मोठय़ा शहरांचा विस्तार होऊ लागला तशी शहराभोवतीच्या गावाची स्थिती पालटू लागलेली दिसते. औद्योगीकरण आणि इतर कारणामुळे शहरांचा नकाशा झपाटय़ाने बदलू लागला आणि छोटय़ा-छोटय़ा गावांना देखील शहरांचा तोंडवळा प्राप्त झाला. बिल्डर लॉबीने धूर्तपणाने आणि दूरदृष्टी ठेवून मोठय़ा प्रमाणात शहरालगतच्या जमिनी खरेदी केल्या आणि या छोटय़ा गावांतील अर्थकारण बदलून गेले. मुंबई-पुणे या शहरांच्या पट्टय़ात तर जमिनींचे भाव गगनाला भिडले. जमिनी विकून छोटे शेतकरी मालामाल झाले. त्यापकी फार थोडय़ा लोकांनी नीट आíथक गुंतवणूक केली. उर्वरित बहुसंख्य शेतकरी अचानक पसा हातात पडल्यामुळे सरभर झाले. काही देशोधडीला लागले. पसा सांभाळता न आल्याने कफल्लक झाले. आपल्याच शेतावर उभारलेल्या टॉवरमध्ये वॉचमन झाले. काही व्यसनाधीन तर काही गुंड, मवाली झाले. जमिनीची खरेदी-विक्री करणारे एजंट वाढले. राजाश्रयाने एजंट लोकांची मक्तेदारी वाढली. पशाच्या जोरावर अर्धशिक्षित तरुण ‘भाईगिरी’ करू लागले. सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने पुढारी झाले. दंडेली करून पसा मिळवणे, त्यातून जमीन खरेदी करणे, ती विकून पुन्हा पसा कमवणे, सहजपणे जमीन खरेदी करता आली नाही तर पिस्तुलाचा धाक दाखवून हडप करणे असे दुष्टचक्र सुरू झाले आणि त्यातून समाजऱ्हासाची बीजं पेरली गेली. कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लागला. खेडय़ातलं गावपण नाहीसं झालं. परस्परातील सामंजस्य आणि आस्था लयाला गेली. मानवी नातेसंबंध दुरावले आणि फक्त पशाला किंमत प्राप्त झाली. पशापुढे सगळेच फिके पडले. हे वर्तमानातील धगधगते समाजवास्तव बबन मिंडे या तरुण लेखकाने आपल्या ‘लँडमाफिया’ या कादंबरीतून अधोरेखित केले आहे.
गेल्या १५-२० वर्षांत या सामाजिक वास्तवाने अनेक प्रश्नांना जन्म दिला. या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असणारे मात्र हतबल झाले. सामाजिक संवेदना नावाची गोष्टच हद्दपार झाली. पसा हाच जगण्याचा केंद्रिबदू झाला की कशाप्रकारचे अरिष्ट निर्माण होऊ शकते याचे सूचन या कादंबरीत फार प्रत्ययकारीपणे व्यक्त झाले आहे. जमिनीच्या वादातून पंढरीनाथ जांभळे याचा जांभुळणी गावात निर्घृण खून झाला आहे. जमिनीच्याच व्यवहारामुळे त्याचा बाप केरू माधू जांभळे याचे अपहरण झाले आहे. पोलीस मात्र ही अपहरणाची केस नसून मिसिंगची आहे असे ठरवून चौकशी करीत आहेत. या घटनाकेंद्राभोवती कादंबरी फिरत राहते. या घटनेच्या संदर्भात जे नाटय़मय प्रसंग घडत जातात, त्याची गुंफण मिंडे यांनी फार सशक्तपणे केली आहे. या लेखकाचे सामाजिक भान अतिशय तीव्र आहे. ग्रामजीवनातील जीवनशैली आणि त्याला व्यापून असलेला भोवताल याची फार चांगली जाण या लेखकाजवळ आहे. पोलिसांचा निबरपणा आणि बनेलपणा, भाईगिरी करणाऱ्यांची स्वार्थी मानसिकता, सूत्रधार असूनही कायम पडद्याआड राहणारे राजकारणी यासंबंधीचे लेखकाचे आकलन चकित करणारे आहे. शिक्षणात बऱ्यापकी गती असलेले तरुण बेरोजगार झाले. मात्र लफंगेगिरी करणारे सुमार तरुण गळ्यात किलोभर सोन्याचे गोफ, मनगटावर ब्रेसलेट, पांढरे शुभ्र कपडे परिधान करून, डोळ्यांवर गॉगल चढवून, कानाशी महागडा मोबाइल लावत, इम्पोर्टेड चार चाकी गाडय़ांतून, गुंड पोरांना हाताशी धरून समाजालाच वेठीला धरतात, तेव्हा सामाजिक मूल्यांचाच प्रश्न निर्माण होतो. अनतिक मार्गाने हडेलहप्पी करीत पसा मिळवण्याची तहान समाजालाच गत्रेत लोटत असते, हे वास्तव या कादंबरीतून फार उत्कटपणे चित्रित झालं आहे.
पूर्वार्धापेक्षा कादंबरीचे कथानक उत्तरार्धात वेगवान होत जाते. कथानकात रहस्यमयता काठोकाठ भरलेली असली तरीही ही कादंबरी रहस्यमय होत नाही आणि ही बाब समाधानाची म्हटली पाहिजे. मात्र वाचकांची उत्कंठा शिगेला पोहोचवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. बबन मिंडे या लेखकाच्या वाटय़ाला आलेल्या जीवनानुभवाचेच हे चित्रण आहे, असे वाटण्याइतपत लेखक या कादंबरीतील सामाजिक पर्यावरणाला भिडला आहे. काही घटना प्रसंगांतून लेखकानं मनस्वी नाटय़ उभं केलं आहे. उदा. ओढय़ात वाहून आलेल्या अनोळखी प्रेताची नातेवाइकांनी ओळख पटल्याची खोटी जबानी देणं. या वेळी गोदावरी-दामोदरची झालेली मनस्थिती आणि संवेदनाहीन एजंट रमेशचा ताíकक युक्तिवाद. पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर माने आणि भाईगिरी करणाऱ्या भाऊंचा वार्तालाप, त्यातून परस्परांवर केली जाणारी कुरघोडी हे संवादाच्या माध्यमातून मिंडे यांनी फार चपखलपणे समोर आणले आहे. माहितीचा अधिकार हे विधायक कार्यासाठी असणारे एक प्रभावी अस्त्र आहे. या अस्त्राचा वापर कोणी, कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तथापि, लोकशाही व्यवस्थेतील सुदृढ समाजनिर्मितीसाठी या कायद्याचा वापर होण्याऐवजी स्वार्थी, मतलबी हेतूने हा कायदा राबविला जातो. आणि मग माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकत्रे पोटभरू होत जातात. जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात तर या कार्यकर्त्यांचा स्वार्थलोलुप धाक आणि दबदबा लक्ष वेधून घेणारा आहे. या सगळ्या मानसिकतेचा वेध बबन मिंडे यांनी फार सुरेखपणे घेतला आहे. भंडाऱ्या, खांडक्या, प्राध्यापक, वास्को द गामा ही एजंट असलेल्या व्यक्तिरेखांची केवळ नावं नाहीत तर त्या नावांना एक वैशिष्टय़पूर्ण पाश्र्वभूमीही आहे. जमीन कोणाची आहे, ती कशी उपलब्ध होईल याचा शोध घेण्यात माहिर असणारा म्हणजेच वास्को द गामा. या एजंटांची जीवनशैली, त्यांचे छंदीफंदी जीवन, सहजपणे तोंडी असलेली शिवराळ भाषा यामुळे या व्यक्तिरेखा जिवंत झाल्या आहेत. जमीन खरेदी-विक्री करण्याचे टप्पे, त्याला लागणारी महसूल विभागातील कागदपत्रे, त्याची वैधता, होणारा आíथक व्यवहार याचे सुक्ष्म चित्रण बबन मिंडे यांनी केले आहे. एका अर्थाने त्यांनी या सगळ्या गोष्टींचा नीट ‘होमवर्क’ केलेला दिसतो. कादंबरीसारख्या वाङ्मयप्रकारांतर्गत लेखन करण्यासाठी लेखकाला किती परिश्रम करावे लागतात, याचं हे एक चांगलं उदाहरण आहे.
‘लँडमाफिया’ वाचून एक प्रश्न मनात आला, की जमिनीबद्दल मालकाच्या मनात प्रेम तर असतंच पण बदलत्या काळात हे सगळे व्यवहार कसे थोपवणार? हे व्यवहाराचं दुष्टचक्र असंच चालत राहिलं तर शेतीसाठी जमीन राहणारच नाही. मग सामान्यांचे जीवन पुरते दुरापास्त होण्याचीच शक्यता जास्त. पुढचा काळ भीषण असेल. या भीषणतेची लख्ख जाणीव बबन मिंडे या लेखकानं करून दिली आहे.
समाजात क्रमाक्रमाने वाढत जाणारा ओंगळ चंगळवाद, श्रीमंतीचे किळसवाणे प्रदर्शन, कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये वाढत जाणारा अविश्वास, व्यवहाराच्या रूक्षपणामुळे हरवलेला मायेचा ओलावा आणि हे सगळं हतबलपणे पाहणारा विचारी, संवेदनशील माणसं, हे सगळं चित्र ‘लँडमाफिया’मध्ये पाहायला मिळतं आणि वाचक अस्वस्थ, अंतर्मुख होत जातो.
‘लँडमाफिया’- बबन मिंडे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे- २३२, मूल्य-२५० रुपये.
डॉ. मनोहर जाधव – manohar2013@gmail.com

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!