20 January 2018

News Flash

मध्य सरकतो आहे..

गेल्या १२ महिन्यांतला तिसरा धक्कादायक निवडणूक निकाल गेल्या आठवडय़ात लागला.

गिरीश कुबेर | Updated: June 18, 2017 2:31 AM

ब्रिटन आणि अमेरिकेत गेल्या १२ महिन्यांत झालेल्या तीन निवडणुकांत धक्कादायक निकाल लागले आहेत. अति वाईट आणि अति अति वाईट अशा दोन पर्यायांतून दुसरा पर्याय तिथल्या नागरिकांनी निवडला आहे. स्वत:च्या पावलापुरतंच पाहण्याची प्रवृत्ती जगभर फोफावते आहे, याचंच हे द्योतक. ब्रेग्झिट, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची निवडणूक आणि आता ब्रिटनमधील संसदीय निवडणुका यांतून काळाचे चक्र उलटं फिरताना दिसून येत आहे. मध्य सरकल्याचंच हे लक्षण!

गेल्या १२ महिन्यांतला तिसरा धक्कादायक निवडणूक निकाल गेल्या आठवडय़ात लागला. ब्रिटनमधल्या मध्यावधी निवडणुकांत विद्यमान पंतप्रधान थेरेसा मे कशाबशा जिंकल्या. त्यांचे जिंकणे हा धक्का नाही, तर त्यांच्या विरोधकांचे वाढलेले मताधिक्य हा धक्का आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात २३ जूनला युरोपीय समुदायातून बाहेर पडायचे की राहायचे, या मुद्दय़ावर ब्रिटिश नागरिकांनी मतदान केले. त्या निकालाने पहिला धक्का दिला. दुसरा धक्का त्याच वर्षी ८ नोव्हेंबरला अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीने दिला. डोनाल्ड ट्रम्प त्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर ही गेल्या आठवडय़ातील ब्रिटनची मध्यावधी निवडणूक. यातील दोन निवडणुकांत राज्यकर्ते निवडायचे होते, तर एकात.. ब्रेग्झिटमध्ये.. युरोपीय संघात राहावयाचे की नाही, याचा निर्णय ब्रिटिश नागरिकांना करावयाचा होता.

तीनही निवडणुकांत धक्का वगळता आणखी दोन साम्यं आहेत.

पहिले म्हणजे या तीनही निवडणुकांत स्थलांतरित हा महत्त्वाचा मुद्दा होता. बाहेरच्या देशांतून येणारे स्थलांतरित आपल्या पोटावर पाय आणत आहेत, ही खरी/ खोटी भीती हा या निवडणुकांतील महत्त्वाचा प्रचारमुद्दा होता. या तीनही निवडणुकांत मतदारांनी ही भीती खरी मानली. मतदान त्यानुसार झाले.

दुसरे साम्य म्हणजे ब्रिटिश आणि अमेरिकी जनतेसमोर असलेले पर्याय. अति वाईट आणि अति अति वाईट या दोनांतून मतदारांना आपले संभाव्य राज्यकर्ते निवडायचे होते. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यात लढत होती. प्राप्त परिस्थितीत क्लिंटन या उत्तम पर्याय निश्चितच नव्हत्या. त्यांचे प्रस्थापित असणे, माजी अध्यक्षाची पत्नी या नात्याने त्यांनी मिळवलेले व्यवस्थेचे फायदे आदी मुद्दे नागरिकांच्या डोळ्यावर येणारे होते. शिवाय नाही म्हटले तरी त्यांचे उच्चवर्णीय असणे हादेखील एक मुद्दा होताच. तेव्हा नागरिकांनी पूर्णपणे अनभिज्ञ, प्रस्थापितच; पण अमेरिकी सत्तावर्तुळाच्या बाहेरच्या ट्रम्प यांना संधी दिली. इतर सर्वाना पारखून झालेल्या दिल्लीतील नागरिकांनी केवळ वेगळी चव हवी म्हणून २०१४ च्या निवडणुकांत आम आदमी पक्षाला जशी संधी देऊन पाहिली तसेच अमेरिकेत झाले. ट्रम्प निवडून आले. मतदारांनी अति वाईटाच्या तुलनेत अति अति वाईट पर्याय निवडला.

त्या तुलनेत गेल्या आठवडय़ातल्या निवडणुकांत ब्रिटनमधल्या नागरिकांची तर कींव यावी अशी परिस्थिती. त्यांना यावेळी निवड करावयाची होती- अत्यंत मचुळ वक्तव्ये आणि कृती यांच्यात काहीही ताळमेळ नसलेल्या हुजूर पक्षाच्या थेरेसा मे आणि बरेच काही करू पाहणारे मजूर पक्षाचे जेरेमी कोर्बिन यांच्यात. थेरेसा मे या हुजूर पक्षाच्या. उद्योगस्नेही धोरणे हे या पक्षाचे वैशिष्टय़. याच पक्षाच्या एकेकाळच्या नेत्या मार्गारेट थॅचर यांनी जगाला नवी दिशा दिलेली. थॅचरबाईंचा मोठेपणा असा, की त्यावेळी आर्थिक उदारमतवादाच्या मुद्दय़ावर का-कू करणाऱ्या अमेरिकेला त्यांनी ओढून आपल्याबरोबर आणले. अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन रिपब्लिकन पक्षाचे. ब्रिटनशी साधम्र्य पाहू गेल्यास रेगन हे मजूर पक्षाचे म्हणता येतील. म्हणजे थॅचर या हुजूर पक्षाच्या, तर आंतरराष्ट्रीय अर्थकारणात त्यांना साथ देणारे रेगन हे मजूर पक्षाचे. यातील आजचे साम्य म्हणजे थेरेसा मे या थॅचर यांच्याप्रमाणेच हुजूर पक्षाच्या, तर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन. म्हणजे मजूर पक्षाला जवळचे. आर्थिक आणि धर्म/ सांस्कृतिकदृष्टय़ा मागास असे.

हे साम्य येथेच संपते. त्यावेळी मजूर पक्षाला जवळच्या असलेल्या रिपब्लिकनांच्या रेगन यांना थॅचर यांनी आपल्याबरोबर खेचून आणले. तर यावेळी हुजूर पक्षाच्या असूनही थेरेसा मे या रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्याइतक्याच मागास वागल्या. तरीही जिंकल्या. ज्या ब्रिटनने थॅचर यांच्यासारखी धडाडी अनुभवली, त्याच ब्रिटनने थॅचर यांच्या पक्षाच्या मे यांचे मागासपणही अनुभवले. थॅचर कमालीच्या मुक्त आर्थिक विचारवादी. थेरेसा मे यांची भाषा तीच; पण धोरण वर्तणूक याच्या बरोबर उलटी. वीजबिलांपासून ते अन्य सेवांचे दर सरकारनेच निश्चित करायला हवेत, हे मागास अर्थविचार मे यांचे. हे सरकारने का करायचे? तर- गरीबांच्या हितासाठी!

गरीबांचे नाव पुढे करीत जगातील अनेक नेत्यांनी किती अर्थदुष्ट निर्णय घेतले याचे दाखले  इतके आहेत, की त्यांचे संकलन करायलासुद्धा अनेक खंड लागतील. ही नाटकी, गरीबप्रेमी संहिता झुगारून प्रचंड महत्त्वाचे आर्थिक परिवर्तन करण्याचे श्रेय मार्गारेट थॅचर यांचे. ‘‘एकसंध समाज असे काहीही नसते. या अशा समाज म्हणवून घेणाऱ्याच्या मागे कधीही जायचे नसते. समाजाला आपल्यामागे आणावयाचे असते,’’ असे मार्गारेट थॅचर म्हणत. आज त्यांचाच पक्ष बरोबर उलट करताना दिसतो. मे यांच्याआधीचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी याच कथित समाजाचे मत जाणून घेण्यासाठी ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर जनमत घेण्याचा अजागळ निर्णय घेतला. त्यात त्यांनी स्वत:चे हात आणि नेतृत्व तर पोळून घेतलेच; पण समग्र युरोप आणि परिणामी जगालाही आर्थिक संकटाकडे नेले. आता त्यांच्याच पक्षाच्या मे यांना समाजवादाची उबळ आलेली आहे. गरीबांचे हित, गरीबांचे कल्याण असल्या भंपक आणि सबगोलंकारी शब्दांचा आधार त्या घेताना दिसतात. अशा वेळी याच मुद्दय़ावर मे यांच्याच पक्षाच्या थॅचर यांचे काय मत होते?

‘‘समाजवादी विचारांची अडचण ही आहे, की तुम्ही इतरांच्या पैशावर कायम जगू शकत नाही. तो कधी ना कधी संपतो,’’ हे थॅचर यांचे विधान. याचा अर्थ असा की, सरकारच्या पैशावर जनतेला पोसता येत नाही. जनतेलाच संपत्तीनिर्मितीचे महत्त्व पटवून द्यावे लागते आणि ही संपत्तीनिर्मिती जनतेकडूनच होईल अशी धोरणे आखावी लागतात. ती धोरणे कशी असतात, हे थॅचर यांनी दाखवून दिले. आपल्या एअर इंडियाप्रमाणेच ब्रिटिश एअरवेज ही सरकारी मालकीची होती आणि तितकीच तोटय़ात होती. आपल्या रेल्वेइतकीच ब्रिटिश रेल्वे गाळात गेलेली होती. आणि आपल्याप्रमाणेच ब्रिटिश खाणींतूनही फक्त तोटाच निघत होता. हे सगळे कसे बदलायचे याचा धडा मार्गारेट थॅचर यांनी एका रात्रीत घालून दिला. ब्रिटिश एअरवेज, रेल्वे, खाणी वगैरेंच्या गळ्यातला सरकारी मालकीचा पट्टा त्यांनी काढला आणि आर्थिक निकषांवरच त्यांना उभे केले. या सर्व संस्था लवकरच नफा कमावू लागल्या. ‘‘फक्त लोकप्रिय व्हायचे हेच तुमचे ध्येय असेल तर तुम्ही लोकप्रिय व्हालही; परंतु तुमच्या हातून काहीही साध्य होणार नाही,’’ हे थॅचर यांचे विधान किती द्रष्टे होते ते आपल्या आसपासच्या अनुभवांतून कळून घेता येईल.

या द्रष्टेपणाचा कोणताही अंश मे यांच्या वर्तनात, धोरणांत आणि त्यामुळे निर्णयप्रक्रियेत नाही. जगातल्या अनेक नेत्यांप्रमाणे त्या अर्थव्यवस्थेच्या सरकारीकरणाकडेच निघाल्या आहेत. प्रचंड होणारी चलनवाढ आणि ठप्प झालेली रोजगारनिर्मिती ही त्यांच्या धोरणाची फळे. मग हे वास्तव असे असेल तर त्या पुन्हा निवडून कशा आल्या?

याचे कारण त्यांचे प्रतिस्पर्धी कोर्बिन हे त्यांच्यापेक्षाही वाईट आहेत म्हणून. अर्थव्यवस्थेतील मे यांच्या सरकारी हस्तक्षेपास जनाची नाही तरी त्यांच्या हुजूरपक्षीय इतिहासाची लाज आहे. कोर्बिन यांना तीही नाही. ब्रिटिश अर्थव्यवस्थेचे घडय़ाळ ते पूर्णपणे उलटे फिरवू पाहत होते. इतके, की ब्रिटिश रेल्वे, खाणी आदी उद्योग पुन्हा सरकारने चालवायला घ्यावेत असे त्यांचे मत होते आणि आहे. इतकेच नाही, तर श्रीमंतांवर ते सणसणीत कर वाढवू इच्छितात. ते जिंकले असते तर ही करवाढ दुसऱ्या महायुद्धानंतरची सगळ्यात मोठी करवाढ झाली असती. जास्तीत जास्त कर लादून श्रीमंतांकडून संपत्ती काढून घेणे आणि गरीबांचे भले करणे याच भंपक, फसव्या मार्गाने त्यांना मार्गक्रमणा करावयाची आहे. पण धक्का हा नाही. या मताचे अनेक राजकारणी आहेत. परंतु या निकालातील धोकादायक आणि धक्कादायक बाब म्हणजे अशी मते असूनही त्यांचे वाढलेले मताधिक्य. गत निवडणुकांच्या तुलनेत कोर्बिन यांच्या मजूर पक्षाला या निवडणुकीत कितीतरी अधिक जागा मिळाल्या. अनेक जणांना कोर्बिन यांची मागास धोरणे विश्वासार्ह वाटली, हे धक्कादायक. म्हणजे अमेरिकी नागरिकांना ट्रम्प यांची वाह्य़ात बडबड ही जशी हिलरी क्लिंटन यांच्या चतुर, लबाड मांडणीपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटली, तितका मोठा उल्कापात ब्रिटनमध्ये झाला नाही, हे खरे; परंतु ब्रिटन त्या कडेलोटक्षणाच्या जवळ गेला, हे नक्की. म्हणजेच कोर्बिन यांच्या अति अति वाईट पर्यायापेक्षा मे यांचा अति वाईट हा पर्याय नागरिकांनी निवडला. अमेरिकी नागरिकांचे ते शहाणपणाचे भान सुटले.

परिणामी संपूर्ण अमेरिका आता श्वास रोखून आहे. ही अतिशयोक्ती नाही. परंतु विचारी अमेरिकी नागरिकाची सकाळ धडधडत्या अंत:करणाने सुरू होते. त्याच धडधडत्या हाताने अमेरिकी नागरिक आपला मोबाइल पाहतो किंवा बातम्या लावतो. न जाणो, रात्री दोन-तीनच्या आसपास आपल्या अध्यक्षाने कोणता धोरणात्मक ट्विट केला असेल, याची भीती अमेरिकी नागरिकांना असते. त्या देशातील सरकारी कर्मचारी तर पुढच्या क्षणी काय वाढून ठेवले आहे याच भीतीत आहेत. धोरणेच ट्विट करणारा, परदेशी सरकारप्रमुखांना ट्विटच्याच माध्यमातून खडसावणारा आणि आपल्याच सल्लागारांचे धोरणसल्ले ट्विटच्या थिल्लर मार्गाने फेटाळणारा अध्यक्ष अमेरिकेनेच काय, पण साऱ्या जगानेच पाहिलेला नाही. इतके दिवस सरकार चालवणे- तेही अमेरिकेसारख्या एकमेव महासत्तेचे- हे पोक्त, विचारपूर्वक करावयाचे कार्य मानले जात होते. ट्रम्प यांनी ही संकल्पनाच बदलून टाकली. कमालीची टोकाची मते असलेला अध्यक्ष आणि त्याच्या या अशा मतांवर झुलणारे भक्तगण हे अमेरिकेचे सध्याचे चित्र आहे.

हे झाले अटलांटिकच्या दोन टोकांना असलेल्या दोन देशांचे चित्र. ते प्रातिनिधिक मानता येईल. एकेकाळी दोन-तृतियांशापेक्षा अधिक देशांवर युनियन जॅक फडकवणारी ग्रेट ब्रिटन ही इतिहासातली महासत्ता होती. आणि नंतरच्या वर्तमानात असा झेंडा न फडकवणारी अमेरिका ही महासत्ता आहे. त्या दोन देशांतील ही स्थिती. अन्यत्र नजर टाकल्यास चित्र यापेक्षाही भयाण म्हणता येईल. त्यातल्या त्यात अपवाद हा फ्रान्सचा. अमेरिका, ब्रिटन अशा देशांत जे काही झाले ते पाहिल्यामुळे असेल, पण फ्रेंचांनी मेरील ली पेन यांना निवडणुकीत थारा न देता इमॅन्युएल मॅक्रोन यांना अध्यक्षपदी बसवले. या पेन निवडून आल्या असत्या तर अमेरिकेच्या ट्रम्प यांची फ्रेंच आवृत्ती ठरल्या असत्या. पण ते सुदैवाने टळले. पण या अशा आवृत्त्या अनेक देशांत तयार आहेत. शेजारील ऑस्ट्रियात ऑस्ट्रियन फ्रीडम पार्टी, इटलीत लेगा नॉर्ड, ग्रीक गोल्डन पार्टी, जर्मनीतील नॅशनल डेमॉक्रॅटिक पार्टी अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्वाना समाजवादाचे डोहाळे लागले आहेत. एक वेळ त्याचेही स्वागत करता येईल. पण यांचे आíथक मनसुबे तसे प्रामाणिक समाजवादीही नाहीत. या सर्वाना उद्योगांची मालकी सरकारने आपल्याकडे घ्यावी असे वाटते. जे काही करावयाचे ते सरकारने. हे असे सर्व काही सरकारचरणी अर्पण केले की काय होते याचा रशिया आणि चीन हा धगधगता अनुभव समोर असतानाही ही अशी इच्छा निर्माण होते, हेच मुळात धोकादायक. आणि त्यातही अधिक धोकादायक म्हणजे लोकांना हा विचार पटतो आहे. याचा अर्थ या सगळ्यांना पाठिंबा देणाऱ्या नागरिकांचा आíथक सुधारणांना विरोध आहे. तसा तो झाला, की राजकीय पक्ष गोगलगाईसारखे आकसतात आणि उलटय़ा दिशेला जाऊ लागतात, हा आपलाही अनुभव आहेच. यातूनच एक समज निर्माण झाला आहे. आíथकदृष्टय़ा वेडपटपणात राजकीय शहाणपणा असतो, हा तो समज. वास्तविक आíथक सुधारणांचे फायदे नागरिकांपर्यंत जावेत तितके आणि आवश्यक तितक्या वेगात पोहोचत नसतील तर त्यावर अधिक सुधारणा करणे हा आणि हाच मार्ग असतो. सुधारणांची दिशा बदलणे हा त्यावर उपाय नाही.

पण सध्या परिस्थिती अशी, की सत्ताधाऱ्यांना हे असे काही शहाणपणाचे सांगणारे नाहीत. आणि जेथे आहेत, तेथील राजकारणी कोणालाच जुमानत नाहीत. आपले बहुमत हेच सर्व समस्यांवर उत्तर, असे त्यांना वाटत असते. त्यामुळे ते अर्थव्यवस्थेशी कसेही वागतात. काहीही करतात. असे काहीही करणे म्हणजे वेगळे करणे, आणि प्रत्येक वेगळे काही म्हणजे सकारात्मक बदल असा यांचा समज. हाच प्रकार कमी-अधिक प्रमाणात अनेक देशांत सुरू आहे. एकाच वेळी इतक्यांना अशी अधोगतीची आस लागलेली असणे, हे तसे काळजी वाढवणारेच.

पण अर्थातच ही काळजी विचार करणाऱ्यांना. तोच नसेल करायचा, तर कार्य सिद्धीस नेण्याची हमी देणारा आपला पारंपरिक भक्तिमार्ग आहेच. अर्थात तसे बरेच असते अशी भक्ती असणे. करतासवरता ‘तो’ आहे असे म्हणायचे, ‘त्या’च्यावर जबाबदारी टाकायची आणि आरतीच्या रांगेत आपले प्रसादाला उभे राहायचे. आणि एकदा का अशा गर्दीत घुसले की जाणीवही होत नाही- आपला मध्य सरकतो आहे याची.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on June 18, 2017 2:30 am

Web Title: britain and america election shocking result
 1. P
  Prakash Joshi
  Jun 24, 2017 at 7:37 am
  Strangely you have likened Democrats to Conservatives and Republicans to Labour. This appears strange coming from a person like Mr Girish Kuber. What is the rationale ?
  Reply
  1. D
   Dilip Harne ,Thane
   Jun 23, 2017 at 11:25 am
   आताचा काळ हा अनपेक्षितपणे येऊन उभा ठाकला आहे .पुढील चार ते पाच वर्षात जागतिक स्तरावर प्रचंड उथापालथं होऊ शकते . मोदी आणि संघ यांचं खरं रूप लोकसभेच्या निवडणुकीचे वेळी जनतेसमोर येणार.सद्य परिथितीचे अगदी सूक्ष्म , अभ्यासपुर्ण व सडेतोड विवेचनाबद्द्ल गिरीश सरांना सलाम !!!
   Reply
   1. M
    Mahesh
    Jun 22, 2017 at 10:46 am
    तमाम अमेरिकन्स आणि ब्रिटिश यांनी आपापल्या देशात कोणाला निवडून द्यावे हे सांगण्यापेक्षा अग्रलेख मागे घ्यायला लागणे हे कसलं लक्षण आहे हे आम्हा पामरांना समजावून सांगा.
    Reply
    1. J
     Jayashri
     Jun 20, 2017 at 3:12 pm
     विकिपीडिया सांगतो की "The Republican Party's current ideology is American conservatism, Its platform involves support for free market capitalism, free enterprise, fiscal conservatism, a strong national defense, deregulation, and restrictions on labor unions ". मात्र गिरीश कुबेर सांगतात की "अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन रिपब्लिकन पक्षाचे. ब्रिटनशी साधम्र्य पाहू गेल्यास रेगन हे मजूर पक्षाचे म्हणता येतील". हा फारच मोठा विनोद आहे. ह्यातून श्री कुबेर यांचे राज्यशास्त्राचे ज्ञान फारच तोकडे आहे असा निष्कर्ष निघतो
     Reply
     1. P
      pramod
      Jun 20, 2017 at 8:01 am
      अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन रिपब्लिकन पक्षाचे व डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन. म्हणजे मजूर पक्षाला जवळचे हा सर्वात मोठा विनोद गिरीश कुबेर यांनी केलेला आहे. मतदारांना आपण धर्म व मजुरांसाठी मोठे काहीतरी करणार अशा थापा मारून हे २ निवडून आलेले आहेत.
      Reply
      1. V
       Vinayak
       Jun 19, 2017 at 3:50 pm
       मोदींच्यावर थेट टीका केली तर लोक कसे झोडपतात याचा अनुभव रोजच येत असल्यामुळे कधीकधी "लेकी बोले" पद्धतीने संपादकांची भंपकगिरी चालते. सदर लेख हा त्याच सदारातला!!
       Reply
       1. R
        RJ
        Jun 19, 2017 at 6:41 am
        अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन रिपब्लिकन पक्षाचे. ब्रिटनशी साधम्र्य पाहू गेल्यास रेगन हे मजूर पक्षाचे म्हणता येतील. म्हणजे थॅचर या हुजूर पक्षाच्या, तर आंतरराष्ट्रीय अर्थकारणात त्यांना साथ देणारे रेगन हे मजूर पक्षाचे. यातील आजचे साम्य म्हणजे थेरेसा मे या थॅचर यांच्याप्रमाणेच हुजूर पक्षाच्या, तर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन. म्हणजे मजूर पक्षाला जवळचे....lol
        Reply
        1. R
         Raul
         Jun 19, 2017 at 2:58 am
         This article simply confirms my belief that the author is one of the most overrated journalists... stating that Republican Party politics is similar to that of Labour Party in the U.K. shows nothing but shallowness and political science illiteracy.. Calling 'regulations of electricity prices and other services' , which according to me a sign of developed economy, a backward economy? I have no words left to describe the backwardness of this article..
         Reply
         1. S
          S V Raje
          Jun 18, 2017 at 1:07 pm
          Sir... your observations and comments about todays world politics is simply great..Precise.👌👌
          Reply
          1. D
           dhananjay
           Jun 18, 2017 at 9:35 am
           great
           Reply
           1. Load More Comments