‘भटकंती’ हे रमेश पाध्ये यांचे नवे पुस्तक शीर्षकामुळे चकवा देणारे ठरू शकते. याचे कारण ‘भटकंती’ या शीर्षकामुळे ते अनेकांना प्रवासवर्णन वाटण्याची शक्यता आहे. परंतु हे पुस्तक प्रवासवर्णन नाही. रूढार्थाने ज्याला प्रवासवर्णन म्हणावे असा एकच लेख या पुस्तकात आहे. ‘केल्याने देशाटन..’ हे त्याचे शीर्षक. त्यात अमेरिकेतील प्रवासाची निरीक्षणे मांडलेली आहेत. हा या पुस्तकातील शेवटचा लेख. त्याआधीचे पुस्तकातील दहा लेख मात्र कामगार चळवळ, निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी, इंधन आदी ‘अर्थ’वाही आणि कामगारकेंद्री राजकीय अर्थकारणाशी संबंधित बाबींवर भाष्य करणारे आहेत.

पुस्तकातील पहिलाच लेख प्रा. वि. म. दांडेकर यांनी १९७७ साली भटकळ मेमोरियल व्याख्यानमालेत मांडलेल्या ‘संघटित आणि असंघटित’ या प्रबंधाचा प्रतिवाद करणारा आहे. दांडेकरांचा हा प्रबंध तेव्हा बराच चर्चिला गेला होता. डाव्या मंडळींनी त्याविरोधात लिखाणही केले होते. रमेश पाध्ये यांनी ‘संघटित विरुद्ध असंघटित- एक आभास’ या लेखात दांडेकर यांच्या मांडणीचा साधार प्रतिवाद केला आहे. दीर्घ असला तरी हा लेख आवर्जून वाचायलाच हवा असा आहे. पुस्तकातील पुढील लेख हे ग्राहक मूल्य निर्देशांक, भविष्य निर्वाह निधी योजना, निवृत्तीवेतन योजना यांविषयी विश्लेषण करणारे आहेत. इंधन महागाई, कॅश ट्रान्सफर आणि दारिद्रय़रेषेचा प्रश्न यांबाबतही सविस्तर चर्चा करणारे लेख या पुस्तकात आहेत. याशिवाय ‘मुंबईचे शांघाय- एक दिवास्वप्न!’ आणि ‘बॉम्बे ते मुंबई : एका स्थित्यंतराचा अनुभव’ हे दोन काहीसे वेगळ्या स्वरूपाचे लेखही पुस्तकात वाचायला मिळतात. मुंबई महानगरातील नागरी जीवन, शहरविकास आणि राजकीय संस्कृती यांचा पाध्ये यांनी या लेखांत थोडक्यात घेतलेला आढावा शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधणारा आहे. एकूणच कामगारकेंद्री अर्थकारणाचा हा लेखाजोखा अवश्य वाचायला हवा.

  • ‘भटकंती’- रमेश पाध्ये,
  • लोकवाङ्मय गृह प्रकाशन,
  • पृष्ठे- १२३, मूल्य- १५० रुपये.