28 February 2021

News Flash

भाषा-शिक्षणावर सम्यक विचारमंथन

शिक्षणाचा खालावणारा दर्जा हा दीर्घकाळ सुज्ञांच्या चिंतेचा विषय झालेला आहे.

प्रा. विद्यागौरी टिळक

शिक्षणाचा खालावणारा दर्जा हा दीर्घकाळ सुज्ञांच्या चिंतेचा विषय झालेला आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले, पण त्याचे फलित मात्र अपेक्षित तसे आणि तेवढे नाही. याचे मुख्य कारण प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन व्यवहाराचे अपयश हे आहे. त्यासाठी अनेकदा पालकांचे दुर्लक्ष, प्रसारमाध्यमे, मुलांची अक्षमता आदी घटक दोषी धरले जातात. वस्तुत: शिक्षक-विद्यार्थी सुसंवाद हा शिक्षणाचा पाया आहे आणि उभयपक्षी आकलन होणारी/ होणाऱ्या भाषा हे त्याचे माध्यम असते. त्यामुळे यशस्वी, सफल सुसंवाद हा यातला गाभ्याचा मुद्दा आहे. मात्र तो लक्षात घेतला जात नाही. हा संवाद घडतो की नाही आणि नसल्यास भाषिक अडथळा मधे येतो आहे का, हे पाहण्याची गरज कुणाला वाटत नाही. विद्यार्थ्यांचे अडखळणे हा शिक्षकाला व्यत्यय वाटला, की दिलेल्या ठराविक शब्दांची आकलनशून्य पुनरुक्ती प्रश्नोत्तरांमध्ये होऊ लागते. या अर्थशून्य घोकंपट्टीलाच ‘शिकणे’ मानल्यावर आकलन ही शैक्षणिकदृष्टय़ा आधारभूत प्रक्रियाच हरवून जाते याची पुरेशी दखल घेतली जात नाही.

याकडे लक्ष वेधत, या अपयशाला शिक्षणाच्या माध्यमाविषयीची आपली अपुरी समज कारणीभूत आहे याची जाणीव अलीकडे प्रकाशित झालेले ‘बहुभाषिकता : गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया’ हे पुस्तक करून देते. शिक्षण आणि भाषा यांच्या परस्परसंबंधाच्या सखोल चच्रेसाठी मुंबई विद्यापीठाचा भाषाविज्ञान विभाग आणि ‘युनिक फाऊंडेशन’चे डॉ. रखमाबाई संसाधन व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २०१५ मध्ये ‘शिक्षणाचा अधिकार आणि भाषांचे भवितव्य’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित केलेला होता. यात वाचलेले निबंध, झालेली चर्चा यासोबतच वंचित, अक्षम आणि विशेष मुलांचे भाषाशिक्षण अशा अन्य मुद्यांवरील काही लेख अशी सामग्री संपादित करून डॉ. अविनाश पांडे आणि विनया मालती हरी या संपादकद्वयाने ती पुढे मांडली आहे.

गणेश देवी, मॅक्सिन बर्नसन, इम्तियाज हसनन, अविनाश पांडे, राजेश कुमार, प्रोबाल दासगुप्ता, वंदना भागवत, नीलेश निमकर, आदी नामवंतांचे लेख यात संग्रहित झालेले आहेत. यातील काही भाषाविज्ञानाचे अभ्यासक- अध्यापक आहेत, तर काही भाषेचे विशेषज्ञ व प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालयांचा अनुभव असणारे शिक्षक कार्यकत्रे आहेत. त्यामुळे या पुस्तकात तत्त्वचच्रेसोबतच प्रत्यक्ष अनुभवाधारित बोलही वाचायला मिळतात. तात्त्विक संकल्पनांसोबतच त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोजनांबाबतची दिशाही यातून बऱ्याच अंशी स्पष्ट होत असल्याने शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयोगी ठरेलसे झाले आहे.

भाषा, मातृभाषा, परिसरभाषा, माध्यमभाषा, बहुभाषिकता यांसारख्या संकल्पनांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून उलगडा या लेखांमधून होतो. ‘भाषा’ ही एकच एक साचेबंद चौकट असणारी वस्तू नसून विविधरूपिणी, स्थलकालसापेक्ष लवचिक व्यवस्था कशी असते, हे त्यातून स्पष्ट होत जाते. आपला विद्यार्थिवर्ग मराठी भाषक आहे असे म्हटले तरी प्रत्यक्षात साऱ्यांना प्रमाणभाषा सारखीच अवगत नसते. त्यांच्या मातृबोली भिन्न असताना एकाच छापाच्या भाषेचा वापर अध्यापनात करणे अन्यायकारक ठरते. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या बोलीचा आधार घेऊन हळूहळू प्रमाणभाषा परिचित करून द्यावी हे आज अनेकांना पटते. त्याचे प्रत्यक्षातले सुपरिणाम काही लेखांमधून नोंदविलेले आहेत. वरच्या स्तरावर प्रथम भाषेऐवजी इंग्रजी वा हिंदी माध्यमाचाही अवलंब होतो. तेथे मातृभाषेचा वापर एवढाच पर्याय आजवर पुढे येई. तेथेही बहुभाषिक व्यवहार ठेवणे व्यक्तित्वविकासाला पोषक आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारे ठरते, अशी वेगळी आणि विचारप्रवृत्त करणारी भूमिकाही यात आहे.

एकीकडे इंग्रजीसारखी संपर्कभाषा, त्रिभाषासूत्र; तर दुसरीकडे मराठीसारख्या प्रादेशिक भाषेमधलेही बोलीवैविध्य, महाराष्ट्रातल्या इतर बोली, सीमाभागातील लोकांच्या/ स्थलांतरितांच्या वापरातील इतर भाषा/ बोली यांच्या बाबतच्या चच्रेतून भाषांचा एक विस्तीर्ण पट वाचकांसमोर येतो. विद्यार्थिवर्गाची ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन शिक्षणप्रक्रियेत सर्वाना मोकळा अवकाश उपलब्ध करून देण्याची गरज हे पुस्तक अधोरेखित करते.

औपचारिक शालेय शिक्षणाच्या सफलतेसाठी घरातील आणि समाजातील अनौपचारिक व सहज शिक्षणाशी त्याची सांगड जुळली पाहिजे. आपल्या भाषाविषयक पूर्वग्रहांमुळे, प्रस्थापित चौकटींमुळे ते घडत नाही. परिणामी लोकशाहीशी सुसंगत, समान संधी देणारी, सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वविकासाला पोषक शिक्षणपद्धती आपण घडवू शकलेलो नाही, हे यातून जाणवते.

मधल्या काळातील.. विज्ञान-तंत्रज्ञानापुढे भाषाशिक्षण गौण मानण्याच्या पाश्र्वभूमीवर ‘आपल्याला जर उत्तम प्रतीचे जीवन जगायचे असेल, तर भाषा या आपले जीवनमान ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या विचारांची आणि अभिव्यक्तीची साधने जर खुरटी, कुपोषित असतील तर आपल्या हाती शक्यतांचेही दारिद्रय़च येते’ हा अविनाश पांडे यांच्या विशेष संपादकीयातला इशारा महत्त्वाचा आणि अंतर्मुख करणाराही आहे.

यातले लेख विविध दृष्टिकोन असलेल्या लेखकांचे आहेत. त्यामुळे ‘आता भारतीयच झालेल्या इंग्रजीला विरोध करण्यापेक्षा तिचे योग्यरीतीने शिक्षण देणे महत्त्वाचे’ अशा भूमिकेसोबतच ‘इंग्रजीचे पुरस्कत्रे वर्चस्वाचे राजकारण करीत असतात’ ही भूमिकाही येते. ‘प्रत्येक भाषेचे आपापले स्थान लक्षात घेतले पाहिजे’ असेही प्रतिपादन वाचायला मिळते. डॉ. गणेश देवी यांनी बहुभाषिकतेचा आपला आग्रह ‘विशिष्ट माध्यमभाषा नसलेली शाळा’ या कल्पनेतून मांडला आहे, तो सर्वाना व्यवहार्य वाटेलच असा नाही. मात्र, या लेखांमधून भाषेचे विविध पलू समोर येत जातात.

‘बहुभाषिकता’ या संकल्पनेतच एकच एक ठोस चौकट स्वीकारण्याला विरोध आहे. या पुस्तकातही अशी एका चौकटीच्या आधारे सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची भूमिका नाही. काहींना दृष्टिकोनांमधल्या या वैविध्यामुळे गोंधळल्यासारखेही वाटेल. मात्र भाषाशिक्षण व भाषाव्यवहाराशी किती शैक्षणिक, सामाजिक व राजकीय पलू निगडित असतात, या बाबत त्यांना विचारप्रवृत्त करण्याचा व अनुभव पडताळायला लावण्याचा या पुस्तकाचा हेतू निश्चितच सफल होईल. प्रश्नाच्या वेगवेगळय़ा बाजू समोर ठेवणे आणि त्यातून सम्यक आकलनाच्या दिशेने जाणे हेच अशा तऱ्हेच्या परिसंवादांचे आणि त्यातून निघणाऱ्या विचारमंथनाचे उद्दिष्ट असते. शैक्षणिक व सामाजिकदृष्टय़ा एका महत्त्वाच्या विषयावरचे हे विचारमंथन मराठी वाचकांना आता पुस्तकरूपात उपलब्ध झाले आहे.

‘बहुभाषिकता : गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया’

संपादन – डॉ. अविनाश पांडे ,

 विनया मालती हरी,

युनिक अ‍ॅकॅडमी पब्लिकेशन्स प्रा. लि.,

पृष्ठे – २३२, मूल्य – १६० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:17 am

Web Title: book review bahubhashikta gunwattapurn shikshanacha paya
Next Stories
1 काश्मीरचा काव्यमय इतिहास
2 अनुभवांचे चिंतनशील कथन
3 काबूल महाविनायक
Just Now!
X