आमच्या गुरुमाऊलीचं (विजया मेहता) आत्मकथन ‘झिम्मा’ २०१२ मधलं. ते वाचलं. वैयक्तिक मत : मला अधिक अपेक्षा होत्या. ‘झिम्मा’नं त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. काहींचं मत माझ्याप्रमाणेच. काहींना बरं वाटलं, काहींना नाही आवडलं. तर पुष्कळ आवडलेले लोक खूपच आहेत. थोडक्यात, ‘झिम्मा’ बाईंनी आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहिल्यासारखं.

..आणि चार वर्षांतच- नोव्हेंबर २०१६ मध्ये विजया मेहता यांच्यावरचं ‘बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ हे पुस्तक प्रकाशित झालं. लगेच वाचून काढलं. खूप आवडलं. अर्थात दोन कारणं होती आवडण्यामागे. एक म्हणजे आपल्याला आदरणीय असलेल्या व्यक्तीबाबतचं पुस्तक आणि दुसरं कारण म्हणजे माझ्यासारख्यांच्या ज्या ज्या अपेक्षा होत्या विजयाबाईंकडून- त्या पुष्कळ प्रमाणात त्यातून पूर्ण होत होत्या.

पुस्तक वाचून बरेच महिने झाले होते म्हणून ‘बाई’ पुस्तकाचं पुनर्वाचन केलं आणि लक्षात आलं, की या पुस्तकाची १८२ पानं ही सगळीच्या सगळी मराठी नाटकाचा (गेल्या निदान पन्नास वर्षांचा तरी) इतिहास आहे. आणि हा इतिहास एका विद्याविभूषित स्त्रीनं अप्रतिम घडवला आहे.

वीसेक वर्षांपूर्वी मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एकनाथ साखळकर आणि साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे या दोघांनी मिळून (आता दोघेही हयात नाहीत.) बाईंचा शिष्य म्हणून बाईंवर मी एक लेख लिहावा म्हणून आग्रह केला. ‘महाराष्ट्राची मानचिन्हे- खंड दोन’मध्ये माझा तो लेख प्रसिद्धही झाला आहे. त्या लेखाबद्दल प्रा. साखळकर आणि डॉ. भेंडे यांनी पत्रं लिहून ‘लेख छान जमला आहे’ असं माझं कौतुकही केलं. परंतु गेल्या वर्षी साहित्यविश्वात भर घालणारं महत्त्वाचं पुस्तक ‘बाई’ हे आहे, असं आता या पुस्तकाच्या पुनर्वाचनानंतर माझ्या अधिकच लक्षात आलं.

‘बाई’ या पुस्तकामध्ये विजयाबाईंचं जे कौतुक आहे ते आपण क्षणभर जरा दूर ठेवू या. ते कौतुक योग्यच आहे आणि क्रमप्राप्तही आहे. परंतु या पुस्तकात ज्या ज्या लेखण्या आहेत, त्या इतक्या महत्त्वाच्या वाटतात मला, की त्याबद्दल वर्णन करायला माझ्याकडे शब्द फार कमी आहेत. ज्येष्ठ लेखिका विजयाबाई राजाध्यक्ष, लेखक अंबरीश मिश्र, ज्येष्ठ संगीततज्ज्ञ (ज्यांची विजयाबाईंबरोबर नाळ जुळली होती आणि ‘बॅरिस्टर’पासून ज्यांच्याशी माझेही वैचारिक सूर जुळले ते) भास्कर चंदावरकर, सत्तरच्या दशकापासून मी ज्यांचा अभ्यास करू लागलो ते नाटककार महेश एलकुंचवार, किशोरीताई आमोणकर, नाटककार वृंदावन दंडवते आदी विचारवंत-लेखकांनी एखादं उत्खननाचं कार्य हाती घ्यावं अशा अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीमध्ये विजया मेहता यांची विविध दृष्टिकोनातून जी रेखाचित्रं चितारलेली आहेत ती साहित्यिक मूल्यांच्या संदर्भात उत्तम आहेतच; परंतु विजयाबाईंच्या कर्तृत्वाच्या, मेहनतीच्या, अभ्यासाच्या, विचारांच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारीही आहेत. बाईंबाबतचं सखोल दर्शन अभ्यासकांना आणि आजच्या पिढीतल्या सर्व क्षेत्रांतल्या रंगकर्मीना आणि वाचकांनासुद्धा जसं घडायला हवं तसं या लेखकांनी घडवलं आहे.

स्वत: विजयाबाईंनी अलिप्ततेनं, तटस्थ राहून त्यांच्या गुरूच्या- पीटर ब्रूकच्या ‘महाभारत’ या बारा तासांच्या महानाटय़ाचं जे निरीक्षण आणि परीक्षण केलेलं आहे तेसुद्धा आजच्या पिढीच्या रंगकर्मी/ रंगधर्मीनी जरूर वाचण्यासारखं आहे.

पुस्तकात ‘बाईंची गँग’ या विभागात पंधराजणांचे लेख आहेत. त्यातले महेश एलकुंचवार, वृंदावन दंडवते, मीना नाईक, विजय केंकरे यांचे लेख अभ्यासनीय आहेत. बाकी सगळ्यांचेच लेख अंत:करणापासूनचे, परंतु थोडी भावुकता चिकटलेले आहेत. अर्थात म्हणून त्यांचं मूल्य कुठंच कमी होत नाही. व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करून नेमकं गाभ्यापर्यंत कसं पोहोचायचं आणि वाचकालासुद्धा ते आकर्षित करेल अशा वैचारिक पातळीवर कसं न्यायचं, असं कोणी विचारलं तर मी म्हणेन, ‘बाई’ या पुस्तकातील विचारवंत-लेखकांचे लेख असा निखळ आनंददायक अनुभव देणारे आहेत.

सायली राजाध्यक्ष, वंदना खरे या अनुवादिकांचा अनुवाद हा ‘अनुवाद’ वाटत नाही, ही फार मोलाची गोष्ट आहे. शब्दांकन करणाऱ्या नंदिनी बेडेकर यांचंही मन:पूर्वक अभिनंदन! स्वत: विजयाबाईंनी त्यांच्या स्नेहपरिवाराबद्दल विस्तृतपणे लिहिताना सर्व दिग्गजांची जी व्यक्तिचित्रणं उभी केली आहेत ती अत्यंत लाघवी आणि परिपूर्ण आहेत, हे मी अधिकारानं नमूद करतो. कारण त्या सातच्या सातही व्यक्तींना (पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, डॉ. श्रीराम लागू, मोहन तोंडवळकर, दामू जव्हेरी, भक्ती बर्वे) माझ्या आयुष्यातही वैयक्तिक पातळीवर मी ओळखत होतो, आहे. माझे त्यांचे स्नेहबंध होते, आहेत.

जाता जाता एक गंमत पण महत्त्वाची, ती सांगतो. वीस वर्षांपूर्वी मी बाईंवर प्रदीर्घ लेख लिहिला. त्याचा उल्लेख वर केलाच आहे. परंतु बाईंवरच्या ‘बाई’ या पुस्तकाच्या पुनर्वाचनानंतर बाईंबद्दल एकूणच माझ्या डोक्यात आणखी प्रकाश पडला आणि त्याचबरोबर ‘बाई’ या पुस्तकासंदर्भात ज्या ज्या लेखकांनी अतिशय विचारपूर्वक आपली मतं मांडली त्या सर्वाच्याच लेखनशक्तीला वंदन करावं असा विचारही मनात आला. विजया मेहतांवर फक्त टीका करणाऱ्यांनी आणि त्यांच्या भक्तीमध्ये अडकलेल्या सर्वानीच हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. खरं तर रंगधर्मी/ रंगकर्मीनी ते संग्रहीच ठेवलं पाहिजे असं माझं मत झालं आहे आणि ते ठाम आहे.

  • ‘बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’
  • संपादन- अंबरीश मिश्र,
  • राजहंस प्रकाशन,
  • पृष्ठे- १८२, मूल्य- २५० रुपये.

– विक्रम गोखले