रशियातील सेंट पीटर्सबर्ग या शहराचा साधा उपमहापौर असलेल्या व्लादिमीर पुतिन यांची त्यांचे पूर्वसुरी बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या पंतप्रधानपदी केलेली नियुक्ती रशियनांनाच नाही, तर सबंध जगालाच धक्का देणारी होती..

ही गोष्ट फक्त तातियाना आणि दूरचित्रवाणी कंपनीचे काही तंत्रज्ञ यांनाच माहिती होती. साऱ्या जगाला ती समजण्यासाठी आणखी १२ तासांचा अवधी होता. या काळात तिला बरीच कामं उरकायची होती. वडिलांकडनं फार काही मदतीची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नव्हता. फार थकले होते ते. आणि त्यात हे व्यसन. इतका धडाक्यानं भाषणं देणारा हा माणूस. दारूच्या व्यसनानं चार शब्द बोलणं त्यांना शक्य होईना. नंतर नंतर तर त्यांचं भानच जायला लागलं. आपण कोण आहोत, काय करतोय, कसं वागायला हवं.. काही काही कळेनासं झालं त्यांना.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

तातियानानं खूप सांगून बघितलं. पटायचं त्यांना- ती काय म्हणते ते. पण मद्याचा मोह काही आवरायचा नाही. तिला आठवलं, बिल क्लिंटन तर एकदा म्हणाले होते, ‘‘तुझ्या वडलांशी बोलायचं तर मी अगदी भल्या पहाटे पहाटेच फोन करतो. न जाणो, नंतर ते शुद्धीवर असतील-नसतील.’’

अशी बदनामी झालेली त्यांची. तिला वाईट वाटायचं. पण करणार काय? आणि कोण? आता तर जनमतसुद्धा त्यांच्या विरोधात जाऊ लागलेलं. एकेकाळी या जनांना आधार वाटायचा तिच्या वडिलांचा. देशातली अर्थव्यवस्था त्यांनीच तर बघता बघता सावरलेली. त्यांच्याच तर काळात गावा-गावात, नाक्या-नाक्यांवर िहडत वेळ काढणारे रिकामटेकडय़ा तरुणांचे घोळके कमी झालेले. भकास आयुष्य जगणाऱ्या गरीबांच्या आवाक्यात मध्यमवर्गीयपण आलं. मध्यमवर्गीयांना आपण श्रीमंत होऊ शकतो याची जाणीव झाली. आणि श्रीमंत.. खऱ्या आनंदाच्या उकळ्या तर त्यांना फुटत होत्या. इतक्या वर्षांचं कम्युनिझमचं जोखड तिच्याच वडलांनी तर फेकून दिलं. ज्या देशात श्रीमंतीचं स्वप्न पाहणं हे अधिकृत पाप होतं, त्या देशात तातियानाच्या वडलांमुळे श्रीमंती सरकारसुलभ झाली. आधी सरकारला, ते चालवणाऱ्यांना पैसे द्यावेच लागायचे. पण त्या बदल्यात काही मिळायचं नाही. आता तसं नव्हतं. सरकार चालवणाऱ्यांना पैसे दिले की कंपन्यांची कामं व्हायची. अडलेले परवाने, विस्ताराची अनुमती मिळायची आणि मग अधिक नफा कमवता यायचा. कम्युनिझमच्या काळातला जाचक नियंत्रणांचा लंबक आता एकदम दुसऱ्या दिशेला गेला होता. सगळ्यांना हे कळत होतं.

कोणतीही व्यवस्था ही अशी या टोकापासून त्या टोकापर्यंत हिंदकळायला लागली की आपलं  निरोगीपण घालवून बसते. तसंच होऊ लागलं होतं. सुरुवातीला हा मुक्तीचा आनंद सर्वानीच साजरा केला. पण मुक्तपणा अनियंत्रित असला तर त्यातून होणारा फायदा हा मूठभरांच्याच पदरात जातो. कारण ते व्यवस्थेत इतरांपेक्षा आघाडीवर असतात. सगळा फायदा स्वत:च ओरबाडायला लागतात. मग ते इतरांना पुढे जाऊ देत नाहीत. अशा परिस्थितीत व्यवस्थेवर हात मारणाऱ्यांच्या टोळ्या तयार होतात. त्या टोळीचे म्होरके सत्ताधीशांनाही त्यात सामील करून घेतात. या सत्ताधीशांतच तर प्राण असतो टोळ्यांचा.

हे असं झालं, की बघता बघता व्यवस्था कोलमडायला लागते आणि सत्ताधारी जनतेला नकोसा होऊ लागतो.

तातियानाला जाणवत होतं- आपले वडील आता जनक्षोभाचे धनी झालेत. लोकांना ते नकोसे होतायत. तिनं वडिलांनाही तसं सांगितलं. आश्चर्य हे, की वडलांना त्याचा पूर्ण अंदाज होता. किंबहुना, आपण पदत्याग करायचा, हे त्यांनी मनोमन ठरवलेलंदेखील होतं. तसा निर्धारही त्यांचा होऊ लागला होता. तसं ते करत मात्र नव्हते. कारण त्यांना पर्याय हवा होता. सुरक्षित पर्याय. सुरक्षित म्हणजे सत्ता सोडल्यावर सुरक्षित राहू देईल, सूड उगवणार नाही असा पर्याय. सत्ता गेली की आपल्या देशात काय होतं, हे त्यांना माहीत होतं.

अखेर असा पर्याय त्यांना आढळला. त्यांच्या काही उद्योगपती मित्रांनीच तो समोर आणला. उपमहापौर. सेंट पीटर्सबर्गचा उपमहापौर. हा तसा साधा होता. फारसा काही माहीत नव्हता कोणाला. त्याला तातियानाच्या वडिलांनी थेट उपपंतप्रधानपदीच नेमलं. खात्री करून घेतली त्याच्या निरुपद्रवीपणाची.

आणि अखेर तो दिवस आला.

३१ डिसेंबर १९९९. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला हे सहस्रक संपून जग २१ व्या शतकात प्रवेश करणार. प्रथेप्रमाणे त्या दिवशी देशप्रमुख राष्ट्राला उद्देशून भाषण करतो. पण ते होणार नव्हतं. त्याऐवजी दुपारी तातियानानं रेकॉर्ड केलेली अध्यक्षांच्या भाषणाची फीत दूरचित्रवाणीवर झळकली.

अध्यक्ष बोरिस निकोलायेविच येल्त्सिन यांनी घोषणा केली.. ‘‘मी पदत्याग करतोय आणि माझा उत्तराधिकारी नेमतोय- व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन.’’

जग म्हणालं, रशियात सत्तांतर झालं. पुतिन पंतप्रधान बनले.

त्यानंतर काही दिवसांनी क्लिंटन या निर्णयावर येल्त्सिन यांना म्हणाले : ‘‘बोरिस.. तुझा हा निर्णय काही फार शहाणपणाचा नाही म्हणता येणार.’’

पुढे जगदेखील असंच म्हणणार होतं.

का?

त्याचीच ही कहाणी. उत्कंठावर्धक आणि नाटय़मय. गूढ. हिंस्र. प्रसंगी रक्तबंबाळ करणारी. एका बलाढय़ महासत्तेचा उदयास्त टिपणारी..