पीठ पुरस्कारविजेते कविवर्य विंदा करंदीकर यांचा २३ ऑगस्ट १९१८ हा जन्मदिवस. येत्या २३ ऑगस्ट रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांस सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने केवळ मराठीच नव्हे, तर  भारतीय साहित्यविश्वाला पडलेल्या या इंद्रधनुषी स्वप्नाचे अंतरंग उलगडून दाखवणारा उत्कट लेख..

एक जुनी आठवण येते. तीस-पस्तीस वर्ष सहज झाली असतील. पुणे आकाशवाणीनं एक जाहीर कविसंमेलन योजलं होतं. इंदिरा संत अध्यक्ष होत्या आणि विंदा करंदीकर, वसंत बापटांसह सगळेच नामवंत संमेलनात होते. मी सूत्रसंचालन करत होते. त्या संमेलनाच्या वेळी मानधनाची आणि प्रवासखर्चाची रक्कम इतरांशी ताडून पाहून, स्टेशन डायरेक्टरकडे खुलासा मागून विंदांनी तिथेच निषेध व्यक्त केला होता. वेगवेगळ्या शहरांनुसार निर्धारित केलेली प्रवासखर्चाची सरकारी रक्कम कशी अपुरी आहे आणि अन्याय्यही, हे स्वच्छपणे संबंधितांना सर्वासमक्ष सुनावणारे विंदा पाहताना मी थक्क आणि अवाक् झाले होते.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

पुढे वर्ष लोटली. मग एकदा विजयाताई लवाटे या सामाजिक कार्यकर्त्यां बाईंबरोबर प्रवास करत असताना त्यांच्या संस्थेला मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाचा विषय निघाला आणि त्या म्हणाल्या, ‘एक ताजा अनुभव सांगू? विंदा करंदीकरांनी आम्हाला आत्ता एक लाखाचा निधी दिलाय. आणि तोही किती साधेपणानं! घरी बोलावलं, चहा दिला आणि हातात धनादेश ठेवला. बस्स. कुठे लिहायचं- बोलायचं नाही.’ त्यावेळी नुकताच विंदांना कबीर सन्मान मिळाला होता आणि त्यांनी ती रक्कम विजयाताईंच्या स्वाधीन केली होती. ते ऐकताना मी पुन्हा वेगळ्या कारणानं थक्क आणि अवाक् झाले.

त्यांच्याबाबतीत आठवणींचं जोडकाम आणखी एकदा झालं. एका कवितासंग्रहाचं प्रकाशन वसंत बापटांच्या अध्यक्षतेखाली होतं. कवी मधल्या पिढीचा होता. आमची पिढी त्यावेळी नवोदित नसलेली आणि ज्येष्ठही नसलेली. समारंभात बोलताना लेखकांच्या तीन पिढय़ांबद्दल वाङ्मयीन अभिरुचीच्या संदर्भात मी काही विधानं केली. मुद्दा दैवतीकरणाचा होता. धर्मक्षेत्राप्रमाणेच वाङ्मयाच्या क्षेत्रातही काही दैवतं निर्माण होतात आणि त्यांची चिकित्सा करणं किंवा त्यांना तपासून पाहणं हे त्यांच्या संप्रदायांना मान्य होत नाही. एकदा एक प्रतिमा निर्माण होते, ती शिरोधार्य होते आणि कालांतराने त्या साहित्यकाराच्या किंवा कवीच्या आंतरिक गतिशीलतेविषयीचा, त्याच्या वाङ्मय प्रवासातल्या चढ-उतारांविषयीचा विचार दूरच सारला जातो.

या माझ्या विधानांवर वसंत बापट अनपेक्षितरीत्या फार रागावले. भाषण तर त्यांनी रागानं केलंच; पण नंतर ते चिडून म्हणाले, ‘मी म्हणून तुम्हाला सोडलं. विंदा तर हिंस्र आहे. त्यानं सोडलं नसतं.’ पण विंदांविषयी मी हे म्हणणारच नाही, असं मी मनातल्या मनात म्हणाले आणि नंतर बापटांचं विंदांविषयीचं ते विधानही अयोग्यच होतं याचा प्रत्यय पुढे वारंवार घेत राहिले. झाला प्रसंग मीच त्यांना सांगितला. मराठी प्रेमकवितांच्या अभिवाचनात त्यांच्या कविता वाचण्यासाठी संमती हवी म्हणून मी त्यांना फोन केला होता. संमती तर त्यांनी दिलीच, पण समारंभाची हकिकतही शांत ऐकून घेतली. मग हसले फक्त. अर्थात् त्यांना बोलतं करण्यासाठी त्यांच्या- आपल्यामधलं अंतर मिटवणं बहुधा कुणाला सहजसाध्य नव्हतं. खरं तर फार साधे होते ते. पण त्यांच्या काहीशा रांगडेपणाला आणि साधेपणाला जो बुद्धीचा ताठ कणा होता, त्यामुळे त्यांची उंची सतत जाणवत असे आणि अंतर राखून वर पाहायला लावत असे.

त्यांची कविताही वर पाहायला लावणारीच तर होती. गर्दीसमोर कवितावाचन करत होते, तरी जनानुरंजन करणारी नव्हती. जी ‘जनता अमर आहे’ अशी त्यांची खात्री होती, त्या जनतेची उघडीवाघडी, भलीबुरी रूपंही त्यांना ठाऊक होती आणि तिच्यातून उठणारा आतला आवाजही त्यांनी ऐकला होता. त्यामुळेच कोणत्याही साचेबंद विचारधारेत ते वाहिले नाहीत. राजकीय तर नाहीच नाही. मार्क्‍सचा सुरुवातीचा त्यांच्यावरचा प्रभाव म्हणजे काळाची एक भलीथोरली अनेकांवर पडलेली सावली होती. पण तेव्हाही सावलीपलीकडे पसरलेलं व्यामिश्र वास्तवावरचं झगझगीत ऊन त्यांना स्वच्छ दिसत होतं.

म्हणून तर अभिनिवेश दूर करून, वक्तृत्वपूर्णता बाजूला सारून, वैचारिक आग्रह सोडून त्यांच्या कवितेला केवळ मानवी प्रज्ञेवर विश्वास ठेवून नंतर पुढे जाता आलं. त्यांच्यासारख्या कवीला यासाठी ‘रोमँटिक’ म्हणताना त्यावरचा हळवेपणाचा, भावविवशतेचा लेप कसा गळून पडतो आणि त्या संज्ञेचं सगळं आंतरसामर्थ्य कसं उजळून येतं, हे लक्षात येतं.

‘वर्तमानपत्रांनी सकाळी घातलेला

आगीचा रतीब पितो घटाघटा

आणि प्रायश्चित्त म्हणून फिरवतो बोटे

मुलाच्या जावळातून..’

असं म्हणत जगण्याला सामोरा झालेला सामान्य माणूस करंदीकरांच्या कवितेचा नायक होता. तो आणि त्याचं आतलं-बाहेरचं जग शोधत जाताना जाणिवांचे अनेक पदर त्यांच्या कवितेनं उलगडले.

काहीशी कोरडी, रूक्ष अशी त्यांची शैली. सांकेतिक हळवी नाही आणि फसवी अलंकारिकही नाही. उपहास आणि विनोदालाही करुणेचा अंत:स्वर सांभाळून व्यक्त करणारी, थेटपणे अनुभवाला भिडण्यासाठी न बिचकणारी, मागे फिरण्याच्या वाटा कोणत्याही सबबीखाली न शोधणारी कविता. तिनं स्वत:चं एक नवं अध्यात्म मांडलं. ‘परंपरा आणि नवता’ हे त्यांच्या एका पुस्तकाचंच नुसतं नाव नाही, ते त्यांच्या सगळ्या प्रयोगशीलतेचंच अंत:सूत्र आहे. त्यांनी आततायी अभंग लिहिले, वैदिक सूक्तांसारखी नवी सूक्तं लिहिली. मुक्त सुनीतं, तालचित्रं, विरूपिका, बालकविता, अमृतानुभवाचं अर्वाचिनीकरण, अनुवाद- सगळ्या प्रयोगांमागे असलेलं हे सूत्र त्यांनी द्वंद्वांच्या पलीकडे जाण्यासाठी सारखं वापरलं आहे. कधी कधी वरवर भासणारी द्वंद्वंही प्रत्यक्षात आतून एकाकार असतात किंवा होऊ शकतात, हे त्यांनी थेटपणे अनुभवांच्या गाभ्यालाच हात घालून उकलून दाखवलं आहे. मग ते द्वंद्व विज्ञान आणि अध्यात्मातलं असो, विचार आणि भावनेतलं असो, व्यक्ती आणि समूहातलं असो, नैतिक-अनैतिकातलं असो की जगण्या-मरण्यातलं असो.

याला साक्ष करंदीकरांच्या प्रेमकवितांची! मराठी प्रेमकवितेला नव्या वळणावर आणून ठेवणारी कविता ‘रक्तसमाधी’ पाऊणशे वर्षांपूर्वी त्यांनी लिहिली. संतांनी श्रेष्ठ आध्यात्मिक अनुभव व्यक्त करण्यासाठी जशी उत्कट, अमर्याद प्रेमाची परिभाषा वापरली तशी विंदांनी उत्कट, असीम, परमप्रेमाचा अनुभव व्यक्त करण्यासाठी आध्यात्मिक परिभाषा वापरली. समागमाचे वास्तव आणि गूढ-तरल असे दोन्ही अनुभव व्यक्त करताना सांकेतिक रतिभावनेपेक्षा अगदी निराळ्या भावनांनी त्यांना ते अनुभव भारता आले. इतकी सच्ची आणि म्हणून इतकी निर्भय आणि वेगळी शंृगारकविता रविकिरण मंडळाच्या बहर ओसरलेला नसतानाही त्यांनी त्या काळात (आणि सातत्यानं पुढेही) लिहिली कशी, याचं थोडं आश्चर्यही वाटतं.

‘प्रेम करावे रक्तामधले

प्रेम करावे शुद्ध पशूसम

शतजन्मांच्या अवसानाने

रक्तामधली गाठावी सम’

असं म्हणणाऱ्या करंदीकरांच्या प्रेमिकाला प्रेयसीच्या देहातच काशी-रामेश्वरापासून सगळी र्तीथ सापडतात आणि मोक्षाचीही इच्छा उरत नाही. पण त्या अनुभवातच- त्या संपूर्ण देहस्वी अशा ऐंद्रिय अनुभवातच जीवन पुढे नेण्याची जी शक्ती आहे तिची उत्कट जाणीवही त्याला होते. तिच्या देहातल्या महाद्वारातूनच जन्मस्थळापर्यंत जाण्याची वाट आहे हे उमगतं आणि ‘वाटते जगावे.. जगवावे..’ या तीव्र इच्छेने तो तिला शोधत जातो.

करंदीकरांच्या स्त्रीकेंद्री कविता वाचताना पुन्हा पुन्हा आणखीही एक आश्चर्य वाटत राहतं. अगदी बाईचेच म्हणावेत असे काही अनुभव, जे बाईनंही कधी नव्हते सांगितले-बोलले, आजही बाईच्या कवितेत ते नाही आलेले, ते त्यांनी लिहिले तरी कसे? साठ-सत्तर वर्षांपूर्वी त्यांनी ‘गर्भाधान’ नावाची कविता लिहिली. पोटात गर्भ आला आहे हे जाणवल्यानंतर एकटीला मृत्यूच्या दारापर्यंत पोचवणाऱ्या त्या अनुभवाविषयीची भीती, थोडा रागही! अलिप्त राहिलेल्या नवऱ्याविषयीची चीड, मत्सर, तीव्र भावनिक उद्रेक आणि मग त्याचं प्रेम, त्याची आर्जवं, त्याचे स्पर्श आठवून पुन्हा त्याच्याच कुशीत शिरून दिलेला हुंदका! कशी लिहू शकले विंदा ही कविता? – खरोखरच आश्चर्य वाटत राहतं.

पण ते असं लिहू शकले आहेत हे कळल्यावर पुरुषाची आदिचेतना म्हणून किंवा जगाचाच मूलाधार म्हणून ते स्त्रीकडे पाहू शकले आहेत, यातली स्वाभाविकताही लक्षात येतेच.

‘ती’च असते जगाला विकलेले त्याचे हात सोडवून आणणारी. भविष्याकरता दिलेली भेट भविष्याला पोचती करण्याचा आग्रह धरणारी. त्याच्यावर कोसळणारी. पण तो कोसळताना

त्याला झेलून धरणारी. केवळ ‘संहिता’ किंवा ‘त्रिवेणी’च नव्हे, तर ‘झपताल’सारखी एखादी कविताही करंदीकरांच्या अशा कवितांचं

सारसर्वस्व ठरते.

एकीकडे करंदीकर ‘साठीचा गझल’ लिहितात आणि दुसरीकडे ‘बाळ होउनी कुशीत यावे’ असंही म्हणतात. मिश्कील लिहायचे करंदीकर. पण त्या मिश्कीलपणाच्या मर्यादाही त्यांना चांगल्या माहीत होत्या. अश्लीलतेचा आणि सवंगतेचा स्पर्शही होऊ न देता अत्यंत स्वच्छ, पारदर्शक, खोल आणि निर्भय अशी स्त्रीविषयीची कविता लिहिणं, रतिरंगाची कविता लिहिणं करंदीकरांनी साध्य केलं. इंद्रियनिष्ठा म्हणजे पाप नव्हे. ती माणसाला जगण्याशी बांधून ठेवण्याची शक्ती आहे. आणि त्याचवेळी मुक्तीचं दार उघडून धरणारीही शक्ती आहे अशा विश्वासानं कविता लिहिणारे कवी होते ते.

तशा कवितेसाठी त्यांनी भाषेचा केलेला उपयोगही नवा होता. ध्वनींचा, उच्चारांच्या नादांचा, लयींचा वेगळा उपयोग! तो तर त्यांच्या बालकवितांमध्येही आहेच. किती सुंदर आहेत त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या कविता! भाषेचा इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर केलेला उपयोग इतर बालकवितांमध्ये क्वचितच सापडेल.

‘बकासुर ओरडला अल्ल्२२डुर

भिमानं मारला भुरका भुर्र’

किंवा-

‘परीचा दगडावर पडला पाय,

दगड म्हणाला ‘आय आय’

परी म्हणाली, तू तर दगड,

तुला का होते परी जड?

दगड म्हणाला, इथे पहा,

परीला दिसल्या जखमा दहा

तेव्हापासून सगळ्या परी

चालू लागल्या अधांतरी’

अशा कवितांमधली फँटसी तर कमाल आहेच; पण विनोद, नाटय़ आणि संगीत यांचा त्यांनी बालकवितांमध्ये घातलेला मेळही कमाल आहे. ‘परी आणि दगड’ किंवा ‘पऱ्यांच्या गप्पा’ यांसारख्या त्यांच्या नाजूक बालकविता एका बाजूला आणि बोलीभाषेचा ठसका दाखवणाऱ्या ठाशीव कविता दुसऱ्या बाजूला! विंदांना बालसाहित्यासाठीचं अकादमीचं पारितोषिकही आपण मनोमन देऊनच टाकावं.

तशा तर मनोमन पुष्कळच गोष्टी आपण कराव्या. विंदांच्या उंचीची जागा मराठी साहित्य संमेलनाला मानानं त्यांना देता आली नाही म्हणून आपण लाज बाळगावी, आपण जे लिहितो त्यावर अव्यभिचारी निष्ठा ठेवून वाङ्मय व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणून खंत करावी, भाषेवर प्रेम करता करता तिचा पैस धांडोळण्याचे प्रयोग करताना त्या प्रयोगांची अर्थपूर्णता दांभिक गाजावाजा न करता कशी सांभाळता येते हे लक्षात घ्यावं, आणि मराठी साहित्याच्या मर्यादा आपल्या निडर प्रतिभाबळानं मोडण्याचं अवघड काम केल्यानंतरही एक प्रकारच्या कठोर नम्रतेनं लौकिक यशांकडे पाहण्याची रीत किती थोर आणि किती दुर्मीळही असते याचा अपूर्वाईचा अनुभव घेत स्वत:ला थोडं शहाणं करीत राहावं.

जे करायचं ते साधेपणानं करून गेले विंदा. अशा माणसाची जन्मशताब्दी साजरी करायची तर देखाव्याचे उत्सवी समारंभ कशाला? तोरणं बांधायची असतील तर चांगली कविता समजून घेण्यासाठी आपल्या अभिरुचीला बांधावीत, रांगोळीच काढायची असेल तर आपल्या शहाणिवेची काढावी, आणि फुलंबिलं हवी असतील तर मुलांपर्यंत न्याव्यात त्यांच्या बालकविता आणि त्यांचा आतून उमलता आनंद पाहावा.

आणि नव्या लिहित्या पिढीसाठीही एक आव्हान आहेच.

‘खय्यामाने भरले पेले

महम्मदाने रचले दोहे

हा यात्रेकरू तिथे न खिळला

निळा पिरॅमिड शोधित जाई’

असं म्हणत इथल्या अध्यात्माच्या निळ्या रंगाचा शोध विश्वसंस्कृतीत घेऊ पाहणाऱ्या त्या यात्रेकरूच्या भटकेपणाचा शाप आपल्यालाही मिळेल असं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करावा.

अरुणा ढेरे