सखोल चिंतनगर्भ लेखन करणारे हिंदीतील ज्येष्ठ कवी, अनुवादक आणि पत्रकार विष्णू खरे यांचे नुकतेच निधन झाले. विष्णू खरे यांचे गेल्या चार दशकांहून अधिक काळचे सुहृद आणि ज्येष्ठ कवी, अनुवादक चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या व्यक्तित्त्वाचा घेतलेला वेध..

विष्णू खरे नावाच्या एका आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या हिंदी कवीने १९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता दिल्लीच्या जी. बी. पंत इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. तो नुसताच कवी नव्हता, तर निर्भीड टीकाकार, अनन्य अनुवादक, सत्यान्वेषी पत्रकार, साक्षेपी संपादक, गंभीर राजकीय विचारवंत आणि प्रखर बुद्धिवादी होता. शिवाय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त चित्रपट समीक्षकही होता तो.

Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा

काही महिन्यांपूर्वीच विष्णूची दिल्लीच्या हिंदी अकादमीचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. एरवी अडगळीत पडलेल्या हिंदी अकादमीला त्याने दिल्लीच्या सांस्कृतिक मध्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अकादमीच्या मुखपत्राचे तीन विशेष अंक संपादित करण्यासाठीच तो दिल्लीत येऊन राहिला होता. ते तीन विशेष अंक अनुक्रमे चंद्रकांत देवताले, केदारनाथ सिंग आणि कुंवर नारायण या तीन महत्त्वाच्या दिवंगत हिंदी कवींवर होते. त्यातला देवतालेवरचा अंक जवळजवळ पूर्ण झालाच होता. हे काम झाल्यावर तो मुंबईला परतणार होता.

१९ सप्टेंबरच्या सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे दूधवाला आला. त्याला विष्णूचं दार उघडं दिसलं. दारामागे विष्णू जमिनीवर बेशुद्ध पडलेला होता. त्याने घरमालकाला सांगितलं. पुढे विष्णूच्या घनिष्ठ ओळखीचा उर्दू लेखक आणि पत्रकार परवेझ अहमद याने आणि विष्णूच्या मुलाच्या मित्रांनी विष्णूला जवळच्या इस्पितळात नेलं. तिथं जागा नव्हती. तिथून दुसऱ्या इस्पितळात नेलं, तर तिथंही जागा नव्हती. शेवटी विष्णूला पंत इस्पितळात दाखल करण्यात आलं. सात दिवस मृत्यूशी संघर्ष करीत अखेरीस विष्णू हे जग सोडून गेला.

विष्णूवर उत्कृष्ट डॉक्टरांनी उपचार केले. पण सात तास उशिरा दाखल केल्यामुळे उपचारांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. डॉक्टरांच्या मते, विष्णूला सकाळी चारच्या सुमारासच झटका आला असावा. विष्णूच्या खोलीचा दरवाजा का उघडा होता? त्याला या धक्क्याची जाणीव झाली असावी का? तो झोपेतून उठून दारापर्यंत चालत आला असावा का? त्याने कुणाला तरी हाक मारायचा प्रयत्न केला असेल का?.. अगदी अशाच प्रश्नांची मालिका असलेली एक प्रभावी कविता त्याने लिहून ठेवली होती. मरणाबद्दल त्याला नेहमीच कुतूहल होतं. मरणावर त्याच्या अनेक कविता आहेत व त्या मुळीच भावविकल नाहीत. त्याची एक अगदी आरंभीच्या काळातली कविता ‘नींद में’ खूप गाजली होती. २००७ साली साने गुरुजी आंतरभारती अनुवाद केंद्राच्या वार्षिकोत्सवात निशिकांत ठकार यांनी विष्णूची एक जाहीर मुलाखत घेतली होती आणि विष्णूच्या ‘कोशिश’ या कवितेचे ११ भाषांमधले अनुवाद सादर करण्यात आले होते. ती कविता पक्षी मरताना कुठे जातात, यावर होती.

विष्णूने लिहिलेल्या मृत्यूविषयक कवितांमध्ये निव्वळ भावनोत्कटता वा खोटी काव्यात्मकता नव्हती, तर एक प्रकारचं बौद्धिक कुतूहल होतं. त्याची एकूणच कविता संयत भावात्मकतेकडून प्रखर बौद्धिकतेकडे जाताना अद्भुत रसायन निर्माण करून वाचकांना झपाटून टाकते. श्रेष्ठ कवितेचा एक गुणधर्म म्हणजे तिने आधिभौतिक प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं हा आहे. मृत्यूचं, जीवनाचं, निसर्गाचं, विश्वाचं रहस्य काय आहे; काळ आणि अवकाशाचं रहस्य काय आहे; जीवनाचा अर्थ काय आहे, अशा प्रश्नांकडे त्याची कविता पुन:पुन्हा वळते. हा शोध तो बौद्धिक पातळीवरूनच घेत असे. शिवाय त्यानं विज्ञानविषयक कविता लिहिताना फारच वरच्या दर्जाची कल्पनाशीलता वापरलेली आहे. हे त्याच्या ‘सुधारणा’ (मराठी अनुवाद : ‘विष्णू खरे यांची कविता’, शब्द प्रकाशन) या दीर्घकवितेवरून सहज लक्षात येऊ शकतं.

विष्णूच्या पहिल्या अवस्थेतल्या कविता आकारानं लहान असत. हळूहळू त्याच्या कविता दीर्घ होत गेल्या आणि त्या गद्यप्राय व बौद्धिक होत गेल्या. अशा कवितांसाठी सखोल चिंतन आवश्यक असतं. नाही तर त्या सपाट, अनावश्यक तपशिलाने भरलेल्या, कंटाळवाण्या, अवाचनीय होतात. विष्णूची विश्वदृष्टी मार्क्‍सवादी विचारधारेने विकसित झालेली होती. पण पोथीनिष्ठ मार्क्‍सवाद्यांना त्याने नेहमीच विरोध केला होता. त्यांच्या मर्यादांची त्याला योग्य ती जाणीव होती. म्हणूनच गजानन माधव मुक्तिबोधांना तो सर्वात मोठा टीकाकार मानत असे. विष्णूच्या दीर्घकवितांमध्ये प्रखर ऊर्जा आणि बौद्धिक आवेग आहे. बौद्धिक आवेगाच्या मुळाशी गंभीर कुतूहल असते आणि अशा कुतूहलामागे ज्ञानाची लालसा असते. शिवाय सत्याचा शोधही असतो. त्यामुळेच त्याची कविता गंभीर आणि प्रौढ होते. विष्णूची कविता ज्ञानलालसेतून निर्माण होते आणि सत्याच्या सर्व अंगांचा सूक्ष्मपणे वेध घेण्याच्या प्रयत्नात ती सरळसरळ आणि धीटपणे वास्तवात पाय रोवून उभी असते. भोवतालच्या गुंतागुंतीच्या वास्तवाचा सामना करताना संघर्ष आणि विरोध अटळच असतो. व्यक्तीच्या विरोधात ज्या सामाजिक-राजकीय शक्ती षड्यंत्र रचताहेत त्यांना उघड करून व्यक्तीची प्रतिष्ठा अबाधित राखण्याचा आणि ती उंचावण्याचा प्रयत्न विष्णूच्या कवितेत प्रकर्षांने दिसून येतो. म्हणूनच आजच्या छुप्या सामाजिक-राजकीय दहशतीच्या काळात विष्णूचं असणं गरजेचं होतं.

राजकीय घटनांवर थेट प्रहार करणारा कवी म्हणून, बाबा नागार्जुन यांचा अपवाद वगळता, विष्णूशिवाय कुणीच आजच्या हिंदी कवितेत दिसत नाही. आणीबाणीत त्यानं ‘डरो’सारखी कविता लिहिली होती. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांच्यावर भेदक टीका करणारी कविता लिहून त्याने तिचं अनेकदा जाहीर वाचनही केलं होतं. मूळ छिंदवाडय़ाचा असल्यामुळे कमलनाथवरही उघडपणे हल्ला करणारी कविता त्यानं लिहिली. त्यानं आयुष्यभर अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊनच लेखन केलं आणि त्याची किंमतही दिली. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे आहोत याचं त्यानं कधीच प्रदर्शन केलं नाही वा आत्मविज्ञापनासाठी धडपड केली नाही.

प्रखर बौद्धिक कुतूहलामुळे विष्णूच्या कवितांचा आवाका फारच विस्तारलेला होता आणि कवितेतली विविधताही थक्क करणारी होती. इतकी विविधता हिंदी कवितेत क्वचितच आढळते. त्यानं कवितेसाठी कोणतंही ज्ञानक्षेत्र वर्ज्य मानलं नाही. समाजकारण, राजकारण, अर्थनीती, इतिहास, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, जीवविज्ञान, भौतिकी, खगोलभौतिकी, पुरातत्त्वविज्ञान, चित्रपट, चित्रकला, पाश्चात्त्य संगीत आदींशी संबंधित त्याच्या कविता लक्षणीय आहेत. तल्लख बुद्धिमत्ता, थक्क करणारी स्मरणशक्ती, विलक्षण कल्पनाशक्ती, अद्भुत तर्कज्ञान, सूक्ष्म संवेदनशीलता ही त्याची काही आयुधं होती.

विष्णूची भाषा असाधारण होती. हिंदी भाषेला खास असा स्वत:चा सांस्कृतिक प्रदेश नाही, तरीही हिंदी कवितेला दीर्घ परंपरा आणि विशाल भौगोलिक क्षेत्र आहे. विसाव्या शतकात हिंदी कवितेत महाप्राण निराला यांनी पहिल्यांदा मुक्तछंद वापरून हिंदी कवितेला छंदमुक्त केलं आणि कवितेत नव्या युगाला सुरुवात केली. निरालांच्या नंतर विष्णूनेच कवितेत गद्यसदृश आणि बौद्धिक भाषेचा वापर करून हिंदी कवितेची भाषा बदलली आणि तिला नवं वळण दिलं. त्याने गद्यप्रधान, सरळ, सोपी, अलंकारहीन, बौद्धिक-वैचारिक, तर्कसंगत, कथनशैलीचं आधिक्य असलेली, वाचताना खिळवून ठेवणारी, सूक्ष्म व जटिल अनुभवांना प्रभावीपणे व्यक्त करणारी भाषा वापरून नव्या कवींसाठी कवितेचा परीघ विस्तृत करून दिला. एकविसाव्या शतकातील तरुण हिंदी कवींनी त्याला सर्वार्थाने आपला आदर्श म्हणून निवडलं होतं. भाषेविषयी अत्यंत जागरूक असलेल्या विष्णूने आपल्या काव्यभाषेत खूपच विविधता आणलेली होती.

कवितेच्या सर्जनासोबतच विष्णूने अनुवादाच्या क्षेत्रातही फारच मोलाचं काम करून ठेवलं आहे. मांजर आपली नखं तीक्ष्ण करण्यासाठी झाडाच्या खडबडीत खोडावर अधूनमधून घासत असते, तसेच कवीलोकही आपली भाषा अधिक तीक्ष्ण करण्यासाठी अनुवाद करीत असतात. अनुवादामुळे आपल्याच भाषेकडे अधिक सूक्ष्मपणे आणि अधिक जबाबदारीने बघणं शक्य होतं. विष्णूने अनुवाद केले ते जागतिक कवितेचं भान येऊन हिंदी कविता अधिक समृद्ध व्हावी म्हणून. शिवाय भाषेचा आणि आशयाचा परीघ विशाल व्हावा म्हणून. त्याने केलेले चेसलाव मिलोशचे आणि विसलावा शिम्बोस्र्काचे अनुवाद अप्रतिम आहेत. दोघंही नोबेल पुरस्कारप्राप्त पोलिश कवी. विष्णूच्या मते, विसाव्या शतकातली सर्वोत्कृष्ट कविता पोलंडमध्ये लिहिली गेली आहे. विष्णूचं सर्वात मोलाचं काम म्हणजे त्याने केलेले दोन युरोपीय महाकाव्यांचे अनुवाद आणि ग्योटेच्या ‘फाउस्ट’चा अनुवाद. मात्र, ‘महाभारत’ त्याला जगातलं सर्वात मोठं महाकाव्य वाटत असे. त्याने ‘महाभारत’विषयक दहा अप्रतिम कविता लिहिल्या होत्या आणि त्याला आणखी काही कविता लिहून त्यांचा स्वतंत्र संग्रह प्रकाशित करायचा होता. त्याच्या ‘महाभारता’वरील कवितांचं वेगळेपण त्याच्या विलक्षण प्रतिभेचं निदर्शक आहे. हिंदीत केलेल्या अनुवादांबरोबरच त्यानं हिंदी कवितांचे इंग्रजी, जर्मन, झेक इत्यादी युरोपीय भाषांतही अनुवाद केले होते आणि हिंदी कवितेला जागतिक मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.

पत्रकार म्हणून विष्णूची कारकीर्द सुमारे नऊ वर्षांची होती. तो १९७६ ते १९८६ या काळात आधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि नंतर ‘नवभारत टाइम्स’ या वर्तमानपत्रांत होता. त्याच्या काळात मायावतींचं सरकार उत्तर प्रदेशात सत्तेवर आलं होतं आणि तो मायावतींच्या सुरुवातीच्या कारभाराने प्रभावित झाला होता. ‘नवभारत टाइम्स’च्या जयपूर आवृत्तीच्या संपादकपदावर असताना त्याचे मालकांशी तात्त्विक मतभेद झाले. तडजोड करणं त्याच्या स्वभावातच नव्हतं आणि त्याला राजीनामा द्यावा लागला. १९८६ नंतर त्याला जगण्यासाठी फारच संघर्ष करावा लागला. त्याला अखेपर्यंत आर्थिक स्थर्य मिळालं नाही. मात्र, त्याने आपल्या साहित्यसाधनेत कधीही खंड पडू दिला नाही. त्यानं स्वत:च्या परिस्थितीबद्दल आणि स्वत:च्या कवितेबद्दल बोलणं कटाक्षाने टाळलं होतं.

सिनेपत्रकार म्हणून त्याची ख्याती हिंदीतच नाही, तर विदेशातही पसरली होती. सिनेमावर त्याने लिहिलेल्या लेखांची आणि स्तंभलेखनाची एकूण तीन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि अजून किमान चार तरी पुस्तकं होतील एवढं त्याने लिहून ठेवलं आहे. शिवाय प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकातही त्याने बराच काळ सिनेमावर स्तंभलेखन केलेलं आहे. त्याची वैश्विक सिनेमाची आणि हिंदी सिनेमाची जाण विलक्षण होती. त्याच्या आणि ‘नवभारत टाइम्स’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक सुंदरचंद ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळेच किशोर साहू या गुणी नट, दिग्दर्शक, पटकथालेखक व निर्मात्याचं अतिशय वाचनीय आत्मचरित्र प्रकाशित होऊ शकलं. जयप्रकाश चोकसे या प्रख्यात सिनेपत्रकाराची आणि त्याची अगदी महाविद्यालयीन काळापासूनच गाढ मत्री होती. गेली सुमारे पाच वर्ष तो नियमितपणे मुंबईच्या ‘नवभारत टाइम्स’मध्ये सिनेमावर एक पाक्षिक स्तंभ लिहीत असे आणि तो अतिशय लोकप्रिय स्तंभ होता.

विष्णूची साहित्याबद्दलची जाण विलक्षण होती. त्याचे शत्रूही त्याच्या आकलनाला दाद देत. पण त्याला टीकाकार म्हणून मान्यता देत नसत. कारण एखाद्यावर टीका करताना तो त्या लेखकाच्या प्रतिष्ठेचा आणि पदाचा कधीच विचार करीत नसे. त्याची साहित्याविषयीची धारणा स्पष्ट व कायमच तावूनसुलाखून घेतलेली असे. अफाट व्यासंग, तीव्र बुद्धिमत्ता व साहित्याभ्यासाची शिस्त यामुळे साहित्याच्या सर्व अंगांची सूक्ष्म पारख करूनच तो साहित्यकृतींची आलोचना करत असे. त्यात नेहमीच त्याची स्वत:ची मते स्पष्टपणे, प्रांजळपणे, कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि कसलाही आडपडदा न ठेवता ठळकपणे मांडलेली असत. त्यामुळे त्याला प्रस्थापित लेखक-टीकाकारांपासून नव्या, हौशी लेखकांपर्यंत अनेक टोकाचे शत्रू होते. त्याने अनेक टीकात्मक लेख लिहिले, पण दुर्दैवाने त्याच्या टीकेचे आतापर्यंत एकच पुस्तक प्रकाशित झालेले आहे. ‘आलोचना की पहिली किताब’ हे त्याचं नाव. प्रकाशकांचे लेखकांशी असलेले व्यावसायिक संबंध लक्षात घेता बहुतेक प्रकाशकांनी त्याचे टीकालेखन छापणे जाणीवपूर्वक टाळले. त्याच्या कवितासंग्रहांना कधीच महत्त्वाचे पुरस्कार मिळू दिले नाहीत. तो जिवंत असताना त्याच्या विरोधात प्रतिष्ठितांनी कायमच षड्यंत्र रचलेले असे. त्याच्या मृत्यूनंतरच त्याच्यावर एवढा प्रचंड स्तुतीचा वर्षांव होत आहे, यावरून हिंदीच्या वाङ्मयीन संस्कृतीची कल्पना यावी. तो १९७५ पर्यंत साहित्य अकादमी, दिल्ली इथे उपसचिव होता. सचिवपदाच्या निवडीत त्याच्यावर अन्याय झाला आणि तो तिथून राजीनामा देऊन बाहेर पडला. त्यानंतर त्याने कधीच साहित्य अकादमीत पाय ठेवला नाही. गतवर्षी डिसेंबरात तो सुमारे ४२ वर्षांनी साहित्य अकादमीत गेला ते प्रभाकर माचवे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित चर्चासत्रात बोलण्यासाठी.

विष्णूने हिंदीतल्या चांगल्या व गुणात्मक साहित्याचा प्रभावीपणे पुरस्कार केला. विनोदकुमार शुक्लपासून कुमार अंबुज, गीत चतुर्वेदी, व्योमेश शुक्लपर्यंत सगळ्या वयोगटांतल्या लेखक-कवींवर त्याने भरभरून लिहिलेले आहे. विनोदकुमारांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीला तो फार महत्त्वाची साहित्यकृती मानत असे. त्याने प्रेमचंद-फणीश्वरनाथ रेणू-विनोदकुमार शुक्ल अशी परंपराच प्रस्थापित केली होती. कवितेतही अशीच निराला-मुक्तिबोध-रघुवीर सहाय अशी परंपरा त्याने रूढ केली होती. हिंदी मातृभाषा असूनही मराठीशी लहानपणापासूनच परिचित असल्यामुळे तो मराठीतल्या श्याम मनोहर आणि नामदेव ढसाळ यांच्या साहित्यावरही विलक्षण प्रेम करीत असे. श्याम मनोहर यांच्या ‘खूप लोक आहेत’ या कादंबरीच्या ‘बहुत लोग है’ या हिंदी अनुवादाला त्याने लिहिलेली मार्मिक प्रस्तावना याची साक्ष आहे. हिंदीत नव्याने लिहिणाऱ्या लेखक-कवींना त्याचा मोठा आधार होता. ‘पिछला बाकी’ हा त्याचा १९९८ मध्ये प्रकाशित झालेला कवितासंग्रह त्याने या शताब्दीच्या अखेरच्या दशकात लिहू लागलेल्या व पुढील शतकात कवितेला समृद्ध करण्याची प्रबळ शक्यता असलेल्या कवी-कवयित्रींना अर्पण केलेला आहे.

चंद्रकांत देवताले हा विष्णूचा सर्वात जवळचा व अभिन्न मित्र होता. चंद्रकांतच्या कवितेचा तो अगदी सुरुवातीपासूनचा एकमेव भाष्यकार होता. आयुष्याच्या पूर्वार्धात उपेक्षित राहिलेली चंद्रकांतची कविता उत्तरार्धात हिंदी कवितेच्या मध्यप्रवाहात महत्त्वाची ठरली आणि भारतभर गाजली ती विष्णूमुळेच. विष्णूचा अखेरचा लेख हा ७ सप्टेंबरच्या ‘नॅशनल हेराल्ड’च्या अंकात प्रकाशित झालेला ‘रिमेम्बिरग चंद्रकांत देवताले’ होता. आयुष्यभराच्या अभिन्न मित्राला वाहिलेली ती अप्रतिम श्रद्धांजली होती.

विष्णूचं प्रकाशित, पण ग्रंथरूपात असंकलित असं लेखन सुमारे दोन हजार पृष्ठांचं आहे. ते कधी, कुठे आणि कसे प्रकाशित होईल, माहीत नाही. एखाद्या साक्षेपी संपादकाने विष्णूच्या समग्र लेखनाची ग्रंथावली संपादित करण्याचे ठरवले तरच ते शक्य होईल.

गजानन माधव मुक्तिबोध, चंद्रकांत देवताले आणि विष्णू खरे हे तिघेही महत्त्वाचे कवी मध्य प्रदेशातलेच. तिघांच्याही कवितेने हिंदी कविता समृद्ध केली आहे. तिघेही व्यवस्थेचे प्रखर टीकाकार. तिघांच्याही साहित्यात एक अव्यक्त धागा आहे. अखिल मानवजातीवर उत्कट प्रेम करणाऱ्या या तिघांचीही अखेर दिल्लीसारख्या अमानवी शहरातल्या इस्पितळांत व्हावी हाही एक विचित्र योगायोग आहे.

patilcn43@gmail.com