२० जुलै १९६९ रोजी माणसाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्या अभूतपूर्व ऐतिहासिक घटनेला पन्नास वर्षे होत आहेत. पृथ्वीतलावरील मानवी संस्कृतीच्या इतिहासात एका उत्तुंग घटनेची नोंद चांद्रभूमीवरील या आरोहनामुळे झाली. माणसाच्या उच्चतम बुद्धिवैभवाचा हा अद्वितीय आविष्कार होताच; त्याचबरोबर मानवी उत्क्रांतीमधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणूनही ते लक्षणीय पाऊल होते. या अवकाश दिग्विजयाचा रोमांचक प्रवास..

२० जुलै १९६९ या दिवशी माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले आणि पृथ्वीतलावरील मानवी संस्कृतीच्या इतिहासात एका खास घटनेची नोंद झाली. माणसाच्या बुद्धिमत्तेचा हा अद्वितीय पराक्रम तर होताच; त्याचबरोबर उत्क्रांतीचा एक खास टप्पा म्हणूनही ते महत्त्वाचे पाऊल होते. आदिमानव कालखंडापासून माणूस केवळ डोळ्यांनीच खगोल निरीक्षण करत होता. इ. स. १६०० च्या पुढे खगोल निरीक्षणासाठी दुर्बिणीची जोड मिळाली आणि खगोल अभ्यासाचे दुसरे पर्व सुरू झाले. पुढे १८-१९ व्या शतकात विज्ञान युगाचा विकास होऊ लागला. आणि यातूनच औद्योगिक क्रांती झाली. नवनवे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले. आणि माणसाचा वेगळाच प्रवास सुरू झाला. मात्र, २० व्या शतकातील दोन महायुद्धांच्या निमित्ताने विज्ञान-तंत्रज्ञान किंवा त्या अनुषंगाने औद्योगिक विकास हे शाप वाटावेत अशी परिस्थितीदेखील निर्माण झाली.

मात्र, या महायुद्धांनीच माणसाला शांततेचे महत्त्व पटवले आणि पुन्हा मानवी संस्कृतीची वाटचाल सुरू झाली. विशेषत: दुसरे महायुद्ध बऱ्याच अंगांनी इष्टापत्ती ठरले. याचे कारण या काळात दळणवळण, संदेशवहन या क्षेत्रांत झालेले संशोधन आणि विकास! या तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच माणसाला चांद्रभूमीवर जाणे शक्य झाले. एकीकडे खगोल निरीक्षणासाठी अदृश्य म्हणून संबोधल्या जातात अशा यंत्रणा व प्रणाली विकसित होत होत्या, तर दुसऱ्या बाजूला सुदूर संदेशवहन साध्य होत होते. संशोधन आणि विकासाचे म्हणण्यापेक्षा स्पर्धेचे म्हणता येईल असे आणखी एक विषयक्षेत्र होते, ते म्हणजे प्रक्षेपणास्त्रांचे!

प्रक्षेपणास्त्रांचा विषयदेखील खासच आहे. प्रक्षेपणास्त्रांचे मूळ आहे अग्निबाणात! इ. स. पूर्व कालखंडापासून मानवी इतिहासात अग्निबाणसदृश्य साधनांचे उल्लेख आढळतात. अग्निबाण ही अर्थातच लढाईची गरज. बसल्या जागेवरून शत्रूपर्यंत दूरवर प्रभावी मारा करण्यासाठी निर्माण झालेली. साधारण १३ व्या शतकापासून प्रभावी अग्निबाण वापरले गेल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. तथापि १६ व्या शतकापासून अग्निबाणाचा शास्त्रीय अभ्यास सुरू झाल्याचे दिसते. त्यात फ्रान्स, जर्मनी, रशिया या देशांचा समावेश होता.

एका बाजूला अग्निबाणाचा प्रक्षेपणास्त्र म्हणून शास्त्रीय अभ्यास होत होता, तर दुसऱ्या बाजूला याच प्रक्षेपणास्त्रांच्या मदतीने माणूस आकाशाला गवसणी घालू पाहत होता. त्याला कारण होते- न्यूटनने शोधलेले गतीविषयक आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचे नियम. युद्धाची आवश्यकता म्हणून प्रक्षेपणास्त्र विकसित करताना काही वैज्ञानिक अग्निबाण पृथ्वीभोवती फिरता ठेवून जगभरासाठी संदेशवहन साध्य करण्याचे प्रयत्न करीत होते. यासंदर्भात रशियातील वैज्ञानिकांनी उपग्रहाची संकल्पना मांडली होती. मात्र, त्यांचे कार्य अतिशय गुप्तरीतीने चालले होते.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान अतिशय नाटय़मय घडामोडी घडल्या. महायुद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत होती. पराभूत होत चाललेल्या जर्मनीवर दोन दिशांनी अमेरिका आणि रशियाचे आक्रमण होत होते. अखेर जर्मनीतील एल्बे नदीच्या काठी दोन्ही राष्ट्रांचे सैन्य समोरासमोर आले. या दोन्ही देशांनी काबीज केलेल्या जर्मनीतून अद्ययावत प्रकारची अग्निबाण प्रक्षेपणास्त्रे आपापल्या देशांत नेली. याचबरोबर जर्मनीतील शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ यांनाही या राष्ट्रांनी आपल्याकडे नेले आणि मानवी इतिहासाला एक वेगळेच वळण लागले.

मानवतेचे महत्त्व अधोरेखित करणारा मौल्यवान धडा शिकवून अखेर दुसरे महायुद्ध संपले. मात्र, तरीही सगळे जग एक होऊ शकले नाही. जग दोन बलाढय़ राष्ट्रांमध्ये विभागले गेले. अमेरिका आणि रशिया या ताकदवान राष्ट्रांचा जगाच्या पटलावर उदय झाला. याला कारण होते- प्रक्षेपणास्त्र! महायुद्ध थांबल्यानंतर या देशांमध्ये प्रक्षेपणास्त्रांच्या विज्ञान-तंत्रज्ञानात तुल्यबळ ठरण्यासाठी चढाओढ सुरू झाली. आता प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता नसली तरी ही एक प्रकारची युद्धाचीच छाया होती. या जोडीला त्यावेळी आधुनिक संदेशवहनाची साधनेही होतीच. या साधनांद्वारे छुपा प्रचार, धमक्या यांच्या साहाय्याने या दोन्ही राष्ट्रांमधला तणाव वाढतच होता. हेच ते शीतयुद्ध!

या शीतयुद्धादरम्यानच्या कालावधीत- म्हणजे साधारण इ. स. १९५० ते १९६० च्या कालखंडात ‘अवकाश स्पर्धे’चा (स्पेस रेस) जन्म झाला. यात बाजी मारली ती रशियाने. १९५७ साली रशियाने अवकाशात प्रक्षेपित केलेला ‘स्पुट्निक’ नामक उपग्रह पृथ्वीभोवती २१५ ते ९३९ कि. मी. लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करू लागला आणि पुनश्च एकदा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या इतिहासाला नवीन कलाटणी मिळाली. या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांचा अवकाश विज्ञान-तंत्रज्ञान विकासाला पािठबा मिळू लागला होता.

‘स्पुट्निक’ उपग्रहामुळे आंतरखंडीय संदेशवहन आवाक्यात आले. त्याचबरोबर माणसाची पृथ्वीच्या वातावरणाच्या सीमारेषा ओलांडून जाण्याचीही ईष्र्या प्रबळ झाली. अर्थात हे स्वप्न फ्रान्स आणि रशियातील वैज्ञानिकांनी कित्येक दशकांपूर्वीच रंगवले होते. मात्र आता ती कल्पना न राहता तिला मूर्तस्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागली आणि अवकाश स्पर्धेतून चांद्र-स्पर्धेचा जन्म झाला.

चंद्राकडे धाव घेण्याची माणसाची इच्छा तशी नसर्गिकच म्हणावी लागेल. कारण खगोलातील चंद्र हा घटक माणसाच्या अधिक परिचयाचा होता. ‘स्पुट्निक’च्या निमित्ताने चांद्रभूमीवर आरोहन करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान पणाला लागले. अर्थातच या स्पर्धेतही रशिया आणि अमेरिका हे दोघेच होते. दोन्ही देशांमध्ये चंद्रावरील स-मानव आणि मानवरहित अशा मोहिमांसंदर्भात संशोधन चाचण्या होऊ लागल्या. तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अवकाश संशोधन किंवा मागील काही दशकांपासून उदयास आलेले अंतराळप्रवासशास्त्र किंवा अवकाशिकी विषयक्षेत्रांचे संशोधन आणि विकास मुख्यत्वे संरक्षण खात्याच्या अखत्यारित चालत असे. परंतु चांद्र मोहिमेच्या स्पर्धेच्या निमित्ताने आता या संशोधन- विकासाला स्वतंत्र स्थान व महत्त्व मिळू लागले. अमेरिकेत ‘नासा’ची (नॅशनल एरॉनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) स्थापना झाली.

अमेरिकेलाही रशियानंतर पुढच्याच वर्षी ‘एक्सप्लोरर’ उपग्रहाचे भ्रमण साध्य करण्यात यश मिळाले. त्यामुळे तिथेही वैज्ञानिकांनी चंद्रावर स्वारी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. मात्र, पुन्हा एकदा रशियानेच बाजी मारली. १९६१ साली रशियाच्या युरी गागारिन याने पहिले स-मानव अंतराळ भ्रमण पूर्ण केले. १०८ मिनिटांच्या कालावधीत युरीने पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली. अर्थात या यशाआधी रशियाने श्वान तसेच अन्य सजीवांना अवकाशात पाठवून अंतराळ भ्रमणाच्या अनेक चाचण्या पार पाडल्या होत्या. अमेरिकेनेही माकड, उंदीर इत्यादी सजीव अंतराळात भ्रमणासाठी पाठवून माणसाला अंतराळात पाठविण्याबद्दलच्या शक्यता पडताळून पाहिल्या होत्या.

रशियाची ‘स्पुट्निक’ मोहीम आणि नंतर युरी गागारिनचे अंतराळ भ्रमण यामुळे अमेरिकेतील वातावरण बदलले. याच वर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जॉन केनेडी यांची निवड झाली. त्यांनी रशियाच्या वरचढ होण्याच्या उद्देशाने ‘नासा’च्या शास्त्रज्ञांना, आपण थेट चंद्रावर माणूस पाठवून त्याला पुन्हा सुरक्षित परत आणू शकतो का, अशी विचारणा केली. जगात अमेरिकेचा ठसा उमटवण्यासाठी हे कार्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

अर्थातच राष्ट्राध्यक्षांच्या आग्रही भूमिकेमुळे चांद्र मोहिमेला वेग आला. पुढे थेट चंद्रावर जाण्याआधी चांद्रभूमीची विविध निरीक्षणे करणारे, तसेच अवकाशयान किंवा त्या अनुषंगाने नियंत्रक उपकरण कुपी, अंतराळवीरांची कुपी यांच्या चाचण्या करण्यासाठी ‘सव्‍‌र्हेअर’, ‘रेंजर’ आणि ‘जेमिनी’ असे खास अवकाश कार्यक्रम आखले गेले. शिवाय संदेशवहन, अंतराळवीर प्रशिक्षण, चंद्रावरील वैज्ञानिक संशोधन, सुरक्षितता आदींबाबत मोठय़ा जोमाने संशोधन व विकासाची कामे हाती घेण्यात आली. राष्ट्राध्यक्ष केनेडी अमेरिकेच्या नागरिकांना चांद्र मोहिमेचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी झाले. लवकरच केनेडींनी संसदेत, अमेरिका येत्या दशकाच्या आत माणूस चंद्रावर पाठवेल आणि त्याला सुरक्षित परत आणेल, असे आत्मविश्वासपूर्वक निवेदन केले. यानंतर चांद्रस्पर्धेची अधिकृत घोषणाच  झाली.

रशियातील महत्त्वाकांक्षी वैज्ञानिकही त्यांच्या परीने चांद्र मोहिमेच्या बाबतीत प्रगतिपथावर होते. तिथेही चंद्रावर जाण्याच्या इराद्याने अवकाशयान, कुपी तसेच अवजड आणि सुदूर प्रवासासाठी आवश्यक असलेली अग्निबाण यंत्रणा आणि अंतराळवीरांसंदर्भात कार्यक्रम, तसेच परतीच्या प्रवासाची तयारी याबाबत जय्यत तयारीच्या उद्देशाने ‘ल्युना’, ‘व्होस्टोक’ असे अवकाश कार्यक्रम आखले गेले. मात्र, तिथे राष्ट्रकार्यासारखे झोकून योगदान दिले जात नव्हते. तसेच अवकाश मोहीम म्हटलं, की विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने विविध वैज्ञानिक शाखा आणि अभियांत्रिकीची विषयक्षेत्रे यांचा आपापसात समन्वय आवश्यक असतो- जो रशियात नव्हता.

इथेच अमेरिका पुढे गेली. समानव चांद्र मोहिमेसंदर्भात अपोलो कार्यक्रम आखण्यात आला आणि क्रमवारीनुसार मोहिमा केल्या गेल्या. यात प्रारंभीच्या ‘अपोलो’ मोहिमेच्या चाचणीच्या वेळी अवकाशयानाच्या कुपीत विद्युत् बिघाड होऊन आग लागली आणि क्षणार्धात तीन अंतराळवीर भस्मसात झाले. यानंतर ‘अपोलो २’ आणि ‘अपोलो ३’ मोहिमा झाल्याच नाहीत. मग काही मानवरहित, तर काही समानव मोहिमा झाल्या.

चांद्रभूमीवर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग, त्याचा सहकारी बझ ऑल्ड्रिन आणि चंद्राभोवती अवकाशयान फिरते ठेवणारा मायकेल कॉलिन्स सगळ्यांना माहीत आहेत. पण त्याआधीच्या अनेक मोहिमांमुळेच हे यश साध्य झाले होते. ‘अपोलो’ कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘अपोलो ८’ ही समानव चांद्र मोहीम पार पडली होती. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीर चंद्राला वळसा घालून पुन्हा पृथ्वीकडे परतले होते. त्यानंतर ‘अपोलो ९’ मोहीम झाली. ही पृथ्वीभोवतालीच भ्रमण करणारी होती. या मोहिमेच्या माध्यमातून अवकाशयानाशी संबंधित उपकरण नियंत्रक कुपी,अंतराळवीरांची कुपी, चांद्रभूमीवर उतरणारी चांद्रकुपी यांची जोडणी/ विलग होणे, अंतराळवीरांचे कुपीबाहेर येणे (अवकाशीय पदभ्रमण) आणि मुख्य म्हणजे प्रदीर्घ काळासाठी अंतराळवीरांचे शारीरिक आणि मानसिक सामथ्र्य तपासले गेले.

यानंतर ‘अपोलो १०’ ही पुन्हा एकदा समानव चांद्र मोहीम पार पडली. यावेळीसुद्धा तीन अंतराळवीर चंद्राकडे गेले. त्यांनी चंद्राभोवती चार भ्रमणे केली. आत्तापर्यंत विविध वेळा छायाचित्रांच्या माध्यमातून आणि तिथल्या भूमीत अनेक अन्वेषक याने पाठवून अभ्यासलेली जागा प्रत्यक्ष पाहिली गेली. अर्थात ‘प्रत्यक्ष’ म्हणजे केवळ १५ किलोमीटर अंतरावरून! चांद्रभूमीवर उतरण्यासाठी आणि तिथून परत उड्डाण करणाऱ्या कुप्यांची चाचणी घेण्यात आली. ही मोहीम रंगीत तालीम म्हणून ओळखली जाते.

इकडे रशियानेही मानवरहित मोहिमांसाठी कंबर कसली होती. त्यांनी चंद्रावर थेट माणूस पाठवण्याऐवजी यंत्रमानवसदृश प्रणालीचा वापर करत तिथल्या जमिनीवरील मातीचे नमुने घेऊन

येऊ शकतील अशा अवकाश मोहिमेचा विकास केला. त्यांनी अमेरिकेच्या आधीच चंद्राभोवती फेरी पूर्ण करणारे यान सुरक्षितरीत्या पृथ्वीवर आणले. ‘झॉन्ड ५’ म्हणून ओळखली जाणारी ही मोहीम मानवरहित असली तरी सजीव होती. कारण या अवकाशयानाच्या कुपीत कासव तसेच काही कीटक आणि वनस्पती बियांचा समावेश होता. या मोहिमेनंतर कासवांच्या प्रकृतीत कोणताही लक्षणीय फरक झाल्याचे जाणवले नव्हते. त्यामुळेच चांद्रभूमीवर जाऊन माणसाने प्रत्यक्ष आपल्या हाताने तिथली जमीन उकरून मातीचे घटक पृथ्वीवर आणणे वा आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून यंत्रमानवाकरवी चांद्रभूमीचे घटक आणणे महत्त्वाचे ठरणार होते.

‘अपोलो १०’नंतर दोनच महिन्यांनी ‘अपोलो ११’ मोहीम पार पडली. हीच ती माणसाचे पाऊल चांद्रभूमीवर उमटविणारी मोहीम! नासाने ही मोहीम जगजाहीर केली होती, तर रशियाची ‘ल्युना १५’ ही मानवरहित मोहीम गुप्तपणे आखण्यात आली होती. १३ जुलै १९६९ रोजी ‘ल्युना १५’ अवकाशयान चंद्राकडे झेपावले आणि १६ जुलैला ‘अपोलो ११’चे प्रक्षेपण झाले. हा चांद्रस्पर्धेचा कळस होता. २० जुलै रोजी ‘अपोलो ११’मधील अंतराळवीर सुरक्षितरीत्या चांद्रभूमीवर उतरल्याचे संकेत मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्याशी

प्रत्यक्ष बोलले. चंद्रावर अमेरिकेचा झेंडा फडकवण्यात आला. विविध वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले आणि तिथल्या भूमीचे घटक गोळा करण्यात आले. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर तिथून अंतराळवीरांचा परतीचा

प्रवास सुरू झाला. तीन दिवसांनी ‘अपोलो ११’चे अंतराळवीर (ज्यांना आता ‘चांद्रवीर’ हे बिरुद लाभले होते.) सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.

रशियाच्या मोहिमेबाबत असे समजते की, ‘अपोलो ११’चे चांद्रभूमीवर आरोहन होत असताना पृथ्वीकडे जाण्यासाठी उड्डाण केलेले ‘ल्युना १५’ हे रशियाचे अवकाशयान नियंत्रणातील काही दोषांमुळे तिथेच कोसळले.

माणसाच्या चांद्र-आरोहनानंतर मात्र संपूर्ण वातावरण बदलले. अवकाशातील माणसाची ही झेप, त्याचे हे आगळेवेगळे सीमोल्लंघन, त्याचे कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा विजय हा समस्त मानवजातीचा विजय ठरला होता. या चांद्रमोहिमेने माणसाचे महत्त्व अधोरेखित झाले होते आणि नगण्यत्वही! आता माणसाला सूर्यमाला आणि त्याहीपलीकडील विश्व खुणावू लागले..

यानंतर रशियानेही मानवरहित चांद्रमोहिमा यशस्वी केल्या. तसेच अमेरिकेने ‘अपोलो’ कार्यक्रम मालिका ‘अपोलो १७’ मोहिमेपर्यंत राबवली. पुढच्या दशकात या दोन बलाढय़ राष्ट्रांमध्ये संयुक्त अवकाश मोहिमांचा बिगूल वाजला आणि १९७५ साली ‘अपोलो-सोयुझ’ ही संयुक्त मोहीम पार पडली. चांद्रमोहिमेनंतर अवकाश मोहिमांच्या अनुषंगाने सूर्यमालेतील अन्य ग्रह तसेच सूर्यमालाबा अवकाशाकडे भरारी घेण्यासाठी माणसाला चांगलाच आत्मविश्वास मिळाला.

कित्येक लाख वर्षांपूर्वी माणूस कृत्रिमरीत्या अग्नी निर्माण करण्यास, दगडांची हत्यारे तयार करून ती वापरण्यास शिकला. सुधारित मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा काही हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यातले इसवी सनापासूनचे दीड सहस्रक, नंतरची आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची ४०० वष्रे, मग महायुद्धांनी होरपळलेली तीन-चार दशके आणि पुढे शीतयुद्ध, अवकाश स्पर्धा, चांद्रस्पर्धा.. आणि

या पाश्र्वभूमीवर मानवी संस्कृतीच्या इतिहासात केवळ कल्पनारम्य आणि अशक्यकोटीतली वाटणारी, परंतु प्रत्यक्षात माणसाने चंद्राकडे घेतलेली उत्तुंग झेप.. हे सारे विस्मयचकित करणारेच आहे.

sudhirphakatkar@gmail.com