राजीव जोशी

मराठीत कविता लिखाणाबरोबर अनेक कवींनी गझलाही लिहिलेल्या आहेत. गझलकार सुरेश भट यांच्या ‘रंग माझा वेगळा’मध्येही कविता आहेत. माधव जूलियन, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आदी मंडळींनी कवितालेखनाबरोबर गझला लिहिल्या आहेत. गझल तंत्रबद्धता व वृत्ती यांची सुसंगती असलेला, तर कवितालेखन हा मुक्त मनोवस्था असणारा आकृतिबंध आहे. गझलकार अनेक आहेत, गझलेच्या आकृतिबंधात ‘नज्म’ लिहिणारेही आहेत. मात्र त्याबरोबरीने मुक्तछंदात कवितालेखन करणारे मोजकेच आहेत. गझलेबरोबरच कविता लिखाण करणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे- चंद्रशेखर सानेकर! सानेकर हे प्रामुख्याने अभ्यासू, प्रयोगशील गझलकार म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत त्यांचे पाच गझलसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत, तर ‘भग्न आस्थेचे तुकडे’ हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

या संग्रहातील कवितांचे तीन भाग केले आहेत. प्रत्येक भागापूर्वी अर्थपूर्ण प्रास्ताविक आहे. पहिल्या प्रास्ताविकात सानेकर लिहितात- ‘हे सगळं भान बुडण्याची भीती वाटते म्हणून नाही; तर तशी कधी वेळ आलीच तर नाइलाज म्हणून नव्हे, तर खुशीखुशीनं बुडता यावं म्हणून एरवी महत्त्वाचं आहे ते स्वत:चं वाहणं, प्रवाह नाही. हे इमान आपण स्वीकारलेलं आहेच!’ प्रास्ताविक कवीच्या काव्यवृत्तीचे सूचक आहे. पहिल्या भागातल्या तेवीस कविता म्हणजे व्यक्तीपासून समष्टीपर्यंतचा कवीने घेतलेला शोध आहे. यात नात्यांमधली गुंतवणूक आहे, तसेच त्यातले ताणतणावही. ‘मोर’ या कवितेत जंगलात नाचताना पाहिलेल्या मोरावर फिदा होऊन तिने मोराला संसाराच्या चार भिंतींत आणून ठेवल्यावर तो तिला सांगतो की-

‘मोर आपल्या हक्काच्या जंगलात होता

म्हणून तो हवं तसं, हवं तेव्हा

नाचत होता

तू फिदा त्याच्या याच नाचावर झाली होतीस

आता

मोरानं नाचावं म्हणून

कुणी आपल्या संसाराचं जंगल करीत नाही’

या ठिकाणी मोर परस्परसंवादाचं माध्यम व कलंदर वृत्तीचं प्रतीक आहे. पती-पत्नीच्या नात्यात ताणतणाव असले, तरी त्यातले नात्याचे गहिरे पदर दोस्तांच्या मफलीतून रात्रीबेरात्री घरी परतल्यावर पाठ करून झोपलेल्या बायकोकडे पाहताना कसे उलगडतात? ‘बायकोची पाठ’ या कवितेत कवी म्हणतो-

‘आता बायकोची पाठ

ही नुसती पाठ राहिलेली नसते,

ती बनलेली असते आरसा

आपण कुणाच्यात तरी आहोत

हा विश्वास आपल्याला

आता तिच्याकडे बघून मिळत असतो’

कवितेतील शब्दांच्या अर्थावरून भावना दुखावल्याने वादंग होण्याचा आजचा काळ आहे. मात्र ‘अर्थ’ या कवितेत सानेकर सांगतात-

‘आरशाच्या मालकीचा कुठलाही एकमेव चेहरा नसतो,

कवितेच्या मालकीचा कुठलाही एक अर्थ

नसतो’

समाजातल्या वाढत्या असहिष्णुतेवर उपरोधातून कवी अचूक भाष्य करतो. ‘एक होता विद्वान’ या कवितेत ते म्हणतात-

‘आजकालचे ऋतूच बिघडून गेलेत

हे झाडांचं सळसळणं,

कोवळी पालवी फुटणं,

रंगीबेरंगी फुलांचं फुलणं,

त्यांचा सुगंध दरवळणं,

हा पक्ष्यांचा किलबिलाट

ही सगळी मागासलेपणाची लक्षणं आहेत,

अरे आजचा काळ कुठला

कागदांची, कागदांच्या फुलांची

हल्ली काय नवनवी डिझाइन्स निघालीयेत!’

या कवितेतला विद्वान शेवटी ऐलान करतो की, ‘जोपर्यंत झाडाझाडांना कागद फुटणार नाहीत, फांद्यांवर कागदांची फुलं फुलणार नाहीत, तोपर्यंत या जगाला मोक्ष मिळणार नाही.’ ‘प्रचार’ या कवितेत झुंडशाहीच्या बळावर शब्दांचे अर्थ बदलणाऱ्यांचा समाचार घेतलेला आहे.

संग्रहातील कवितांच्या दुसऱ्या विभागाचे प्रास्ताविक आहे- ‘ही खिंड, कधी कुठलाच फैसला होऊ देणार नाही. ती फक्त एवढंच करत राहील- आमच्या लढय़ाची आणि तुमच्या धंद्याची वेगवेगळी रूपांतरं.’ कविताही एका अर्थाने खिंडीत गाठलेल्या, फैसला न होणाऱ्या! भाषा मरणार, मरून पडली आहे असे भाषेविषयी आपण सतत ऐकत असतो. या विभागातली ‘भाषा (अ)मृत : चार खांदे’ ही कविता म्हणजे भाषाविषयक चिंतन आहे. कवी भाषेशी संवाद साधताना म्हणतो-

‘तुझी कवटी फुटण्याचा आवाज

ऐकण्यासाठी

आतापासूनच सगळय़ांनी

जिवाचे कान आणि कानाच्या एण्टिना

केल्यात

तूर्तास सगळय़ांच्या चेहऱ्यांवर एकच प्रश्न

मृतदेह अजून कसा ताब्यात येत नाहीये?’

भाषेच्या संदर्भात हे फारच सूचक आहे. या विभागातल्या कविता म्हणजे समकाळाच्या खिंडीत अडकलेले अनिर्णायक आहे. जगण्यातल्या विषमतेवर, विसंगतींवर बोट ठेवणे हे कवीचे काम असते, हे लक्षात घेता समाज खिंडीत गाठला गेलाय असेच दूरान्वयाने सानेकर इथे सूचित करताहेत.

एकविसाव्या शतकात गावातल्या बारक्या बारक्या गल्ली-आळींना ग्लोबल जाणिवा आल्या. सोबत स्पर्धा व

प्रदर्शनांनी त्यांना पूर्णत: कवेत घेतलेले दिसते. याचे फायदे-तोटे कोणते व कुणाला, याची गणिते आकलनाच्या पार आहेत. तिसऱ्या विभागाच्या प्रास्ताविकात कवी या नव्या युगाचा जगण्यातला ‘मार्केटिंग’चा फंडा मांडतो-

‘जोवर आपण असं सतत काही न काही तरी

विकून खात राहू

तोवर आपल्याला जिवंत माणूस मानलं जाईल

ज्या क्षणी आपण काहीबाही विकून खायचं

थांबू

त्या क्षणी आपल्यालाच कुणी तरी

विकून खाल्लंही असेल.

त्यापेक्षा आपण बाजारात उभं राहू या

दुसरं काही तरी हाती लागेपर्यंत

निदान स्वत:ला तरी विकून खात राहू या

सतत काही न काही तरी

आपण विकून खाल्लं पाहिजे..’

अशा काळातल्या यातना गंभीर आहेत. यातून कुणीच सुटलेलं नाही, अगदी ‘घरातील माणसं’सुद्धा! कवी म्हणतो,

‘आकाश, उजेड, वारा, माती, पाणी

सध्या

यांच्या व्यतिरिक्त कोणालाच

आपल्या यातना कळत नाहीत, दिसत नाहीत

आपल्या जीवाच्या कळा

जाऊन उभ्या राहतात त्या यांच्याच दारी’

या विभागातल्या सर्वच कविता प्रचलित समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या आहेत. मनोगतातल्या कवीच्या निरीक्षणांबाबत इतकेच म्हणता येईल, की कविता या आकृतिबंधात मिळालेल्या मोकळिकीमुळे गझलेतली कलाटणी वा चमत्कृती यात आढळत नाही. प्रगल्भ वैचारिकतेमुळे कवी कवितेत थेट उतरलाय. ‘तुमचा फैसला काय व्हायचा तो होवो, आपल्या युद्धनीतीत शक्य झाल्यास एक बदल करा- शब्दांना द्या दगडाचे टणकपण आणि दगडांना द्या शब्दांचे द्रष्टे ओठ!’ हा ‘भग्न आस्थेचा तुकडा’ही तेच अधोरेखित करतो. त्यासाठी हा संग्रह आवर्जून वाचायलाच हवा.

‘भग्न आस्थेचे तुकडे’

– चंद्रशेखर सानेकर,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे- १४०, मूल्य- १५० रुपये.

joshrajiv@gmail.com