‘द वे ऑफ किंग्ज’ या गाजलेल्या पुस्तकाचे अमेरिकन लेखक ब्रँडेन सँडरसन यांनी कथेविषयी बोलताना एके ठिकाणी म्हटलंय, ‘‘The purpose of a story-teller is not to tell you how to think, but to give you questions to think upon.’’ सँडरसन यांच्या या विधानाची विशेषकरून आठवण यावी असा ऊर्मिला सिरूर यांचा ‘असीम’ हा नवा कथासंग्रह आहे. नवकथाकार म्हणून ऊर्मिला सिरूर यांचा मराठी वाङ्मय क्षेत्रात अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. मोठय़ा कालखंडानंतर ‘असीम’मधून मराठी वाचकांची त्यांच्याशी पुन्हा एकदा भेट होते आहे आणि ती अतिशय सुखद आहे.

१९७८ ते २०१३ या कालावधीत ठिकठिकाणी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथा ‘असीम’मध्ये एकत्र आल्या आहेत. या नऊ कथांपकी प्रत्येकीची ताकद वेगळी आहे, रंग-गंध वेगळा आहे आणि प्रत्येक कथेचा पोतही वेगळा आहे. थोडा उजेड, थोडा काळोख आणि थोडय़ा सावल्या एकत्र येऊन तयार झालेला हा कथासंग्रह वाचकांना एकीकडे रसरशीत समाधान देतोच, शिवाय अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना सामोरं जायलाही लावतो. काळ भिन्न, माती भिन्न, व्यक्तिरेखांची संस्कृती आणि सामाजिक स्तरही भिन्न; मात्र अनुभवाची उत्कटता सगळीकडे तितकीच प्रगाढ असल्याची जाणीव देणाऱ्या या कथा आहेत.

पतीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या देखण्या आणि हुशार अम्मा, वाढत्या वयातही पतीचे रंगढंग पाहून आतल्या आत जळणाऱ्या अम्मा, स्वत:चा पराभव स्वीकारता न आलेल्या आणि आत उसळणाऱ्या ज्वालामुखीला जिभेवाटे मुक्त करणाऱ्या अम्मा लेखिकेनं ‘वंशवृक्ष’मधून रंगवल्या आहेत. घरात चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या माणसाची अजाणतेपणानं प्रेमानं आवभगत करणाऱ्या देवकीबाई आणि त्यांच्या अगत्यानं बावचळून गेलेला भुरटा चोर यांच्या भेटीचं चित्रण ‘कित्तूर साहेब’मध्ये आहे. नवऱ्यावर विलक्षण प्रेम करणारी, मात्र शरीराची भूक नि:संकोचपणे व्यक्त करून त्याच्या निधनानंतर दुसरा पुरुष शोधणारी आणि शेजारणीचं अशक्त, आजारी मूल दत्तक घेऊन त्याला नवऱ्याचं नाव देऊन प्रेमानं सांभाळणारी एरिका ‘बाय आल्फ’मध्ये भेटते. जन्मत:च अधू, खुरटलेल्या सुभीची करुण गाथा आणि मुलाच्या एका शब्दानं आईपण सिद्ध झाल्यावर तिला मिळालेला आत्मविश्वास ‘छुबी’मधून समोर येतो. अनाथालयातून दत्तक गेलेल्या आणि सुभग, संपन्न आयुष्य वाटय़ाला आलेल्या समीराची खरी आई भेटल्यानंतर झालेली सरभर अवस्था ‘अंतर’ या कथेत मांडलेली आहे.

‘बाळबोध आणि मोडी’ या कथेत निर्धन अवस्थेत शिक्षणासाठी मदत मागणाऱ्या जयंत गणपुलेला ऐकाव्या लागलेल्या, जिव्हारी लागणाऱ्या शब्दांनी केलेली दीर्घ सोबत रंगवली आहे. वर्कशॉपच्या निमित्तानं चार-पाच दिवसांसाठी एकत्र आलेल्या एका अमेरिकन आणि एका ‘इंडियन’ माणसाची भेट, अमेरिकन माणसाला भारतीय योग, ध्यान-चिंतन याविषयी वाटणारं आकर्षण आणि त्याच दृष्टीनं समोरच्या ‘इंडियन’ला जोखणारा आणि ‘मनकवडय़ा इंडियन’ची खरी हुशारी शेवटच्या क्षणी लक्षात आल्यावर दिलखुलास हसणारा खिलाडू वृत्तीचा अ‍ॅलेक ‘पर्पल ऑर्किड’ या कथेत भेटतो.

अतिशय बुद्धिमान डॉक्टर आणि करारी गृहिणी असलेली, स्वत:च्या आणि सावत्र मुलांना सारख्याच शिस्तीनं वाढवणारी वैजयंती, नवऱ्यानं मृत्युपत्रात घरदार आणि शेतीवाडी स्वत:च्या दोन मुलांच्या नावावर केल्याचा निर्णय ऐकवल्यावर दुखावलेली आणि आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेणारी वैजयंती ‘वारस’ या कथेत रेखाटली आहे. तर ‘असीम’ या कथेत नवरा गेल्यावर परदेशात मुलाकडे स्थिरावलेल्या प्रौढ वयाच्या बाईला घेरणारं रिकामपण आणि जातिधर्माचा विचार न करता तिथल्या ओळखीच्या तसेच अनोळखी मुलींचं बाळंतपण मायेनं करताना तिला मिळालेलं समाधान रेखाटलं आहे.

या कथांमधला काळ कुठे नवा आहे, तर कुठे अगदी जुना. काही कथा भारतीय मातीतल्या आहेत, तर काही विदेशी संस्कृतीतल्या.. विदेशी माणसांच्या. पण मानवी जीवनाचा फार मोठा पस त्यांनी वाचकांसमोर खुला केला आहे. काळ आणि अनुभवांचा नवे-जुनेपणा ओलांडून अतिशय निखळ टवटवीतपणा त्यांनी आपल्या या कथांमध्ये जपला आहे. या कथा नुसते नातेसंबंध सांगणाऱ्या नाहीत, एकीकडे जगण्याची गुंतागुंत त्यांनी स्पष्ट केली आहे आणि दुसरीकडे माणसाच्या स्वभावातलं जगणं प्रसन्न करणारे रंगही उजेडात आणले आहेत. या कथांमध्ये तगमग आहे. तडफड आहे. कारुण्य आहे. जगण्याला आपल्या परीनं तोंड देण्याची धमक आहे. उद्विग्नता आहे. सल आहे. उत्कंठा आहे. अनेक अनाम प्रेरणा आणि ऊर्मी आहेत. आणि किंचित थरारही आहे. आपल्या जगण्यातले काळे-पांढरे-राखाडी धागे त्यांच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता त्यांच्या नैसर्गिक पोतासह या कथांनी उलगडले आहेत. ‘असीम’मधल्या कथा वाचकांना केवळ परिपूर्ण अनुभव देणाऱ्या आहेत असं नाही, तर जवळपास प्रत्येक कथा ही परिपूर्णतेच्या पलीकडे जाऊन जगण्याच्या व्यामिश्र रूपाचं दर्शन घडवताना, अनेक प्रश्नांमध्ये वाचकांना गुंतायला लावणारी आहे. या कथा वाचून तुम्ही मोकळं होऊ शकत नाही. उलट, त्या- त्या अनुभवात तुम्ही आणखी खोल रुतत जाता. ही त्यांची जमेची बाजू आहे. या संग्रहातली जवळपास प्रत्येक कथा नुसती संवेदना जागवणारी नाही, तर ती संवेदनांची धग वाढवणारी आहे. मानवी मनोव्यापाराचं अफाट विश्व समजून घेण्याची आणि त्यातून हाती लागलेले काही धागे कथारूपानं वाचकांसमोर मांडण्याची ऊर्मिला सिरूर यांची असोशी ठळकपणे या कथांनी अधोरेखित केली आहे. ‘असीम’मधल्या सगळय़ा कथांमध्ये नाटय़मयता फार मोठी नसली तरी सशक्त कथाबीज आणि अतिशय समर्थ व्यक्तिरेखा हे प्रत्येक कथेत प्रत्ययाला येणारे विशेष आहेत. जगण्याच्या खोल तळाशी जाताना काही हाती लागतंय आणि आणखी पुष्कळ काही अज्ञात राहतंय, अशी अपूर्णतेची जाणीव देणारा हा संग्रह आवर्जून वाचायला हवा असा आहे.

‘असीम’- ऊर्मिला सिरूर,

मौज प्रकाशन गृह,

पृष्ठे- १७३, मूल्य- २०० रुपये.