शफाअत खान

मध्यंतरी बनारसला हुबेहूब संत वाटावेत असा पोशाख केलेले एक गृहस्थ भेटले होते, ते आठवले.माझी करुण कहाणी ऐकून ते म्हणाले होते, ‘भरोसा रखो.. सब ठीक होगा.’ भरोसा कुणावर ठेवायचा, ते विचारायला मी विसरलो होतो. समोर जे नाटक चाललंय ते वैचारिक आणि अर्थपूर्ण आहे असा भरोसा ठेवायचा मी ठरवलं. आसपासच्यांनी असा भरोसा ठेवलेला दिसतच होता. मीही ठेवला.

Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

..आणि चमत्कार झाला!

मध्यंतरी माझ्या दाढेचा प्रॉब्लेम झाला. अचानक डावीकडची दाढ दुखू लागली. एरवी अधूनमधून इथली किंवा तिथली दाढ ठणकते.. दोन-चार दिवसांचा कोर्स केला की दुखणं थांबतं. आनंदीआनंद होतो. तक्रार करण्याचं कारण उरत नाही. पण या खेपेची गोष्ट वेगळी आहे.

मला एका महत्त्वाच्या कामासाठी आठवडाभर बनारसला जायचं होतं. तारखा ठरल्या होत्या. मी बनारसबद्दल खूप ऐकलं होतं, वाचलं होतं. आता पहिल्यांदाच बनारसला जाणार असल्यामुळे फार उत्साह वाटत होता. मी बनारसची तयारी सुरू केली आणि अचानक डाव्या दाढेनं उचल खाल्ली. दोन-चार दिवस दुखण्याकडे दुर्लक्ष करून बघितलं. दुखणं कमी न होता वाढतच गेलं. डावी बाजू सुजली. चेहऱ्याचा बॅलन्स गेला. शेवटी घराजवळच असलेल्या एका डेंटिस्टकडे गेलो. डॉक्टर तरुण आणि स्मार्ट होता. त्याचं शांत बोलणं धीर देणारं होतं. त्याने मला खुर्चीत आडवा करून जबडा उघडून तपासण्या केल्या. दात ठोकून बघितले. एक्सरे बघून सर्व दातांचा इतिहास समजावून घेतला आणि दाढेचं रूट कॅनल करावं लागेल असं म्हणाला. वेदनेतून कायमच्या सुटकेचा तो एकच मार्ग असल्याने मी ‘हो’ म्हणालो आणि माझ्या दंतकथेची सुरुवात झाली..

तीन-चार बैठकांत दाढ कोरणे, खरवडणे, खणणे, ठोकणे, टोचणे, हिरडय़ात इंजेक्शन खुपसणे असे हिंसक प्रकार आलटूनपालटून होत राहिले. ही हिंसा आपल्या भल्यासाठीच असून, उद्या त्यामुळे वेदनारहित बरे दिवस येतील, या आशेवर मी हे सर्व सोसत राहिलो. निमूट खुर्चीत आ वासून पडून राहिलो. मगरीसारखा जबडा फाकवला. सर्व सहकार्य केलं. रूट कॅनल पार पडलं आणि ते भलतंच यशस्वी झाल्याचंही कळलं. आता फक्त कॅप बसवणं, दुखऱ्या दाढेवर टोपी घालणं एवढंच उरलं होतं.

टोपी घालताना अजिबात त्रास होत नाही हे कळल्यामुळे मी निवांत होऊन बनारसच्या तयारीला लागलो. काळजीचं काहीच कारण दिसत नव्हतं. प्रवास उत्तम झाला. पण बनारसचा वारा लागताच दाढ पुन्हा ठणकायला लागली. मी गोळ्या खाऊन कळा थांबवायचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. काम होईना, मन रमेना अशी अवस्था झाली. माझी सैरभैर अवस्था बघून स्थानिक लोक कळवळले. प्रेमाने, मायेने चौकशी करू लागले. त्यांच्या हिंदी भाषेत ओलावा होता. पण ओलाव्याने फार काही फरक पडला नाही. एक नवीनच संकट उभं राहिलं.

रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्यासाठी तोंड उघडायचा प्रयत्न केला तर तोंडच उघडत नाही असं लक्षात आलं. बळजबरीने ब्रश घुसवायचा प्रयत्न केला तर ब्रश मोडला आणि जबडा ठणकायला लागला. मराठी नाटककाराचं तोंड बंद झाल्याची बातमी शहरभर पसरली.

बातमी ऐकून सकाळी एक बनारसी गृहस्थ भेटायला आले. ते हरहुन्नरी होते. स्वत: कवी आणि गीतकार होते. ते गंगेच्या घाटावर होणाऱ्या देशी, परदेशी सिनेमाच्या शूटिंगसाठी कलावंत पुरवणे, वेळप्रसंगी अभिनय करणे, अभिनयाच्या कार्यशाळा घेणे, थोरामोठय़ांची बडदास्त ठेवणे, स्वस्तात बनारसी साडय़ा वा मिठाया मिळवून देणे इत्यादी कामं करत. फावल्या वेळेत ते अडल्यानडल्यांना मदत करत. त्यांचे हात वपर्यंत पोचलेले होते. त्यांच्या मोबाइलमध्ये ते थोरामोठय़ांच्या खांद्याला खांदा भिडवून हसत उभे आहेत असे असंख्य फोटो होते. मी त्यांना स्वत:चं बंद तोंड दाखवलं. बंद तोंड दाखवताना लाजल्यासारखं झालं. त्यांनी काळजी करायचं कारण नाही, असा धीर दिला. बनारसमध्ये एक जुने डेंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे, हातात जादू आहे, त्यांच्या निव्वळ एका स्पर्शाने सर्व काही ठीक होतं अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही दोघे त्या डेंटिस्टकडे गेलो.

तो डेंटिस्ट डॉक्टरही वाटत नव्हता आणि जादूगारही दिसत नव्हता. पण हिंदीतले अनेक थोर लेखक त्याच्याकडे येऊन गेल्याचं कळलं. त्याच्या स्पर्शाने तोंड उघडलेल्या काही लेखकांना पुढे ज्ञानपीठ मिळून गेल्याची बातमी स्वत: त्यानेच सांगितली. सोबतच्या हरहुन्नरी गृहस्थाने त्याला दुजोरा दिला. मी बंद तोंडाने बोलायचा प्रयत्न केला, पण त्याला काही ऐकायची गरज वाटली नाही.

त्याने दैवी नजरेनं तपासणी केली. एक तपकिरी डाग पडलेला औषधाचा फाया आत खुपसला आणि मी ठणठणीत बरा झाल्याचं जाहीर केलं. मी तोंड उघडून बोलायचा प्रयत्न करू लागलो. ते हरहुन्नरी गृहस्थ म्हणाले, ‘आता सगळं विसरा.. लिहा.. ज्ञानपीठ मिळून जाईल.’ मीदेखील वेदना विसरून ज्ञानपीठाचा विचार करू लागलो. ज्ञानपीठ स्वीकारताना काय बोलावं, याची मनातल्या मनात जुळवाजुळव करू लागलो. नंतर ज्ञानपीठ नाकारावं आणि ते का नाकारलं त्याचंही भाषण मनातल्या मनात तयार केलं. ते पहिल्यापेक्षा जास्त प्रभावी झालं. त्यामुळे ज्ञानपीठ नाकारावं असंच वाटू लागलं. हे असं सगळं डोक्यात चालू असल्यामुळे दुखणं लक्षात आलं नाही आणि मी बरा झालो असं वाटायला लागलं. हरहुन्नरी गृहस्थ ‘बनारसी जादूगाराने मराठी लेखकाचं तोंड क्षणार्धात उघडलं..’ असं गावभर सांगत हिंडू लागला. असो!

परंतु प्रत्यक्षात काही तोंड उघडत नाही. उघडायचा प्रयत्न केला तर जबरदस्त कळ मारते. कळ कानाच्या कडेकडेनं थेट मेंदूपर्यंत जाते. जाणकार म्हणतात, ‘किमान उभी चार बोटं आत जातील एवढं तोंड उघडायलाच पाहिजे.’ माझं तर एकही बोट जात नाही. ‘हां- हूं’ पलीकडे बोलता येत नाही. वाद घालायचा प्रश्नच येत नाही. आता मी फक्त समोरच्याचं सगळं बरोबरच आहे अशी मान हलवतो. समोरचा खूपच बोलायला लागला तर त्याला थांबवण्यासाठी हात वर करतो. मी आशीर्वाद देतोय असं समजून तो पायांना स्पर्श करतो. कळ मारते, पण किंचाळता येत नाही. आता मी आतल्या आत किंचाळायची सवय लावून घेतली आहे. घास तोंडात जात नाही. द्रव पदार्थावर दिवस ढकलतो आहे. अमेरिकन बर्गर नको, पण देशी पाणीपुरी तरी खाता यावी एवढीच इच्छा आता उरली आहे.

मुंबईच्या डॉक्टरांनी काळजी करण्याचं कारण नाही असा सल्ला दिला आहे. दाढेची ट्रीटमेंट चालू असताना बराच वेळ जबडा उघडा ठेवावा लागतो. त्यामुळे जबडय़ाचे स्नायू आखडतात आणि तोंड बंद होतं असं म्हणतात. दोन-चार दिवसांत तोंड उघडेल असं डॉक्टर म्हणाले. पण त्यालाही आता दोन महिने झाले. बोलायचा प्रयत्न करावा तर एक नॉर्मल कळ मारतेच; शिवाय गालफड दाढेत अडकून दुसरी एक जबरदस्त कळ मारते. बाहेरून कुणी तोंड बंद करू पाहिलं तर लढता तरी येईल, पण आतूनच बोलणं थांबवलं जात असेल तर काय करावं? काळजी वाटते. मी माझ्या नकळत बोलण्याची नवीन रीत शोधून काढली आहे. ठणकणाऱ्या डाव्या दाढेला टाळून मी जीभ उजवीकडे वळवून बोलतो. ऐकणाऱ्याला बोलणं कळत नाही. हरकत नाही. आपण निर्थक का होईना, बोलू शकलो हे समाधान मोठं आहे.

मध्यंतरी एक अर्थपूर्ण वैचारिक नाटक आलंय असं कळलं. बाजारात हसवणारी बरीच नाटकं आली होती. पण हसवणाऱ्या नाटकानं हसू आलं तर कळ मारेल म्हणून मी वैचारिक नाटक बघण्याचा निर्णय घेतला. पडदा उघडल्या उघडल्या कंटाळ्याचे अटॅक येऊ लागले. जांभई द्यावी तर कळ मारते अशी अवस्था झाली. नाटक पडलंच होतं; आता फक्त पडदा पडायची वाट बघणं एवढंच उरलं होतं. लेखकाकडे बोलण्यासारखं काही नसल्यामुळे तो लवकर थांबण्याची शक्यता नव्हती. जांभया आणि कंटाळ्यानं मी हैराण झालो. मध्यंतरी बनारसला हुबेहूब संत वाटावेत असा पोशाख केलेले एक गृहस्थ भेटले होते, ते आठवले. माझी करुण कहाणी ऐकून ते म्हणाले होते, ‘भरोसा रखो.. सब ठीक होगा.’ मी भरोसा कुणावर ठेवायचा, ते विचारायला विसरलो होतो. मी समोर जे नाटक चाललंय ते वैचारिक आणि अर्थपूर्ण आहे असा भरोसा ठेवायचा ठरवलं. आसपासच्यांनी असा भरोसा ठेवलेला दिसतच होता. मीही ठेवला.

आणि चमत्कार झाला! कंटाळा गेला. जांभया थांबल्या. लेखकाच्या विचाराने मी आतून समृद्ध होत चाललोय असं जाणवायला लागलं. नाटकाच्या शेवटी सर्व नटांना भेटलो. पुरुष कलावंतांना मिठय़ा मारल्या. एक समृद्ध करणारा वैचारिक अनुभव दिल्याबद्दल आभार मानले. हे ऐकून ते गलबलले. मीही गलबललो. कळा बंद झाल्या. ओढलेल्या चेहऱ्यावर चमक आली. खोटेपणातच खरी पॉवर असते ही जाणीव झाली.

या कठीण काळात अनेक लहानथोर भेटले. लोकांनी- मी आता सकारात्मक विचार करावा असा सल्ला दिला आहे. घराबाहेर निसर्ग नसल्यामुळे घरातच निसर्गचित्रं लावली आहेत. घरातल्या घरात फिरतो. चटईवर योगा करतो. सतत खाली डोकं आणि वर पाय केल्यामुळे मी डोक्याने चालतो आहे आणि पायाने विचार करतो आहे असं वाटू लागलं आहे. ठेचल्या- चेचल्याच्या बातम्यांनीही आतून गुदगुल्या व्हाव्यात असा प्रयत्न सुरू आहे. लवकरच जमेल असा भरोसा वाटतो आहे.

खिडकीबाहेर काहीतरी गडबड सुरू आहे. महागडय़ा मोटरसायकलवर बसून आलेले सुसंस्कृत तरुण एकाला खाली पाडून लाठय़ा-काठय़ाने बडवताहेत. त्यांच्यातलाच एक कवीमनाचा कलावंत तरुण थोडय़ा दुरून मोबाइलवर सर्व शूट करतो आहे. चांगला अँगल मिळावा म्हणून धडपडतो आहे. मारण्याचा वेग वाढला आहे. पूर्वी एवढय़ा माराने माणूस मरत असे. आता माणसाची मार खाण्याची क्षमताही वाढली आहे.  मला ओरडावंसं वाटतं, पण कळ मारेल या भीतीने गप्प राहतो. मार खाणाराही ओरडत नाही. सगळ्यांच्याच तोंडाचा प्रॉब्लेम झालाय. तोंड बंद होण्याची साथच आली आहे. तोंड बंद करून जगण्याची चटक लागण्याअगोदरच काहीतरी करायला हवं. काळजी घ्या..

shafaat21@gmail.com