News Flash

समरसून जगण्याचा कलात्मक दस्तावेज

जुने घर विकून टाकण्यापूर्वी जुन्या सामानाची विल्हेवाट लावताना ताईने लिहिलेले काही कागद लेखकाला सापडले.

‘जीवलग’- विजय पाडळकर,

आश्लेषा महाजन

‘जिवलग’ हे विजय पाडळकर यांचे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. जीवनाला कधी अर्थ, कधी बळ, कधी आनंद वा विविध अनुभूतींचा सुगंध देणाऱ्या विविध व्यक्तींबद्दलचे हे लेख अतिशय रसाळ आहेत. ही सर्व व्यक्तिचित्रणे हाडामासाच्या माणसांची आहेत; काल्पनिक नाहीत. त्यामुळे त्यांना संदर्भाच्या अस्सलपणाची पाश्र्वभूमी आहे. आपली आई, लेक, नात  यांच्याविषयीचे लेख त्यातील साध्यासुध्या प्रसंगांच्या कथनातून वाचकाला अगदी आपलेसे वाटू लागतात. कारण माणसे अगदी बारकाईने वाचण्याची पाडळकरांची सवय हीच त्यांची चित्रदर्शी शैली बनून सामोरी येते. गुलजारांसारख्या थोर कलावंताच्या सहवासाने अभिमंत्रित झालेल्या क्षणांचेही पाडळकरांनी यथावकाश ललित व्यक्तिचित्रणात रूपांतर केले आहे. एकूण दहा लेखांचे हे पुस्तक एका मध्यमवर्गीय, सरळमार्गी, संवेदनशील लेखकाचे त्याच्या परिघात येणाऱ्या ठसठशीत व्यक्तींविषयीचे हृद्गत आहे.

पहिल्याच लेखात ‘ताई’- म्हणजे लेखकाची आई वाचकाला भेटते. जुने घर विकून टाकण्यापूर्वी जुन्या सामानाची विल्हेवाट लावताना ताईने लिहिलेले काही कागद लेखकाला सापडले. त्यावर ताईने लिहिलेला मजकूरच लेखकाने या लेखात जसाच्या तसा- मुद्रितशोधन न करता-  टाकला आहे. बीड या आपल्या माहेरचे, तिथल्या देवळांचे नि रस्त्यांचे-पेठांचे, ताईच्या चतुर आईचे चित्रदर्शी व्यक्तिचित्रण त्यात आहे. जुन्या काळातले एका सामान्य सोशिक स्त्रीजीवनाचे कवडसे त्या लेखनात पडले आहेत. आपल्या आईमधील हे सुप्त साहित्यगुण, त्यातील प्रांजळपणा लेखकाच्या ध्यानात आला. तो मजकूर पुस्तकात छापून त्यांनी जणू आपल्या जन्मदात्रीला आदरांजली वाहिली आहे. लेखाच्या उत्तरार्धात ताईविषयीच्या अनेक आठवणी लेखकाने  तरलपणे सांगितल्या आहेत. अनुवंशाने लेखनाचे गुण पुढच्या पिढीत येतात, हेही अध्याहृत आहेच.

‘गोजी’ आणि ‘गोजीचा एक दिवस’ हे दोन लेख म्हणजे लेखकाच्या नातीविषयीचे जणू चलत् चित्रण आहे. नवजात बाळ जेव्हा घरी येते तेव्हा अधीरता, उत्सुकता, उत्साह यांचे संमिश्र काहूर सर्वाच्या मनात असते. वंशसातत्य ही तर आदिम प्रेरणा. खरं तर तुमच्या-आमच्या घरातलेच हे वातावरण लेखकाने बारकाईने, जसे घडले तसे नोंदवले आहे. अपत्यप्राप्तीचा- वंशसातत्याचा तो सोहळा रंगवताना लेखक कधी भावुकही होतो. ‘आपली आई आपल्यासाठी खस्ता खाते हे आपण गृहीतच धरलेले असते. परंतु त्यासाठी तिला काय काय सहन करावे लागले असेल,’ याचे नव्याने होणारे दर्शन पाडळकरांना अंतर्मुख करते. तसेच आपल्या मुलांचे जन्म आणि त्याभोवतीचे वातावरण आपल्याला उत्कटतेने का आठवत नाही, हा विचारही दचकवणारा आहे. जगण्याच्या कोलाहलात आपण वर्तमानात जगतच नाही, पळत राहतो, आठवणींना छानसे कोंदणच द्यायचे राहून जाते असेच काहीसे वाटते.

आयुष्यात अपघाताने माणसे भेटतात. ध्यानीमनी नसताना आपल्या आयुष्याचा अर्थपूर्ण भाग होतात. काहीशा अशाच प्रकारे लेखकाच्या जीवनात कादंबरीकार, समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख आले होते. बँकेच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे लेखकाला अनेक गावे नि माणसे अनुभवता आली. एरवी तापट, अबोल असणारे सरदेशमुख लेखकाच्या बाबतीत मात्र मवाळ व मनमिळाऊ झाले. याचे कारण साहित्यप्रेम हा त्यांच्यातील सामायिक दुवा! आपुलकी निर्माण झाल्याने लेखक त्यांना ‘बापू’ या खासगी नावानेही संबोधू लागले. ‘श्रेष्ठ साहित्यकृती शाश्वत जीवनमूल्यांचा कसा उद्घोष करते व ती तिच्या श्रेष्ठत्वाची महत्त्वाची खूण कशी असते?’ किंवा ‘कादंबरी श्रेष्ठ की कथा?’ या व अशाच प्रकारच्या साहित्य-समीक्षेविषयीच्या गंभीर चर्चा त्यांच्यात घडल्या. एका प्रज्ञावंताच्या सानिध्यात राहण्याने लेखक कसा संदर्भसमृद्ध झाला, हे या लेखातून बारीक तपशिलांत रेखाटले आहे. ‘वनवास’, ‘शारदासंगीत’, ‘झुंबर’, ‘पंखा’ अशा पुस्तकांतून पौगंडावस्थेतील एका निरागस मुलाची- लंपनची- भेट घडवून आणणारे प्रकाश नारायण संत एका अपघातात अनपेक्षितपणे गेले. त्यांच्याशी पाडळकरांचा पत्रव्यवहार होता, मत्री व येणे-जाणे होते. प्रत्यक्ष भेटींतून, पुस्तकांतून नि पत्रांतून भेटलेला हा माणूस चित्रित करताना पाडळकर हळवे झाले आहेत. साध्याच प्रसंगांना डोळ्यांसमोर उभे करण्याची लेखकाची कथनशैली प्रासादिक, अनलंकृत आहे. ती वाचकाला बोट धरून पुढे नेते.

‘धर्मापुरीकर अ‍ॅण्ड सन्स’ या शीर्षकाचा दीर्घ लेख धर्मापुरीकर या साहित्यप्रेमी कुटुंबातील तीन पिढय़ांशी असलेला दोस्ताना कथन करतो. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे पाडळकर कुटुंब कंधारमध्ये येतात. तिथे भेटलेल्या उदू धर्मापुरीकर याने लेखकाचे बालपण काही काळासाठी व्यापले. नारायणराव, श्रीधरराव तसेच लेखक मधुकर धर्मापुरीकर, इत्यादी मंडळींच्या आठवणी वाचकांना त्या-त्या व्यक्तीचा परिचय करून देतात. धर्मापुरीकरांचे माकड, घोडी, कुत्रा, गायी, म्हशी, पोपट, इत्यादींचे भूतदयामंडळ असो वा काकांचे उर्दू बोलणे असो, लेखक सहजपणे वाचकांना धर्मापुरीकरांच्या घरीदारी जणू फिरवून आणतात. अगदी नव्या पिढीतला अजिंक्य ऊर्फ जिंकू धर्मापुरीकर हाही लेखकाचा तरुण मित्रच! अशा या पिढीजात मत्रीविषयीचा लेख अतिशय दिलखुलास आहे. याशिवाय कंधारच्या शाळेतले पीटीचे शिक्षक, ड्रीलमास्टर मुलीसाब यांच्याविषयीचा लेख अतिशय हृद्य आहे. खेळाविषयी आत्यंतिक निष्ठा बाळगणारे हे मुस्लिम शिक्षक. त्यांनीही लेखकाचे बालपण समृद्ध केलेले आहे. आयुष्याच्या अखेरच्या काळात एका खेडय़ात पत्ता शोधत शोधत लेखक त्या शिक्षकाच्या घरी जातो आणि स्मरणरंजनात सगळेच कसे रममाण होतात, हे सारे लेखात खूप तरलपणे उतरले आहे. लेखकाचे वडील उपशिक्षणाधिकारी (ज्याला उर्दूत ‘नाजरसाहेब’ म्हणतात) असल्याने त्यांना बदलीच्या त्या-त्या गावी मान असे. त्यामुळे साहेबांचा मुलगा म्हणून लेखकही त्या-त्या गावच्या लोकांच्या ध्यानात राहिल्याचे दिसते. त्यामुळे आठवणींच्या लेखनासाठी या गोष्टी पूरक, पोषक ठरल्या आहेत. ‘जवळेकर मावशी’ ही अशीच एक व्यक्तिरेखा. कृष्णा नावाच्या आईबापाविना पोरक्या मुलाला जेवूखाऊ घालणारी ही प्रेमळ, बडबडी मावशी. साध्यासाध्या माणसांकडूनही आपण काही शिकत असतो, घडत असतो हे सांगणाऱ्या या व्यक्तिरेखा. आपल्या डॉक्टर झालेल्या मुलीविषयीचा ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ नामक लेखही अतिशय तरल आहे.

पाडळकरांवर प्रभाव टाकणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी एक म्हणजे ख्यातकीर्त कवी-लेखक गुलजार! त्यांची ‘रावीपार’ (कथा), ‘आंधी’ (पटकथा) ही गुलजार यांची गाजलेली दोन अनुवादित पुस्तके, याशिवाय ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ हा गुलजारांच्या निवडक कवितांचा भावानुवाद, ‘बोस्कीचे कप्तान काका’ हा गुलजारांच्या बालकथांचा अनुवाद आणि  निमित्तानिमित्ताने गुलजारांच्या भेटी, चर्चा, मुलाखती.. हे सारे त्यांचे गुलजार-प्रेम दर्शवतात. त्यांच्या सिनेमांविषयीच्या रसास्वादांच्या पुस्तकांतही याचे संदर्भ येतात. असा हा गुलजार नावाचा जादुगार एके दिवशी नांदेडला एका व्याख्यानमालेला येतो, मग लेखकाच्या घरी जातो, त्यांचा पाहुणचार स्वीकारतो, ‘गर्द रानात भर दुपारी’ या पुस्तकाचे प्रकाशन करतो आणि लेखकाच्या नातीला- गोजीला मांडीवर घेऊन खेळवतो.. हे सारेच मुळातून वाचण्यासारखे आहे.

व्यक्तिचित्रण लिहिणारा माणूस माणसांवर प्रेम करणारा असावा लागतो. तो जीवनोत्सुक, समाजाभिमुखही हवा. त्याची निरीक्षणशक्ती आणि नोंदवही भरगच्च हवी. मनात मुरलेले लिहून काढण्याची निकड वाटायला हवी. हे सारे पाडळकरांकडे आहे. त्यांची कथनशैली प्रासादिक, ओघवती, चित्रदर्शी, तपशील देणारी व अनलंकृत आहे. त्यांच्या भाषेत क्वचित कोठे हिंदी-उर्दूचा गंधही दरवळतो. किराया, शरीक होणे, बिमारी, जानपहचान असे काही शब्द नांदेडच्या मातीतून आल्यासारखे वाटतात नि कथनात एकजीव होतात. ही व्यक्तिचित्रणे सुमारे सत्तरेक वर्षांच्या समरसून जगण्याचा कलात्मक दस्तावेज आहे.

‘जीवलग’- विजय पाडळकर,

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई,

पृष्ठे- १६५, मूल्य – २०० रुपये.

ashlesha27mahajan@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 1:02 am

Web Title: author vijay padalkar jivlag book review
Next Stories
1 लल्लेश्वरीची जीवनकथा
2 ‘कथक’विषयी सबकुछ
3 पण लक्षात कोण घेतो? 
Just Now!
X