News Flash

‘गांव-गाडा’ : समाजशास्त्रीय अन्वयार्थ

त्रिंबक नारायण आत्रे यांचे १९१५ साली प्रसिद्ध झालेले ‘गांव-गाडा’ हे बहुचर्चित पुस्तक.

त्रिंबक नारायण आत्रे यांचे १९१५ साली प्रसिद्ध झालेले ‘गांव-गाडा’ हे बहुचर्चित पुस्तक. गावाचे स्वायत्त, स्वयंसिद्ध प्रशासन, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीन गावगाडय़ाची कोसळू लागलेली अवस्था यांची साधार, सप्रमाण चिकित्सा त्यांनी या पुस्तकात केली आहे. या पुस्तकाची द. दि. पुंडे यांच्या साक्षेपी संपादनाखाली सिद्ध झालेली ‘शताब्दी आवृत्ती’ राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या खास आवृत्तीनिमित्त त्यातील मिलिंद बोकील यांचा विश्लेषणात्मक लेख येथे संपादित रूपात देत आहोत..

भारत हा आत्तापावेतो ग्रामीण देश होता आणि ‘गांव-गाडा’ या एका शब्दात सगळी प्राचीन भारतीय समाजव्यवस्था सामावलेली होती. महाराष्ट्रात हा गांव-गाडा कसा होता, कसा चालत होता, त्याची वैशिष्टय़े कोणती होती, हे समजून घ्यायचे असेल तर आपल्या हातातले सर्वोत्कृष्ट साधन म्हणजे त्रिंबक नारायण आत्रे यांनी १९१५ साली प्रसिद्ध केलेले ‘गांव-गाडा’ नावाचे हे पुस्तक.
गांव-गाडा ही एक अतिशय गुंतागुंतीची व्यवस्था होती. खेडी म्हणजे गावे हे तिचे भौगोलिक क्षेत्र होते, तर शेतीची अर्थव्यवस्था हा तिचा कणा होता. या गावांमध्ये जी कुटुंबे राहत ती निरनिराळे व्यवसाय करीत. मात्र, ते करण्याचा पाया जातव्यवस्था हा होता. जातव्यवस्थेमध्ये व्यवसाय हे वंशपरंपरागत होते आणि जात, कुटुंब आणि व्यवसाय यांची एक घट्ट सांगड घातलेली होती. शिवाय जातव्यवस्थेला एक प्रकारचे धार्मिक अधिष्ठान होते आणि जातींशी निगडित रूढी-परंपरांच्या माध्यमातून धर्म माणसांच्या जीवनाचे नियंत्रण करीत होता.
शेतीच्या अर्थव्यवस्थेला उपयुक्त असे इतर व्यावसायिक असणे ही गोष्ट काही भारताचेच वैशिष्टय़ नाही. जगातल्या सर्वच कृषी-व्यवस्थांमध्ये असे कारागीर (आर्टझिन्स) होते. पण भारतातल्या व्यवस्थेचे वैशिष्टय़ म्हणजे हे नुसते व्यावसायिक नसून ‘वतनदार’ होते. वतन म्हणजे वंशपरंपरागत हक्क किंवा अधिकार. हे व्यावसायिक गावातल्या शेतकऱ्यांना सेवा द्यायचेच; पण तसा सेवा देण्याचा आणि त्यापोटी मोबदला घेण्याचा वंशपरंपरागत हक्क (वतन) त्यांना मिळालेला होता. या हक्कांपासून किंवा अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवता यायचे नाही. आणि तेही हे हक्क कधी सोडायचे नाहीत. व्यवसाय आणि वतन या अशा प्रकारे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. आत्रे यांनी या वतनवृत्तीचे अतिशय तपशीलवार वर्णन केलेले आहे. किंबहुना जात, व्यवसाय आणि वतन यांची एकरूपता कशी होती याचे विश्लेषण हीच आत्रे यांची प्रमुख मांडणी आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाने जातिव्यवस्थेला धार्मिक वा वैचारिक अधिष्ठान पुरवलेले होते आणि सर्व माणसांनी ते मान्य केलेले असल्याने वेगळ्या दंडव्यवस्थेची गरज पडलेली नव्हती. शेतीनिष्ठ गावे, पितृसत्ताक-पुरुषप्रधान एकत्रित कुटुंबव्यवस्था, त्यांच्यातल्या निरनिराळ्या जाती, त्यांचे व्यवसाय, त्यांचे अधिकार आणि त्यांना बांधून ठेवणारे तत्त्वज्ञान या सगळ्यांची गुंफण म्हणजे गांव-गाडा. गांव-गाडा हा काही कोणा एका व्यक्तीने वा गटाने निर्माण केला नव्हता. काळाच्या दीर्घ प्रवाहामध्ये समाजाची उपजीविकेची पद्धत, त्याचा पर्यावरणीय आधार, सामाजिक गरजा, उपखंडात दाखल होणारे निरनिराळे जनसमूह, त्यांची सततची चालणारी स्थलांतरे, परचक्रे, नसíगक आपत्ती, राजकीय धुमश्चक्री आणि जीवनाकडे पाहण्याचे या भूमीत विकसित झालेले एक विशिष्ट तत्त्वज्ञान या सगळ्यांच्या मेळातून हा गांव-गाडा निर्माण झाला होता.
आत्रे यांनी गांव-गाडय़ाचे तपशीलवार वर्णन केले असले तरी त्यांची भूमिका गांव-गाडय़ाच्या गौरवीकरणाची नाही. किंबहुना, ते गांव-गाडय़ाचे कठोर टीकाकारच आहेत. ही व्यवस्था समताधिष्ठित नव्हती; उतरंडीची होती आणि हा गांव-गाडा फसलेला आहे याची त्यांना यथार्थ जाणीव आहे. त्यांच्या मते, गांव-गाडय़ाचा सगळा बोजा जो कुणबी, शेतकरी, बळीराजा होता त्याच्यावर पडायचा आणि त्या ओझ्याखाली हा बळीराजा पिचून गेला होता (एक बळी आणि हजार छळी). ‘कुणबी ही गाय आणि बलुतेदार ही वासरे’ ही आत्रे यांची मुख्य मांडणी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या प्रतिपादनात कुणबी-शेतकऱ्याला झुकते माप दिलेले आहे. शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नाचा जवळजवळ तिसरा हिस्सा हा आलुत्याबलुत्यांना द्यावा लागतो आणि त्यामुळे तो फार जेरीला आलेला असतो असा त्यांचा निष्कर्ष आहे.
‘गांव-गाडा’ या पुस्तकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे भारतीय समाजाविषयी आत्रे यांनी केलेली असंख्य आणि मार्मिक निरीक्षणे. सबंध पुस्तकभर ही निरीक्षणे विखुरलेली आहेत. किंबहुना, आत्रे यांचे प्रत्येक वाक्य हे अशा अंतर्दृष्टीने भरलेले आहे. हे सर्व पुस्तक जर कोणी नीट, मन लावून वाचले तर प्राचीन भारताची ग्रामव्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था व धर्मव्यवस्था कशी होती याची सहज माहिती होईल, आणि ज्या समाजाची किंवा संस्कृतीची आपण एरव्ही फार महती गातो तो प्रत्यक्षात कसा होता किंवा आहे, हे समजून डोक्यातली जळमटे झटकली जातील. उदाहरणार्थ- ‘‘जातिधर्मबद्ध सामान्य जनाची नजर ‘मी व माझे कुटुंब’ ही कोंडी फोडून निघाली ती गांवकुसाला अटकली, आणि देशाभिमानाची जागा ग्रामाभिमानाने पटकावली व तोही पुढे वतनलोभांत लय पावला.’’ ‘‘हक्क, मोहबत, भीक, लोचटपणा व चोरी ही जपमाळेच्या मण्यांप्रमाणे एकामागून एक येतात.’’ ‘‘जातिधर्माने हिंदू समाजाला रूढींचे गुलाम केले व वतनपद्धतीने हा दोष जुलूम वाढविला.’’ ‘‘वतनपद्धती ही जातिधर्माच्या अपार कुंडाचा गांवापुरता एक लहानसा हौद आहे. तिने जसे वतनदारांना व्यक्तिश: व समुच्चयाने तुटक, स्वार्थी व कमजोर करून एकंदर गांवगाडय़ाचा विचका केला, तीच गति जातिधर्माने एकंदर हिंदू समाजाची केली.’’
आत्रे यांचे सर्वात महत्त्वाचे गुणवैशिष्टय़ म्हणजे गांव-गाडा ही एरव्ही जी समाजशास्त्रीय संस्था वाटते तिच्याकडे त्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले आहे. बलुतेदारी ही एक ‘अ-विपणी’ (नॉन-मार्केट) व्यवस्था होती आणि बलुत्याची पद्धत ही व्यवसायबंधन टिकवण्याची युक्ती होती. व्यापारउदिम असेल तर त्या व्यवस्थेत पसा खेळायला लागतो. निव्वळ कृषिप्रधान व्यवस्थेत तसे होत नाही. शेतकरी धान्य निर्माण करतो. पण त्या धान्याची विक्री होणार नसेल तर त्याच्या हातात रोख पसा खेळत नाही. मग ज्या सेवा त्याला आवश्यक आहेत, त्या त्याला धान्याच्या बदल्यातच घ्याव्या लागतात. या शेतीमधून भांडवलनिर्मिती होत नाही, हेच भारतीय शेतकऱ्याचे मुख्य दुखणे होते. त्यामुळे तो कधीही सक्षम होऊ शकला नाही. त्यातच पूर-दुष्काळादी आपत्ती आल्या, आक्रमणे झाली किंवा राज्यकर्त्यांनी जुलमी कर बसवले की शेतकरी देशोधडीला लागायचा. भारतात ज्या काळात आणि ज्या प्रदेशात व्यापारी उलाढाल जोमाने झाली त्याच संस्कृती भरभराटीला आल्या (सिंधुसंस्कृतीमधले प्रदेश किंवा रोमन साम्राज्याशी व्यापार चालायचा तेव्हाच्या सातवाहनकालीन महाराष्ट्राचे प्रदेश किंवा विजयनगरसारखे राज्य). बाकीची गावे आíथक व सामाजिकदृष्टय़ा कुचंबलेलीच राहिली. ही गावे कदाचित स्वयंपूर्ण असतील; पण प्रगतिशील नव्हती. आंबेडकरांनी म्हटले आहे त्याप्रमाणे या गावांमध्ये फक्त श्रमांचीच विभागणी झाली होती असे नाही, तर श्रमिकांचीही विभागणी झाली होती. ‘वतनांचा त्याग करा आणि खेडी सोडा’ असे जे आवाहन आंबेडकरांनी दलितांना केले त्याचे कारणही हेच होते. खेडे, शेती, जात, व्यवसाय, वतन आणि धर्म यांची ही सांगड होती आणि तिचे भयावह परिणाम समाजावर होत होते.
आत्रे यांनी कुणबी-शेतकरी हा गांव-गाडय़ाचा पोिशदा मानला असल्याने आपल्या विश्लेषणात त्याला झुकते माप दिले आहे. ही भूमिका समजण्यासारखी असली तरी तो अगदी दीनवाणा, गरीब बापडा होता आणि आलुते-बलुते त्याचे शोषण करून त्याला नागवत असत, हे मत मात्र संपूर्णपणे मान्य करता येण्यासारखे नाही. याचे मुख्य कारण असे की, बलुत्याचा दर (निरख) हा बलुतेदाराला पोटापुरते मिळेल आणि त्याची उपासमार होणार नाही अशा आणि एवढय़ाच पद्धतीने ठरलेला होता; ते त्याच्या श्रमाचे योग्य मूल्य नव्हते. दुसरी गोष्ट अशी की, आलुते-बलुते किंवा महार-मातंगादी दलित फुकटखाऊ नव्हते. त्यांच्याकडून सपाटून काम करून घेतले जायचे. कुठल्याही गावात लोहार किंवा सुतार नुसते बसून आहेत किंवा पारावर चकाटय़ा पिटत बसले आहेत असे चित्र कधीही नव्हते. पहाटेपासून रात्रीपर्यंत ते कामाला जुंपलेले असत. एवढेच नाही तर त्यांच्या बायका आणि मुलेही या कामात सामील असत. असे कष्ट करून त्यांनी इमले उठवले आहेत असे कधीही घडले नाही. कारण त्यांना पोटापुरतेच मिळे. ते मरू नयेत, तगून राहावेत, एवढाच मोबदला त्यांना दिला जायचा. जातिसंस्थेचे विश्लेषण करताना या सामाजिक वस्तुस्थितीकडे, विशेषत: गरीबांच्या होणाऱ्या शोषणाकडे आत्रे का लक्ष देत नाहीत, ते कळत नाही. आत्रे यांचा ‘गांव-गाडा’ वाचत असताना दया पवार यांचे ‘बलुतं’ आणि भटक्या-विमुक्त समाजातील कार्यकर्त्यां-लेखकांची आत्मचरित्रेही वाचायला हवीत; म्हणजे गांव-गाडय़ाचे आकलन पूर्णत्वाला जाईल. अशीच गोष्ट भटक्या-फिरस्त्या आणि ज्यांना गुन्हेगार म्हटले जात होते अशा जातींच्या बाबतीतही आहे. आत्रे यांना या जातींबद्दल कणव नाही असे नाही, पण ते त्यांच्याकडेही कुणब्याला नागवणारे चोर-भिकार-लाचार याच दृष्टिकोनातून बघतात. एरव्ही आत्रे यांचा दृष्टिकोन पुरोगामी आणि सुधारकी आहे, पण याबाबतीत मात्र ते ब्रिटिशांचा वसाहतवादी दृष्टिकोनच स्वीकारताना दिसतात.
आत्रे यांच्या लेखनात आणखी एक त्रुटी जाणवते ती म्हणजे महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे वा त्यांच्याही आधी लोकहितवादी ज्या पद्धतीने परकीय सरकारच्या वसाहतवादी धोरणाची चिकित्सा करतात, तशी ते करत नाहीत. सरकारी नोकरीत असल्यानेच हे बंधन त्यांनी स्वीकारलेले दिसते. दुसरे कारण असेही असेल की, आत्रे यांची विचारपद्धत ही राजकीय-सामाजिक (पोलिटिकल-सोशल) नसून विवेकवादी-सामाजिक (रॅशनल-सोशल) अशी आहे. त्यामुळे वसाहतवादी राज्यावर टीका करण्याऐवजी सामाजिक-धार्मिक चिकित्सा त्यांना अधिक महत्त्वाची वाटली असावी. मात्र, त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरी आधीच्या या विचारवंतांचा काहीएक वारसा त्यांनी पुढे चालवलेला आहे. लोकहितवादींप्रमाणेच ते ग्रामरचनेवरचे भाष्यकार आहेत. तर महात्मा फुल्यांप्रमाणेच ते हिंदू धर्माची कठोर चिकित्सा करतात. आणि रानडे यांच्याप्रमाणेच आíथक सुधारणांचा विचार करतात.
‘गांव-गाडा’ या पुस्तकाच्या शेवटी आत्रे यांनी ‘महायात्रा’ नावाची एक पुरवणी जोडलेली आहे आणि त्यामध्येहिंदू समाजाच्या तीर्थयात्रादी धार्मिक समजुतींचा ऊहापोह केलेला आहे. यातले विवेचन हे आत्रे आधी करत असलेल्या हिंदू धर्माच्या चिकित्सेशी सुसंगत असेच आहे. किंबहुना, सर्वच पुस्तकभर आत्रे यांचा रोख हिंदू लोक धर्मभोळेपणाच्या चिखलात कसे रुतलेले आहेत, ते सांगण्याचाच आहे. ते स्पष्टपणे म्हणतात की, ‘‘ज्या- त्या वस्तूमध्ये व कृत्यामध्यें धर्म घुसडल्यामुळे हिंदु लोकांमध्ये धर्मभोळेपणा वाढत जाऊन हिंदु समाजाचा कोंडमारा झाला आहे, आणि धर्माच्या बाबींच्या अनेक प्रकारच्या भाराखाली तो पार गुदमरून चेंगरून गेला आहे.’’ धर्माने माजवलेला हाहाकार हेच आत्रे यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र असून भोळसर धर्मसमजुती नष्ट झाल्या पाहिजेत, ही त्यांची मुख्य कळकळ आहे. हिंदुस्थानात अस्पृश्यता, जातिभेद व व्यवसायबंधन अविरतपणे चालू राहिले याचे कारण त्याला असलेले धार्मिक अधिष्ठान- हे त्यांनी अचूकपणे हेरले होते.
हे जे ‘धर्मोत्तर विवेकवादाचे’ प्रतिपादन आहे ते आत्रे यांचे सर्वोत्कृष्ट योगदान आहे. याचे कारण गांव-गाडा जरी आज राहिला नसला तरी धार्मिक बाबतीत मात्र आत्रे जी परिस्थिती वर्णन करतात ती आजही तशीच कायम आहे. नाना प्रकारचे बाबा, महाराज, स्वामी, महंत यांची चलती पूर्वीपेक्षा कितीतरी प्रमाणात वाढली आहे. देवस्थानांचा बाजार होऊन लोकांना लुबाडण्याच्या एका नवीन धंद्यात त्याचे रूपांतर झालेले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची वाढ झालेली असली तरी अंधश्रद्धा कमी झालेल्या नाहीत. सृष्टीचे नियम समजू लागले असले तरी सर्वसामान्य माणूस अजूनही अदृष्टाला भिऊन असतो आणि त्यापोटी नवस-सायास, गंडेदोरे, अंगठय़ा, माळा यांच्या आहारी जात असतो. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पूर्वी ज्या सहिष्णुतेकरता हिंदू धर्म प्रसिद्ध होता ती सहिष्णुता नाहीशी होत चालली आहे. आता सनातनी विचारांचे लोक सुधारकांना गोळ्या घालायला लागलेले आहेत. ही गोष्ट हिंदू धर्मामध्ये पूर्वी कधीही नव्हती. या पाश्र्वभूमीवर आत्रे यांचे द्रष्टेपण तर दिसतेच; पण त्यांच्या विचारांचे महत्त्वही उलगडते. ते जे म्हणतात की, ‘‘सुधारणेची सर्व मदार व्यक्तिस्वातंत्र्यावर असते. ते ज्या समाजांत नाही, त्याच्या चलनवलनाचे क्षेत्र आंत आंत येत जाऊन अखेर तो नामशेष होतो हे प्रमाणसिद्ध आहे..’’ ते किती खरे आहे याचीही जाणीव होते.
आत्रे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सबंध समाज काही एका नीतीच्या आधाराने चालायला हवा, या मताचा त्यांनी पुकारा केला. त्यांनी म्हटले आहे त्याप्रमाणे समाजहितवर्धनास आवश्यक असे जे गुण- आपलेपणा, आत्मश्रद्धा, आत्मप्रेम- ते हिंदूंमधून समूळ नाहीसे झालेले होते. ते गुण पुन्हा प्रस्थापित व्हावे आणि या देशात एक सभ्य, समृद्ध आणि सुसंस्कृत समाज अस्तित्वात यावा, ही आत्रे यांची आस होती. ‘गांव-गाडा’ पुस्तकाच्या पानापानांतून ती व्यक्त होते. माणसांनी एकमेकांशी आपलेपणाने, समतेने, बंधुभावाने राहावे, ही आत्रे यांची धारणा आहे. ही धारणा कोणा एका काळाशी किंवा प्रदेशाशी निगडित नाही. सगळ्या मानवजातीसाठी सर्वकाळच आवश्यक अशी ती धारणा आहे. अशी धारणा जो मनाशी जपतो त्याच्या लिखाणाला एक वेगळेच मोल प्राप्त होते. आत्रे यांच्या लिखाणाला तसे मोल प्राप्त झाले आहे.
त्यामुळेच महाराष्ट्रात गांव-गाडा राहिला नाही तरी त्याचे शब्दांकन करणारेहिंबक नारायण आत्रे मात्र मराठीत कायम राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 2:25 am

Web Title: book gao gada by trimbak narayan atre
Next Stories
1 स्त्री-परिषदांची फलश्रुती
2 व्यवस्थेविरुद्धचे बंड
3 रोहित वेमुला हवा की नको?
Just Now!
X