ज्येष्ठ सावरकर अभ्यासक शेषराव मोरे लिखित ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ हे पुस्तक २८ मे रोजी राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील निवडक भाग..

काँग्रेसला १९३७ च्या व नंतर १९४५-४६ च्या निवडणुकांमध्ये जनतेनेच निवडून दिलेले आहे; गांधीजी हे काँग्रेसचे सर्वेसर्वा होते, ते जनतेच्या पाठिंब्यामुळेच- याची सावरकरांना पूर्ण जाणीव होती. त्यांचा काँग्रेसला वा गांधीजींना असलेला विरोध वैयक्तिक कारणांसाठी नव्हता. राष्ट्राचे हित अधिक कशाने होईल, यासाठीच्या राजकीय धोरणासाठी होता. मुस्लीम लीगने फाळणीची मागणी केल्यानंतरच्या महत्त्वाच्या सात-आठ वर्षांच्या काळातीलही त्यांचे गांधी-नेहरूंशी असलेले संबंध उच्च राजकीय पातळीवरील होते. या काळात त्यांच्याशी वैयक्तिक संबंध कसे राहत आले, हे पुराव्यांसह न्यायालयासमोर आले होते आणि तेही प्रामुख्याने फिर्यादी सरकारतर्फे  सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे. गांधीहत्येनंतर पोलिसांनी सावरकर सदनाची झडती घेऊन तेथील १०,००० कागदपत्रे जप्त करून आणली होती. त्यांत सावरकरांविरुद्ध एक कागदही वा शब्दही मिळाला नाही, पण त्यांच्या बाजूने काही कागदपत्रे मिळाली. त्यांचा सावरकरांनी आपल्या न्यायालयातील निवेदनात आधारही घेतला होता. सावरकर हे गांधी-नेहरूंकडे एक व्यक्ती व राजकीय नेते म्हणून कसे पाहत व संबंध ठेवीत असत, यावर प्रकाश टाकणाऱ्या व न्यायालयात दाखल झालेल्या काही कागदपत्रांची आपण पाहणी करू.

(१) नोव्हेंबर, १९४० मध्ये पंडित नेहरूंना ब्रिटिश शासनाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्या वेळी हिंदुमहासभेचे अध्यक्ष असलेल्या सावरकरांनी शासनाचा निषेध करण्यासाठी पत्रक काढले होते. यासंबंधात न्यायालयात दिलेल्या आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते : ‘६ नोव्हेंबर १९४० रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंना चार वर्षांची शिक्षा झाली. त्या वेळी मी काढलेले आणि भारतातील अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले पत्रक पुढे देत आहे. ते पत्रक ‘व्हर्लव्हिंड प्रॉपगंडा’ या माझ्या पुस्तकात पृष्ठ २६२ वर दिलेले आहे- ‘पंडित जवाहरलाल नेहरूंना दिलेल्या चार वर्षांच्या कारागृहाच्या शिक्षेचे वृत्त ऐकून प्रत्येक भारतीय देशभक्ताला दु:खाचा धक्काच बसला असला पाहिजे. आमच्या तत्त्वांतील व धोरणांतील भेदांमुळे आम्हा दोघांना जरी भिन्न पक्षांत काम करणे भाग पडत असले, तरी त्यांनी आयुष्यभर देशभक्तीच्या व मानवतेच्याही तळमळीने केलेल्या कार्यात जे अपार कष्ट सोसले आहेत, त्याची सखोल नोंद करणे व त्यांच्याविषयी सहानुभूती प्रकट करणे एक हिंदुसभावादी म्हणून माझे कर्तव्य आहे..’’

पुढे गांधीहत्येच्या वेळी न्यायालयात उपयोगाला पडेल म्हणून आठ वर्षे आधीच त्यांनी तयार करून ठेवलेला हा पुरावा होता, असे तर विरोधक म्हणणार नाहीत ना?

(२) ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेस महासमितीत ‘छोडो भारत’चा ठराव संमत होताच दुसऱ्या दिवशी (९ ऑगस्ट) सरकारने गांधीजी, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य व अनेक काँग्रेस नेत्यांना अटक केली. लगेच दुसऱ्या दिवशी (१० ऑगस्ट) सावरकरांनी काँग्रेसची बाजू घेऊन शासनाचा निषेध करणारे व त्यांना इशारा देणारे पत्रक काढले. त्यात म्हटले होते :

‘अपरिहार्य ते घडले आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आघाडीचे व देशभक्त शेकडो नेते आणि कार्यकर्ते यांना पकडून कारागृहात डांबण्यात आले आहे. देशभक्तीसाठी त्यांना सोसाव्या लागलेल्या यातनांबद्दल हिंदू संघटनावाद्यांची वैयक्तिक सहानुभूती त्यांच्या बाजूने आहे.. मी शासनाला पुन्हा इशारा देतो की, भारतातील असंतोष शांत करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटने अशी नि:संदिग्ध घोषणा केली पाहिजे की, भारताला इंडो-ब्रिटिश राष्ट्रसमूहात ग्रेट ब्रिटनप्रमाणेच समान अधिकार व कर्तव्ये असणारे संपूर्ण स्वातंत्र्य तात्काळ प्रदान करण्यात येईल.’

हे लक्षात घेतले पाहिजे की, ‘छोडो भारत’ आंदोलनात सावरकर अध्यक्ष असलेल्या हिंदुमहासभेने भाग घेतला नव्हता; उलट हे ‘छोडो भारत’ म्हणजे ‘तोडो भारत’ होय, असाही इशारा दिला होता. तरीही त्यांनी शासनाच्या विरोधात देशभक्त गांधीजी व काँग्रेसची बाजू घेतली होती, ही गांधीहत्यासंदर्भातही लक्षणीय ठरणारी बाब आहे.

(३) गांधीजींनी येरवडा कारागृहात असताना १० फेब्रुवारी १९४३ पासून २१ दिवसांचे कालबद्ध उपोषण सुरू केले होते. ७४ वर्षे वयाच्या त्यांच्या प्रकृतीला ते उपोषण सहन होणारे नव्हते. उपोषणकाळात त्यांची अवस्था नाजूक झाली होती. त्यांची विनाअट सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी १९ फेब्रुवारी रोजी मुंबईला सर तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेचे सावरकर एक सदस्य होते. त्यांनी सर सप्रू यांना तार करून संदेश दिला होता की, ‘देशाचे कल्याण लक्षात घेऊन स्वत: गांधीजींनीच उपोषण सोडून द्यावे, याकरिता त्यांना एक सार्वत्रिक राष्ट्रीय आवाहन करण्यात यावे.’

त्याच दिवशी त्यांनी हिंदुमहासभेचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते : ‘गांधीजींच्या गंभीर प्रकृतीविषयी ज्यांना अत्यंत चिंता वाटते आणि त्यांच्या प्राणरक्षणार्थ कोणतीही गोष्ट करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांनी तात्काळ लक्षात घेतले पाहिजे की, गांधीजींना उपोषणाचा ताण असह्य़ होण्यापूर्वीच एक राष्ट्रीय आवाहन करून त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणे, हाच अधिक परिणामकारक उपाय आहे. आता वाट पाहत बसणे धोकादायक ठरेल.. गांधीजींची सुटका करण्यासाठी व त्यांचे प्राण वाचविण्यासाठी सरकारचे मन वळविण्याचे आतापर्यंत आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. या उपोषणाने किंवा त्याच्या नैतिक व मानवी आर्ततेने सरकारचा हृदयपालट होईल, अशी आशा धरणे आता व्यर्थ आहे.. काळ इतक्या वेगाने पुढे जात आहे की, (सरकारचा) केवळ निषेध व विरोध करण्यासाठी एक क्षणही वाया घालविता येणार नाही. विनंत्या, त्यागपत्रे किंवा शासनाला उद्देशून केलेला ठराव आता गांधीजींची सुटका करू शकणार नाहीत. आता आपण आपला मोर्चा परकीय व सहानुभूतीशून्य व्हाइसरॉय निवासाच्या दाराशी न नेता त्याचे तोंड गांधीजींच्या रुग्णशय्येकडे वळविले पाहिजे. ज्या राष्ट्रीय हितासाठी त्यांनी हे उपोषण आरंभिले आहे त्याच राष्ट्रहितासाठी त्यांनी हे उपोषण सोडले पाहिजे, अशी आपण त्यांना विनंती केली पाहिजे.. ज्या राष्ट्राच्या सेवेसाठी गांधीजींनी हे प्राण धोक्यात आणणारे उपोषण आरंभिले आहे, ते राष्ट्रच त्यांना सांगत आहे की, या वेळी त्यांचे प्राण जाण्यापेक्षा ते राहणेच (राष्ट्रासाठी) अगणित मौल्यवान ठरणार आहे. स्वत: गांधीजींनीही, अशा राष्ट्रीय आवाहनातून हे ओळखले पाहिजे की, त्यांचे जीवन हे केवळ त्यांचे स्वत:चे नसून तो एक राष्ट्रीय ठेवा आहे, साऱ्या राष्ट्राची मालमत्ता आहे. (His life… is not so much his own as it is a national asset, a national property).. तेव्हा, मी परिषदेच्या सर्व सन्माननीय नेत्यांना विनंती करतो की, त्यांनी गांधीजींनीच उपोषण सोडावे, यासाठी त्यांनाच आवाहन करावे.’

त्यानंतर दिल्लीला हिंदुमहासभा कार्यकारिणीची बैठक भरून त्यात या उपोषणाविषयी एक ठराव संमत करण्यात आला. त्यात आपल्या आत्मिक बळावर गांधीजी प्रस्तुत अग्निदिव्यातून सुखरूप बाहेर पडोत, अशी प्रार्थनायुक्त सदिच्छा व्यक्त करण्यात आली. अर्थात, आपल्या आत्मिक बळावर व कोटय़वधी भारतीयांच्या शुभेच्छांमुळे हा महात्मा एकवीस दिवसांच्या उपोषणाचे अग्निदिव्य संपवून सुखरूप बाहेर पडला. आता प्रश्न एवढाच आहे की, त्यानंतर पाच वर्षांच्या आत असे काय घडले होते की, सावरकरांनी या राष्ट्रीय ठेव्याला संपवून टाकण्याचा विचार करावा?

(४) गांधीजी २ ऑक्टोबर १९४३ रोजी ७५ व्या वर्षांत पदार्पण करीत होते. सावरकरांनी त्यांना पुढील तार पाठवून शुभेच्छा दिल्या व ती तार वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाली : ‘महात्मा गांधीजींच्या ७५ व्या वाढदिवशी मी त्यांचे व आपल्या राष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य व सुदृढ आरोग्य देवो.’

(५) २२ फेब्रुवारी १९४४ ला, गांधीजी आगाखान पॅलेस कारागृहात असताना, त्यांची सहचारिणी कस्तुरबा गांधी यांचे दु:खद निधन झाले. लगेच सावरकरांनी गांधीजींना तारेने संदेश पाठविला की, ‘कस्तुरबा यांच्या निधनाने माझे हृदय अत्यंत दु:खी झाले आहे. त्या एकनिष्ठ पत्नी नि प्रेमळ माता होत्या. ईश्वराची व मानवाची सेवा करीत असताना त्यांना उदात्त व सौभाग्याचे मरण आले. तुमच्या दु:खात सर्व राष्ट्र सहभागी आहे.’

(६) गांधीजींची ६ मे १९४४ रोजी येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सावरकरांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा देणारे पत्र पाठविले व विविध वृत्तपत्रांत ते प्रसिद्धही झाले. त्यात लिहिले होते : ‘गांधीजींचे उतारवय, खालावलेली प्रकृती व अलीकडले मोठे आजारपण लक्षात घेऊन शासनाने त्यांची सुटका केली, हे वृत्त ऐकून सर्व राष्ट्राने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ही माणुसकीची कृती आहे. गांधीजींची प्रकृती वेगाने पूर्ववत होवो, अशी इच्छा मी व्यक्त करतो. मी आशा व्यक्त करतो की, राजकीय कारणासाठी विनाचौकशी डांबून ठेवलेल्या पं. नेहरू आणि अन्य सर्व सद्गृहस्थांना शासन आता सोडून देईल.’

(७) सावरकरांचे राजकीय नेत्यांशी संबंध कसे राहत असत, याचे एक उत्कृष्ट उदाहरण जिनांसंबंधातील आहे. बॅ. मोहंमद अली जिना हे अ. भा. मुस्लीम लीगचे अध्यक्ष, मुसलमानांचे सर्वोच्च नेते, फाळणीची मागणी करणारे व सावरकरांचे कट्टर राजकीय विरोधक होते. काँग्रेस व गांधीजींशी सावरकरांचा विरोध असण्याचे एक प्रमुख कारण त्यांची जिनांविषयीची भूमिका हे होते. या कट्टर राजकीय विरोधकाशी वैयक्तिक पातळीवर सावरकर कसे वागत असत, हे पुराव्यांसह न्यायालयासमोर आले होते. जुलै, १९४३ मध्ये एका खाकसार मुस्लीम तरुणाने राजकीय कारणासाठी जिनांवर खुनी हल्ला केला होता. सावरकरांनी या खुनी हल्ल्याचा निषेध करून, सुखरूप राहिल्याबद्दल जिनांचे अभिनंदन करणारे पत्र त्यांना पाठविले होते. यासंबंधात सावरकरांनी न्यायालयातील निवेदनात सांगितले होते की, ‘(माफीचा साक्षीदार) बडगे याने त्याच्या साक्षीत सांगितले होते की, (फाळणीपूर्व बंगालचे मुस्लीम लीगचे मुख्यमंत्री) सुऱ्हावर्दी यांना संपवून टाकण्याची माझी इच्छा असल्याचे आपटे याने त्याला सांगितले होते. सुऱ्हावर्दी हे मुसलमान असल्यामुळे माझ्यावर हा आरोप केल्यास त्याच्या खरेपणाविषयी इतरांची अधिक खात्री पटेल, असे बडगेला वाटले असावे. परंतु कायदा पाळणारा भारताचा नागरिक, मग तो हिंदू असो की मुसलमान, तो कोणत्याही धर्मावर श्रद्धा ठेवणारा असो किंवा कोणतीही राजकीय विचारसरणी मानणारा असो, त्याच्यावर हिंसेचा अवलंब करून कोणी हल्ला केल्यास त्यास घातक भ्रातृहत्या म्हणता येईल, अशा कोणत्याही कृत्याचा मी कठोरपणे धिक्कारच करीत आलो आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे २७ जुलै १९४३ रोजी मी काढलेले आणि वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेले निवेदन. त्यात मी अलीकडेच निधन पावलेल्या कायदेआझम जिना या मुस्लीम नेत्यावर १९४३ साली झालेल्या खुनी हल्ल्याचा धिक्कार केला होता. तेव्हा जिना हे भारताचे नागरिक होते व म्हणून आमच्या देशबांधवांपैकी होते. तेव्हा मी काढलेले निवेदन असे –

‘श्रीयुत जिना यांच्यावरील खुनी हल्ल्याचे वृत्त ऐकून अत्यंत दु:ख झाले. ते थोडक्यात बचावल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मुसलमानांची कड घेणाऱ्यांमध्ये जिना आघाडीवर आहेत. असे असतानाही आपला जीव घेण्याचा प्रयत्न एका मुसलमानाने करावा, हे त्यांच्या जिव्हारी लागणे अगदी स्वाभाविक आहे. अशा घातक खुनी हल्ल्यांमागे राजकीय हेतू असो किंवा धर्माधता असो, असले कृत्य म्हणजे सार्वजनिक आणि नागरी जीवनाला लागलेला कलंक म्हटला पाहिजे आणि म्हणून त्याचा तीव्र निषेध केला पाहिजे.’’

याची एक प्रत बॅ. जिना यांच्याकडेही पाठवून देण्यात आली होती. त्यास जिनांनी १ ऑगस्ट १९४३ रोजी पाठविलेल्या उत्तरात आपल्यावरील खुनी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल सावरकरांचे आभार मानले होते.

जिनांवरील हल्ल्याचा निषेध करण्याचे व ‘असे हल्ले सार्वजनिक जीवनावरील कलंक होत’ असे पत्रक काढण्याचे सावरकरांवर कोणतेही कायदेशीर बंधन नव्हते. असा निषेध करून ते राजकीय जीवनात नैतिकतेची उच्च परंपराच पाळीत होते व पुढचा पायंडा पाडीत होते. गांधी व जिना हे त्यांचे कट्टर राजकीय व वैचारिक विरोधक होते व अशा लोकप्रिय विरोधी नेत्यांचा काटा काढण्याची सावरकरांची नीती वा प्रवृत्ती असती, तर ते आयतेच व परस्परच उपोषणाने वा खुनी हल्ल्याने मरणार होते; तर त्यांना चांगलेच वाटायला पाहिजे होते. वरील सर्व पत्रे-परिपत्रके न्यायालयासमोर आलेली होती. सावरकरांच्या सर्व विचारांवर टोकापर्यंत जाऊन प्रखर टीका करणाऱ्या डॉ. य. दि. फडके यांनी या पुराव्यांवर पुढीलप्रमाणे अभिप्राय व्यक्त केला आहे : ‘गांधीजींचा खून होण्यापूर्वी चार वर्षांआधी काढलेली ही सर्व पत्रके म्हणजे सावरकर राजकीय रंगभूमीवर करत असलेल्या नाटकाचा भाग होती, असे मानणे बरोबर ठरणार नाही.’