04 March 2021

News Flash

कृषिसंस्कृतीच्या वर्तमानाचे मूल्यभान

या संग्रहात एकूण १८ ललितलेख असून त्यांचे स्वरूप व्यक्तिचित्रणाचे आहे.

 ‘पडझड वाऱ्याच्या भिंती’- श्रीकांत देशमुख,

श्रीकांत देशमुख हे मराठी साहित्यविश्वाला कवी म्हणून परिचित आहेत. ‘बळीवंत’, ‘आषाढमाती’, ‘बोलावे ते आम्ही’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ’, ‘कुळवाडी भूषण शिवराय’ हे वैचारिक ग्रंथलेखन तसेच काही ग्रंथांची संपादनेही त्यांनी केली आहेत. ‘पडझड वाऱ्याच्या भिंती’ हा त्यांचा पहिलाच ललितगद्याचा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी आठवणी, तसेच अनुभवांतून जीवनाच्या वाटचालीचे सिंहावलोकन केलेले आहे. हे सिंहावलोकन ‘स्व’च्या घडणीतील व्यक्ती, समूहमानस आणि निसर्ग यांचे स्थान अधोरेखित करते. बालपणापासूनच्या जडणघडणीचा कालपट यात आहे. कृषिसंस्कृतीतील श्रमांनी आपला अवघा अवकाश व्यापलेला आहे याची स्पष्ट जाणीव या लेखनात दिसते.

या संग्रहात एकूण १८ ललितलेख असून त्यांचे स्वरूप व्यक्तिचित्रणाचे आहे. सहवासातील व्यक्तींचा समूहपट या लेखनात उलगडला आहे. या व्यक्तिरेखा कृषिसमूहातील आहेत. कुणबीकीत श्रमांना प्रतिष्ठा आहे. त्यामुळे श्रमसंस्कृतीने आकारलेले मूल्यभान यामध्ये आहे. त्यातही प्रामुख्याने श्रमांतील अधिकचा वाटा स्त्रियांचा आहे. त्यामुळे श्रमणाऱ्यांच्या संवेदनस्वभावाचे वेगवेगळे पलू या पुस्तकात आले आहेत. शेतीशी संबंधित कष्टांच्या धबडग्याचे, सर्वाना सोबत जोडण्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचे, घरीदारी होणाऱ्या कुतरओढीचे, दमणुकीचे हे जग आहे. सगळे सोसूनही आतली करुणा शाबूत ठेवणाऱ्या या व्यक्तिरेखा वाचकांच्या भावविश्वात सहजगत्या प्रवेश करतात.

लेखनविषय झालेल्या व्यक्तिरेखा नातेसंबंधांतील ममत्वाच्या ओढीने जोडलेल्या असल्यामुळे यात एक आस्थेने आलेली ओलखेच आहे. प्राप्त परिस्थितीशी चिवटपणे दिलेला संघर्ष आणि सहनशीलतेच्या आधाराने वाटय़ाला आलेली सगळी दुखे सोसण्याचा सोशीकपणा या रेखाटनांतून व्यक्त होतो. त्याने खेडय़ातील व्यक्तिदर्शनाचा फलक विस्तृत केला आहे. यातील ‘पहाटपाळणा’ हा लेख म्हणजे आईच्या कष्टांची जवळून पाहिलेली गोष्ट आहे. त्यातून स्वतच्या वाढीचे आणि आईच्या राबणुकीचे संदर्भ येत राहतात. श्रमांतून कृषिसंस्कृतीचे आकारणे आणि त्यातूनच समूहभाव व सहानुभाव येणे, हे त्यातून अधोरेखित केले आहे. परिसर, निसर्ग, समूहमानस यांतून चितारलेलं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व या साऱ्यातून वाचकांसमोर येते. ‘बापू’ हा एक महत्त्वाचा शोध आहे. जगण्याचे विविधांगी अनुभव गाठीशी असणारे बापू त्यात रेखाटले आहेत. ‘मामाचा गाव’ या लेखात लहानपणातील मामाच्या गावाविषयीची आठवरूपे आहेत. बालमनाला जाणवणारे कोमल जग आणि त्यातले वास्तवाचे पदर हे गहिरेपणाने या लेखात येतात. व्यक्तींच्या अनुभवविश्वातील भू-परिमाणे चित्रित केल्यामुळे परिसर आणि व्यक्तिरेखा दोन्ही जिवंत होतात. हे एकूणच कृषिसंस्कृतीच्या पडझडीच्या कालपरिमाणाचे वाचन ठरते.

कृषिसमूहातील स्त्रियांचे जग हा या संग्रहातील महत्त्वाचा पलू आहे. स्त्रियांच्या अलक्षित दुखाचे विश्व यात सौहार्दतेने आले आहे. समाजरहाटीची वहिवाट या विश्वाला टोकदारपणे भेगाळते आहे. स्त्रियांच्या भावविश्वाची, विशेषत: भरल्या घरातील हा दुखावेगाचा कोपरा यात उजागर केला आहे. सरंजामी मूल्यभानाचे हे अंधारे कोनाडे, स्त्रियांच्या तृष्णार्ततेची भयव्याकूळ दुखरी बाजू यातून प्रकाशमान केली गेली आहे. सरंजामी बडेजावी मूल्यव्यवस्था कुणाला तरी अंधाऱ्या कोनाडय़ात चिणून डामडौल मिरवते आहे. कुणीतरी असे चिणून घेतल्याशिवाय हे मोठेपणाचे जग उभारलेच जात नाही. अशा स्त्रियांच्या दुखभरल्या कहाण्या या संग्रहात आहेत.

‘वागाची मावशी’ या लेखात एका बालविधवेच्या आयुष्याची परवड आहे. इतरांचे फळलेले-फुललेले संसार पाहत स्वतला आणि इतरांना कोसत आपले जगणे रेटत राहणे.. आणि हे रेटणे आणि सहनशीलता यामध्ये दुखावेगाचा झालेला आत्यंतिक टोकाचा आविष्कार बालसुलभ नजरेतून या लेखातून दाखवलेला आहे. तुळस, बुक्का आणि जपमाळ यांतून स्वतपुरता जपलेला अवकाश. स्वतच्या मनाची, शरीराच्या दमनाची स्वतपुरती करून घेतलेली सुटका, हे तीव्रतर प्रसंगांतून रेखाटले गेले आहे. ‘अंधाराची लेक’ या लेखात लोकलाजेस्तव होणारी शहाण्णवकुळी घुसमट नेमकेपणाने आली आहे. रझाकारीच्या काळात कितीतरी अनुल्लेखित भूमिगत इतिहास घडलेले आहेत. बायाबापडय़ांची इज्जत लुटण्याची वर्णने इतिहासाच्या पुस्तकांच्या पानांतून बंदिस्त झाली आहेत. या लुटीची प्रत्यक्ष जगण्यात मोठी सजा भोगत असलेली बहीण आणि भाऊ यांच्या ताटातुटीची कहाणी या लेखसंग्रहात आली आहे. ही कहाणी सांगितली आहे भावाच्या लहान मुलाने. म्हणजे यात निवेदक हा घटना – प्रसंगांचा साक्षीदार आहे. भावा – बहिणीच्या नात्याचे गहिरे पदर उलगडून लोकलाजेस्तव नसर्गिक ओढीवर येणारी बंधने सांगितली गेली आहेत. या ललितबंधाचे महत्त्वाचे करुणाद्र्र पदर हे बालमनाच्या दृष्टिनियंत्रणातून उलगडले आहेत. त्यामुळे यातले दाहक वास्तव संयतपणे उत्सुकता ताणत आकारास येते. बालसुलभ औत्सुक्याची तीव्र-कोमल नजर या निवेदनात अखेपर्यंत राखली गेली आहे.

‘पारबती’ या लेखात पारबतीच्या अपंगत्वाची, शेतशिवारात तिने घेतलेल्या कष्टांची कहाणी येते. ‘नलिनी देवराव’ ही अशीच एका घुसमटीची शोकांतिका वाचकाच्या संवेदनेत कल्लोळ निर्माण करणारी आहे.

कृषिसंस्कृतीच्या जडणघडणीचा स्थायीभाव हा भोवतालाशी नाते निर्माण होण्यात असतो. ‘पडझड वाऱ्याच्या िभती’ हा दीर्घलेख सृष्टीच्या आदिम वाटचालीचे वर्तमानदृश्य दाखवतो. चराचरसृष्टीची वहिवाट-रीत कशी सुरू राहिली असेल याचा काहीएक अंदाज भोवताल तपासण्यातून घेतला आहे. उत्पत्ती, विकास आणि लय हा सजीवसृष्टीचा रीतिबदू समकाळात कसा दिसतो याचा लालित्यपूर्ण शोध यात घेतलेला आहे. त्यात सुगरणीच्या, चिमण्यांच्या चिवचिवाटाचे वर्णन अतिशय प्रासादिकतेने आले आहे. घर – शिवाराचा वाढविस्तार, गावातील बदलांचा शिरकाव, दारिद्रय़ाच्या खडकातील प्रस्तर, तेथील जातवास्तव अशा अनेक परीने मानवी जगण्यातील पडझडीचे चिवट धागे निर्ममतेने इथे शोधले आहेत. पडझड भिंती या वाऱ्याच्या आहेत. कालबिंदू स्थिर नाही. पडझड प्रवाही राहणार आहे. काळानुरूप नवे आकाराला येणार आहे. सृष्टीच्या सृजनशीलतेचे सूचन यामध्ये आहे. गावगाडा, कृषिसंस्कृतीचे आदिम प्रवाहीपणच यातून दिग्दíशत झाल्याचे दिसून येते.

लहानपणीच्या आठवणींचा गोफ या सर्वच लेखांतून आढळतो. प्रौढ वयात त्या आठवणींचा अन्वयार्थ या ललितबंधांतून शोधला गेला आहे. मात्र, कथनाचे दृष्टिनियंत्रणक्षेत्र हे बालमनाचे ठेवल्यामुळे आठवणीतील घटनांचा कालपट निरागसतेने, बालसुलभ ओढ-उत्सुकतेने येतो. सहवासातील व्यक्तींचे, घटनांचे पदर उलगडले जातात. मग यातल्या स्त्रियांच्या व्यथा – कथांचे काळसंदर्भ करुणाद्र्र नजरेच्या आर्ततेने यात येतात. बालमनातील आठवरूपातील कथांचे हे जणू प्रगल्भ प्रौढपणीचे वाचन आहे. त्यामुळे निरागस मनातील ओरखडय़ांचा प्रौढपणापर्यंतचा हा एक प्रवास आहे. लहानसहान तपशिलांतून कृषक समाजाच्या आठवांचे थक्क करणारे जग त्यातून उभे राहते. ललितगद्याच्या रूपविस्ताराचा दीर्घ आविष्कार या लेखनातून झाला आहे. बालसुलभ आठवकोपऱ्यांत साठवलेल्या व्यक्तींची ही स्मरणचित्रे आहेत.

मराठीमध्ये एककेंद्री अनुभवविश्व लिरिकल पद्धतीने फुलवत नेणारे विपुल लेखन झालेले आहे. परंतु ‘स्व’बरोबरच्या जाणीवविश्वातील व्यक्तींची भू-सांस्कृतिक परिमाणे परिपूर्णतेने शोधणारे, आपल्या विस्तृततेने ललितगद्य लेखनाच्या दिशा विस्तारणारे, नव्या शक्यता शोधणारे ललितलेखन मात्र अपवादानेच झाले आहे. श्रीकांत देशमुख ग्रामीण संवेदनशीलतेने कृषिसंस्कृतीचा शोध घेणारे लेखक आहेत. गावगाडा, निसर्ग, शेती, पशुपक्षी यांच्यातून आकारणारी आदिम ग्रामसंस्कृती आणि त्यासंबंधाने वर्तमानात पडणाऱ्या गढी, ढासळणारे बुरूज, मरणाचे काळसंदर्भ, उजाड बनलेला निसर्ग यातून कृषिसंस्कृतीच्या वर्तमानाचे मूल्यभान ते दाखवतात. ललितलेखनातील प्रसरणशीलता, लवचीकता आणि सर्वसमावेशकता यांचा पुरेपूर वापर करत माणूस आणि त्याचा भोवताल लेखकाने तपासला आहे. रूपाकाराच्या खुलेपणाचा आविष्कार यात दिसून येतो. व्यक्तिजीवनाचे तळकोपरे त्यातून उजागर होतात. लघुनिबंधातून आलेल्या मराठी ललितगद्याला आशयगर्भ विस्तारवाढीचे तसे वावडेच आहे. मात्र, ही उणीव या लेखनाने काही अंशी भरून काढली आहे.

 ‘पडझड वाऱ्याच्या भिंती’- श्रीकांत देशमुख,

 ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे- ३३०, मूल्य- ३५० रुपये.

डॉ. दत्ता घोलप dpgholap@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 4:37 am

Web Title: book review padzad varyachya bhinti by shrikant deshmukh
Next Stories
1 पुण्याच्या इतिहासाचा चिकित्सक वेध
2 चिरंतन प्रेमाचे यथार्थ चित्रण
3 वाचकदृष्टीला आवाहक कविता
Just Now!
X