अस्मितादर्शया वाङ्मयीन नियतकालिकाच्या माध्यमातून गेली पाच दशके दलित साहित्य चळवळ प्रवाही ठेवणारे ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे सुह्रद ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी..

पानतावणे सर गेले आणि दलित अस्मितेच्या ध्यासपर्वाचा अखेरचा श्वास थांबला. माझा आणि त्यांचा जवळपास गेल्या चार दशकांचा संबंध होता. तो कौटुंबिक पातळीवर होता, मत्रीच्या पातळीवर होता आणि वैचारिक पातळीवरही होता. चंद्रपूर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी खास विनंती करण्यासाठी बाबा आमटे यांनी दूत पाठवले होते. त्या वेळी झालेल्या चच्रेच्या वेळी लक्ष्मी कॉलनीच्या त्यांच्या निवासात मी उपस्थित होतो. पराभूत झाल्यानंतरही चंद्रपूरकरांनी त्यांचे भव्य स्वागत केले होते. कालवश बॅरिस्टर खोब्रागडेंनी जवळपास आम्हा वीस-पंचवीस दलित साहित्यिकांना विशेष निमंत्रण देऊन आपल्या बंगल्यावर खाना दिला. त्या वेळी मी त्यांच्या सोबत उपस्थित होतो आणि संमेलनाच्या मंडपाच्या दाराशी माझे मित्र वामन निंबाळकर ‘अस्मितेची नऊ वष्रे’ ही पुस्तिका वाटत होते, तेव्हा त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचाही मी प्रयत्न केला होता.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

माझी ‘एकरी’ नावाची पहिली एकांकिका ‘अस्मितादर्श’मध्ये प्रसिद्ध झाली. दलित जाणिवेचे लेखन नाटकाच्या फॉर्ममधून लिहावे असा आत्मविश्वास येत नव्हता. कारण तोपर्यंत मी नागपूर येथे होणारे ‘रस्ता नाटक’ कधी पाहिले नव्हते. मराठी रंगभूमीवरचा कौटुंबिक फॉर्म रुचत नव्हता आणि प्रायोगिक रंगभूमी उच्चशिक्षित पांढरपेशा वर्गाच्या ताब्यात होती. त्यामुळे दलित जाणिवेच्या अभिव्यक्तीसाठी कथा आणि कविता माध्यमांशी मी चाचपडत होतो. त्या वेळी झालेल्या पहिल्याच भेटीत ‘तुमची एकांकिका कोण सादर करू शकेल मी सांगू शकत नाही, पण ती वाचकांसमोर पोचवण्याचे काम मात्र नक्की करेन. शिवाय नाटक हा तुमच्या आवडीचा फॉर्म असेल तर आपल्या दलित साहित्याच्या चळवळीसाठी तुम्ही नाटय़लेखन करायलाच हवे,’ असा आग्रहाचा आदेशही पानतावणे सरांनी दिला. औरंगाबादहून नांदेडला परतल्यावर कथा म्हणून लिहून ठेवलेला ताजा मजकूर लगेच नाटकाच्या फॉर्ममध्ये लिहून काढला आणि पानतावणे सरांना पाठवून दिला. त्यांनी लगेच ती एकांकिका ‘अस्मितादर्श’मध्ये छापली आणि काही दिवसांतच अकोल्याच्या कामगार कल्याण मंडळाच्या कलावंतांचे प्रयोगासाठी संमती मागणारे पत्रही आले. माझ्या लेखनातील या यशाचा मी एका संग्रहात अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला असून तो संपूर्ण संग्रहच ‘अस्मितादर्श साहित्य चळवळीस’ अर्पण केला आहे.

वैचारिक पातळीवर ते माझे समानधर्म असले तरी अनेक बाबतीत त्यांच्याशी माझी मतभिन्नताही होती. ही मतभिन्नता कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्ष मी अनेक वेळेस त्यांना बोलून दाखवली किंवा लेखांच्या माध्यमातूनही प्रकट केली. ‘अस्मितादर्श’कडे आलेल्या बहुतांश लेखनावर वडीलकीच्या नात्याने त्यांनी संपादकीय संस्कार केले. कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या कवितेवर त्यांनी केलेले संपादकीय संस्कार मला माहीत आहेत. माझ्या ‘अश्मक’ या दीर्घाकावर त्यांनी असाच संपादकीय हात फिरवला होता. तेव्हा खासगीत मी त्यांना माझी प्रतिकूल प्रतिक्रिया सांगितली. डॉ. रुस्तुम अचलखांब यांच्या ‘गावकी’वर लिहिलेल्या लेखात पानतावणे सरांनी थोडा बदल सुचवला. मी तो मान्यही केला. पण त्यामागची त्यांची भावना अशी की, नव्याने लिहिणाऱ्या लेखकाचा हिरमोड होईल असे समीक्षा लेखात येता कामा नये. ही चळवळीची एक गरज आहे, असे त्यांना वाटत असे. चळवळ उभी करताना काही वेळेला साहित्यिक राजकारणही करावे लागते, अशी त्यांची धारणा होती. परंतु या अशा धारणा त्यामागचा हेतू संशयास्पद ठरला की चारित्र्यहननाचे साधन ठरतात.

समरसता मंचाच्या साहित्य संमेलनास ते समारोपाच्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून उपस्थित राहिले आणि काही लेखकांनी त्यांच्या हेतूवरच आघात केले. या उपस्थितीबद्दल मी त्यांना कधीच दोषी गृहीत धरले नाही. कळत-नकळतपणे गुरूस्थानी असणाऱ्या ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या प्रभावाचा तो अवशेष असावा, असा तर्क करीत मी त्याकडे दुर्लक्ष केले. मार्क्‍सवादाबद्दलची त्यांच्या मनातल्या सूक्ष्म अढीबद्दलचाही राग तिथे व्यक्त झाला असावा, असे आज वाटते. परंतु अशा वादांमुळे ते कधी निराश झाले नाहीत. कारण दलित साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, त्यांना सतत लिहिते ठेवणे हे काम ते निष्ठेने करीत होते. त्यांची ही निष्ठाच त्यांना नेहमी ताजे ठेवीत असे. त्यामुळेच त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदरभाव आहे.

औरंगाबाद येथे पानतावणे सरांनी ‘अस्मितादर्श लेखक-वाचक मेळावा’ घेतला. त्याच्या पहिल्या मेळाव्यास मी उपस्थित होतो. त्यांच्याच संमतीने दुसरा मेळावा मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९७५ च्या जानेवारीत नांदेड येथे आयोजित केला. या मेळाव्यास ना. धों. महानोर, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, राजा सर्वश्री मुकुंद, लक्ष्मीकांत तांबोळी, रा. भि. जोशी, वामन निंबाळकर, अप्पा रणपिसे, दिनकर साक्रीकर, भ. मा. परसवाळे, बाबुराव बागूल, डॉ. जे. एम. वाघमारे, वामन होवाळ असे लौकिक असणारे साहित्यिक उपस्थित होते. वामनराव भटांसारखे प्रकाशकही उपस्थित होते. ज्यांच्या दुर्मीळ कागदपत्रांच्या संग्रहामुळे पुढे महाराष्ट्र राज्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन प्रकाशन समिती निर्माण झाली त्या वसंत मून यांच्याकडील दुर्मीळ कागदपत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मेळाव्याचे अध्यक्षपद भालचंद्र सुरडकरांनी भूषवले होते. मेळाव्याच्या यशासाठी तीन स्थानिक पातळीवरचे मार्गदर्शक म्हणून पद्मश्री श्यामरावजी कदम, प्राचार्य गो. रा. म्हैसेकर आणि गुरुवर्य नरहर कुरुंदकर आम्हाला मार्गदर्शन करीत होते. नांदेडच्या कलामंदिरात झालेला हा दुसरा मेळावा केवळ मेळावा न ठरता त्याला लहानशा साहित्य संमेलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र ‘अस्मितादर्श’च्या मेळाव्यातच पुढील फुटीची बीजे आहेत, हे मला त्या वेळी कळले नाही.

अस्मितादर्शच्या मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या मेळाव्यात वडाळ्याला दोन मंडप पडले आणि पानतावणे सर काहीसे दुखावले. मुंबईच्या मेळाव्यापासून दलित साहित्यिकांचे वेगळे असे ध्रुवीकरण सुरू झाले. असे घडले तरी पानतावणे सर निराश झाले नाहीत. कृतिशील सातत्य हा त्यांच्या प्रकृतीचा धर्म होता. म्हणून याही वयात अत्यंत उत्साहाने ते ‘अस्मितादर्श’च्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्याची तयारी करीत होते. त्यांना अनेक पुरस्कार-सन्मान मिळाले, पण ते मिळावेत यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. काही सन्मान तर घोषित होऊनही त्यांना मिळू शकले नाहीत. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी तीन वेळा निवडणूक लढवली आणि विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी आधीच्या निवडणुकींतील पराभवाचाही पराभव केला. यंदाच पद्मश्रीने झालेला पानतावणे सरांचा गौरव दलित साहित्याच्या चळवळीला नवीन ऊर्जाशक्ती देऊ शकेल असे वाटले होते; पन्नासाव्या अस्मितादर्श लेखक-वाचक मेळाव्यामुळे वेगळे वैचारिक मंथन होऊ शकेल असेही वाटले होते. परंतु कुठल्याच आजारपणास कधीही सामोरे न गेलेल्या पानतावणे सरांना काळाने अचानक झडप घालून नेले याचे अख्ख्या महाराष्ट्रालाच अतीव दु:ख झाले आहे.