हरियाणातील गुरूग्राममधील एका शाळेतल्या प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षांच्या कोवळ्या मुलाचा अकरावीतील मुलाने केलेल्या भीषण खुनाने एकच खळबळ माजली. हा खून शाळेतील परीक्षा रद्द करण्याकरिता केला गेल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले. हे तर त्याहून भयंकर आहे. परीक्षेचा इतका धसका मुलं घेत असतील तर तो आपल्या शिक्षणपद्धतीचा पराभव आहे. या घटनेचा आणि त्यातून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचा संवेदनशील कवी  प्रा. दासू वैद्य यांनी घेतलेला धांडोळा..

शाळेत कायम मान खाली घालायला लावणारा विषय म्हणजे गणित! या गणित विषयाने निर्माण केलेल्या भीतीचा हळूहळू न्यूनगंड होऊन बसतो. असे गणिताच्या न्यूनगंडाचे लाभार्थी आपल्या आजूबाजूला बरेच असतात. पूर्वी छोटय़ा गावांतून अनेक विद्यार्थी दहावीला हमखास नापास व्हायचे. त्याचं कारण म्हणजे या कोवळ्या मुलांच्या पाठी गणित आणि इंग्रजी विषयाचे क्रूर राहू-केतू लागलेले असत.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
curd Should Curd be Given to Students Before Exams Should it really be done How healthy is it
Health Special: परीक्षेला जाताना हातावर दही द्यावे का?

चारी मुंडय़ा चीत झालेला नव्हे, पण त्या भयभीत लाभार्थ्यांपैकी दमछाक झालेला मीही एक होतो. गणिताशी माझी कधी दोस्ती झालीच नाही. उलट, पटापट गणित सोडवणारे वर्गमित्र परग्रहावरचे वाटायचे, किंवा त्यांना दोन मेंदू असतील असं वाटायचं. बंद डोळ्यांसमोर आकडय़ांचं महाकाय जाळं दिसायचं. गणिताचे मारकुटे मास्तर स्वप्नात यायचे. तालुक्याच्या गावाहून बदली होऊन आलेले मास्तर नदीकडच्या गल्लीत एकटेच माडीवर राहायचे. त्या गल्लीतून जाण्याचीसुद्धा आमची हिंमत नव्हती. पाहता पाहता नावडता विषय म्हणून गणिताकडे दुर्लक्ष होत गेलं. गणिताला टाळण्याकडे कल वाढत गेला. सातवी-आठवीची गोष्ट असेल. आम्हाला गणित शिकवायला चांगले शिक्षक होते, पण आमचंच नेटवर्क हुकलेलं होतं. गणिताचा तास बुडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच असत. ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ अंथरत मराठीचा तास संपायचा आणि लागलीच गणिताचा कोरडा दुष्काळ सुरू होई. आम्ही दोघे-तिघे जण या दुष्काळात तडफडत असू. दुष्काळात जिवंत राहण्यासाठी अनेक उपाययोजना करतात, तशा अनेक युक्त्या गणिताचा तास टाळण्यासाठी आम्ही करीत असू. एक दिवस तर गणिताचा तास बुडवण्यासाठी आम्ही अफलातून प्रकार केला. प्रत्येक तास संपल्यावर लघुशंका किंवा पाणी पिण्याच्या निमित्ताने आम्ही दोघं-तिघं जण हमखास वर्गाबाहेर पडणारच. त्या दिवशी शाळेच्या मागे आम्ही उभे होतो. निमित्त होतं लघुशंकेचं. सहज समोर लक्ष गेलं तर समोरच्या पडक्या बेसमेंटच्या बाजूला भलामोठा साप होता. क्षणभर घाबरलोच. पण जवळ गेल्यावर लक्षात आलं की साप मेलेला आहे. सापाला मारून फार वेळ झालेला नसावा. त्याचं तोंड ठेचलेलं होतं. आमची टय़ूब पेटली. आम्ही ताबडतोब चर्चा करून योजना ठरवली. (गणित सोडून बाकी विषयांत आमचं बरं डोकं चालायचं.) ठरलेल्या योजनेप्रमाणे कामाला लागलो. वर्गात जाण्यापूर्वी प्रथम तो भलामोठा साप काठीने उचलून जुनाट बेसमेंटच्या पडक्या छिद्रात जातोय असा देखावा तयार केला. म्हणजे काठीने त्या सापाचा ठेचलेल्या तोंडाचा भाग त्या छिद्रात खुपसला. त्यामुळे तो साप त्या बेसमेंटच्या बिळात जातोय असं दृश्य तयार झालं. ही तयारी पूर्ण झाल्यावर वर्गात धूम ठोकली. गणिताच्या सरांनी शिकवायला सुरुवात केलेली होती. फळ्यावर काहीतरी अगाध आकडे लिहिणं सुरू होतं. ‘साप साप’ असं ओरडतच आम्ही वर्गात प्रवेश केला. सगळे घाबरून गेले. सरांनी शिकवणं थांबवलं. (आनंदी आनंद गडे!) सर विचारत होते, ‘कुठाय? कुठाय?’ आम्ही वर्गाबाहेर पळालो. आमच्यामागे सरांबरोबर इतर मुलंही बाहेर पडली. हा गोंधळ, गोंगाट ऐकून शेजारचे वर्गही भराभर बाहेर पडले. आम्ही दिशादर्शक जत्थेदार बनलो होतो. हेडमास्तरांच्या खोलीपर्यंत वार्ता गेली. पाहता पाहता त्या पडक्या, जुनाट बेसमेंटच्या भोवती अख्खी शाळा जमली. एरवी ती लघुशंकेची जागा होती. लांबवरून सरांना आम्ही तो साप दाखवला. उन्हात साप चमकत होता. सर मुलांना पुढे जाऊ देत नव्हते. लांबून तर भलामोठा साप बिळात जातोय ही दृश्यचौकट सुंदर दिसत होती. दरम्यान शिपायाने दोन मोठय़ा काठय़ा आणल्या. हेडमास्तरांच्या आज्ञेप्रमाणे एक धाडसी शिपाईमामा काठी घेऊन पुढे सरसावले. साऱ्या गर्दीने श्वास रोखून धरला होता. शिपाईमामा घणघण घंटा वाजवायच्या सवयीने सापाची मृत्युघंटा वाजवणार असा तो क्षण. हा प्रसंग घडवून आम्ही दोघे-तिघे निवांत होतो. उलट, आपली योजना यशस्वी होतेय याच्या मनात उकळ्या फुटत होत्या. अर्थात शेवट कसा होतो याची उत्सुकता होतीच. शिवाय बातमी फुटली असती तर मात्र धडगत नव्हती. शिपाईमामांनी मारण्यासाठी उगारलेली काठी हवेतच राहिली. सापाला लागलेल्या मुंग्या बघून शिपाईमामाने सापाच्या मधोमध काठी घालून सापाला वर उचललं. चांगला सहा-सात फुटांचा साप सगळे बघतच राहिले. दरम्यान हे नाटय़ घडेपर्यंत तास संपला होता. मेलेला साप पुन्हा मारण्याची मर्दुमकी शिपाईमामांना दाखवता आली नाही. आम्ही मात्र गणिताचा नकोसा तास पद्धतशीर ठेचून काढला होता.

गणिताचा तास बुडवण्याकरिता केलेला हा प्रताप आठवायचं कारण म्हणजे हरियाणातल्या गुरूग्रामच्या शाळेत झालेला कोवळ्या मुलाचा खून! हा खून शाळेतली परीक्षा रद्द करण्याकरिता केला गेल्याचा संशय आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांने स्वच्छतागृहात एका कोवळ्या मुलाचा गळा कापून खून केला. हरियाणा पोलिसांनी आधी या कोवळ्या मुलाच्या खुनासाठी स्कूल बसच्या कंडक्टरला दोषी ठरवलं होतं. परंतु आता सीबीआयने पुराव्यानिशी अकरावीच्या विद्यार्थ्यांला खुनी म्हणून अटक केली आहे. त्यासंबंधी अधिक तपास, वाद-प्रतिवाद होत राहतील, पण यानिमित्ताने मुलांमध्ये लीलया संचारणारी हिंसा ही आज काळजीचं कारण ठरली आहे.

१९८० च्या आसपासची गणिताचा तास बुडवण्याकरिता मृत सापाला जिवंत ठरवू पाहणारी ती घटना आणि २०१७ मधील परीक्षा रद्द करण्याकरिता जिवंत मुलाला मारून टाकणारी ही घटना.. या दोन घटनांमध्ये काही ठळक साम्यं आढळून येतात. दोन्ही घटनांमध्ये काळाचं अंतर असलं तरी नावडते विषय, नावडत्या परीक्षा हे समान आहे. मास्तरांची दहशत पूर्वीएवढी राहिली नसली तरी विद्यार्थ्यांवर ‘लादणे’ कायमच आहे. एखादा विषय किंवा परीक्षा विद्यार्थ्यांला नकोशी किंवा भीतीदायक का वाटावी? परीक्षा टाळण्यासाठी विद्यार्थ्यांने वाट्टेल ते जीवघेणं कृत्य सहज करावं, यात संबंधित विषयाला किंवा परीक्षेला सामोरे जाण्यासाठीचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण तयार करीत नाही, हेच खरं. निदान वरील घटनांमधून तसंच ध्वनित होतं.

चाळीसेक वर्षांपूर्वी नावडता तास बुडवण्याकरिता मेलेल्या सापाची विद्यार्थ्यांनी गंमत करावी, या तुलनेत आजच्या विद्यार्थ्यांने नावडती परीक्षा टाळण्यासाठी चक्क कोवळ्या मुलाचा जीव घ्यावा, यात बदललेल्या भोवतालाचाही विचार होणं आवश्यक आहे. हरयाणातील शाळेत घडलेल्या या घटनेची बातमी वर्तमानपत्रांत वाचताना ‘मालक’ या शब्दाशी अडखळलो. संदर्भ असा होता : कोवळ्या मुलाचा स्वच्छतागृहात खून केल्यानंतर तो अकरावीचा खुनी मुलगाच खालच्या मजल्यावर शाळेच्या ‘मालकाला’ जाऊन ही बातमी सांगतो. शाळेचे ध्येयवादी ‘संस्थाचालक’ जाऊन ‘मालक’ आले. इथंच शिक्षणाचा धंदा झाला. झगमगाटी इंग्रजी शाळा मालकासाठी सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडय़ा बनल्या. पैसा कमावण्याच्या नादात उभारलेल्या टोलेजंग शाळांच्या गेटवरचे सुरक्षारक्षक नैतिकतेला आणि मूल्यभानाला बऱ्याचदा आत येऊच देत नाहीत. मग अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यात ही हिंसा मोठी काळजीत पाडणारी गोष्ट आहे.

हिंसा, आक्रमकता, भीती, निष्क्रियता यांच्यामागे माध्यमं आणि सोशल मीडियाचा मोठा हातभार आहे. एका मोबाइल कंपनीने नेटवर्कचा वापर ‘मुफ्त’ करून टाकला आणि तहान-भूक विसरून भाग्यवान ग्राहक मोबाइलवर नेट दामटू लागले. रोज एक जीबी डाटा मुफ्त मिळू लागला म्हणून रात्र रात्र जागून मोबाइलवर ‘वाटेल’ ते पाहणारे महाविद्यालयीन विद्यार्थी गावोगाव सापडतील. वायफाय फ्री असलेल्या भागातील आत्ममग्न तरुणाईची जत्रा पाहण्यासारखी असते. काही दिवसांपूर्वी आमच्या कॅम्पसमधील वसतिगृहात एका विद्यार्थ्यांने ‘लाइव्ह’ आत्महत्या केली. म्हणजे या प्रेमवीराने वसतिगृहातील आपल्या खोलीतून त्या मुलीला मोबाइलवरून कॉल केला. (अर्थात कॉल फ्री होता.) ती लग्न करायला तयार होईना म्हणून त्याने मोबाइलवरून आत्महत्येची धमकी दिली. तरीही ती ऐकेना तेव्हा धावते वर्णन करत त्याने आत्महत्या सुरू केली. ‘बघ मी आता कपडे वाळू घालण्याची दोरी पंख्याला बांधतोय’.. ‘मी आता दोरीचा फास गळ्यात अडकवतोय’.. असं सांगत सांगत तो खरंच पंख्याला लटकला.. मेलाही. पलीकडून मुलगी एकच बोलत होती- ‘प्लीज, असं करू नकोस.’ बाजूच्या मुलांना शंका आल्यामुळे ते खोलीत घुसले. पाहतात तर हा पंख्याला लटकलेला. शेजारी पडलेल्या मोबाइलवर मुलगी बोलतेच आहे.. ‘प्लीज, असं करू नकोस.. प्लीज, काहीतरी बोल ना..’ शेवटी पोलीस आले आणि त्या मुलीला त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. हत्या काय, आत्महत्या काय, हे सारं हिंसेलाच कवटाळणारं आहे. मुलगा मरतो हे वाईट आहेच; पण ज्या तालुक्यातून ती मुलगी शिकायला आलेली असते तिकडचे तिचे माय-बाप अशा घटनांमुळे शहरात शिकण्यासाठी मुलींना पाठवायला घाबरतात. ‘अमेरिकेतल्या पबमध्ये माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला’, ‘लंडनमधल्या एका शाळेत शालेय विद्यार्थ्यांने गोळीबार करून वर्गातील मुलांना मारले..’ अशा दूरस्थ घटना आता आपल्या घराजवळ येऊन धडकल्यात.

माध्यमांतून, खेळांतून आज हिंसा आपल्या सरावाची होत चालली आहे. डोकेदुखी असह्य़ झालेल्या माणसाने ‘अ‍ॅनासिन’ गोळी मागावी एवढय़ा सहजतेनं चित्रपटातलं पात्र ‘गोली मार भेजे में, भेजा दर्द करता है..’ असं म्हणत असतं. एका राष्ट्रीय तेज चॅनलवर चर्चेच्या कार्यक्रमाचं नाव ‘हल्लाबोल’ असं असतं. मुलांच्या व्हिडीओ गेममध्येसुद्धा गोळ्यांनी माणसं उडवण्याचा खेळ असतो. यातली भयंकर गोष्ट म्हणजे रंगपंचमीत रंगाच्या पिचकारीऐवजी बंदूक पाहिली तेव्हा थक्क होऊन पाहतच राहिलो. रंग हा प्रेमाचा, आनंदाचा आविष्कार! आणि तो बंदुकीचा घोडा दाबून उडवायचा? कसली संगती आहे ही? बाहेरच्या लोकांसाठी अणुबॉम्ब तयार ठेवायचे आणि देशातल्या लोकांच्या हाती चाकू, सुरे, बंदुका द्यायच्या.. यातूनच पुढलं नवनिर्माण होणार आहे. एका कोवळ्या मुलानं दुसऱ्या कोवळ्या मुलाचा गळा चिरल्यामुळे कोवळेपण मरून जातं. कोवळ्या बाळांना सहाणेवर उगाळून हिंसेची गुटी पाजणाऱ्या प्रत्येकाच्या पुढय़ात एक कविता ठेवू इच्छितोय..

‘आता फारशी जत्रा भरत नाही

भरलीच तरी

मुलं पुंग्या विकत घेत नाहीत,

घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक

मुलं कुठं खेळतात खेळपाणी

खेळतात युद्ध युद्ध

बैठकीतल्या उशांचा बांध रचून

पोरांनी एकदा

माझ्यावरच रोखली स्टेनगन,

गोळीला घाबरलो नाही

पण चिमुकल्या डोळ्यांत

हिंस्रतेचा आविर्भाव पाहून

हातातली खोटी बंदूक

कधीही खरी होण्याची भीती

मेंदूत आरपार घुसत गेली..’