निसर्गाच्या राज्यातलं प्रत्येक दालन प्रत्येकासाठी उघड असतं. आपण जर आपल्या मनाची कवडं उघडली तर आपल्यासाठीही तो आनंदाचा खजिना खुला होऊ शकतो आणि आपलं जीवन समृद्ध करू शकतो..’’
हा संदेश आहे शकुंतला पुंडे यांनी लिहिलेल्या ‘ते आणि मी’ या पुस्तकाचा. या पुस्तकात आपल्या नित्य परिचयातील मानवेतर जीवसृष्टीचा त्यांनी जो डोळस अनुभव घेतला त्याचं हृद्य चित्रण केलेलं आहे. या अनुभवांतून त्यांना जो आनंदाचा खजिना प्राप्त झाला आहे त्याचं प्रत्ययकारी दर्शन त्यांनी या पुस्तकात घडवले आहे. आजपर्यंत मराठीत कुत्रा, मांजर, वानरं इत्यादींवर ललित लेखन झालेले आहे. पक्षीनिरीक्षक, जंगल भ्रमंती करणारे अशा लेखकांनीही त्यांची वर्णनं लिहून ठेवली आहेत. त्यापेक्षा हे पुस्तक वेगळ्या कारणाने वैशिष्टय़पूर्ण वाटतं. शकुंतला पुंडे यांना हे अनुभव लिहिण्यासाठी कुठे दूरची शोधयात्रा करावी लागली नाही, किंवा मुद्दाम आयोजित केलेल्या सहलीत सहभागीही व्हावं लागलं नाही. त्यांनी फक्त आपल्या मनाची कवाडं उघडी ठेवून आपल्या भोवताली वावरणाऱ्या हलत्या-बोलत्या सजीव प्राणिसृष्टीचं जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं जे सूक्ष्म निरीक्षण केलं तोच या पुस्तकाचा विषय आहे. त्यांनी रंगवलेल्या या निसर्गपटाचा रंगमंच त्यांचं कोकणातील माहेरचं घर आणि विवाहोत्तर निवडलेली पुण्यातील सदनिका या प्रामुख्याने दोन स्थळांपुरता मर्यादित आहे. परंतु ‘साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे’ हे कितीही खरं असलं तरी तो आशय पाहण्याची जी स्वतंत्र दृष्टी लागते ती त्यांच्याकडे असल्यामुळेच त्यांनी या छोटय़ाशा विश्वाचा एक सुंदर पट आपल्यापुढे उलगडलेला आहे.
या पुस्तकाची मांडणी त्यांनी एकूण चार प्रकरणांत केली आहे. (१) एका शेजाराची कहाणी (२) जिवलगांच्या स्मृती (३) निसर्गपुत्र आणि (४) सख्खे शेजारी.. अशी ती प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात आपल्या पुण्याच्या सदनिकेतून त्यांना घडलेलं पक्षिजीवनाचं दर्शन आहे. या जीवनाचं कुतूहल असल्यामुळे त्यांनी आपल्या गॅलरीत पक्ष्यांसाठी खास सोय केलेली आहे. त्यांच्या खाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, अंघोळीची व्यवस्था इ. गोष्टी त्यांनी मोठय़ा हौसेने केल्या आहेत. त्यांचा लाभ घेणारे पक्षी आणि गॅलरीसमोरच्या झाडावर घरटी बांधून राहणारे पक्षी यांचं त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले आहे. पक्ष्यांचे विविध प्रकार, त्यांची कुटुंबं, त्यांची भांडणं, त्यांच्या सवयी, त्यांना देवाने दिलेल्या बुद्धीचा त्यांनी केलेला उपयोग, इ. बारीकसारीक गोष्टी त्यांनी यात छान रंगवल्या आहेत. त्यांच्या निरीक्षणाचे विषय झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती मोजण्याचा प्रयत्न केला असता त्या अठ्ठावीस इतक्या भरल्या. यावरून त्यांच्या पक्षिज्ञानाची व्याप्ती लक्षात येते. त्यांनी नोंदवलेली माहिती खूप उद्बोधक आहे. कोकीळ प्रजातीमधला नर गात असतो, मादी नव्हे. तरी पण आपल्याकडे ‘कोकिळेचा आवाज’ म्हणण्याची पद्धत पडली आहे. कोकिळा कावळ्यांना फसवून आपली अंडी कावळ्याच्या घरटय़ात टाकते आणि तिची पिलं मोठी होईपर्यंत कावळ्यांना सांभाळायला लावते. एवढं करून ती कावळ्याशी भांडायलाही तयार असते. घार आकाशात हिंडते खरी; पण तिचं लक्ष आपल्या पिलांकडेच असतं. तसंच इतरांच्या पिलांकडेही भक्ष्य म्हणून तिचं लक्ष असतंच. पक्ष्यांना जेव्हा आपल्या मरणाची चाहूल लागते तेव्हा ते एखादी शांत जागा शोधून स्वस्थ बसून राहतात. मुंग्या रांगेने जात असतात. त्यात एखादी मुंगी मरण पावली तर तिच्या मागची मुंगी तिला खाऊन टाकते, इत्यादी त्यांची निरीक्षणं खूप मार्मिक आहेत.
त्या- त्या पक्ष्याच्या स्वभावावरून त्यांनी त्यांना काही बिरुदंही अर्पण केली आहेत. कबूतर म्हणजे साडेसाती, साळुंकी म्हणजे गव्हाणीतला कुत्रा, भांडकुदळ चिमण्या, भांगपाडी मैना, इ. विशेषणं मनोरंजक आहेत. काही पक्ष्यांची नावं कोकणात वेगळी आहेत. उदा. वटवाघूळ म्हणजे डांबक, ग्रेटिट म्हणजे टोपीवाला, भारद्वाज म्हणजे कोकड कुंबा, इ. अनेक वर्षांच्या सूक्ष्म निरीक्षणाने त्यांना पक्ष्यांची मनोगतेही कळतात. म्हणून त्यांनी कल्पनेने त्या पक्ष्यांचे आपापसातले संवाद व भांडणेही रंगवली आहेत.
दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे- ‘जीवलगांच्या स्मृती’! त्याला ‘मार्जारपुराणे मनु-आख्यान’ असं पर्यायी नावही देता येईल. कोकणातील त्यांच्या घरातील मांजर, कुत्रा या प्राण्यांच्या खेळकर लीला त्यात सांगितलेल्या आहे. त्यातही मनु नावाच्या मांजरीच्या लीला खूपच विस्ताराने आल्या आहेत. ही मनु मांजरी फार हुशार आहे. ती नाटकीही आहे. खेळकर आहे, तशीच पराक्रमीही आहे. एकदा ती कुठलातरी प्राणी पकडल्याचा अभिनय करत होती. लेखिका कुतूहलाने तो प्राणी कोणता, हे पाहायला गेली, तर तिथे काहीच नव्हते. म्हणून त्या म्हणतात, ‘थांब हं! बघते तुझ्याकडे. मला फसवलेस काय?’ असं म्हणून त्या तिला धपाटा मारणार, तोच ते ओळखून ती तिथून टुणकन् उडी मारून हवेत पंजे उडवत धूम पळाली. या प्रसंगात मनीचं खोटं खोटं नाटक, तिचं पळून जाणं, इ. अगदी जिवंत वाटतं. मांजरीमागून जाणाऱ्या पिलाचं वर्णन ‘फेंगडी फेंगडी’ चालणारी मांजरीची पिलं अशा दोन-तीन शब्दांत करून आपल्यासमोर त्या त्यांचं चित्र उभं करतात. अशा वर्णनाला साहित्यशास्त्रात स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. मनुनं कुत्र्याला पळवून लावलं, याचं वर्णन करताना त्या असंच शब्दचित्र रंगवतात. या प्रकारची स्वभावोक्तीची वर्णनं या पुस्तकात पानोपानी दृष्टीस पडतात.
तिसऱ्या प्रकरणात साप, विंचू, इंगळी, वाघ, कोल्हा इत्यादी विषारी व हिंस्र प्राण्यांचे अनुभव दिले आहेत. त्यांच्याबद्दल लेखिकेची एक भूमिका आहे. त्यांच्या मते, हे प्राणी निसर्गपुत्रच आहेत. ते विनाकारण आक्रमक नसतात. ते त्यांच्या नेमून दिलेल्या कक्षेत राहून जीवन जगत असतात. त्यांचं म्हणणं असं की, या प्राण्यांपेक्षा माणूसच अधिक क्रूर व विखारी आहे. तो साप पाहिल्याबरोबर त्याला मारायच्याच तयारीत असतो आणि त्याला मारून टाकतो. त्या उपरोधाने म्हणतात, जनमेजयाने आरंभिलेला सर्पयज्ञ संपलेला नाही, तो आजही सर्रास चालू आहे. हिमालयातील गुहांतून राहणाऱ्या साधूंना या हिंस्र प्राण्यांची भीती अजिबात वाटत नाही. स्वामी राम यांच्या Living With Himalayan Masters या ग्रंथाची साक्ष त्या यासंदर्भात देतात. याच संदर्भात विलास मनोहर आणि पुरुषोत्तम भट यांचे विचार उद्धृत करून त्या एक महत्त्वाचा विचार सांगतात.. ‘माणसाचं अंतर्गत शक्तिसामथ्र्य त्याला निर्भय करीत असतं.’ मानवी मनाच्या निर्वैर स्थितीतून, विश्वैक्य भावभावनेतून आपल्याला प्राण्यांचे शांत व अहिंसक प्रतिसाद मिळत असतात. पण मनाची अशी अवस्था होणं हीच फार कठीण गोष्ट असते. (पृ. ८७)
चौथं प्रकरण म्हणजे पहिल्याच प्रकरणाचा विस्तार आहे. त्यातही या मुक्या प्राण्यांबद्दल त्यांचे सहानुभूतीपर चिंतन आहे; जे मौलिक आणि विचारप्रवर्तक आहे. मनुच्या संदर्भात त्या म्हणतात, ‘प्रत्येक प्राण्याचा एक विशिष्ट मर्यादेपर्यंतच बौद्धिक विकास झालेला असतो. आणि निसर्गाच्या साखळीत जसं वागणं आवश्यक असतं, तसं ते आपल्या मर्यादेच्या कक्षेत राहून करत असतात.’ मनुच्या लीलांचं त्यांना खूप कौतुक आहे. लाघवी, प्रेमळ, निडर, स्वाभिमानी, विनोदी, बुद्धिमान, विवेकी अशी विशेषणं त्यांनी तिला बहाल केली आहेत. त्या म्हणतात, ‘मनुकडे बघितल्यावर वाटे की, कधीही न चुकणाऱ्या देवाची काहीतरी गफलत झाली असावी. मनुष्यदेहात घालावयाचा आत्मा बहुधा त्याने चुकून या मनुच्या देहात घातला असावा.’ (पृष्ठ ६०)
या पुस्तकाचं मुख्य आकर्षण म्हणजे त्याची भाषा. अगदी साधी, घरगुती भाषा. तीत मधूनमधून वापरलेल्या कोकणातील शब्दांनी आणखीन गोडवा आणला आहे. डावली लावणे, कसव, झाप, कांडप, भाटी, बहाला, चिटवळपणा, चोपई, चुलीत लाकडं डाळणे, इत्यादी. त्यांच्या भाषेला विनोदाची जोड आहे. मार्मिक चिंतनाने तिच्यात एक प्रगल्भता आलेली आहे. त्यातून लेखिकेची सुशिक्षित पाश्र्वभूमी, संपन्न संस्कार, इ. विविध गुणांची ओळख पटते. पुस्तक वाचायला घेतल्यापासून संपेपर्यंत खाली ठेवावंसं वाटत नाही, यापेक्षा जास्त काय सांगावं!

‘ते’ आणि मी’- शकुंतला पुंडे,
रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १९५,
किंमत- २०० रुपये. ठ

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
low response to pradhan mantri surya ghar yojana
विश्लेषण : पंतप्रधान सूर्यघर योजनेला राज्यात प्रतिसाद कमी का?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?