नटवर्य भार्गवराम आचरेकर हे नाव माहीत नाही असा नाटय़रसिक सापडणं अशक्य. तब्बल ७१ वर्षे झळाळती कारकीर्द गाजवणारे एकमेवाद्वितीय कलावंत होते मामा!  भार्गवरामांच्या २० व्या स्मृतीप्रीत्यर्थ (२७ मार्च) आचरेवासी सुहृदाने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..

कोण भार्गवमामा? खरंच कोण होते भार्गवमामा? ज्यांना रंगभूमीचा इतिहास ठाऊक आहे त्यांच्या हृदयात नटवर्य भार्गवराम आचरेकरांचं स्थान चंदनी देव्हाऱ्यात आहे. असामान्य प्रतिभेच्या या कलावंताला जाऊन आता वीस र्वषे लोटली तरीही रेडिओवर ‘संगीत सौभद्र’, ‘मानापमान’, ‘विद्याहरण’, ‘चित्त शुद्ध तरी’, ‘लग्नाची बेडी’, ‘स्वयंवर’, ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकांमधली पदं ऐकताना भार्गवराम आचरेकरांची देखणी, रुबाबदार मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते. भार्गवरामांचा मन रिझवणारा स्वच्छ, सच्चा, सुरेल स्वर कानात सदैव रुंजी घालत राहतो.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

अवघ्या बाराव्या वर्षी पेंढारकरांच्या नाटक कंपनीत तत्कालीन थोर मोठय़ा अभिनेत्यांच्या समोर सहजपणे उभे राहणारे भार्गवराम केवळ कलेवरच्या प्रेमापोटी नाटक जगत राहिले. भार्गवरामांनी कधी पैशाचा हव्यास केला नाही की प्रसिद्धीसाठी हात-पाय आपटले नाहीत. सहकलाकारांना मनमिळाऊपणानं समजून घेत, वरिष्ठांशी आदरानं वागत त्यांनी नाटय़सृष्टीत १९२२ ते १९९३ अशी तब्बल ७१ वर्षांची प्रदीर्घ आणि सर्वार्थानं सुंदर कारकीर्द केली. १९९३ साली ‘विद्याहरण’ नाटकातली शुक्राचार्याची भूमिका करत असताना त्यांचं वय ८२ र्वष होतं. एवढा प्रदीर्घ काळ रंगभूमीवर कार्यरत असणारे भार्गवराम हे बहुधा एकमेव असावेत.

या कारकीर्दीत त्यांनी कित्येक नाटकं आपल्या सर्वागसुंदर अभिनयाच्या ताकदीवर लोकप्रिय केली. या प्रदीर्घ काळात त्यांच्या डोळ्यांदेखत कित्येक कलावंत आले-गेले; पण भार्गवराम मात्र स्वत:ची मुद्रा उमटवणाऱ्या आपल्या सहज अभिनयाची पताका उंच उभारून शेवटपर्यंत निश्चल राहिले. अवघ्या महाराष्ट्राला आपलासा वाटणारा हा नटश्रेष्ठ आम्हा आचरेकरांचा मात्र खरोखरच ‘आपला’ आहे. आम्ही सिंधुदुर्ग जिल्हय़ातल्या आचरे गावचे. आचरे हे भार्गवराम आचरेकरांचं गाव. खरं तर आचरे गावाचं नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक फलकावर अधोरेखित करणारे भार्गवराम पहिले. आचरे पंचक्रोशीतली प्रत्येक व्यक्ती त्यांना ‘भार्गवमामा’ असंच संबोधते. खरं तर नुसतंच ‘मामा’! मामांचं गाणं.. मामांची नाटकं.. मामांचं घर.. मामा म्हणाले होते.. असा तो सगळा प्रेमाचा मामला आहे. या अजातशत्रू माणसाचा खरं तर करू म्हटलं तरी अपमान करता येणार नाही. परंतु काही दिवसांपूर्वी मात्र असा एक प्रसंग उद्भवला आणि आम्ही हतबुद्ध झालो. जे घडलं त्यानं आम्ही अपार दु:खी तर झालोच, पण एका ज्येष्ठ, सच्च्या कलावंताला त्याच्या हयातीपश्चात मिळालेली सापत्न वागणूक पाहून आमची मनं शतश: विदीर्ण झाली. परंतु या प्रसंगात उभ्या महाराष्ट्रातून जी प्रतिक्रिया उमटली, त्यावरून एक मात्र नव्यानं जाणवलं, की मामा फक्तआमचे नव्हते, तर ते अवघ्या मराठी मुलखाचे आहेत. या जाणिवेनं आमच्या भंगलेल्या मनांवर फुंकर घातली.

नेमकं असं काय घडलं होतं- ज्यामुळे भार्गवराम आचरेकरांसारख्या माणसाचा अपमान झाला होता? २०१५ च्या दिवाळीत ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकाचं सिनेमा रूपांतरण पडद्यावर झळकलं. भार्गवराम आचरेकरांच्या अभिनय कारकीर्दीवर सोन्याचा कळस चढवणारं हे नाटक. त्या काळात ‘कटय़ार’ म्हणजे भार्गवमामा आणि भार्गवमामा म्हणजे ‘कटय़ार’- हे समीकरणच बनून गेलं  होतं. साहजिकच मामांचे आणि ‘कटय़ार’चे चाहते मोठय़ा उत्साहानं सिनेमा पाहायला धावले. पडद्यावर ‘श्रेयनामावली’ आणि ‘विशेष आभार’ वगैरे सुरू झालं. सर्वजण डोळ्यांत प्राण आणून अक्षर न् अक्षर वाचू लागले. पण मुख्य कथानक सुरू झाल्यानंतरही भार्गवराम आचरेकर हे नाव कुठंच दिसलं नाही. आधुनिक पद्धतीनुसार एखादा सीन झाल्यावर ‘आणि भार्गवराम आचरेकर’ असं काही दाखवण्याची योजना असावी असं वाटून संयमानं अर्धा सिनेमा होईपर्यंत वाट पाहिली. पण तसंही काही नव्हतं. मग वाटू लागलं- सिनेमाच्या शेवटी ‘विशेष उल्लेख’ म्हणून ‘पं. भानुशंकर शास्त्रींच्या खास भूमिकेत भार्गवराम आचरेकर यांनी स्थापित केलेल्या नव्या उच्चांकाबद्दल त्यांना अभिवादन!’ असं काही विशेष असेल म्हणून रसिक खिळून राहिले. पण एवढय़ा प्रतीक्षेनंतरही रसिकांच्या हाती निराशाच आली आणि चित्रपटगृहातला क्षणकालचा काळोख जाणकार रसिकांच्या मनात उतरला. असं काय कारण असेल, की जुन्या संचातल्या इतर सर्व कलाकारांची नावं घेऊन त्यांचे आभार, त्यांना अभिवादन वगैरे सर्व सोपस्कार करता यावेत, परंतु भार्गवराम आचरेकरांचं नाव घेता येऊ नये? की ज्या पं. भानुशंकर शास्त्रींच्या भूमिकेसाठी भार्गवराम आचरेकरांना ओळखण्यात येतं, ती भूमिका या नव्या चित्रपटवाल्या मंडळींना भावली नाही? रसिकांनी हे आणि असे कित्येक प्रश्न यासंदर्भात विचारले. तेव्हा उत्तर आलं की, ‘मुख्य मुख्य लोकांचाच नामोल्लेख आम्ही केला. बाकी सगळ्यांना ‘आणि इतर’ असं संबोधलं आहे.’ ‘कटय़ार’च्या बाबतीत लिहिताना, बोलताना भार्गवराम आचरेकरांचा उल्लेख ‘आणि इतर’ या सदरात केला जाऊ शकतो?

पन्नास वर्षांपूर्वी- १९६७ साली लखलखलेल्या या कटय़ारीच्या हस्तिदंती मुठीवर ‘भार्गवराम आचरेकर’ हे नाव पाचूंनी मढवलेलं आहे. त्या खोबणीतून ते पाचू असे नव्या कटय़ारीनं उचकटून फेकता येतील? ज्या नावानं ‘कटय़ार’ला धार आणली ते नाव असं अनुल्लेखानं मिटवता येईल? या दिग्विजयी नाटकाचे लेखक पुरुषोत्तम दारव्हेकरांनी ‘कटय़ार’ सर्वप्रथम हाती दिली ती भार्गवमामांच्याच. ज्या पंडित भानुशंकर शास्त्रींच्या घराणेदार गायकीची सुरेख कटय़ार खाँसाहेबांच्या मग्रूर काळजात घुसते, त्या पं. भानुशंकरांच्या भूमिकेसाठी दारव्हेकर रात्रंदिवस वेगवेगळे चेहरे डोळ्यांसमोर आणत विचारमग्न होऊन बसले होते. सगळे चेहरे फिरून झाल्यावर एक चेहरा पुन:पुन्हा समोर येऊन ठाकत होता. तो होता भार्गवराम आचरेकरांचा. परंतु भार्गवराम जुन्या काळचे अभिनेते. त्यांची कारकीर्द सुरू झाली होती १९२२ साली. आणि नाटक उभं राहत होतं १९६७ साली. त्यातही पुन्हा भार्गवरामांचा आवाज वरच्या पट्टीतला. या सगळ्या कारणांमुळे दारव्हेकरांना काही निर्णय घेता येत नव्हता. ते अशा द्विधा मन:स्थितीत असताना त्यावेळचे आघाडीचे नट प्रभाकर पणशीकर यांनी दारव्हेकरांना सांगितलं, ‘विचार कसला करता? ही भूमिका मामांचीच. आपण भार्गवमामांना पूर्ण गेटअपमध्ये एकदा पाहू तर..!’ मग भार्गवरामांना बोलावणं गेलं. इतरही प्रख्यात नटांनी या भूमिकेसाठी भार्गवरामांचंच नाव दारव्हेकरांना सुचवलं. तत्कालीन सर्व अभिनेत्यांनी भार्गवरामांच्या नावाचा एकमुखी आग्रह धरावा असं काय होतं या माणसात? कोण होते भार्गवराम? काय होती त्यांची पुण्याई?

भार्गवमामांचा जन्म १९१० सालचा. कोकणातल्या आचरे गावात ‘श्रीदेव रामेश्वर प्रासादिक नाटय़ मंडळ’ या स्थानिक नाटक कंपनीच्या दर्जेदार संगीत नाटकांमध्ये छोटा भार्गव छान छान भूमिका करायचा. या मंडळाच्या ‘शारदा’ नाटकाच्या देखण्या प्रयोगात ‘वल्लरी’च्या भूमिकेत भार्गवानं कमाल केली. त्या भूमिकेचा बोलबाला मालवण तालुक्यापर्यंत गेला. कै. बापूसाहेब पेंढारकर (नटवर्य भालचंद्र पेंढारकरांचे वडील) यांच्या ‘ललितकलादर्श’चा मुक्काम त्यावेळी मालवणला होता. छोटय़ा भार्गवाची कीर्ती बापूसाहेबांच्या कानी गेली.         आचरे गावी जाऊन बापूसाहेबांनी भार्गवाचं गाणं ऐकलं आणि अवघ्या बाराव्या वर्षी भार्गवचा प्रवेश ‘ललितकलादर्श’मध्ये झाला. अर्थात भार्गवाचे थोरले बंधू अवधूतभाऊ यांची समजूत घालण्याचं कठीण काम बापूसाहेबांना करावं लागलं. आई-वडिलांच्या मागे पालक होऊन भार्गवाचा सांभाळ करणाऱ्या अवधूतभाऊंना वाटत होतं, की त्यानं शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईत नोकरी धरावी. अवधूतभाऊ स्वत: संगीतज्ञ होते. त्यांचं लेखन, काव्य, चाली हे सर्व अतिशय उत्तम होतं. पण भार्गवाचा हट्ट आणि बापूसाहेबांचा आग्रह यासमोर अवधूतभाऊंचं काही चाललं नाही. अवधूतभाऊंसारख्या व्यासंगी, विद्वानाचा हात भार्गवच्या डोक्यावरून हटला, तरीही बापूसाहेबांचा हात भार्गवच्या डोक्यावर आला.

१९२२ ते १९३६ ही ‘ललितकलादर्श’मधील चौदा र्वष म्हणजे भार्गवरामांच्या नाटय़जीवनाची चढती कमान ठरली. बापूसाहेबांनी भार्गवासाठी पं. पणशीकरबुवा, विष्णुपंत पागनीस, कागलकरबुवा, रामकृष्ण वझेबुवा यांच्या खास तालमी ठेवल्या. पुढे ‘ललितकलादर्श’चा मुक्काम दोन र्वष मुंबईत होता. तेव्हा भार्गवानं ही दोन र्वष बशीरखाँ साहेबांकडे नियमित संगीताची उपासना केली. या थोर गुरूंच्या स्पर्शानं भार्गवाच्या आयुष्याचं सोनं झालं.

या सोन्याला वेगवेगळय़ा मुशीत टाकून त्याच्या एकाहून एक अफलातून कलाकृती बनवण्याचं आणि रसिकांसमोर आणण्याचं बापूसाहेबांनी जणू व्रतच घेतलं होतं. ‘सोन्याचा कळस’, ‘शिक्का कटय़ार’, ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’ या ‘ललितकलादर्श’च्या नाटकांमधल्या भार्गवमामांच्या भूमिका म्हणजे त्यांच्या स्वत:च्या नावाची जणू नाणीच होती.

१९३२ साली मामा वरेरकर यांचं ‘सोन्याचा कळस’ हे नाटक रंगभूमीवर आलं. त्यात भार्गवरामांनी रंगवलेली फटकळ, पण सरळ स्वभावाची ‘बिजली’ अशी काही चमकली, की पु. ल. म्हणाले होते, ‘बिजलीच्या स्पर्शानं एरव्ही कळस कोसळतात, परंतु भार्गवरामांच्या ‘बिजली’च्या स्पर्शानं ‘सोन्याचा कळस’ उभा झाला.’ भार्गवरामांना आपल्या नाटकांतील सर्व पात्रांची पदं आणि संवाद मुखोद्गत असायचे. एकाच नाटकात कधी कृष्ण, तर कधी अर्जुन असे सहसा कुणाला न जमणारे बदलते रोल त्यांनी केले. भार्गवराम नाटक करत नव्हते, तर ते नाटक जगत होते.

‘कटय़ार’समोर आली त्यावेळी मामांचं वय ५७ वर्षांचं होतं. वयाच्या बाराव्या वर्षांपासून रंगमंचावर सफाईनं वावरणाऱ्या मामांची तब्बल ४५ वर्षांची झळाळती कारकीर्द त्यांच्यामागे उभी होती. अतिशय देखणं, रुबाबदार व्यक्तिमत्त्व; तरीही चेहऱ्यावर साधकाचं तेज. रंगमंचावरचा लयबद्ध, शांत, तरीही सफाईदार वावर. अन् सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे पट्टीची गायकी आणि उच्चीचा अभिनय या नाण्याच्या दोन्ही बाजू झळझळीत. दारव्हेकरांचा निरोप गेल्यावर मामांनी क्षणभर डोळे मिटले. भानुशंकर कसे दिसले पाहिजेत हे मामांना पक्कंठाऊक होतं. (या रोलसाठी गेटअप आणि ड्रेपरी मामांनी स्वत:च योजिली होती.) मामा भानुशंकर शास्त्री बनले अन् दारव्हेकरांसमोर आले. भानुशंकर शास्त्रींच्या भूमिकेसाठी दारव्हेकर आता दुसऱ्या कुणाचा विचारच करू शकत नव्हते.

पुढचा इतिहास महाराष्ट्र अद्यापि विसरलेला नाही. संपूर्ण नाटकात फक्त ४५ मिनिटांचा रोल आणि दोन प्रवेश मिळालेल्या भार्गवमामांच्या पं.भानुशंकरांनी ही ‘कटय़ार’ कायमची मुठीत बंद करून टाकली. ती ‘कटय़ार’ प्रेक्षक अत्यानंदानं काळजात उतरवून घेत होते. नाटय़गृहाबाहेर येताना गुणगुणत होते- ‘दिन गेले.. भजनाविण सारे..!’ असे होते मामा. विसरू म्हणता विसरता न येणारे!

पुढे सलग वीस र्वष- म्हणजे ७७ व्या वर्षांपर्यंत मामांनी ‘कटय़ार’ तोलली. १९८६ पर्यंत सलग पाचशेहून जास्त प्रयोगांत मामांनी काम केलं. नंतर वयपरत्वे प्रकृतिवश मामांनी नाटकातून निवृत्ती घेतली. नाटय़समीक्षक गो. रा. जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘कटय़ार’ म्हणजे मामांच्या नाटय़मैफिलीची ‘भैरवी’ होती.

माणसं जोडणाऱ्या मामांच्या आयुष्यात दैवानं त्यांची फार परीक्षा घेतली. पानशेतच्या पुरानं मामांचं घर धुऊन नेलं. पण मामा खचले नाहीत. आश्चर्य म्हणजे त्या पुराच्या थैमानात मामांच्या घरातला देव्हारा आणि त्यातली दत्ताची मूर्ती मात्र अढळ राहिली. ते पाहून मामा म्हणाले, ‘बघा, माझा दत्त मात्र आजही माझ्याबरोबर आहे. आणखी काय हवं?’ १९७१ साली प्रभाकर पणशीकर, शेठजी फणसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, वसंतराव आचरेकर या सर्वानी मिळून अतिशय प्रेमानं मामांची साठी साजरी करून त्यांना थैली दिली होती.

असे हे मामा अवघ्या महाराष्ट्राचेच लाडके. आम्हा आचरेवासीयांचे तर ते मानबिंदूच. आज आचऱ्याच्या श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या नारदीय गादीला शास्त्रीय संगीताचा मंच म्हणून ओळखलं जातं. त्या गादीवर शास्त्रीय गायनाची सुरुवातच मुळात मामांनी केली. या थोर कलावंताचं आपल्या जन्मगावाला हे केवढं मोठं योगदान आहे. यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ मामांचे जन्मोजन्मी ऋणी राहू. चैत्रोत्सवात आचरे गाव व पंचक्रोशीत मामांची आठवण निघत नाही असं घर शोधून सापडणार नाही. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात गावातल्या घराघरांत मामांचा मुक्त वावर असायचा. हा सिलसिला १९२२ पासून १९९५पर्यंत अव्याहत चालला. या काळात एकही रामनवमी मामांनी चुकवली नाही. १९९६ या एकाच वर्षी संपूर्ण हयातीत मामा रामनवमीला आले नाहीत. १९९७ च्या रामनवमी उत्सवातच मामांच्या निधनाची बातमी आली. २७ मार्च १९९७ या दिवशी आमच्या गावात प्रत्येकाचं काळीज रडत होतं. मामांच्या अभिनयाची, गायकीची रत्नजडित ‘कटय़ार’ केवळ आम्हा गाववाल्यांच्याच नाही, तर तमाम नाटय़रसिकांच्या हृदयात रुतलेली आहे. मामांचं नाव रसिकांच्या काळजावर कोरलेलं आहे. ते पडद्यावरून हटवून काय होतंय?

‘संगीत मानापमान’मधील धैर्यधराच्या भूमिकेत

‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकात छोटय़ा सदाशिवला  (रघुनंदन पणशीकर )

आशीर्वाद देताना भार्गवमामा

प्रवीण कानविंदे president@gandharvasabha.com