23 November 2017

News Flash

पाळत ठेवण्याची परवानगी..

तुम्ही मोबाईल कंपन्यांना चोवीस तास तुमच्यावर नजर ठेवण्याची परवानगी देत असता.

राहुल बनसोडे | Updated: September 10, 2017 2:00 AM

गूगलमधून केलेली शोधाशोध, फेसबुकवरचं लिखाण वा ‘लाइक’.. इतकेच काय, आपण न वापरता खिशात वा पर्समध्ये ठेवलेला मोबाईल फोन.. हे सारे आपल्यावर नजर ठेवण्यास- एक प्रकारे पाळत ठेवण्यास उपयोगी पडत असते. आपले सर्वोच्च न्यायालय आपल्याला खासगीपणाचा हक्क देते खरे, पण मोबाईलचे वा समाजमाध्यमांचे वापरकर्ते या नात्याने आपण आपला खासगीपणा आधीच गमावलेला असतो. तुम्ही कोणत्या वस्तू विकत घेता, कोणत्या तुम्हाला घ्याव्याशा वाटतात.. एवढय़ावरच न थांबता, तुम्ही कोणाचा खून करू शकता, इथपर्यंत ही पाळत पोहोचलेली आहे..

साधारण दोन महिन्यांपूर्वी गुजरातेतल्या नवसारी जिल्ह्य़ामध्ये असलेल्या दांडी या शहरात एका मित्राला जायचे होते. ‘भौगोलिक इतिहास’ अशा काहीशा सहज लक्षात न येणाऱ्या व्याख्येभोवती हा वृद्ध मित्र काम करीत असतो. एरव्ही तो फक्त औषधांनी जिवंत ठेवलेला एक चमत्कार आहे असे आमच्यातल्या काहींचे म्हणणे आहे. पण पासष्ट वर्षांचा हा माणूस स्वत:ला आजारी समजत नाही. तो ज्या गोळ्या घेऊन स्वत:ला जिवंत ठेवतो, ती केवळ विज्ञानाची कृपा असून विज्ञानाला अधिक शोधांची गरज असल्यानेच अशा गोळ्या तयार होत आहेत असे त्याचे म्हणणे आहे. समाजात नवे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या वयांत वैविध्य असल्यास अधिक व्यापक शोध लागण्यास मदत होते असे अनेक शास्त्रज्ञ आता खासगीत मान्य करू लागले आहेत. काही महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या वयाच्या निम्म्या लोकांसमोर विनम्रपणे बसून ज्येष्ठ लोक जग नव्याने समजून घेत आहेत. आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा अधिक हुशार आणि अधिक सजग निघाली याचा विषाद न मानता अभिमान बाळगणारे लोक आज जगभरातल्या अनेक महत्त्वांच्या संस्थांमध्ये दिसून येतात. हे चित्र प्रेरणादायी असले तरी ज्या वेगाने संशोधनाचा पट विस्तारतो आहे आणि संशोधनाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडून येत आहेत, त्यामुळे या नव्या पद्धतीत हाती येणारी संशोधने ही अनेकदा विस्मयकारक असतात. अनेकदा ती भयप्रदही असतात.

१ जानेवारी १९४२ ते ३१ जानेवारी १९४८ या काळात मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या ज्या ज्या ठिकाणी होते, त्या त्या ठिकाणी जाऊन नंतर हा सगळा डेटा गुगल मॅप्सच्या मदतीने डिजिटलाइज करण्याचे काम माझा हा पासष्ट वर्षांचा मित्र करतो आहे. अनेकांना माझा मित्र गांधीवादी असावा असे यावरून वाटू शकते. पण या मित्राला ३० जानेवारी १९४८ साली हत्या झालेल्या गांधींपेक्षा ३१ जानेवारी १९४८ रोजी अंत्यसंस्कार झालेल्या गांधींबाबत जास्त कुतूहल आहे. त्याने गांधींनी सहा वर्षांत केलेल्या प्रवासाचा आलेख एखाद्या सायन्स फिक्शनसारखा अ‍ॅनिमेटेड आणि डिजिटल स्वरूपात जेव्हा माझ्यासमोर मांडला, तेव्हा एखाद्या राजकीय विचाराचा प्रसार भौगोलिक परिप्रेक्ष्यात कसा होतो, याचे एक तर्कशुद्ध चित्र माझ्यासमोर आले. या डेटामुळे उगीचच राष्ट्रभक्तीचा कड येणे शक्य होते. पण हा कड येण्याअगोदर वर्तमानातल्या काही दुसऱ्या प्रसिद्ध व्यक्तींचा डेटाही माझ्या पाहण्यात आला. या दुसऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रवासात मोठय़ा जनसंख्येचा मतप्रवाह कसा बदलला याचेही विश्लेषण मला दाखविण्यात आले.

माझा हा मित्र गांधीवादी नसून तो पोलिटिकल सायन्समध्ये कॉम्प्युटर सायन्सचा अधिकाधिक वापर करणाऱ्या वैज्ञानिक सल्लागारांपैकी एक आहे. त्याने संशोधन केलेल्या प्रणालींचा वापर करून कुठल्याही भौगोलिक भागातली राजकीय अनुकूलता बदलली जाऊ शकते. निदान त्याचा तरी तसा दावा आहे. या संशोधनासाठी जसा मुख्य नेत्यांच्या नकाशावरच्या स्थानाचा विचार केला जातो, तसाच त्या त्या भागातल्या प्रत्येक नागरिकाचाही विचार केला जातो. अधिकाधिक नागरिकांचे दिवसभराचे लोकेशन या मॅपवर टाकले जाऊ शकते. प्रत्येक माणसाचा विचार हा एक एकक मानून मग त्याच्या समविचारी माणसांचे निरनिराळ्या समूहांत अथवा झुंडीत वर्गीकरण केले जाऊ शकते. एकाच प्रकारचा शॅम्पू वापरणारे लोक एकाच प्रकारचे नूडल्स खातील असे नाही. एकाच प्रकारची कार चालविणारे लोक एकाच प्रकारचा एसी वापरतीलच असेही नाही. आणि एकाच हॉटेलात जवळजवळ एकसारख्याच प्रकारचे पदार्थ सारख्याच आवडीने खाणारे लोक एकाच राजकीय पक्षाला मत देतील असेही नाही. ही ढोबळ संशोधने अनेकदा गमतीशीर असतात. ज्याला फारसा काही अर्थ असत नाही. पण अमुक एक शॅम्पू वापरणारे लोक अमुक एक कार वापरीत असतील, तर त्यांना अमुक एकाच कंपनीचे नूडल्स आवडण्यासाठी नेमके काय काय करता येईल याची रीतसर स्ट्रॅटेजी संगणक बनवून देऊ शकतात. डेटाचे विश्लेषण करताना त्यातल्या प्रारंभिक गमतीजमती बाजूला पडून ते जेव्हा अधिकाधिक प्रगल्भ होत जाते, तसतसे तो डेटा ज्या व्यक्तींकडून आला आहे त्या व्यक्तींचे खासगी आयुष्य आणि पर्यायाने व्यक्तीसमूहाचे खासगी आयुष्य याबद्दल बरीच विस्तृत माहिती उपलब्ध होऊ शकते. ‘खासगी’ आणि ‘सार्वजनिक’ या दोन शब्दांची व्याख्या आजपर्यंत आपण विरुद्धार्थी किंवा दोन वेगवेगळ्या प्रतलांत घेत होतो. मुंबईत राहणाऱ्या एखाद्या माणसाला कुठल्या प्रकारची अंतर्वस्त्रे आवडतात, ही बाब वैयक्तिक आणि खासगी स्वरूपाची असते. समस्त मुंबईकरांना कुठल्या प्रकारची अंतर्वस्त्रे आवडतात, ही माहिती मोठय़ा व्यक्तीसमूहाबद्दलची असली तरी ती अनेक लोकांच्या खासगी माहितीचे एकत्रित स्वरूप आहे. त्यामुळे या माहितीला ‘सार्वजनिक खासगी’ माहिती म्हणावे लागेल. या सार्वजनिक खासगी माहितीच्या डेटाचे विश्लेषण करून अंतर्वस्त्रांची एखादी कंपनी मुंबईच्या अंतर्वस्त्रांच्या बाजारपेठेचा मोठा भाग काबीज करू शकते. त्यांनी ठरवले तर मुंबईची पूर्ण लोकसंख्या एकाच कंपनीची अंतर्वस्त्रे वापरू शकते.

मोठय़ा व्यक्तीसमूहातील लोकांच्या खासगी आणि सार्वजनिक माहितींचे संकलन करून त्या माहितीचे संगणकांच्या मदतीने केलेल्या तर्कविश्लेषणाला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) असे म्हणतात. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने प्रगत होत असून त्याने माणसाने आजपर्यंत इंटरनेटवर जे काही साठविले त्या सर्व डेटाचे व्यवस्थित चर्वितचर्वण करून त्याचे निरनिराळ्या प्रकारे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे. इथे पुढचा उपस्थित होणारा साधा प्रश्न म्हणजे- हा सगळा डेटा येतो कुठून? आपल्यापैकी बहुतांशांच्या हाती असणारा मोबाईल फोन हे परीकथेतले एक जादुई यंत्र आहे. हे सुंदर, स्लीक डिव्हाइस आपल्या आयुष्याचा इतका मोठा घटक बनले आहे, की तो शरीराबाहेरचा आपला एक अवयवच बनला आहे. आपल्यातल्या बहुतांशांना आपल्या अवयवांबद्दल जितकी जुजबी माहिती आहे, तितकीच जुजबी माहिती, किंवा अगदी ‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणता येईल इतकी कमी माहिती आपल्याला आपल्या फोनबद्दल असते. तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात- अगदी एव्हरेस्ट शिखरावर जरी असलात तरी तुमचा फोन खिशातून बाहेर काढून तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाशी संपर्क करू शकता. मात्र, हाच फोन तुम्ही परत खिशात ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल कंपनीसमवेत एक अलिखित करार करीत असता. या कराराअंतर्गत तुम्ही आपल्या मोबाईल सेवा कंपनीला तुम्ही नेमके कुठे आहात याबद्दलची माहिती ठेवण्यास परवानगी देत असता. यात लगेचच काही गैर वाटत नाही. तुम्ही नेमके कुठे आहात, ही माहिती कंपनीला नसल्यास ती सेवा कशी देऊ शकेल, असा मूलभूत प्रश्न कदाचित तुम्ही विचाराल. जो खरा तर रास्तही आहे. पण या अलिखित करारामुळे तुम्ही मोबाईल कंपन्यांना चोवीस तास तुमच्यावर नजर ठेवण्याची परवानगी देत असता.

तुमची अत्यंत खासगी माहिती तुमच्या फोनला असते. तुम्ही कुठे राहता आणि तिथून तुमचे ऑफिस किती अंतरावर आहे, तुम्ही रविवारी कुठे असता, कुठल्या मॉलमध्ये शॉपिंग करतात, कुठल्या हॉटेलात जेवण घेता, किती वेळा मंदिरात जाता, कुठल्या देवाच्या मंदिरात जाता, कुठल्या पिकनिक स्पॉटवर जाता, कुठे दारू पिता, आणि दारू प्यायल्यावर गाडी नेहमीपेक्षा हळू चालवता की जोरात चालवता.. इतपत माहिती फोनला असते. या फोनला आजूबाजूच्या दुसऱ्या फोनचीही माहिती असल्याने तुमचे सहकारी कोण कोण आहेत, तुम्ही संध्याकाळी कोणासोबत असता, आणि रात्री कुणासोबत असता, याचीही माहिती फोनला असते. माणसाच्या इतिहासात इतकी सविस्तर स्थल-कालकुंडली कधीही नव्हती. कधीकाळी एखाद्यावर पाळत ठेवण्याकरता माणसांना हेरगिरीच्या कामासाठी चोवीस तास गुंतवून राहावे लागायचे. तेच काम आज फोन विनासायास करतात.

तुमचा ‘लोकेशन डेटा’ हा सोन्याची खाण आहे. आणि भांडवलशाहीतल्या प्रत्येक संस्थेला आणि यंत्रणेला हा डेटा हवा आहे. शहरातल्या विविध भागांत फिरत असताना अमुक एका स्टोअर अथवा शोरूमपासून तुम्ही किती दूर आहात, या माहितीवरून तुम्हाला त्याच भागातल्या विशिष्ट स्टोअर्स आणि शोरूमची जाहिरात मेसेजमध्ये पाठविली जाते. तुम्ही ऑफिसहून निघण्याच्या वेळी स्थानिक पिझ्झा डिलिव्हरी कंपनीतर्फे डिस्काऊंट देणारे कुपन तुम्हाला मेसेज केले जाते.

हा डेटा जसा कंपन्यांना हवा आहे तसाच तो पोलिसांनाही हवा आहे. कारण त्यायोगे ते कुठल्याही फोनला पिंग करून कुठलाही माणूस त्या क्षणी नेमका कुठे आहे, ते ट्रॅक करू शकतात. जगातल्या काही देशांमधल्या पोलिसांनी लोकेशन डेटाचा वापर सुरूही केला असून, असे करताना त्याकरता त्यांनी सरकारकडून परवानगी घेतली आहे असेही नाही. मुळात अशा परवानगीची गरज असू शकते, हेही अनेक व्यवस्थांच्या वा त्या देशातल्या कायद्यांच्या गावीसुद्धा नाही. गेली सात वर्षे जगभरात सुरू असलेले निरनिराळे मोर्चे आणि निदर्शने यांसाठी जिथे कुठे म्हणून लाखो लोक एकत्र येत असतात, त्या मोर्चात सहभाग घेतलेल्या प्रत्येक निदर्शकाची वैयक्तिक माहिती पोलीस यंत्रणा मिळवू शकतात. कित्येकदा या माहितीचे ‘लाइव्ह’ विश्लेषण करून पोलीस त्या मोर्चावर अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवीत असतात. मोर्चा ही तशी पूर्णत: सार्वजनिक बाब असली तरी त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची खासगी माहिती गोळा करता येणे शक्य असल्यामुळे या समीकरणाला ‘खासगी सार्वजनिक’ परिस्थितीचे स्वरूप येते. खासगीपण सार्वजनिक झालेल्या आणि सार्वजनिकतेत खासगीपणा पूर्णपणे शिल्लक राहिलेल्या परिस्थितीत समाजाचे नेमके काय होत असावे, असा प्रश्न मी माझ्या या महात्मा गांधींवर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ मित्राला विचारला. त्यावर त्याचे उत्तर मला सुरुवातीला बुचकळ्यात टाकणारे आणि नंतर धक्का देणारे होते.

गांधींना गोळी मारल्यानंतर त्यांचा मारेकरी पळून न जाता तिथेच थांबला, कारण त्याने पळून जाण्याचे जरी ठरवले असते तरी गर्दीमुळे तो पळून जाऊ शकला नसता. पळून जाताना पकडला गेल्यास त्याचा कदाचित ‘समूह-न्याय’देखील झाला असता; जो चांगलाच असता असे नाही. त्यापेक्षा गोळ्या झाडल्यानंतर तिथेच तटस्थ उभे राहिल्यास त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असते आणि मग  त्याच्यावर रीतसर खटला चालविला गेला असता. या प्रकरणात त्याला फाशी होण्याअगोदर दरम्यानच्या काळात सत्ता बदलली असती तर कदाचित तो तुरुंगातून सुटलादेखील असता आणि थोर राष्ट्रभक्तदेखील म्हणवला गेला असता. शक्यतांचा विचार केल्यास ही शक्यता तशी कमीच होती; पण या शक्यतेशिवाय दुसरी कुठलीच शक्यता उपलब्ध नव्हती. कारण त्याकाळची पिस्तुले अधिक विकसित नव्हती. ती वजनाने बोजड, चालविण्यास अवघड आणि कमी शक्तिशाली होती. त्यामुळे ती प्रभावीपणे वापरताना लक्ष्याच्या एकदम जवळ उभे राहावे लागत असे. ते पिस्तूल आजच्या पिस्तुलाइतके प्रगत असते तर गांधींच्या मारेकऱ्याला तिथेच थांबण्याची काहीएक गरज भासली नसती. तो मारेकरी गांधींची इतक्या गुपचूपपणे हत्या करू शकला असता, की गांधीजींचा खून नेमका कुणी केला हे इतरांना सोडाच; पण खुद्द गांधींनाही कळले नसते. प्राण्यांची किंवा आपल्यासारख्याच माणसांची हत्या करणे हा माणसाच्या समाजाचा आदिम अपराध आहे. पण अशी हत्या करताना तो कोण करतो आहे, हे ज्याची हत्या होते आहे त्याला निदान थोडय़ा क्षणांपुरते तरी माहिती असते. निसर्गात जिथे कुठे म्हणून हत्या होते, तिथे ज्या प्राण्याची हत्या होते आहे त्याला मरण्यापूर्वी आपली हत्या नेमकी कोणी केली, याची निदान कल्पना असते. याचमुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या तत्त्वात हत्या आणि खून या संज्ञा वेगवेगळ्या प्रकारे पाहिल्या जातात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात गांधीहत्या झाली तर..? या प्रश्नाकडे पाहताना गांधींचा लोकेशन डेटा जसा महत्त्वाचा ठरतो, तसाच त्यांच्या मारेकऱ्याचा लोकेशन डेटाही विचारात घ्यावा लागेल. आजची पिस्तुले जास्त प्रगत आहेत, त्यामुळे गांधींच्या मारेकऱ्याला गोळ्या झाडल्यानंतर तिथेच थांबायची गरज नाही. ज्या ठिकाणी गांधींची हत्या झाली त्या बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थनेसाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या लोकेशन डेटावरून माग घेऊन किती लोक स्थानिक आहेत आणि किती लोक तिथे पहिल्यांदाच आले आहेत याचाही माग काढता येतो. मारेकऱ्याचा लोकेशन डेटा ट्रॅक करताना तो अगोदर कुठल्या दुसऱ्या फोन्सच्या संपर्कात होता, आणि हत्येनंतर तो कुठल्या फोन्सच्या संपर्कात होता, या फोन्सचे मालक कोण कोण आहेत, हेही तपासले जाऊ शकते. एक प्रगत पिस्तूल जर गांधींच्या मारेकऱ्याच्या हातात दिले तर तो घटनास्थळापासून जितका वेगाने पळून जाऊ शकतो तितक्याच वेगाने तो ट्रॅकसुद्धा केला जाऊ शकतो. यामुळे फक्त मारेकरीच नाही, तर हत्येत अप्रत्यक्षपणे सामील असलेले इतर लोकही पकडले जाऊ शकतात. ‘‘आज पिस्तूल जितके जास्त प्रगत झाले आहे तितकेच गुन्हेगारांना पकडण्याचे तंत्रही प्रगत झाले आहे..’’ मी माझ्या मित्राला म्हणालो. यावर माझा मित्र म्हणाला, ‘‘प्रश्न गांधींच्या मारेकऱ्याकडे प्रगत पिस्तूल असण्याचा नाहीए, तर गांधींच्या मारेकऱ्याकडे फेसबुक अकाऊंट असण्याचा आहे.’’

त्याच्या म्हणण्याचा नेमका अर्थ मला अद्यापिही लागलेला नाही. याचे कारण कदाचित जनरेशन गॅप किंवा माझी कमी बुद्धिमत्ता असेल. पण गांधींच्या मारेकऱ्याचे फेसबुक अकाऊंट असल्यास त्याच्या टाइम लाइनवर नेमके काय काय विचार शेअर केले गेले असतील याची बरीचशी कल्पना मला आहे.

तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात- अगदी एव्हरेस्ट शिखरावर जरी असलात तरी तुमचा फोन खिशातून बाहेर काढून तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाशी संपर्क करू शकता. मात्र, हाच फोन तुम्ही परत खिशात ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल कंपनीसमवेत एक अलिखित करार करीत असता. या कराराअंतर्गत तुम्ही आपल्या मोबाईल सेवा कंपनीला तुम्ही नेमके कुठे आहात याबद्दलची माहिती ठेवण्यास परवानगी देत असता. यात लगेचच काही गैर वाटत नाही. तुम्ही नेमके कुठे आतुम्ही मोबाईल कंपन्यांना चोवीस तास तुमच्यावर नजर ठेवण्याची परवानगी देत असता.हात, ही माहिती कंपनीला नसल्यास ती सेवा कशी देऊ शकेल, असा मूलभूत प्रश्न कदाचित तुम्ही विचाराल. जो खरा तर रास्तही आहे. पण या अलिखित करारामुळे तुम्ही मोबाईल कंपन्यांना चोवीस तास तुमच्यावर नजर ठेवण्याची परवानगी देत असता.

राहुल बनसोडे

rahulbaba@gmail.com

First Published on September 10, 2017 1:57 am

Web Title: artificial intelligence google maps facebook information technology