समाजात चांगले काही घडतच नाही का, असा प्रश्न पडण्याचा सध्याचा काळ आहे. अशा वेळी ठिकठिकाणी मोजके मनुष्यबळ व तुटपुंजी साधने यांच्या साहाय्याने सुरू असलेल्या विधायक व रचनात्मक कार्याची ओळख करून देणे आवश्यक ठरते. प्रफुल्ल जोशी यांचे ‘चंदनाची झाडं’ हे पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केलेले पुस्तक नेमके हेच करते. जोशी हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. लेफ्टनंट कर्नल या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजासाठी आवश्यक, उपयुक्त आणि जबाबदारीचे काम करत असलेल्या संस्थांना मदतीचा हात देण्याचे व्रत घेतले. त्यासाठी ‘दिवाळी फंड’ सुरू केला. त्यातील काही संस्थांच्या कामाची ओळख या पुस्तकात करून देण्यात आली आहे.

‘एक उत्तुंग वामन’ या पहिल्या प्रकरणात रुग्णमित्र म्हणून काम करणारे अरुणचंद्र कोंडेजकर यांच्या कामाची ओळख करून दिली आहे. तर ‘एक पटेल असा माणूस’ या दुसऱ्या प्रकरणात जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या, त्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या शैलेंद्र पटेल यांच्याविषयी माहिती मिळते. तिसऱ्या प्रकरणात लोणावळा येथील ‘आंतरभारती बालग्राम’ या संस्थेचे सागर रेड्डी यांच्या कार्याचा परिचय लेखकाने करून दिला आहे. कारगिलमधील जवानांचे संघर्षमय कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई यांच्या प्रयत्नांविषयीही एका प्रकरणात सविस्तर वाचायला मिळते. याशिवाय ‘नवक्षितिज’, ‘मानव्य’ या संस्था, तसेच ज्योती सचदे या उपक्रमशील कार्यकर्तीविषयी स्वतंत्र लेखांत वाचायला मिळते. कुठलेही श्रेय न घेता कार्यरत असलेल्या, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या या संस्था व व्यक्तींवरील हे पुस्तक म्हणजे विधायक व रचनात्मक कर्तृत्वाची घेतलेली नोंद आहे. असे असले तरी हे केवळ आढावावजा लेखन नाही. ललित व प्रासादिक शैलीत करून दिलेली ही कार्यओळख वाचनीयही आहे.

चंदनाची झाडं’- प्रफुल्ल जोशी, पद्मगंधा प्रकाशन,

पृष्ठे- १०४, मूल्य- ८० रुपये.