नीलिमा बोरवणकर

प्राचीन भारतीय साहित्यावर भक्तिमार्गाची, विविध पंथांमधील भक्तिसाहित्याची ठसठशीत मुद्रा उमटली आहे. मोक्ष, मुक्ती, परमेश्वराच्या भेटीची ओढ आणि त्यासाठी संसाराचा त्याग करून परमेश्वराच्या शोधार्थ बाहेर पडणे, त्यात येणाऱ्या अडचणी हे सर्व थोडय़ाफार फरकाने सर्व पंथांमध्ये समान विशेष आढळतात.

‘लल्ला’ अथवा ‘लल्लेश्वरी’ या काश्मिरी शैव पंथातल्या संत कवयित्रीच्या आयुष्यावर आधारित संध्या सप्रे लिखित ही कादंबरी. लेखिका स्वत: कीर्तन-प्रवचन करते. त्यासाठी भारतातील संतचरित्रांचा अभ्यास करताना लल्लेश्वरीबद्दलचा एक लेख त्यांच्या वाचनात आला. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी लल्लेश्वरीने घरादाराचा त्याग केला आणि ती ज्ञानाच्या शोधात बाहेर पडली. तिचा जन्म इ. स. १३०१ ते १३२० च्या दरम्यान झाला असावा असं मानलं जातं. १३ व्या शतकात एका तरुण स्त्रीनं संसाराचा त्याग करून वनवास पत्करणं ही निश्चितच धाडसाची बाब! तिच्याबद्दलच्या या माहितीनं लेखिकेचं कुतूहल जागं झालं आणि मनात कादंबरीचं बीज पडलं.

इंग्रजी साहित्याचे समीक्षक रणजित होस्कोटे यांच्या ‘लल्ला दे’ या पुस्तकातले संदर्भ आधारासाठी घेऊन संध्या सप्रे यांनी ही कादंबरी लिहिली आहे. लल्लेश्वरीच्या रचनांचा इंग्रजी अनुवादसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे.

लल्लेश्वरीचा अगदी बालवयापासून भक्तिमार्गाकडे ओढा होता. तिच्या वडिलांनी तिला शाळेत दाखल केलं होतं. बाराव्या वर्षी तिचं लग्न करून देण्यात आलं. सासरी तिचा अनन्वित छळ होतो. तब्बल सोळा वर्ष ती छळ सहन करते आणि एक दिवस घर सोडते. माहेरी शैव परंपरेचे संस्कार असतात. त्यातून शिवभक्तीची असोशी निर्माण झालेली असते. घर सोडल्यावर गुरूच्या, ज्ञानाच्या शोधात फिरत असताना योगायोगानं ती गुरू सिद्ध श्रीकंठ या तिच्या पूर्वीच्या गुरूंच्या आश्रमात येऊन पोचते. तो आश्रम फक्त मुलांसाठी असूनही गुरुजी तिला दाखल करून घेतात. तिला पूर्वायुष्यातल्या घटनांविषयी विचारतात. ती सासरच्या छळाबद्दल चकार शब्दानं बोलत नाही. ते म्हणतात, ‘‘मी तुला पूर्वायुष्याबद्दल पुन:पुन्हा विचारत राहिलो नि तू त्या प्रश्नालाच मागे टाकून दिलंस की! मी परीक्षा घेतली तुझी. प्रत्येकाला आपला भूतकाळ प्रिय असतो, दु:खाचे डोंगर सोसले असतील तर त्याविषयी बोलायला आवडतं. मला कळलं होतं तुझ्याबद्दल, म्हणून तुझी परीक्षा बघत होतो. तू त्या दलदलीतून बाहेर पडलीस.’’

गुरू तिला त्यांच्याजवळचं ज्ञान तर देतातच; शिवाय स्वत: उन्नत कसं व्हायचं, त्याचा मार्गही दाखवतात. तिचा शोध घेत तिचा नवरा दोनदा आश्रमात येऊन जातो, पण ही त्याच्याबरोबर जायचं नाकारते. गुरूसुद्धा तिच्या मनाविरुद्ध तिला नवऱ्याकडे पाठवत नाहीत. ज्ञानग्रहण होईपर्यंत ती तिथे थांबते. पण नंतर पुढे निघून जाते. स्थर्य आलं की प्रगती संपते, म्हणून ती कुणाच्याही घरात आणि कुठेही दोन दिवसांपेक्षा जास्त मुक्काम करत नाही. येणाऱ्या अडचणींना तोंड देत प्रवास करत राहते. खाली जमीन, वर आकाश अशा परिस्थितीत मार्गक्रमणा करत राहते. वाटेत एखाद्या गावात लोकांना संबोधित करते, स्वत:च्या रचनांनी उदाहरणं देत प्रवचनं देते. वाटेत काही खायला मिळालं तर खायचं, नाही तर चालत राहायचं.

असंच फिरता फिरता एकदा तिला वाटेत एक धर्मशाळा लागते. तिथे मोठी सभा आहे, अनेक विद्वान धर्मशास्त्रावर आपले विचार मांडणार आहेत असं कळल्यानं ती ते ऐकायला तिथे थांबते. आधी एका गावात तिचं प्रवचन ऐकणारा एक माणूस तिथे हिला बघतो आणि आयोजकांना- ‘हिलाही तिचे विचार मांडू द्या’ अशी विनंती करतो. एक बाई प्रवचन देणार, या विषयावरून वाद सुरू होतो. तो आवाज ऐकून तिथले मुख्य गुरुजी बाहेर येतात. ते गुरुजी म्हणजे सद्गुरू सिद्ध श्रीकंठ गुरुजींच्या आश्रमात लल्लेश्वरीचा गुरुबंधू सत्यजित असतो. मग त्याच्या विनंतीवरून लल्लेश्वरी या धर्मशाळेत विचार मांडते. सत्यजित तिला स्वत:च्या घरी राहण्याविषयी खूप आग्रह करतो, पण ती निग्रहानं निघते. कुठल्याही मोहात, मायेत न गुंतण्याचं तिचं व्रत ती सुरू ठेवते.

पुढच्या प्रवासात तिच्या सासरच्या घराशेजारच्या, तिच्यावर मुलीसारखी माया करणाऱ्या उमामावशी, त्यांचा मुलगा-सून भेटतात. तेही तिला थांबण्याचा आग्रह करतात, पण ती थांबत नाही. चालत राहते रानावनात वर्षांनुवर्ष आणि अखेर देह ठेवते. देह फक्त संपला, पण ती तर अजूनही आहे. काश्मीरच्या लोकमानसात, मनामनांत तिचं काव्य एकेका पिढीगणिक उतरत राहिलं.

कादंबरी संपते, पण वाचकाच्या मनातली उत्सुकता संपत नाही. लल्लेश्वरीच्या रचनांचा अनुवाद पुस्तकात वाचायला मिळतो, परंतु तिचं व्यक्तिमत्त्व उभं राहत नाही. १३ व्या शतकात काश्मीरमध्ये सामाजिक, धार्मिक वातावरण कसं होतं? त्या काळात काश्मिरात मुस्लीम होते का? हिला फक्त िहदू आपलं मानत, की हिची शिकवण धर्मापलीकडे होती? यातल्या कशाचीही उत्तरं मिळत नाहीत. लल्लेश्वरीची फार कमी माहिती उपलब्ध आहे असं मनोगतात म्हटलंय, परंतु १३ व्या शतकातल्या काश्मीरचीही इथे माहिती मिळत नाही. वर्णनावरून हे कथानक महाराष्ट्र, बंगाल, ओरिसा कुठेही घडू शकतं असं वाटतं. फक्त ‘सफरचंदाच्या बागा’ एवढय़ा उल्लेखामुळे ते काश्मीर असेल असं वाचकांनी ओळखून घ्यायचं! तसंच तो काळ कुठे उभाच राहत नाही. कपाट, भंगार, ग्लासभर दूध आदी शब्द टाळता आले असते. एका वेगळय़ा विषयावरची ही कादंबरी अधिक अभ्यासपूर्ण असायला हवी होती.

 ‘लल्ला’ – संध्या सप्रे,

लोकवाङ्मय गृह प्रकाशन,

पृष्ठे- १७५, मूल्य- २०० रुपये.