खटाववाडी! मराठी साहित्य, मराठी संस्कृती या क्षेत्रात या खटाववाडीला असामान्य असे स्थान होते. अगदी गेल्या वर्षांपर्यंत! अजूनही ते नाही असे नाही, पण ते हळूहळू खालावत आले आहे, हे खरे! या खटाववाडीवर काही लिहायला उत्तम माणसे म्हणजे अनुक्रमे ग. रा. कामत, श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन! कारण हे तिघे काही वर्षे ‘मौज’, ‘सत्यकथा’ या साप्ताहिक-मासिकाचे संपादक होते. पण या तिघांचे एक व्यवच्छेदक लक्षण असे आहे, की त्यांना उत्तम ‘वाचता’ येते, पण त्यांना धड दोन शब्द लिहिता येत नाहीत. त्यांना अगदी दोन शब्द लिहिण्याचा आग्रह केलाच तर ते लिहितील- ‘साभार परत’!

गेली ३५ वर्षे माझा खटाववाडीशी संबंध आहे. प्रथम मी तिथे नोकर होतो. तिथून गेल्यावर मी त्यांच्या ‘सत्यकथे’त कथा लिहिल्या. पण मी ‘त्यांचा’ लेखक कधी झालो नाही. त्यामुळेच असेल कदाचित, मी त्यांचा मित्र झालो. ‘परचुरे’ आणि ‘ललित’ या दोन मासिकांत मी २० वर्षे ‘ठणठणपाळ’चे सदर लिहिले. त्यात सर्वाधिक थट्टा, चेष्टा, मस्करी मी या खटाववाडीची केली. ‘सत्यकथा’ मासिक बंद झाले तेव्हा मला दु:ख झाले; पण त्याहीपेक्षा माझे नुकसान झाले असे मला वाटले. मासिक बंद झाल्यावर मी श्री. पु. भागवतांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते की, ‘सत्यकथा बंद करून तुम्ही ठणठणपाळचा एक हुकमी विषय कायमचा बंद केलात!’

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
what is ring of fire
यूपीएससी सूत्र : भूकंपप्रवण क्षेत्र असलेले ‘रिंग ऑफ फायर’ अन् कचाथीवू बेटाचा वादग्रस्त इतिहास, वाचा सविस्तर…

मी खटाववाडीचा लेखक नसलो तरी मी तिथला ‘घरचा’ होतो. अधिककरून विष्णुपंत भागवतांच्या दृष्टीने! मी खटाववाडीत पाय ठेवला १९४८ साली. त्यावेळी खटाववाडीत मौज पिंट्रिंग ब्युरो होता. पण तो आतासारखा उत्कृष्ट छपाई करणारा नव्हता. ‘प्रभात’ (दैनिक), ‘मौज’ (साप्ताहिक) आणि ‘सत्यकथा’ (मासिक) ही तीन पत्रे छापणारा तो छापखाना होता. काही किरकोळ छपाईची कामे या छापखान्यात फावल्या वेळी झाली असतील; पण मुख्य काम ही तीन पत्रे वेळेवर आणि सुबक छापण्याचे!

१९४८ साली मी खटाववाडीत प्रथम पाय ठेवला तो नोकरीसाठी! राष्ट्रसेवा दलातला माझा मित्र राजा केळकर मला विष्णुपंत भागवतांकडे घेऊन गेला. त्यावेळी खटाववाडीत प्रथम पाय ठेवताना माझ्या मनावर खटाववाडीचे जे चित्र उमटले ते आजतागायत आहे तसे आहे. याचे कारण ती खटाववाडीच गेल्या ३५ वर्षांत आहे तशी आहे. सेंट्रल सिनेमाच्या गल्लीत शिरल्याबरोबर तिथे आधी एक गटार फुटलेले असतेच. तिथे चारदा उडय़ा मारून ते ओलांडा. डावीकडे वळा. आता खटाववाडी सुरू झाली! खटाववाडीच्या त्या चिंचोळ्या रस्त्यावर लक्ष ठेवून पाय ठेवला नाही तर पाय मुरगळलाच म्हणून समजा! कडेला एक-दोन हातगाडय़ा दिसतील. त्यावर कुणीतरी तोंडावर फडके टाकून झोपलेलाही असतो. (तो ‘सत्यकथा’चा लेखक नसतो, हे आपले नशीब!) रात्री त्या रस्त्याच्या कडेला कागदाच्या रिमांना गुंडाळलेला निळा पुठ्ठा पसरून तेथे दोन-चार माणसे तरी जमिनीवर झोपलेली असतात. (पूर्वी कधीतरी यात केशवराव कोठावळे यांचा समावेश होता.) थोडे पुढे गेल्यावर जिन्यापाशी डोक्यावर अत्यंत गबाळे पद्धतीने ताडपत्री बांधलेली दिसेल. तिथे सावलीत कागदाचे, फार्माचे, पुस्तकांचे गठ्ठे बांधलेले दिसतील. डावीकडे लग्नमंडपासारखे काहीतरी दिसेल. तेथे छापलेल्या फार्माना घडय़ा घालण्याचे काम.. आणखी पलीकडे बाइंडिंगचे सामान! उजवीकडला लाकडी जिना चढताना भिंतीवर पान-तंबाखू खाणाऱ्यांनी फेकलेली मोरपिसे दिसतील! तिच्यावर वारंवार सफेदीचे ब्रश ओढले जातात. खटाववाडीतील सतत परिवर्तनाची ही एकमेव जागा! एवढी एकच भिंत पुन:पुन्हा रंगवली जाते. पण खटाववाडीचा उपाय चालत नाही. तेथे लाल चिंध्यांचा आकृतिबंध सतत असतो. त्या वास्तूत पुढील काळात सौंदर्यमीमांसेचा अतिरेक झाला असेल, पण भिंतीवरची ती रंगीत कलाकुसर जुनी आहे.

खटाववाडीतील मौज पिंट्रिंग ब्युरोची इमारत जुनी आणि दोनमजली आहे. खालचा सबंध मजला छपाईच्या यंत्रांनी व्यापलेला आहे. ही यंत्रे सुरू झाली की वरचा मजला थरथरू लागतो. वरच्या मजल्यावर अध्र्या भागात कंपोझिंग खाते आहे. उरलेला अर्धा भाग भागवत आणि मंडळी यांनी व्यापलेला आहे. ही इमारत भागवत मंडळींसाठी बांधली गेली, की ती आपल्यास अनुरूप आहे म्हणून तीत भागवत मंडळी आली, हे कळण्यास मार्ग नाही; इतकी ती इमारतही विचित्र आहे. पहिल्या मजल्यावरची पायाखालची जागा लाकडी आहे. शिवाय ओबडधोबड आहे. रेल्वे रुळाखालचे लाकडी ठोकळे ठेवून केल्यासारखी. त्या इमारतीला भिंती अशा नाहीतच! सगळ्या खिडक्याच आहेत आणि त्यासुद्धा भल्यामोठय़ा. देवळाच्या दरवाजासारख्या! आणि सदैव दिवस-रात्र उघडय़ा! छप्पर एवढे उंच आहे की त्यात आणखी एक मजला बसू शकेल. ती जागा कबुतरांसाठी सोडून दिलेली होती. त्यात शे-सव्वाशे कबुतरे वास्तव्याला असत! हल्ली ती कबुतरे तिथे फारशी येत नाहीत. कशाला येतील? हल्ली श्रीपुच फारसे तिथे येत नाहीत. कबुतरे कशाला येतील? या इमारतीत भागवत मंडळींचा छापखाना आला नसता तर तेथे फक्त ख्रिस्ती जोगिणींचे वसतिगृह आले असते, अशीच त्या इमारतीची रचना आणि त्यातले वातावरण आहे. त्या इमारतीला जन्मजातच जुनाटपणा आहे. आणि तो या जन्मी बदलला जाण्याची शक्यता नाही! शिवाय त्या इमारतीत साधेपणा, साधुत्व, वैराग्य यांच्याही खूप छटा आहेत.

जी अवस्था या इमारतीची, तीच अवस्था त्या वास्तूत वावरणाऱ्या सर्वाची! विष्णुपंत भागवत हे तेथील क्रमाने, वयाने तिसरे. पण दैववशात त्यांच्याकडे कर्तेपण आले होते. घरातल्या कर्त्यां पुरुषाचे निधन झाल्यामुळे त्यांना सगळा भार खांद्यावर घेणे भाग होते. थोरले जयरामपंत व्हीजेटीआयचे इंजिनीयर. दुसरे वासुदेवराव वैद्य. तिसरे विष्णुपंत बी. एस्सी.ला. सर्वजण आपापल्या लायनी सोडून मौजेत आले. त्यातले विष्णुपंत हे ध्येयनिष्ठा, स्वप्नाळूपणा वगैरेचे कडबोळे होते. १९४७ साली १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. त्या समारंभाला ते चौपाटीवर गेले होते. मध्यरात्रीच्या त्या वातावरणाने ते भारावून गेले आणि तेथल्या तेथे त्यांनी ‘प्रभात’ दैनिक विकत घेऊन चालवायचा निर्णय घेतला. श्रीपाद शंकर नवरे संपादक होते. विष्णुपंत भागवत न्यूज एडिटर. वरच्या मजल्यावर अध्र्या भागात कंबरभर उंचीची कपाटे आडवी-उभी लावून खोल्या पाडल्या होत्या. लाकडी जिन्याने वर येताच एक भलामोठा चमत्कारिक उंबरठा आहे. ‘हर्डल’च्या शर्यतीसाठी रचून ठेवल्यासारखा. तो उंबरठा ओलांडला की तेथेच जुन्या ब्लॉक्सची रास, ‘सत्यकथे’चे गठ्ठे, शाईचे डबे वगैरे अनेक गोष्टी ठेवून मार्ग आणखी अवघड केलेला दिसेल. मग उंच लाकडी पट्टय़ांचे कुंपण. त्यातून आत आल्यावर खाणावळीत टेबले- खुर्च्या मांडून ठेवलेल्या असतात तशी लिहायची लाकडी टेबले आणि खुर्च्या मांडलेल्या होत्या. एकाही खुर्चीला हात नाही! (पाठ मात्र असायची!) डावीकडे तीन टेबले. उजवीकडे तीन टेबले. एका कोपऱ्यात पीटीआयची सतत थडथडणारी मशीन. त्या मशीनच्या जवळ विष्णुपंत भागवत- ‘प्रभात’चे न्यूज एडिटर. त्यावेळी विष्णुपंत वयाने सत्तावीस वर्षांचे होते. पण ते पन्नाशीतील दिसत. त्यांनी कधी तारुण्य उपभोगले नाही. ते कधी तरुण दिसलेच नाहीत. त्यांनी कधी कसले उपभोग घेतले नाहीत. गिरगावात वेलणकरची मिसळ आणि कुलकण्र्याची भजी प्रख्यात होती. पण विष्णुपंत (आणि इतर भागवतही) तेथे कधी फिरकले नाहीत. विष्णुपंतांची मोठी चैन म्हणजे चिमूटभर तपकीर! मोठय़ा आर्थिक जबाबदारीने ते चेपलेले होते. मी ‘प्रभात’मध्ये वार्ताहर होतो. पगार सत्तर रुपये होता. त्यासाठी दोन महिने मी खेटे घालीत होतो. माझी नेमणूक झाल्यावर ते एकदा मला म्हणाले, ‘तुम्हाला मी मुद्दाम खेटे घालायला लावले नाही! नवीन फायनॅन्शियल जबाबदारी घेण्यापूर्वी विचार करावा लागतो!’ ते ऐकून मला थोडेसे हसू आले. पण ‘प्रभात’ची जबाबदारी घेऊन ते आर्थिकदृष्टय़ा थकले होते हे खरे होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘प्रभात’चा खप वाढत नव्हता. जाहिराती मिळत नव्हत्या. पण माझ्यासारख्या शिकाऊ लोकांना मात्र ‘प्रभात’सारखे दुसरे दैनिक नव्हते. तेथे संपादकीय खात्याला फक्त कंपोझिंग आणि प्रिंटिंग करावे लागत नसे, बाकी सर्व कामे करावी लागत- गरजेप्रमाणे! त्यामुळे वृत्तपत्रीय शिक्षण चांगले होई.

डावीकडे दोन छोटी कपाटे लावून एका कोपऱ्यात संपादकांची आखूड खोली केलेली होती. एक खुर्ची, समोर छोटे टेबल, पलीकडे पाहुणे आले की त्यांना बसण्यासाठी दोन खुर्च्या. तेथून पलीकडे ‘मौज-सत्यकथा’चे ऑफिस. तेथे दोन टेबले आणि चार-पाच खुर्च्या.

येथे जमा झालेली सर्व माणसे वेगळी आणि चमत्कारिक होती. त्यांची आजही आठवण झाली तरी गंमत वाटते. एका खुर्चीत काकतकर नावाचे गृहस्थ होते. पन्नाशी ओलांडलेले. हाडकुळे, बुटके, गोरे. खादीचा आखूड पायजमा, वर आखूड सदरा- आटल्यासारखा! डोक्यावर टोपी, डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा. शिवाय त्यांच्या टेबलावर वेगळे मॅग्निफाइंग ग्लास असायचेच! त्यांच्या खुर्चीच्या मागे त्यांची छोटीशी पत्र्याची बॅग होती. कारण ते तेथेच राहायचे. तरुणपणी त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली होती. अविवाहित होते. ते कधी कुणाशी बोलत नसत. अगदीच विनोदी असे काही कानावर पडले तर गच्च आवळून धरलेले ओठ किंचित सैल होत. त्यांना तिथे पगार होता, पण ते काय काम करीत असत ते मला कधीच कळले नाही. त्यांनासुद्धा माहीत होते की नाही, कोण जाणे! रात्री ते शेजारचे टेबल ओढून वर बसत. तासभर चरखा फिरवून सूत काढीत आणि मग अक्षरश: तिरडीवर ठेवल्यासारखे झोपी जात. भल्या पहाटे खाली नळावर अंघोळ करीत आणि तिथेच फेऱ्या मारीत. सकाळी आठ वाजता विष्णुपंत ऑफिसात येण्याआधी ते आपल्या खुर्चीत बसायचे. खूप वर्षांनी त्यांनी खटाववाडी सोडली.  ते कुठेतरी म्हातारपणचे दिवस घालवण्यासाठी आपल्या नातेवाईकाकडे गेले. पुढे कळले, की ते वेडे झाले. त्यावेळी माझ्या मनात विचार आला होता- ते खटाववाडीतच राहिले असते तर वेडे झाले नसते.. किंवा निदान दिसले तरी नसते!

रात्रपाळी चालू असताना तिथे आणखी एक झोपणारे म्हणजे श्रीपु! खटाववाडीच्या मागे गोरेगावकर चाळीत सर्व भागवतांची जागा होती. पण तिथे गर्दी होई. म्हणून श्रीपु रात्री झोपायला ‘प्रभात’मध्ये येत. दोन टेबले जोडून झोपत. पोटावर हाताची घडी आणि उशीला मौजेच्या फायलींची घडी! ‘प्रभात’ची मशीन धडधडू लागली की त्यांना झोप येई. मशीन थांबली की ते जागे होत.

‘प्रभात’ दैनिकाचे मुख्य संपादक श्रीपाद शंकर नवरे. त्यांना सर्व जण ‘पंत’ म्हणत. ‘प्रभात’चे मालक भागवत होते, पण प्रत्यक्षात खरे मालक नवरे होते. शिवाय ते सर्व भागवतांचे वडीलबंधू होते. त्यांच्या सल्ल्याशिवाय विष्णुपंत काही करीत नसत. पंत खरोखरच काय सल्ला देत, देव जाणे!  कारण त्यांचे ‘प्रभात’कडे तसे लक्ष नव्हते. ते जुन्या थाटाचे संपादक. मनाने खरे सुधारक. माटुंग्याच्या अनाथ महिलाश्रमाच्या कार्यात त्यांचे सारे लक्ष असे! उरल्या वेळेत संयुक्त महाराष्ट्र. त्यातून उरलेल्या वेळेत ‘प्रभात.’ एक अग्रलेख आणि ‘प्रभातची किरणे’मध्ये दोन टिपणे एवढे डिक्टेट करून ते मोकळे व्हायचे. बाकी पेपरशी त्यांचा संबंध नव्हता! जुन्या जमान्यातल्या कोणाचे निधन झाले म्हणजे त्यावर अग्रलेख लिहावा फक्त पंतांनी! पंतांचा बाया कर्वेंवरील अग्रलेख अद्याप माझ्या स्मरणात आहे. प्रभाकर पाध्ये ‘नवशक्ति’चे संपादक होते. ते म्हणायचे- ‘या पंतांनी आपल्यावर अग्रलेख लिहावा म्हणून लवकर मरावेसे वाटते!’ पंतांचे धोतर, शर्ट, कोट, वर गांधी टोपी. संपूर्ण पोशाख घरी धुतल्यामुळे चुरगळलेला. पण त्या पोशाखाकडे लक्ष जात नसे- इतका त्यांचा चेहरा सात्त्विक आणि प्रसन्न! त्यांना चिडलेले मी कधीच पाहिले नाही! ‘प्रभात’ चालत नाही म्हणून बंद करण्याचा निर्णय झाला तेव्हा ‘कळावे, लोभ असावा, ही विनंती’ असा आठ कॉलमी मथळा टाकून आणि त्याखाली आपले निवेदन लिहून ते उठले आणि खुर्चीला अडकवलेली पिशवी उचलून नेहमीप्रमाणे शांतचित्ताने घरी निघून गेले.

‘प्रभात’च्या ऑफिसच्या मागल्या बाजूला खिडकीकडे जी दोन टेबले होती, तेथे मराठी साहित्यातले बोल्शेविक प्रचंड क्रांती करायला सज्ज झाले होते. एका टेबलापाशी ग. रा. कामत. त्या टेबलाला काटकोनात लावलेले दुसरे टेबल. त्या टेबलापाशी श्री. पु. भागवत. तरुण वयातले श्री. पु. हे फडक्यांच्या कादंबरीतल्या नायकाप्रमाणे देखणे आणि प्रेक्षणीय होते. शिवाय न. र. फाटकांचे आवडते विद्यार्थी. एम. ए. परीक्षेत वर्ग, पारितोषिक वगैरे! त्यामुळे त्यांची ‘एन्ट्री’ विलक्षण वाटे. पण गांभीर्य पहिल्यापासून! टेबलापाशी डाव्या तर्जनीचे टोक उजव्या हाताच्या बोटांनी चोळत ते बसले की ‘चिंता करितो विश्वाची’ असे ते मनातल्या मनात म्हणत आहेत असे वाटे. ते फडक्यांच्या नायकाप्रमाणे दिसत. म्हणजे लालबुंद गोरे, घारे डोळे. डोकीवर केस थोडे विरळ होते. पण मधोमध भांग पाडण्यापुरते होते. तलम धोतराचा काच्या, ओपन कॉलरचा शर्ट. वर तपकिरी रंगाचा वूलन कोट. (त्याला पितळेची चकचकीत बटणे होती का?) त्यांच्या एकूण आविर्भावामुळे ते फडक्यांचे नायक वाटले तरी कोणा तरुणीवर प्रेम करतील असे वाटत नसे! पण त्यांनी एका मुलीवर प्रेम केले आणि भागवत आणि मंडळी हादरली. पुढे एकदा गंगाधर गाडगीळ मला कुठल्या तरी संदर्भात चेष्टेने म्हणाले- गाडगीळांची चेष्टा म्हणजे गाल फुगवून गोलाकार आवाज काढीत म्हणाले- ‘श्रीपुंची आयुष्यातली मोठी क्रांती म्हणजे स्वत: चित्पावन असून त्याने कऱ्हाडय़ा मुलीशी लग्न केले! श्रीपुंची ही सर्वात मोठी क्रांती! त्यापुढे फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती.. काहीच नाहीत! होऽऽ होऽऽ होऽऽ’ (हे गाडगीळांचे हसणे!)

‘मौज’ साप्ताहिक आणि ‘सत्यकथा’ यांचे संपादक म्हणून विष्णुपंत भागवतांचे नाव होते. ते ‘मौज’वर लक्ष ठेवीत. ‘सत्यकथे’कडे त्यांचे लक्ष नसे. पण ‘मौज-सत्यकथे’चे जे काही बरे-वाईट होत होते ते या दोन टेबलांवरून होत होते. ‘मौज’ हे साप्ताहिक असल्यामुळे आणि त्याला निखळ ‘साहित्यिक’ स्वरूप नसल्यामुळे या दोन टेबलांकडून ‘मौज’चे सारथ्य व्हावे तसे होत नव्हते. म्हणून विष्णुपंत स्वत: वि. गं. देशपांडे आणि अंबादास अग्निहोत्री यांची दर आठवडय़ाला मदत घेत. हे दोघे ‘लोकमान्या’त नोकरीला होते. अंबादास ‘माणूस’ या टोपणनावाने दर आठवडय़ाला एक याप्रमाणे अनेक वर्षे ‘मौज’मध्ये कथा लिहायचा. मी पुढे ‘लोकमान्या’त गेलो. तेथे पाहिले- अंबादास अनेकदा रात्रपाळी संपवून झोपण्याऐवजी ‘मौज’ची कथा लिहीत बसायचा. त्याला त्याबद्दल प्रथम पंधरा रुपये आणि नंतर पंचवीस रुपये मिळायचे. वि. गं. देशपांडे हे वेताच्या काठीसारखे सडसडीत, लवचीक. खादीचा पोशाख, पायजमा, सदरा व टोपी. सगळे शुभ्र! यांच्याइतका संतप्त माणूस माझ्या पाहण्यात नाही. कधी हसले तरीसुद्धा चिडून हसत. पण मराठी, गुजराती, हिंदी आणि बंगाली वाङ्मयाचा दांडगा व्यासंग! ते सदैव विरोधी पक्षाचे होते. मौजेत सकाळी (सकाळी श्री. पु. व कामत आलेले नसत.) ते ‘सत्यकथे’तल्या एखाद्या कथेवर कडाडून हल्ला करीत. पण त्याच कथेवर दुपारी ‘लोकमान्य’मध्ये कोणी टिंगलवजा टीका केली तर त्याच कथेचा कैवार घेऊन ते जबरदस्त भांडत! ‘मौज’मध्ये त्यांच्या नावाने आणि नावाशिवाय खूप लेखन असे. ‘मौज’मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि रामदास भटकळही नाटक-चित्रपट या विषयावर लेखन करीत. ‘त्यामुळेच ‘मौज’ लवकर बंद झाली,’ असे काही जण चेष्टेने म्हणत. द्वा. भ. कर्णिकदेखील लिहीत. त्याआधी काही दिवस कर्णिक ‘प्रभात’चे न्यूज एडिटर म्हणूनही काम पाहत होते. पण ‘मौज’मधले लेखन खरे लोकप्रिय झाले ते व्यंकटेश माडगूळकर यांचे. त्यांचे ‘माणदेशी माणसे’ हे सदर प्रथम ‘मौजे’त आले आणि ते खूपच लोकप्रिय झाले. त्या सदरात ते दर आठवडय़ाला एक व्यक्तिचित्र लिहायचे. प्रत्येक व्यक्तिचित्राला चित्रकार दीनानाथ दलालांचे चित्र असायचे. माडगूळकर त्याकाळी पोटाच्या विवंचनेने मुंबईला आले होते. त्यांना राहायला निवांत अशी जागा नव्हती. त्या काळात जागेची फार मोठी टंचाई नव्हती, पण माडगूळकरांना पैशाची टंचाई होती. एका ‘माणदेशी माणसा’साठी माडगूळकरांना पंधरा-वीस रुपये मिळत असतील-नसतील! पण त्या ‘माणसां’मुळे माडगूळकर लेखक म्हणून पुढे येत होते. ते लिहायला ‘मौज’मध्येच यायचे. जे टेबल रिकामे दिसेल तेथे बसायचे. त्यावेळी त्यांचा संपूर्ण खादीचा, पण मळकट पोशाख असायचा. पायजमा, तर कधी धोतर, वर सदरा. सगळा पोशाख एवढा ढगळ असायचा की त्यात ते खूप जाडेजुडे दिसायचे. मुळात होते ते खूप सुटलेले. त्यांचा रापलेला लालसर चेहरा, राठ केस आणि पोशाख यामुळे मुंबईचे ते वाटत नसत. काँग्रेस आमदारासारखे दिसत! त्यांना काही सुचले नाही म्हणजे ते तेथेच फेऱ्या मारत. मग विष्णुपंत अस्वस्थ होत. वेळेवर लिहून होईल की नाही- या विचाराने! त्यांना स्फूर्ती यावी म्हणून विष्णुपंत ऑर्डर देत- ‘शंकर, चहा आणायला सांग!’ खटाववाडीत ‘मौज’च्या जिन्यापाशीच एक गुजराती ‘भट’ होता. तो चहा घेऊन यायचा. खटाववाडीतली आमची सर्वात मोठी चैन म्हणजे या भटाचा चहा! तो कानापर्यंत किटली ओढून एक-एक कप भरायचा.. आणि कटकट कटकट आवाज करीत कप प्रत्येक टेबलावर ठेवत जायचा- सकाळी आणि संध्याकाळी! सर्वाना मोफत!

या काळात खटाववाडीत मोठी वट होती ती ग. रा. कामत यांची. हे ‘सत्यकथे’चे संपादक. न. र. फाटकांचे विद्यार्थी. श्री. पुं.चे वर्गमित्र. आणि  असेच वर्ग, पारितोषिके वगैरे मिळवून एम. ए. झालेले. ते ‘सत्यकथे’चे- नव्या ‘सत्यकथे’चे पहिले खरे संपादक. अफाट वाचन आणि जबरदस्त बडबडे. त्यांचे हसणे म्हणजे आढय़ावरची पाचपन्नास कबुतरे फडाफडा आवाज काढीत उडून जात आणि श्री. पु. सौम्यपणे बोलू लागले की ती परत येत आणि घुमू लागत. श्रीपुंना वरची कबुतरे बघायची सवय होती. आपले घारे डोळे वर करून कबुतरे आपल्या डोक्यावर आहेत का काय ते ते बघत. मी त्यांची चेष्टा करताना ‘ललित’च्या ‘ठणठणपाळ’ सदरात लिहिले होते- ‘श्री. पु. उच्चभ्रू आहेत असा लोकांचा समज होतो तो या कबुतरांमुळे! कबुतर वरून ठिपका टाकेल म्हणून ते भुवया उंचावून वर बघतात. ठिपका कबुतरांचा आणि ठपका मात्र श्रीपुंवर!’..एखादा नको तो कथाकार कथा घेऊन आला आणि हुज्जत घालून श्रीपुंना छळू लागला की तो अखंड बोलत असताना श्रीपु आढय़ावर कागदाचे बोळे फेकून कबुतर हाकलण्यात दंग होऊन जात. तो तेथे बोलतो आहे आणि श्रीपु जोराने बोलिंग केल्याप्रमाणे कुबतरांवर बोळे फेकताहेत.

श्री. पु. आणि ग. रा. यांच्यासमोर संध्याकाळी गराडा पडलेला असे. गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, पु. शि. रेगे हे तर नेहमीचेच. मग काय श्रीराम कामत, मंगेश पाडगांवकर, सदानंद रेगे.. पुण्याहून आले असले तर अरविंद गोखले वगैरे. जबरदस्त गप्पा चालत. त्यात भाव्यांच्या गप्पा भांडल्यासारख्या आवाजात! गाडगीळांची सायकॉलॉजी, अंतर अन्कॉन्शस, मनाचे पापुद्रे वगैरे भानगड होती. पु. शि. रेगेंचा आवाज कमी येई. आवाज न करता आपले माठासारखे अंग हलवत त्यांचे हसणे अधिक असे. त्यांच्या डोळ्यांचा पांढरा भाग त्यांच्या चष्म्यातून गमतीदार आणि खूप उठावदार दिसे. ते बसले की त्यांची पहिली हालचाल डोळ्यांची असे!

अशाच एकदा गप्पा चालल्या होत्या. फक्त श्रीपु होते. समोर गाडगीळ आणि पु. शि. रेगे. गाडगीळ कुठेतरी वाचून आले होते.. ‘नवरा- बायको दीर्घकाळ प्रेमाने एकत्र राहतात तेव्हा त्यांची रूपे एकमेकांवर आरोपित होतात.. ती दोघे एकमेकांसारखी दिसू लागतात.’ म्हणजे गाडगीळांचे हे सायकॉलॉजीतले लफडे होते आणि ते गंभीरपणे सांगत होते. श्रीपुही ते सर्व गंभीरपणे ऐकत होते. पण पु. शि. रेगे मात्र चष्म्याच्या आत डोळे नाचवीत होते. पुशिंचा चेहरा म्हणजे घारापुरीतल्या त्रिमूर्तीतली एक मूर्ती! ते आपले अंग गदागदा हलवीत एकदम हसले आणि श्रीपुंची फिरकी घेण्यासाठी म्हणाले, ‘भागवत, तुम्ही कसली काळजी करताय? तुमच्यावर कसलाही परिणाम होणार नाही!’ भागवत तेवढय़ात गंभीरपणे म्हणाले, ‘मी चिंता करतोय सरिताबाईंची! तुमचं रूप त्यांच्यावर आरोपित झाले तर काय होईल?’ (सौ. सरिताबाई रेगे दिसायला खूप चांगल्या होत्या!) ते ऐकताच पु. शि. रेगे कृत्रिमपणे हसले आणि पटकन् जायला उठले!

ग. रा. कामत ‘सत्यकथे’त फार काळ टिकले नाहीत! कारण गरांची संपादनाची कल्पना वेगळी होती. लेखकांना भेटून चर्चा करणे, त्यांना लिहिते करणे, उत्तेजन देणे, त्यांना दाद देणे या गोष्टींवर त्यांचा भर होता. त्यामुळे आलेल्या लेखकांशी ते मोठमोठय़ाने गप्पा मारीत. खदखदा हसत. लहर आली तर लेखकांच्या खांद्यावर हात टाकून त्यांच्याबरोबर निघून जात. शिवाय अधूनमधून गडबडीने तरातरा चालीने पान- तंबाखू खायला जात. आणि पिचकाऱ्या टाकीत येत. आले नाहीत तोच पुन्हा निघून जात. एके जागी स्थिर बसणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. ते विष्णुपंतांना आवडत नसे. त्यांची संपादनाची कल्पना वेगळी होती. विशेषत: त्यांच्या शिस्तीच्या कल्पनेत किमान पाच-सहा तास त्यांनी खुर्चीत चिकाटीने बसणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि गरा निघून गेले.

मग श्रीपुंच्या साहाय्याला राम पटवर्धन आले. (त्याआधी काही दिवस अनंत भावे तेथे बसत असत. तेव्हा ते दाढीवाले नव्हते. आताएवढे हसतही नसत. ते जेवढय़ा गडबडीने आले तेवढय़ा गडबडीने निघून गेले!) राम पटवर्धनांनी दीर्घ काळ ‘मौज’ आणि ‘सत्यकथे’चे प्रत्यक्ष संपादन केले. यांचे संपादन ग. रा. कामतांच्या नेमके विरुद्ध! विष्णुपंतांना हवे तसे! पटवर्धन कधी लेखकाशी मनमोकळ्या गप्पा मारत बसले नाहीत. लेखकाबरोबर किंवा लेखक शोधायला बाहेर पडले नाहीत. ते चांगल्या कथेला दाद देत; पण ती दिलखुलास नसे! ‘वा:!’ असा एखादा उद्गार काढून चष्म्याच्या वर डोळे फेकले की त्यांची दाद झाली! ‘कथा फसली.. बटबटीत झाली.. भिजली नाही.. टोक आले नाही,’ वगैरे शब्दप्रयोग त्यांनी रूढ केले आणि त्याची खासगीत चेष्टा होऊ लागली. राम पटवर्धनांनीच र. कृ. जोशी यांच्या काही कविता त्यांच्या हस्ताक्षरात ब्लॉक करून छापल्या. त्यावर हैदराबाद साहित्य संमेलनात वा. ल. कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात टीका केली होती. पण पुढे रकृंची नुसतीच अक्षरे आणि आकडे यांचे आकृतिबंध कविता म्हणून छापण्याची प्रथा सुरू झाली. आणीबाणीत तर ‘सत्यकथे’च्या कव्हरवर विसाचा पाढासुद्धा छापण्यात आला. तो इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाचा निषेध होता, असे त्या कवितेचे काही जणांनी इंटरप्रिटेशन केले.

१९६९ च्या प्रारंभी राजा ढाले यांनी ‘येरू’ नावाचा एक अनियतकालिकाचा अंक काढला. तो संपूर्ण अंक (४५ पाने) ‘सत्यकथेची सत्यकथा’ सांगण्यात खर्ची घातला होता. ‘येरू’च्या शेवटच्या पानावर पुढीलप्रमाणे ‘जाहीर’ बोलावणे होते- ‘आमचे येथे आमचे कृपे करून मराठीतील उच्चभ्रू मासिकाची होळी करण्याचे घाटत आहे. यानिमित्ताने सत्यकथेच्या एका अंकाची होळी केली जाईल. या प्रसंगी सुप्रसिद्ध तापसी तरुण हजर राहतील. उदाहरणार्थ, विख्यात बोंबलभांडय़ा राजा ढाले, थोर बोंबलभिके अशोक शहाणे, भालचंद्र नेमाडे, रमेश रघुवंशी, एकनाथ पाटील, तुलसी परब, वसंत गुर्जर वगैरे. तरी दिनांक ५ मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता खटाववाडीच्या गल्लीत इष्ट मित्र-मैत्रिणींसह उपस्थित राहून या मंगल समारंभाला शोभा आणावी. – राजा ढाले, तुलसी परब, वसंत गुर्जर.’

त्याप्रमाणे त्यांनी त्या दिवशी बोंब मारून ‘सत्यकथे’च्या अंकाची होळी केली. पण ‘सत्यकथे’वर त्याचा काही परिणाम झाला नाही! होळी करणाऱ्यांतल्या काही जणांनी लेखनच बंद केले. आणि काहीजण निमूटपणे ‘सत्यकथे’कडे लिहू लागले! हे सारे झाले तरी ‘सत्यकथे’त आपली कथा यावी असे प्रत्येक नवीन लेखकाला वाटायचे, हेही तेवढेच खरे! ‘सत्यकथा’वाले लेखकांना कथांचे शेवट (एण्ड) सुधारायला लावतात आणि म्हणून विद्याधर पुंडलिक संपूर्ण कथा पाठवण्याआधी नुसताच ‘एण्ड’ आधी पाठवतात अशी आख्यायिका प्रचलित होती. श्री. ज. जोशींची कथा ‘सत्यकथे’ने परत केली की श्री. ज. खूप चिडायचे. ते चिडून म्हणायचे- ‘सत्यकथेसाठी आम्ही मुद्दाम वाकडय़ा वळणाची कथा लिहितो. ती सत्यकथेने परत केली की दुसरा कोणीच तिला हात लावीत नाही. आणि आमची कथा फुकट जाते!’ (अर्थात पुढल्या वर्षी ते तीच कथा आणखी वाकडी करून ‘सत्यकथे’कडेच पाठवायचे आणि ती छापूनही यायची!)

विष्णुपंत आणि श्रीपु यांच्या मनाचा एक मोठेपणा घेण्यासारखा होता. एकदा राम पटवर्धनांना संपादक नेमल्यानंतर त्यांनी पटवर्धनांच्या कामात ढवळाढवळ केली नाही. राम पटवर्धनांना सर्व तऱ्हेचे प्रयोग करण्यास त्यांनी मुक्त स्वातंत्र्य दिले.

अर्थात खटाववाडीच्या हट्टापायी प्रत्येक नियतकालिक क्रमाने बंद होत गेले! त्याचे सर्व भागवतांत अधिक दु:ख झाले ते विष्णुपंतांना. त्यांना काहीतरी करण्याची, चालवण्याची जिद्द होती. पण आर्थिक नुकसान सोसण्याची ऐपत नव्हती. भागवतांपैकी कोणालाही- म्हणजे एकूण खटाववाडीलाच धंद्याचा दृष्टिकोन नव्हता.  जाहिरातीचे आणि खटाववाडीचे सदैव वाकडे! ‘प्रभात’ दैनिक बंद केले तेव्हा विष्णुपंत म्हणाले, ‘‘प्रभातच्या तोटय़ामुळे ‘मौज’, ‘सत्यकथे’कडे दुर्लक्ष होत होते. आता आम्ही ‘मौज-सत्यकथा’कडे भरपूर लक्ष देऊ शकू! ’’ तेवढय़ात त्यांना ‘मौज’ बंद करावे लागले. विष्णुपंतांच्या डोळ्यात पाणी आले.  ते पुन्हा तेच म्हणाले, ‘‘आता आम्ही ‘सत्यकथा’ उत्तम चालवू शकू.’’ शेवटी ‘सत्यकथा’ बंद झाले. ते बघायला विष्णुपंत हयात नव्हते.

खटाववाडीतले भागवत बंधू हे एक मोठे करमणुकीचे आणि त्याचबरोबर उद्बोधक प्रकरण होते.  जयरामपंत, वासुदेवराव, विष्णुपंत आणि श्रीपु. (प्रभाकरपंतांचा तोपर्यंत उदय झाला नव्हता.) शुभ्र धोतरे, लॉंग क्लॉथचे एकसारखे शुभ्र शर्ट आणि एका रंगाचे एका कापडाचे सर्वाचे कोट. (अपवाद श्रीपु!) शर्टिगचा आणि कोटिंगचा एक-एक तागा घेतला की त्यात सगळे भागवत बसले. अंबादास अग्निहोत्री विनोदाने म्हणायचा- ‘काही बंधू प्रेमाच्या धाग्याने बांधले जातात. पण भागवत ताग्याने बांधले गेले आहेत.’ आणि तो हसायचा.

यांतले जयरामपंत हे सर्वात वेगळे होते.  विशेष म्हणजे त्यांना खूप हसण्याची सवय होती.  हसणारे असे ते एकमेव भागवत. आता ते खटाववाडीतून दूर असलेल्या मौज फाउंड्रीचे काम पाहतात. पण ते खटाववाडीत होते तेव्हा त्यांना छापखान्यात फेऱ्या मारणे, अधूनमधून मोठय़ाने हसणे आणि कबुतरे उडवणे हे काम होते. त्यात खरे हुशार होते ते वासुदेवराव! ते वैद्यबुवा होते. त्यामुळे सर्व नियतकालिकांच्या नाडीवर त्यांचा बरोबर हात होता. ते स्वत: हिशेबाचे खाते सांभाळीत. त्यामुळे जाते काय आणि येते काय, याकडे त्यांचे लक्ष असे. माझी नेमणूक झाली आणि मी एक टेबल अडवून बसलो. त्यावेळी खटाववाडीत सर्वात आधी माझ्यावर संशयास्पद नजर फिरवली ती या वासुदेवरावांनी!  हा कोणीतरी आमचे खायला बसलेला आहे अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले. तेथे येणाऱ्या प्रत्येक लेखकाकडे ते त्याच नजरेने पाहत. छापखान्याची कमाई हे लोक येऊन खातात असे त्यांना वाटे. त्यांना साहित्य,  संस्कृती वगैरेमध्ये काही रस नव्हता. ‘प्रभात’ आणि ‘मौज’ बंद करण्यात त्यांचा व्यवहारी हात होता.  पुढे ते निवर्तले.  पण ते हयात असते तर ‘सत्यकथा’ कधीच बंद करून त्यांनी खटाववाडीच्या नाक्यावरच गुरखा बसवला असता. आणि जोशी-पुंडलिक वगैरेंना प्रवेश बंद केला असता!

श्रीपुंचे खरे लाड केले ते विष्णुपंतांनी. श्रीपुंना हवी तशी त्यांनी ‘सत्यकथा’ घडवू आणि बिघडवू दिली. खंबीरपणे ते श्रीपुंच्या मागे उभे राहिले. ‘आमचे सांस्कृतिक खाते’ असा ते आमच्याकडे श्रीपुंचा उल्लेख करीत. आम्ही त्यांच्यासमोर श्रीपुंची चेष्टा केली (अर्थातच श्रीपुंच्या पश्चात) तर ते तोंड बाजूला करून तोंडावर हात ठेवीत आणि भरपूर हसून घेत. तथापि श्रीपुंच्या विद्वत्तेबद्दल त्यांना अतोनात आदर होता. खरे पाहता खटाववाडी म्हणजे श्रीपुच! खऱ्या अर्थाने खटाववाडीबद्दल ज्या आख्यायिका महाराष्ट्रभर प्रसृत झाल्या त्या श्रीपुंमुळेच! टीका, चेष्टा आणि आदर असे विचित्र आणि दुर्मीळ मिश्रण श्रीपुंच्या वाटय़ाला आले. टीका करणारे आणि चेष्टा करणारेही शेवटी श्रीपुंना मानत आले आहेत ते श्रीपुंच्या तटस्थ विद्वत्तेमुळे.. त्यांच्या गांभीर्यामुळे. अन्यथा खटाववाडीला गेली चाळीस वर्षे जे स्थान प्राप्त झाले आहे ते झालेच नसते.

या व्यवहारी जगात खटाववाडीला व्यवहार साधला नाही, हे खरे! त्यांची पुस्तक प्रकाशने चालू आहेत. त्यातही मोठा व्यवहार नाही. अलीकडे ज्या पद्धतीने त्यांनी दुसऱ्या आवृत्त्या मोकळ्या करून बहुतेक सर्व लेखक मोकळे सोडले ते पाहता तेथेही श्रीपुंचा धंद्याचा दृष्टिकोन नाही हे लक्षात येते. कोणी सहज काढू शकणार नाही असे एखादे उत्तम पुस्तक काढून त्या लेखकाला त्या पुस्तकाने प्रकाशात आणायचे- एवढाच त्यांचा उद्देश दिसतो.

श्रीपुंना व्यवहाराची जोड नाही असे म्हणून दोष देण्यात अर्थ नाही. कारण तो त्यांचा दोष नव्हे! आणि या भागवतांचे काका म्हणजे पांडोबा भागवत. ते कामगारांना कर्जे देत आणि त्यांना ती परत फेडता यावीत म्हणून वर पगारवाढ देत. ही अव्यवहाराची परंपराच तेथे आहे! त्याला विष्णुपंत काय करणार आणि श्रीपु काय करणार?

आता खटाववाडीतली नुकसानीची, तोटय़ाची बिळे बुजली आहेत. प्रभाकरपंत भागवत आणि माधवराव भागवत कार्यक्षम आहेत. ते मौज प्रिंटिंग ब्युरोला हा-हा म्हणता ऊर्जितावस्थेला आणतील. तसे झाले तर मात्र या खटाववाडीला काळिमा लागल्याचे दु:ख या वास्तूलाच होईल! पण त्याला इलाज नाही! ते पुढीलांचे पाप!

– जयवंत दळवी