22 January 2020

News Flash

उकिरडय़ात जगणाऱ्यांचे वास्तव जीवनदर्शन

अशोक जाधव यांच्या या आत्मवृत्तात गोसावी समाजाच्या जगण्याची हकिकत आली आहे.

भटके, दलित, उपेक्षित, अन्यायग्रस्त समाजघटकांतील व्यक्तिमत्त्वांची आत्मचरित्रे मराठीमध्ये लिहिली गेली आहेत. मराठी साहित्य समृद्ध होण्यास या आत्मचरित्रांचा मोठा हातभार लागला आहे. यांपैकी अनेक आत्मचरित्रांनी ‘असेही जीवन असते?’ असा विस्मयचकित करणारा प्रश्न सर्वसामान्य वाचकांसमोर उभा केला. त्यांना नवे जग दाखवले, धक्के देऊन मानवी जीवनाविषयी नव्याने विचार करायला प्रवृत्त केले. जीवनाचे अलक्षित कोपरे आणि मानवी अधोविश्व यांपैकी काही आत्मचरित्रांनी उजेडात आणले. एवढेच नाही, तर या आत्मचरित्रांमुळे भारतीय समाजजीवनातील विविधता, भाषा आणि संस्कृतींची समृद्धता लोकांसमोर आली. याच परंपरेत आता भटक्या गोसावी समाजाचे जीवनवास्तव मांडणारे ‘भंगार’ हे आत्मवृत्त प्रसिद्ध झाले आहे. अशोक जाधव यांच्या या आत्मवृत्तात गोसावी समाजाच्या जगण्याची हकिकत आली आहे. उकिरडय़ावरील भंगार गोळा करणाऱ्या गोसाव्यांचे जीवन, त्यांची भाषा तसेच संस्कृती या हकिकतीतून उलगडली आहे.

लोखंड, पत्रा, बाटल्या, प्लास्टिक अशा उकिरडय़ात फेकून दिलेल्या वस्तू वेचून जगणे हे गोसावी समाजाचे जिणे. या समाजातील स्त्रिया, मुले खांद्याला खंदाडी अडकवून लोकांनी फेकून दिलेल्या अशा वस्तू गोळा करून त्यावर गुजराण करतात. त्यासाठी सकाळी उठून उकिरडा चिवडत या वस्तू शोधत फिरायचे. लोकांनी त्याच उकिरडय़ात फेकून दिलेले आणि बुरशी चढलेले भाकरीचे तुकडे खायचे. ते न मिळाले तर भीक मागायची. गोळा केलेले भंगार भंगारवाल्याला विकायचे. तो तोंडावर फेकेल ते पैसे घ्यायचे आणि त्यावर आयुष्य जगायचे.. असे हे भयंकर जीवन या आत्मवृत्तामुळे प्रथमच लिखित स्वरूपात आपल्यासमोर येत आहे. हे आत्मवृत्त या समाजाच्या जीवनात डोकावून पाहण्याची, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, रूढी-परंपरांच्या जोखडात अडकलेले त्यांचे जीवन समजून घेण्याची संधी देते.

या आत्मवृत्ताचे लेखक अशोक जाधव हे या समाजातील पहिले शिक्षक. उकिरडय़ाशेजारीच जन्मून उकिरडय़ात फेकलेले अन्न खात ते वाढले. ते स्वत:सह आपल्या समाजाला या उकिरडय़ातून सोडवू पाहताहेत. समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची कास धरणारे आणि सतत संघर्ष करत स्वत:ला घडवणारे जाधव या समाजासमोरचे एक आदर्श आहेत. जातपंचायतीसारख्या प्रथा, अनेक अंधश्रद्धा आणि रूढींच्या जोखडात अडकलेला हा समाज स्त्रियांचे अनन्वित शोषण करतो. भंगार गोळा करायला हात कमी होतील म्हणून समाजातील मुलांना शिक्षणापासून दूर ठेवायचे, मुले आणि स्त्रियांना भंगार गोळा करण्यासह भीक मागायला पिटाळायचे आणि पुरुषांनी मात्र दारू आणि इतर व्यसने करत लोळत पडायचे, ही सर्वसाधारणपणे त्यांची जीवन जगण्याची पद्धत. अशा भणंग आणि दरिद्री जगण्यातही पुरुषी वर्चस्वाचे अनेक नमुने या आत्मवृत्तात वाचायला मिळतात. स्त्रीला विक्रीयोग्य वस्तू समजणाऱ्या या समाजात मुलीच्या वडिलांना हुंडा द्यायची प्रथा असल्याने तिची अनेक वेळा लग्ने लावायची अघोरी प्रथा आढळते. पैसे कमी पडले, की लग्न लावून दिलेल्या नवऱ्यापासून तिला सोडवायची आणि जातपंचायतीला चिरीमिरी चारून ‘धारूच्यो’ करायचा. त्यात तिच्या मनाचा विचार कुठेच नाही. असा भयचकित करणारा जीवनाशय या आत्मवृत्तातून समोर येतो.

‘भंगार’चा प्रारंभ भुकेच्या तीव्र वेदनेच्या आठवणीने होतो. नाकातोंडात उकिरडय़ाचा उग्र वास घेत आणि भुकेच्या वेदना दाबत दोन चिमुकल्या लेकरांसह भंगार गोळा करणारी आई ‘आसूक, जरा कळ सोस. येवढी भंगाराची खंदाडी भरली की तुला भजी खायाय देती,’ असे आमिष दाखवत पोरे सांभाळते आहे. ती त्यांना पोट मारत जगायचे कसे, याचे जणू शिक्षणच देते आहे. पोटच्या पोराच्या पाठीवर अडकवलेल्या खंदाडीतील काचेचा तुकडा घुसून त्याची पाठ फाटते. या जखमेत उकिरडय़ातलीच माती भरून ती पुन्हा कामाला लागते. भंगारात सापडलेला बुरशी चढलेला भाकरीचा तुकडा पदराने पुसून मुलाला खायला देते. सायंकाळी घरची चूल पेटेल की नाही या विवंचनेत उकिरडय़ावरचे सारे काही पोटात घेत उकिरडे चिवडत फिरायचे, हे तिचे जीवन. घरातला पुरुष अपंग. त्याला ओझ्याचे काम जमत नाही. परंतु मटण-मांसाशिवाय तो दुसरे काही खाणार नाही. ते नाही आणले तर वर अंगाची सालटी निघेपर्यंत मारणार. आणि तिलाच उपाशी ठेवणार. तिचा हा रोजचाच संघर्ष. दररोज जगण्याशी दोन हात करीतच जगायचे. उगवलेला दिवस मागे टाकायचा. या गावाहून त्या गावात भंगार वेचत भटकायचे. कुठे काही चोरी झाली तर पहिला संशय यांच्यावर. समाजही त्याच नजरेने यांच्याकडे पाहणार. पोलीसही रेकॉर्डसाठी यांच्यावर गुन्हे घालणार, अंग सुजेपर्यंत मारणार आणि मग सोडून देणार.

अशा भंगार गोळा करणाऱ्या गोसावी समाजात लेखकाचा जन्म झाला. त्याचे कुटुंब गावोगावी फिरत कोल्हापूर जिल्ह्यतील इचलकरंजीला येते. तेथे ही जमात थोडीशी स्थिरावते, परंतु त्यांचे जगणे मात्र बदलत नाही. लेखक या आत्मवृत्ताच्या माध्यमातून केवळ आपली कथा सांगत नाही, तर साऱ्या जमातीचेच वास्तव मांडतो. या जमातीत जातपंचायत ही अंतिम सत्ता. ती देईल तो निर्णय कितीही अन्यायकारक असला तरी स्वीकारायचा. तक्रार करायची नाही. जातपंचायतीला आव्हान द्यायचे नाही. जातपंचायतीला विरोध म्हणजे साक्षात परमेश्वराला विरोध. निर्णयाला आव्हान दिलेच तर जमातीतूनच बहिष्कृत करण्याची शिक्षा. बहिष्कृत होणे ही कोणत्याही जमातीत सर्वात मोठी शिक्षा असल्याने ही जमात जातपंचायतीच्या अन्याय्य निर्णयापुढेही नमतेच घेते. लेखकही याला अपवाद नाही. परंतु पुढे शिक्षणातून आलेल्या आत्मभानानंतर ते जातपंचायतीला आव्हान देतात. तिच्या विरोधात संघर्षांला उभे ठाकतात.

या आत्मवृत्तात अनुषंगाने अनेक घटना-प्रसंगांची नोंद आहे. त्या अर्थाने हे एक महत्त्वाचे दस्तावेजीकरण आहे. भंगार गोळा करण्याचा धंदा सोडून हमाली करताना झालेल्या चोऱ्या आणि त्यात गोसाव्यांची फरफट, चादरीच्या आमिषाने रस्त्यावर झोपताना ट्रकखाली चिरडलेले जीव, फुटपाथवर अंगावरून गेलेल्या गाडय़ा, आंतरजातीय विवाहात बेवारस म्हणून आलेले मरण, भंगारातील विषारी औषध पिऊन आलेला मृत्यू, भंगार म्हणून उचललेल्या डब्यातील अ‍ॅसिड पडून भाजलेले अंग.. अशा अंगावर शहारे आणणाऱ्या अनेक प्रसंगांची नोंद या आत्मवृत्तात आढळते.

समाजाच्या विरोधात जाऊन लेखक शिक्षणाची वाट धरतो. अर्थात, ही वाट त्यांच्यासाठी खचितच सोपी नव्हती. कारण या समाजात शिक्षणाला प्रचंड विरोध. मुले शिकू लागली तर काम करणारे हात कमी होतील, ही भीती. त्यातून अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही शिक्षणाच्या आड येतात. गोसावी जमात म्हणजे गुन्हेगार जमात असे समीकरण झाल्याने शिक्षणात अनेक अडसर निर्माण होतात. शाळेतील शिक्षक आणि मुलेही या जमातीतील मुलांचा राग करतात. त्यांच्याकडे संशयाने पाहतात. तरीही लेखक अशा अनेक गोष्टींना तोंड देत शिकत राहिले. पुढे शिक्षक झाले. परंतु हा प्रवास प्रचंड खडतर होता. व्यवस्थेबरोबरच समाजाशी दोन हात करत त्यांनी घेतलेले शिक्षण हा सगळा चित्तथरारक प्रवास आहे. या प्रवासाची ही हकिकत आहे. ते आणि त्यांचा समाज इचलकरंजीमध्ये स्थिर झाल्यानंतर जमातीसह गावकऱ्यांशी केलेला संघर्ष, तेथील निवडणुका, पतसंस्थेची स्थापना, समाजातील लोकांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी खाल्लेल्या खस्ता अशा त्यांच्या समग्र जगण्याचाच हा वृत्तान्त आहे.

या आत्मवृत्ताचे महत्त्व दोन गोष्टींमुळे अधोरेखित करता येते. एक- गोसावी समाजाच्या संस्कृतीचे समग्र दर्शन आणि दुसरी त्यांची भाषा. गोसाव्यांच्या जाती, पोटजाती, गोसावी भाषेतील गाणी, समाजात जन्मलेल्या मुलांवर होणारे संस्कार, बालविवाह, लग्नपद्धती, संसार, धारूच्यो, विटाळासारख्या अघोरी प्रथा, खानपान, जातपंचायत, स्त्रियांचे जीवन या गोष्टी आत्मवृत्तामध्ये बारकाव्याने आल्या आहेत. यासंबंधीचे अनेक प्रसंग मुळातून वाचण्यासारखे आहेत. अशा घटना-प्रसंगांमुळे हे आत्मवृत्त गोसावी समाजाचे सांस्कृतिक संचित बनले आहे.

भंगार’- अशोक जाधव, मनोविकास प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- १६८, मूल्य- २०० रुपये.

nandkumarmore@ymail.com

First Published on December 31, 2017 12:41 am

Web Title: bhangar book by ashok jadhav
Next Stories
1 रचनात्मक कर्तृत्वाची नोंद
2 उपराष्ट्रवादाचे उपाख्यान!
3 भारताचे विकासपुरुष
Just Now!
X