आपल्याकडे कल्पनादारिद्रय़ कधीही नव्हते, यापुढेही नसेल; पण कल्पना वा प्रतिभा आणि कलाकृतीची प्रत्यक्ष निर्मिती या दोन वेगळ्या गोष्टी असून, नवी विज्ञानकथा जन्माला यायला हवी असेल तर निव्वळ लेखकाकडून अपेक्षा करून उपयोग नाही. त्यासाठी अनुकूल अशा पर्यावरणाची ठोस निर्मितीही व्हायला हवी.
‘विज्ञानाने काय साधले?’ या प्रश्नाचे उत्तर ढोबळमानाने ‘बदल’ असेच देता येईल. हा बदल मानवी जीवनात, समाजात आणि सभोवतालात मोठय़ा प्रमाणावर घडून आला. या बदलाचे भोवतालावर विविध परिणाम घडून आले. हे परिणाम ज्या माणसांवर, समाजावर, संस्कृतीवर घडले त्यांच्या कथा म्हणजेच विज्ञानकथा! थोडक्यात सांगायचे झाले तर विज्ञानकथा हे एक बदलाचे साहित्य आहे. एक असा बदल- जो पूर्णत: विज्ञानामुळे घडून आला. अज्ञानयुगातून विज्ञानयुगात जाण्याचा काळ हा माणसाच्या दृष्टीने एका मोठय़ा स्थित्यंतराचा काळ होता. हा प्रवास जरी चाकासारख्या अगदीच छोटय़ा-मोठय़ा वस्तूंपासून सुरू झालेला असला तरी या मूलभूत तंत्राकडे कुणीही फार विस्मयाने पाहिले नव्हते. पण स्थिर भौतिक नियमांना गणिती समीकरणांच्या चौकटीत बांधून न्यूटनने जी एक वैज्ञानिक शोधांच्या फटाक्यांची माळ पेटविली, ती पुढे अथक पेटत राहिली.. धडधडत राहिली. सभोवताली घडणारे हे बदल माणूस विस्फारीत नेत्रांनी पाहत होताच. विज्ञानाने घडवून आणलेले हे बदल त्याच्या दृष्टीने एखाद्या चमत्कारासारखेच होते. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात ज्युल व्हर्न किंवा एच. जी. वेल्स यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा या प्रचंड लोकप्रिय झाल्या. कारण लोकांनी त्या साहित्याकडे विस्मयकथा वा अद्भुतिका म्हणूनच जास्त पाहिले. आदिम काळापासून माणसाची अद्भुताकडे असणारी ओढ या विज्ञानकथांनी भागवली.. नव्हे वाढवली. पाश्चात्त्य विज्ञानकथेच्या इतिहासात पुढे अनेक लेखकांनी मोलाची भर घातली. यात असिमोव्ह, क्लार्क, हॅनलन, ब्रॅडबरी अशा अनेकांचा समावेश होतो. जसजशी विज्ञानकथा बदलत गेली, तसतसे या साहित्याला निव्वळ विज्ञानकथा (सायन्स फिक्शन) हे नाव देणे या साहित्यप्रकाराच्या आवाक्यासाठी अपुरे पडू लागले. पुढे विज्ञानकथेच्या अनेक व्याख्या अनेकांनी आपापल्या परीने केल्या. त्यातही एक व्याख्या सर्वसमावेशकपणे स्वीकारली गेली; ती अशी- ‘सद्य:कालीन सभोवतालापेक्षा अतिप्रगत असे विज्ञान आणि तंत्रज्ञान असणाऱ्या सभोवतालात घडणारी कथा म्हणजे विज्ञानकथा.’ हे साहित्य आता विज्ञानामुळे माणसाच्या जीवनात निर्माण होणारे विस्मय एवढय़ापुरतेच मर्यादित नव्हते. त्यात विज्ञानामुळे बदललेले माणसाचे पर्यावरण, त्याची संस्कृती, समाज, राहणीमान आणि मानसिकता या सगळ्याचाच समावेश होता.
जॉर्ज ऑर्वेलने लिहिलेल्या आणि १९४९ साली प्रकाशित झालेल्या ‘१९८४’ या कादंबरीत भविष्यकालीन समाजाचे आणि एका एकाधिकारशाहीवादी राजवटीचे भयप्रद चित्रण होते. ऑर्वेलने त्याकाळी त्याला वाटणारी दैनंदिन मानवी आयुष्यातली राजकीय ढवळाढवळीची भीती- जी ‘१९८४’ या कादंबरीत त्याने चितारली होती- ती आज जवळपास प्रत्यक्षात उतरली आहे. ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ ही उक्ती आज सर्वार्थाने खरी ठरू पाहत आहे. जिथे तिथे लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे, ई-मेल्स, सोशल मीडियावर असलेले परकीय नियंत्रण यामुळे आजचे मानवी जीवन हे त्या अर्थाने कुणा ना कुणाच्या तरी नजरेखाली कैदच आहे. इतक्या अचूक प्रमाणात भविष्यातील समाजाचे चित्रण करूनही या कादंबरीबद्दल- ती विज्ञानकथा आहे की नाही, असेही वाद झाले.
भाषा हे साहित्याचे हत्यार असले तरी ज्या समाजात आणि संस्कृतीत त्या भाषेची जोपासना होते, त्या समाजाचे आणि संस्कृतीचे प्राचीन व अर्वाचीन असे सार्वकालीन पडसाद त्या- त्या साहित्यकृतीत उतरत असतात. साहित्य आणि समाज या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी असल्या तरीही साहित्यामुळे समाज घडतोच असे नाही. मात्र, हेच विधान उलट अर्थाने आपण करू शकत नाही. कोणतीही साहित्यकृती रुजायला, उगवायला आणि ती उभारून यायला एका विशिष्ट प्रकारच्या सामाजिक वातावरणाची अथवा योगदानाची निकडीची गरज असते. हे सामाजिक वातावरण साहित्यविश्वापुरतेच मर्यादित असू शकते. पण साहित्यकृती जगायला ते सामाजिक वातावरण त्या साहित्यकृतीबाबत कितपत सहिष्णु आहे, हा निकष महत्त्वाचा ठरतो. या पाश्र्वभूमीवर पाश्चात्त्य विज्ञानकथा आणि भारतीय सभोवतालात घडणाऱ्या मराठी विज्ञानकथा यांची तौलनिक मांडणी करणे हे तसे अवघडच काम.
मराठीत विज्ञानकथालेखन विपुल झाले; नाही असे नाही. माझ्या पिढीला मराठी विज्ञानकथांची ओळख भा. रा. भागवतांनी अनुवादित केलेल्या ज्युल व्हर्नच्या विज्ञान काल्पनिकांमुळे झाली. लहान वयात उपजत असलेल्या अद्भुताच्या ओढीची भूक या विस्मयिकांनी भागवली. पुढे मराठीतले अनेक विज्ञानकथा लेखक वाचनात आले. जयंत नारळीकर, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे, अरुण मांडे, निरंजन घाटे हे त्यापैकीच काही महत्त्वाचे मराठी विज्ञानकथा लेखक.
यातही प्रामुख्याने डॉ. जयंत नारळीकरांनी लिहिलेल्या विज्ञानकथा या वैज्ञानिक पर्यावरणात जास्त चपखलपणे बसल्या. स्वत: वैज्ञानिक असण्याची पाश्र्वभूमी आणि तत्संबंधित माहिती आणि संदर्भाचा सहज उपलब्ध असणारा स्रोत हे नैसर्गिक फायदे नारळीकरांना मिळालेले असले तरी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये विस्मय निर्माण करणाऱ्या विषयांची वा घटकांची कधीही वानवा नव्हती. ‘यक्षाची देणगी’ हा कथासंग्रह असो वा ‘वामन परत न आला’, ‘व्हायरस’, ‘प्रेषित’ या कादंबऱ्या असोत; पाश्चात्त्य विज्ञानकथेच्या तुलनेत छोटय़ा परिघावर लिहिलेल्या या कथा विस्मयनिर्मितीत कुठेही उण्या पडत नाहीत. डॉ. बाळ फोंडके यांच्या कथांमध्येही वैज्ञानिक पर्यावरण बऱ्याचदा माहिती आणि संदर्भासह चपखल आढळते.
इंटरनेटद्वारे माहिती आणि संदर्भाच्या उपलब्धीचा अक्षरश: स्फोट होण्याआधी निरंजन घाटे यांनी अनेक विज्ञानविषयक पुस्तके आणि विज्ञानकथा लिहिल्या. ‘पॉप्युलर सायन्स’ या अर्थाने मराठीत विज्ञानविषयक साहित्य लोकप्रिय करण्याचा बहुमान- किंबहुना त्यांचाच! अहमदनगरसारख्या साहित्यिक परिघाबाहेर वसलेल्या शहरात राहणाऱ्या डॉ. अरुण मांडेंनी एकेकाळी उत्तमोत्तम विज्ञानकथा लिहून चांगली चमक दाखविली. त्यांची ‘चंद्र, ताजमहाल आणि चहा’ ही कथा आजही मराठीतल्या आघाडीच्या विज्ञानकथांमध्ये गणली जावी. माणसाला उपजतच असलेला अप्राप्य गोष्टींचा हव्यास आणि त्या गोष्टींच्या प्राप्तीची शक्यता पाहून मोहरून गेलेला या कथेचा नायक या दोन्ही केंद्रांभोवती ही कथा उत्तमरीतीने फिरते.
विज्ञानाचा आधार घेत विस्मयनिर्मिती करणे हा लोकप्रिय लेखनाचा हुकमी एक्का बाजूला ठेवत सुबोध जावडेकर यांनी आपली वेगळी वाट चोखाळली. त्यांच्या कथा वैज्ञानिक वातावरणात, पर्यावरणात, समाजात आणि संस्कृतीत घडतात. किंबहुना, त्यांच्या कथांतील घटितांना बऱ्याचदा विज्ञानाचीच पाश्र्वभूमी असते. त्यांच्या कथांतील कळीचा मुद्दा हा बऱ्याचदा वैज्ञानिक प्रगती वा अवनतीचाच असतो. असे असले तरी प्रक्षेपणात त्यांची कथा प्रचंड वेगळा परिणाम साधते आणि म्हणूनच कमालीची यशस्वीही होते. एखाद्या छोटय़ाशा समाजावर, कुटुंबावर वा व्यक्तीवर विज्ञानामुळे बदललेल्या पर्यावरणाचा किंवा भोवतालाचा कसा परिणाम होतो, हे दाखवणाऱ्या जावडेकरांच्या काही कथा निश्चितच उच्च साहित्यिक अभिरुचीचा परिणाम साधतात.
असे असले तरी मराठी- किंबहुना, भारतीय विज्ञानकथा या पाश्चात्त्य विज्ञानकथांच्या तुलनेत अगदीच थिटय़ा पडतात, हे खरेच आहे. बऱ्याचदा भारतीय विज्ञानकथेविषयी उपहास व्यक्त करताना पाश्चात्त्य कथेचे जे उदाहरण दिले जात तेही हास्यास्पदच असते. म्हणजे पाश्चात्त्य विज्ञानकथेत वर्णन केलेला समाज अथवा विज्ञान किंवा तंत्रज्ञान हे भविष्यकालीन समाजाचे तंतोतंत वर्णन असते आणि ते बऱ्याचदा प्रत्यक्षातही येताना आपल्याला दिसते. संगणक, यंत्रमानव, मोबाइल या गोष्टी आज प्रत्यक्षात आलेल्या असल्या तरी आजच्या या प्रगत तंत्रज्ञानाचे चित्रण यापूर्वीच पाश्चात्त्य विज्ञानकथा- लेखकांनी करून ठेवले होते. त्यामानाने आपल्याकडे अगदीच कल्पनादारिद्रय़ आहे, इत्यादी इत्यादी.
मुळात आपल्याकडे कल्पनादारिद्रय़ कधीच नव्हते. कल्पना किंवा प्रतिभा ही तत्कालीन सभोवतालाच्या सहिष्णुतेशीच थेट संबंधित असते. जेव्हा जेव्हा सभोवतालची सहिष्णुता कलेच्या प्रातिभिक लवचीकतेच्या आड येते, तेव्हा तेव्हा कलेचा वा साहित्याचा नाश होतो. निव्वळ मराठी विज्ञानकथेविषयी बोलायचे झाले तर आपला सभोवताल हा या प्रकारच्या साहित्यनिर्मितीसाठी कधीही पोषक नव्हता. सहिष्णुता ही फक्त एखादी गोष्ट स्वीकारण्यापुरता वा सहन करण्यापुरता एक अंगीभूत गुण या अर्थाने मर्यादित न राहता समोर प्रकट होणाऱ्या प्रत्येक गोष्टीनुसार वा कलाकृतीनुसार स्वत:ही उत्क्रांत होत जाणारा गुण असावा. अशा अर्थाने आपला सभोवताल हा पाश्चात्त्यांच्या तुलनेत केवळ विज्ञानकथाच नव्हे, तर सर्वच कला वा साहित्यकृतींबाबत उदासीन राहिला आहे. उत्तम विज्ञानकथा ही तर सभोवतालाकडून अधिक पोषक घटकांची मागणी करते.
ज्या काळात पाश्चात्त्य समाज आणि तिथला सभोवताल नवनवीन वैज्ञानिक शोधांच्या दर्शनाने विस्मयचकित होत होता, ज्या काळात पाश्चात्त्य समाज भविष्यकालीन वैज्ञानिक कुतूहल शमवणाऱ्या विज्ञानकथा डोळे विस्फारून वाचत होता, त्या काळात भारतीय सभोवताल मात्र ‘यात आश्चर्य ते काय? हे सगळे इथे पूर्वीच निर्माण झाले होते!’ या धारणेखाली स्वमग्नतेत बुडून गेला होता. कुतूहल अथवा विस्मयाचा प्रवास हा नेहमी पुढच्या दिशेने असतो. आणि विज्ञानकथा प्रामुख्याने कुतूहलच शमवते.
साहित्य, नाटय़, सिनेमा वा एकुणातच सर्वच कलाविषयक घटकांचा पाश्चात्त्य आणि भारतीय असा तुलनात्मक आढावा घेता भारतीय कलाप्रांत हा पाश्चात्त्य कलाप्रांतापेक्षा नेहमीच किमान शतक-अर्धशतक मागे राहिला. इथे निव्वळ कलावंतांना वा कलानिर्मात्यांना दोष देण्यात अर्थ नाही. कोणत्याही कलाकृतीच्या वैयक्तिक भरभराटीसाठी त्या कलाकृतीचे योग्य रसग्रहण करणारा समाज, त्या कलाकृतीच्या जोपासनेसाठी आवश्यक घटक गरजेचे असतात. या सर्वाना सामायिकरीत्या आपण ‘अभिरुची’ हे नाव दिले, तर निव्वळ कलाकृतीच्या निर्मितीतच नव्हे, तर कलाकृतीविषयक अभिरुचीतही आपला सभोवताल कमालीचा पिछाडलेला आहे असे म्हणावयास हरकत नाही.
आपल्याकडे कल्पनादारिद्रय़ कधीही नव्हते, यापुढेही नसेल; पण कल्पना वा प्रतिभा आणि कलाकृतीची प्रत्यक्ष निर्मिती या दोन वेगळ्या गोष्टी असून, नवी विज्ञानकथा जन्माला यायला हवी असेल तर निव्वळ लेखकाकडून अपेक्षा करून उपयोग नाही. तशा पर्यावरणाची ठोस निर्मितीही व्हायला हवी.
gupterk@yahoo.in