News Flash

मग्नता, बंदूक, उदोउदो

कोणतीही महान गोष्ट साध्य करायला एकाग्रतेशिवाय पर्याय नाहीच; नसेलही.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘मग्नता’ ही समाधी अवस्था असू शकते, किंवा नार्सिससचं अतिरेकी टोक! आज कुणालाच एखाद्या गोष्टीत झोकून देऊन त्यात समाधीवस्था प्राप्त करण्यात स्वारस्य उरलेलं नाही. प्रत्येकाला झटपट सगळ्या गोष्टी मिळवण्याची घाई झाली आहे. त्यातही ‘स्व’चा उदोउदो करण्यातच सगळे मश्गुल आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमांतून याचंच हिडीस प्रदर्शन होत असतं.
याचा शेवट काय होणार?

प्रत्येक लहान मुलाचा एक ‘आयडॉल’ असतो.  माझा आयडॉल होता सुनील गावस्कर. अँडी रॉबर्टस्, माल्कम मार्शल, व्हॅनबर्न होल्डर, जोएल गार्नर यांच्यासारख्या धिप्पाड, कर्दनकाळ दैत्यांच्या आणि रिचर्ड हॅडली, डेनिस लिली, इम्रान खान, सर्फराज नवाझ अशा आक्रमक, आग ओकणाऱ्या तोफखान्यांसमोर गावस्करची मग्न, एकाग्र मूर्ती अविचल उभी ठाकलेली असायची. भारताच्या डावाची समोरची बाजू तकलुपी पत्त्यांच्या डावाप्रमाणे कोसळत असतानाही त्याची तन्मयता तासन् तास.. कधी दिवसचे दिवस जराही कमी व्हायची नाही. त्या निश्चयी, मग्न, एकाग्र मूर्तीमध्ये चिकाटी होती, विजिगीषु वृत्ती होती, तसंच एक लुब्ध करणारं सौंदर्यही होतं. शब्द, भाषा, भाषणं, घटना, प्रवचनं, बौद्धिकं करूशकतील त्यापेक्षा कितीतरी अधिक गावस्करची ती मूर्ती प्रोत्साहित करायची.. प्रेरित करायची. त्याकाळी अनेक जण वर्तमानपत्रांतले त्या मूर्तीचे फोटो कापून वहीत चिकटवायचे. अभ्यास करताना मरगळ आली, आत्मविश्वास खचतोय असं वाटलं की ती मूर्ती हुरूप द्यायची. आग ओकणाऱ्या तोफखान्यापुढे गावस्करची तंद्री भंगत नाही, तर साधी ‘प्लासीची लढाई’ घोकताना आपलं चित्त असं का भटकावं?

पण तन्मयतेतलं सौंदर्य जाणवायला जागतिक कीर्तीच्या या खेळाडूपर्यंत जायची गरज नाही. जो विणायला सलग एक अख्खं वर्ष लागतं असा अनवट कलाकुसरीचा रेशमी गालिचा विणणारा कारागीर, काहीच क्षणांत ज्याच्यावर झडप घालायची आहे अशा सापाच्या हालचालीवर झाडाच्या फांदीवरून लक्ष ठेवणारा सर्पमार गरूड किंवा वाळूचा किल्ला बनवणारं लहान मूल यांच्या मग्नतेतही ते सौंदर्य जाणवतं.

कोणतीही महान गोष्ट साध्य करायला एकाग्रतेशिवाय पर्याय नाहीच; नसेलही. पण मी आता बोलतोय ते काही ‘साध्य’ करण्याबद्दल नाही; तर मग्नतेतील सौंदर्याबद्दल बोलतोय. समुद्रकिनारी वाळूचा किल्ला बनवण्यात मग्न असलेलं मूल कसं सुंदर दिसतं याविषयी बोलतोय. म्हणूनच बहुदा दोन- अडीच हजार वर्षांपूर्वी महर्षी पतंजलीनं आणि गौतम बुद्धानं हे ताडलं. किमान दैनंदिन समाधानासाठी (‘सुख-समाधान’ हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही आहे. सुख आणि समाधान यांचं दूरचंही काही नातं नाही.) मग्नता ही अपरिहार्य गोष्ट आहे असं या दोघांना वाटल्यामुळेच समाधी, ध्यान (ध्यान- झान- झेन) या संकल्पना अस्तित्वात आल्या. म्हणजे समाधी, ध्यान साधण्यासाठी संन्यास घेऊन हिमालयातील गुहेतच जाऊन बसायचं का? अजिबातच नाही.  स्वच्छ सूर्यप्रकाशातली, हिरव्यागार किंग्स्टन ओव्हलवरची गावस्करची ती मग्न, तन्मय मूर्ती हे समाधीचंच ‘स्टिल लाइफ’ आहे. आणि त्या मूर्तीचा फोटो आणि खेळाचा वृत्तान्त असलेलं वर्तमानपत्राचं शेवटचं पान समरसून तासभर वाचणं ही त्याहून मोठी समाधी आहे. कारण ते पान असं समरसून तासभर वाचल्यामुळे कुठलं अ‍ॅवार्ड मिळण्याची शक्यता नाही!

..पण गेले, ते दिन गेले! आता तेवढा वेळच नाही राहिला आहे कुणाकडे. खेळांबद्दलचं शेवटचं पान तासभर वाचणं दूरच; माझ्या एका ब्रिलियंट मित्रानं एक असं अ‍ॅप तयार केलं आहे- की त्यावर प्रत्येक बातमी ही ‘केवळ बेचाळीस शब्दांत’ सादर करण्याची हमी आहे.  म्हणजे सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या माणसाला साधारणपणे ती बातमी वाचायला लागणारा वेळ आहे अवघा पाच सेकंद! हुशार माणसाला याहूनही कितीतरी कमी वेळ लागणार आहे. असं गृहीत धरा की, दिवसात ३० महत्त्वाच्या बातम्या घडतात. (मला याबद्दल शंका आहे!) तरी एक ते दीड मिनिटात तुम्ही या अ‍ॅपवर पूर्ण वर्तमानपत्र वाचू शकता! साहजिकच या अ‍ॅपचे (माझ्यासह) जगभरात काही कोटी वाचक आहेत. दीड मिनिटात सगळं वर्तमानपत्र वाचून होत असेल तर वाचकांनी ते का वाचू नये?  नुकताच तो मित्र भारतात आलेला असताना गप्पांच्या ओघात, ‘एका सुंदर देशाच्या देखण्या राष्ट्राध्यक्षाने त्याच्याहून २५ वर्षे अधिक वयाच्या सुमार दिसणाऱ्या स्त्रीशी विवाह केल्याविषयीची बातमी ४२ शब्दांत तू नको चेपवली पाहिजे होतीस..’ असं मी म्हणताच तो हताशपणे मला म्हणाला की, ‘हे तुला- मला भले पटत असेल; पण शेवटी हा व्यवहार आहे. उद्या बातमीत ४२ ऐवजी ५३ शब्द झाले, दिलेल्या हमीचे उल्लंघन झाले, आणि त्यामुळे पेपर वाचायला दीडऐवजी दुप्पट मिनिटे लागली, तर त्यामुळे आणि अशी दीड मिनिटे गुणिले कोटय़वधी वाचकांचा मोलाचा वेळ वाया गेल्यामुळे मला आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचून मल्टिमिलियन डॉलरचा दावा माझ्यावर ठोकला गेला तर तू येणार आहेस का मला वाचवायला? ‘आम्ही एकेकाळी आमचा आयडॉल असलेल्या सुनील गावस्करबद्दलचं पान तासन् तास वाचत बसायचो..’ असा युक्तिवाद करून?

दीड मिनिटामध्ये सबंध पेपर वाचायचा म्हणजे तन्मयतेचा काही संबंधच येत नाही. काही दिवसांपूर्वी व्हेगासमधील स्ट्रीटवरील एका हॉटेलच्या खोलीतून एका चक्रमाने समोरच्या चौकात सुरू असलेल्या गाण्याच्या मैफिलीवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षांव करून ५० जीव घेतले. अगदी पद्धतशीरपणे नियोजन केलेल्या अशा घटना नियमितपणे घडत असतात. दारिद्रय़, उपासमारी, अस्वच्छता, प्रदूषण हे प्रश्न संपल्याने अमेरिकेत ‘बंदूक नियंत्रण असावे की नाही?’ असले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे बनले आहेत असं वाटायचं. पण व्हेगाससारख्या घटना बघून वाटतं, की तसं नाही. हा प्रश्न खरोखरच महत्त्वाचा बनला आहे.  कॉफी-हाऊस सुहृदांशी झडणाऱ्या चर्चेत (अमेरिकेतल्या रिपब्लिकन पार्टीप्रमाणे) माझा दृष्टिकोन हा बंदूक नियंत्रणाच्या विरोधी असतो. आणि माझ्यासारख्या अति अहिंसक वृत्तीच्या माणसाचा असा दृष्टिकोन असावा याबद्दल त्यांना आश्चर्य वाटतं. पण माझ्या मते, बंदूक हिंसा करत नसते, तर ती हातात धरणारा माणूस हिंसा करत असतो. माणसातल्या हिंस्र वृत्तीबद्दल न बोलता जणू काही बंदुकीने स्वप्रेरणेनेच ते जीव घेतले आहेत, त्यामुळे ‘बंदुकीला फासावर चढवा, बंदूक नियंत्रण करा’ असा आरडाओरडा चुकीचा नाही का? हजारो वर्षांपासून माणसे माणसांना मारत आली आहेत. दगड, कोयते, तलवारी, गदा, भाले अशा अनेकविध शस्त्रांमध्ये बंदुकीची ही आणखीन एक भर. त्यामुळे बंदुकीवर नियंत्रण आलं की हिंसा संपलीच- ही समजूत हास्यास्पद.. अ‍ॅम्ब्सर्डच. निद्रानाशाच्या विकारातून बऱ्या झालेल्या माणसाने बरा झाल्यावर रात्री झोपताना ‘निद्रानाश असताना कसे आपण रात्रभर तळमळत असायचो’ हाच विचार करत झोपावं, हे जितकं हास्यास्पद आणि अ‍ॅब्सर्ड, तितकीच ही समजूतसुद्धा. मग त्याचा बरा झाला तो विकार कोणता? अर्थात व्हेगासचं हत्याकांड घडलं म्हणून अमेरिकेत बंदूक नियंत्रणाविरुद्ध कल वाढला का? जराही नाही. त्यानंतर याविषयीच्या जनमत चाचण्या घेण्यात आल्या. पण बंदूक नियंत्रणाच्या विरोधातल्या जनमताचा थर्मामीटरचा पारा जराही खाली सरकला नाही.

पण मग्नतेवर रोखल्या गेलेल्या असंख्य बंदुकांच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येणार नाही. दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने, पतंजलीने केलेलं ध्यान, समाधीचं महतीवर्णन किंवा अगदी ३० वर्षांपूर्वीची गावस्करची तन्मय, एकाग्र मूर्ती आणि त्या मूर्तीच्या कलात्मक कौशल्याचा आनंद घेणारे क्रीडारसिक या सर्वावर आता या सतत धडधडणाऱ्या शक्तिशाली बंदुका आहेत.. दीड मिनिटात वाचायचं वर्तमानपत्र आहे. अशी अनेक वर्तमानपत्रं आहेत. स्मार्टफोन, आयपॅड, टॅब्लेट यांवर दर सेकंदाला दाखल होणारे चुटके, बातम्या, विडंबने, कविता, प्रचारक लेख, स्मृतिरंजनाच्या गाथा, प्रोत्साहनात्मक विचार, सल्ले, टीकाटिप्पणी युद्धे असा सगळा भडिमार सध्या सुरू आहे. त्यातही पुढची कटकट म्हणजे बरेच प्रोत्साहन, सल्ले एकमेकांच्या थेट विरोधी आहेत. एक म्हणतो, ‘समय मूल्यवान है’; तर दुसरा म्हणतो, ‘हा क्षण हे एकमेव सत्य आहे, त्यामुळे वेळ ही कल्पनाच मायावी आहे.’

नवरात्रीत भल्या पहाटे सोलापूर आणि आसपासचे लोक रूपाभवानी या देवीला झुंडीने जातात तेव्हा त्यांच्या मुखी जागर असतो.. ‘आई राजा उदो उदो, सदनंदीचा उदो उदो.’ हा जागर लहानपणापासून ऐकत आल्याने मला ‘उदो उदो’ या शब्दाबद्दल जिव्हाळा निर्माण झाला होता. पण आता ‘उदो उदो’च्या जबरदस्त बंदुका तयार झाल्या आहेत. काहीही झालं की त्वरित ते इन्स्टाग्राम, फेसबुक, इ. इ. वर प्रसारित करायचं. स्नान झालं, कपडे करून तयार झालो (करा प्रसारित!), नाश्ता केला, हात धुतले (करा प्रसारित!).. असं सगळं इत्थंभूत. इस्लाममध्ये व्यक्तीची प्रतिमा निषिद्ध आहे, कारण स्वप्रतिमेच्या ‘उदोउदो’चा माणसाचा अतिरेकी मोह (आधी इतरांना वैतागदायी आणि मग यथावकाश) त्याला स्वत:लाच घातक ठरतो असा विचार त्यामागे असावा. पण आजच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि शक्तिशाली बंदुकीच्या नावातच ‘चेहरा’ (फेस) आहे. याच धर्तीवरची, पण जरा अमूर्त अशी कल्पना भगवान गौतम बुद्धाने मांडली, ती म्हणजे ‘अनत्त’! अनत्त म्हणजे ‘स्वत: नाहीच’ (no self)! दर क्षणी, उठता-बसता स्व, स्व, स्वत:ची ही छबी, स्वत:चे ते कर्तृत्व, स्व, स्व.. ‘स्व नको’ अशी त्यामागची सूचना. जडशीळ, भक्कम, दर्पोक्तीयुक्त ‘स्व’ सहज लक्षातही न येईल असा हलकाफुलका व्हावा.  ‘स्व’चा उदोउदो कमी आणि विलय अधिक व्हावा.

पण हे सगळं तत्त्वज्ञान, क्लृप्त्या सांगितल्या गेल्या तेव्हा तंत्रज्ञानाचा पसारा नव्हता, माहितीचा विस्फोट नव्हता, उदोउदोच्या तगडय़ा व विपुल बंदुका नव्हत्या. आता नितांतसुंदर मग्नतेनं या तगडय़ा बंदुकांचा मुकाबला त्या दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीच्याच दर्भ, लाठय़ाकाठय़ांनी करायचा आहे, की मग्नतेच्या बाजूनेही काही चिरेबंदी तट, अभेद्य ढाली उभ्या ठाकतात, हे आता पाहायचं.. येत्या काही काळात. कुतूहलाचा विषय आहे.

मिलिंद म्हैसकर sooryanamaskaar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 12:52 am

Web Title: author milind mhaiskar view against the gun control
Next Stories
1 आडनावांची सुरस कहाणी
2 मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा!
3 धर्मभावना आणि मातृत्वाचा शोध 
Just Now!
X