17 November 2017

News Flash

काँग्रेस + डावे = भाजप

संघाच्या कृपेने त्यांच्याकडे डाव्यांसारखेच तळागाळापर्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत

गिरीश कुबेर | Updated: March 19, 2017 3:59 PM

एकेकाळी कॉंग्रेस हा सत्तावादी पक्ष होता. येनकेन प्रकारेन सत्ता मिळवायची आणि ती टिकवून ठेवायची, या तत्त्वावर चालणारा. आज भाजपही तेच करतो आहे. भ्रष्टाचारी आणि गुंडांना पावन करून घेत, वर त्याचे समर्थन करण्याचे धारिष्टय़ भाजपवाले दाखवीत आहेत. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये असलाच तर एकच फरक आहे, तो म्हणजे संघाच्या कृपेने त्यांच्याकडे डाव्यांसारखेच तळागाळापर्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. जे कॉंग्रेसमध्ये सुरुवातीचा काही काळ सोडला तर कधीच नव्हते आणि नाहीत. तशात भाजपने कॉंग्रेसची गरीबकल्याणाची दांभिक भाषाही चलाखीने आत्मसात केली आहे. आणि या भाषेला भुलणाऱ्या भाबडय़ा जनतेची आपल्याकडे कधीच कमतरता नव्हती- आणि नाही. भाजपच्या ताज्या यशाचे हे खरे गमक आहे.

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेक भ्रष्टाचारी, गुंड आदींना भाजपने आसरा देऊन पावन करून घेतले होते. स्वच्छ प्रतिमेसाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी या मंडळींचे वर्णन करताना एक मार्मिक शब्दप्रयोग केला होता.

‘माजी गुंड’ हा तो शब्दप्रयोग! ही मंडळी वादग्रस्त आहेत, गुंड आहेत, हे फडणवीस यांना मान्य होते. परंतु त्यांच्या मते, तो त्यांचा भूतकाळ होता. ज्या अर्थी भाजपने त्यांना स्वीकारले आहे, त्या अर्थी वाल्याचा वाल्मिकी होतो त्याप्रमाणे हे सर्व शुचिर्भूत झाले आहेत असे जनतेने मानावे, हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत- त्यातही विशेषत: उत्तर प्रदेशात- भाजपने जी डोळे दिपवणारी कामगिरी नोंदवली त्यामागे हा सत्ताग्रही नवनैतिकवाद आहे. सध्याच्या सत्योत्तर काळात हा नवनैतिकवाद हे भाजपचे वास्तव असून, एकेकाळी काँग्रेसने ज्याप्रमाणे त्याकाळच्या नवनैतिकवादास जन्म दिला होता, त्याचे हे नरेंद्र मोदीकालीन स्वरूप. त्याकाळी कोणत्याही विचारधारेच्या व्यक्तीस आपल्यात घोळवून आपल्याच पक्षाचा चेहरा त्या व्यक्तीस देण्यात काँग्रेसने नैपुण्य मिळवले होते. सांप्रत काळी भाजपचा प्रवास त्याच दिशेने सुरू आहे. भाजपच्या ताज्या विजयाचा अर्थ लावताना हा मुद्दा समजून घ्यायला हवा.

एकेकाळी काँग्रेस हा पक्ष भिन्न भिन्न विचारधारेच्या निवडून येणाऱ्या नेत्यांचा समूह होता. त्यात डावीकडे झुकणारे, किंबहुना- कडवे डावे मोहन कुमारमंगलम् वगैरे जसे होते त्याचप्रमाणे कडवे उजवे वल्लभभाई पटेल यांच्यासारखेही अनेक होते. समाजवाद्यांचा तर भरणाच होता त्यावेळी काँग्रेसमध्ये. हा काहीएक वैचारिक बांधिलकी मानली जाण्याचा काळ. पुढे सत्तेस सरावल्यानंतर अणि सत्तेची चटक लागल्यानंतर विचारधारांचा एकेक पदर काँग्रेसच्या खांद्यावरून गळत गेला आणि शेवटी एकाच विचारधारेने हा पक्ष बांधला गेला..

सत्तावाद!

या सत्तावादाचे वर्णन ‘सत्तेचा ध्रुवतारा डोळ्यासमोरून हलू द्यायचा नाही!’ असे करता येईल. मग अब्दुल गनीखान चौधरी यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्यास पोसावे लागले तरी हरकत नाही, मुस्लीम लीगसारख्या कडव्या धर्मवादी पक्षाशी शय्यासोबत करावी लागली तरी हरकत नाही, आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्याना रोखण्यासाठी भिंद्रनवाले नावाचा भस्मासुर पोसावा लागला तरी हरकत नाही, अयोध्येच्या वादग्रस्त भूमीतील राममंदिराचे दरवाजे उघडावे लागले तरी पर्वा नाही, वगैरे वगैरे अनेक दाखले देता येतील.. पण सत्ता मिळवायचीच, हे काँग्रेसचे एकमेव ध्येय होते. आणि ते सातत्याने साध्य करण्यातील यशाने त्यास त्या विषयात नैपुण्य मिळाले होते. काँग्रेसच्या या यशास भुलून अनेक सत्तेच्छुक भुंगे या पक्षात येत गेले आणि काँग्रेस त्यांचे स्वागत करीत गेला. काँग्रेसने सर्वपक्षीय वादग्रस्तांना पावन करून घेतले. काँग्रेसवासी झाले की त्यावेळच्या प्रथेप्रमाणे आपोआपच ते निधर्मी गणले जात असत. फरक असलाच तर इतकाच, की आताच्या भाजपप्रमाणे काँग्रेसने त्यांचे वर्णन कधी ‘माजी धर्माध’ वा ‘माजी गुंड’ असे केले नाही.

प्रत्येक पुढची पिढी ही सर्वच बाबतींत मागच्या पिढीपेक्षा अधिक धीट असते. राजकीय पक्षही यास अपवाद नसतात. त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी आपल्या सत्तावादी धोरणांचे हे असे समर्थन करणे जमले नाही. पण भाजपने ते करून दाखवले. गेल्या काही महिन्यांत झालेल्या निवडणुका हे त्याचे उदाहरण. या निवडणुका मग महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या असोत वा उत्तर प्रदेश विधानसभेच्या. भाजपने निवडून येऊ शकतील अशा निवडकांना आपले म्हणण्याचा सपाटा लावलेला दिसतो तो याच सत्तावादाच्या साक्षात्कारामुळे. एकेकाळी पप्पू कलानी यांच्यासारख्यांना काँग्रेसमध्ये घेतले म्हणून आकाशपाताळ एक करणारा भाजप ज्याप्रमाणे त्याच पप्पू कलानीशी सत्तासोबत करू शकला, त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाच्या केशव प्रसाद मौर्य यांनाही भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले म्हटले. इतकेच नाही, तर त्यांच्या हाती उत्तर प्रदेश राज्याची धुरादेखील दिली. असे विविध राजकीय पक्षांतील जिंकू शकतील असे अनेक महत्त्वाचे मोहरे भाजपने ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या त्या ठिकाणी वेचून वेचून टिपले. अमित शहा यांच्या नव्या बेरजेच्या राजकारणाचा हा परिपाक. एकेकाळी काँग्रेस हे

असे बेरजेचे राजकारण करीत असे. परंतु एकापाठोपाठ एक अशा अनेक ठिकाणच्या सत्तांतून काँग्रेसची वजाबाकीच होत गेली. वजाबाकीची प्रक्रिया सुरू असताना बेरीज करता येत नाही. ती करण्यासाठी एका कोणत्या तरी अंकावर थांबावे लागते. असे थांबणे काँग्रेसला अजून जमलेले नाही. दरम्यान, भाजपला हा बेरजेच्या राजकारणाचा मूलमंत्र गवसला आणि हे समीकरण त्या पक्षाने आत्मसात केले.

परिणामी भाजप आज एकेकाळच्या काँग्रेसप्रमाणे ऐन हमरस्त्यातला पक्ष बनला असून, ज्याप्रमाणे महामार्गावरून जाणारी बस अधिक प्रवासी आकर्षित करते, त्याप्रमाणे अन्य राजकीय पक्षांतील विविध प्रवासी भाजप आकृष्ट करू लागला आहे. या दोन पक्षांतील साम्य येथेच संपणारे नाही. आणखी एक महत्त्वाचे साम्य या दोन पक्षांत आहे.

उजव्यांचे भले करायचे, उजवीकडे पाहायचे; परंतु भाषा सातत्याने डावी करायची, डावीकडे पाहायचे, हे काँग्रेसचे आर्थिक धोरण राहिलेले आहे. भाजप बरोब्बर तसेच करताना दिसतो. सत्ता हाती आल्यावर लवकरच हे डावीकडे पाहण्याचे महत्त्व भाजपच्या ध्यानी आले. ‘सूट-बुट की सरकार’ या राहुल गांधी यांनी केलेल्या एकाच आरोपातून भाजपला दिशा सापडली. या देशात गरिबीची भाषा केल्याखेरीज आपला राजकीय खुंटा बळकट करता येणार नाही, हे सत्ताकारणाचे मर्म आहे.

ते म्हणजे आर्थिक! उजव्यांचे भले करायचे, उजवीकडे पाहायचे; परंतु भाषा सातत्याने डावी करायची, डावीकडे पाहायचे, हे काँग्रेसचे आर्थिक धोरण राहिलेले आहे. भाजप बरोब्बर तसेच करताना दिसतो. सत्ता हाती आल्यावर लवकरच हे डावीकडे पाहण्याचे महत्त्व भाजपच्या ध्यानी आले. ‘सूट-बुट की सरकार’ या राहुल गांधी यांनी केलेल्या एकाच आरोपातून भाजपला दिशा सापडली. या देशात गरिबीची भाषा केल्याखेरीज आपला राजकीय खुंटा बळकट करता येणार नाही, हे सत्ताकारणाचे मर्म आहे. इंदिरा गांधी यांना जसे ते गवसले, तसेच ते पश्चिम बंगालात ज्योती बसू आदींनाही उमगले. पश्चिम बंगालातले एक बुद्धदेव भट्टाचार्य वगळता एकजात सर्व डावे हे एका अर्थी वागण्यात कडवे उमरावच होते. सुस्नात कोरे करकरीत धोतर, वरती तितकाच शुभ्र कुडता, एका हातात फ्रेडरिक फोर्सिथ याचे ‘फिस्ट ऑफ गॉड’ आणि दुसऱ्या हातात स्कॉचचा ग्लास असे ज्योतीबाबूंचे प्रस्तुत लेखकाने मुंबईतील अतिआलिशान सप्ततारांकित हॉटेलात घेतलेले दर्शन अजूनही डोळ्यासमोर आहे. त्यांच्या डावेपणाच्या या दिलखेचक दर्शनाने त्यावेळी बसलेला उजवा धक्का पचवायला किती काळ जावा लागला होता याचेही अजून स्मरण आहे. त्यानंतर काँग्रेसमधील डाव्या नाही, पण समाजवादाचा बुक्का लावणाऱ्या अनेकांची भांडवलशाही वृत्ती पुढे अनेकदा अनुभवता आली. तरीही या सर्वाच्या गरीब- कल्याणाच्या भाषेचा सुरुवातीला धक्का बसायचा. नंतर हा विरोधाभास अंगवळणी पडला. भाजपने ही चूक वेळीच सुधारली. त्यामुळे पंगतीला अंबानी, अदानी असले तरी हरकत नाही, सर्व धोरणे त्यांच्या भल्याचीच असली तरी हरकत नाही; पण भाषा मात्र गरीबकल्याणाचीच असायला हवी, हे भाजपला लवकरच उमगले. त्याचमुळे उद्योगस्नेही अशा जमीन हस्तांतरण कायद्याचा प्रयत्न या सरकारने लगेचच सोडला. त्यात सर्वसमावेशक राजवट आणि कार्यक्षम कारभार असूनही २००४ साली अटलबिहारी बाजपेयी यांना पत्करावा लागलेला पराभव भाजपसमोर होताच. त्यावेळी ‘शायनिंग इंडिया’ या एकाच घोषणेने भाजपचा घात केला. ती चूक विद्यमान भाजपला टाळायची होती. ती त्यांनी टाळली.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे निश्चलनीकरणाच्या निर्णयाला नरेंद्र मोदी यांनी यशस्वीपणे फासलेला गरीबकल्याणाचा चुना. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्याने काळा पैसा नष्ट होऊन जणू गरीबांचे कल्याणच होणार आहे, ही कथा मोदी यांनी इतक्या उत्तमपणे या देशातील भाबडय़ांच्या गळी उतरवली, की त्यांच्या विक्रीकौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मुदलात या देशातल्या बहुसंख्य जनतेचे आर्थिक ज्ञान बेतासबात. त्यात गरीब, पिछडे वगैरे भाषा केली की हा वर्ग हमखास भुलतो, हे ऐतिहासिक सत्य. या सत्याच्याच वास्तवदर्शी जाणिवेने गरीब, पिछडय़ांची भाषा करणाऱ्या मायावती धनाढय़ांनाही लाजवतील असे श्रीमंती आयुष्य जगू शकतात; आणि याच सत्याच्या अंगीकारामुळे मोदींची नोटाबंदीची नजरबंदी बहुसंख्यांना आंधळी करते. गरीब आणि श्रीमंत यांतील दरी वाढवणे आणि आपल्या निर्णयांमुळे श्रीमंतांच्या पोटाला चिमटा बसत असल्याचे वातावरण निर्माण करणे, हे आपल्याकडे हमखास राजकीय यशामागील सूत्र असते. संस्थानिकांचे तनखे बंद, बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि त्यावर ‘गरिबी हटाव’ ही दिलखेचक घोषणा यामुळे इंदिरा गांधी बराच काळ यशस्वी ठरल्या. जनधन, निश्चलनीकरण आदींमुळे मोदी यशस्वी ठरत आहेत. या अशा भुलवणाऱ्या यशाची पुनरावृत्ती का होते, यामागे एक महत्त्वाचे कारण आहे.

ते म्हणजे- या देशात संपत्तीनिर्मितीला महत्त्व नाही. त्यामुळे गरिबीचे उदात्तीकरण आणि ती हटवण्याची भाषा यांस महत्त्व येते. त्याचमुळे ‘गरिबी हटाव’ ही नकारात्मक घोषणा या देशातील सर्वात लोकप्रिय घोषणा ठरते. आणि त्याचमुळे काळा पैसा हटवण्याची भाषा आजही आकर्षक ठरते. म्हणजेच काहीतरी निर्माण करण्यास महत्त्व देण्यापेक्षा काहीतरी हटवणे हे आपल्याकडे अधिक फलदायी ठरते- हे ऐतिहासिक सत्य आहे. मोदी यांना ते लवकरच उमगले. त्याचमुळे कोणत्याही लक्षणीय आर्थिक सुधारणा, निर्गुतवणूक आदी न करता निश्चलनीकरण हेच या सरकारचे मोठे आर्थिक भाष्य.. ‘स्टेटमेंट’ या अर्थाने.. होते. मोदी आणि त्यांचे आंधळे भक्त म्हणतात त्याप्रमाणे हे निश्चलनीकरण इतके प्रभावी अस्त्र असते तर त्यानंतरच्या सर्व निवडणुकांत पैशाचा असा नंगा नाच दिसता ना! निवडणूक आयोगाचीच आकडेवारी दर्शवते की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत किमान तिप्पट रोकड पकडली गेली. तीदेखील निश्चलनीकरण ताजे असताना. हा सर्व पैसा पांढराच आहे, यावर विश्वास ठेवणे हे आंधळ्या भक्तांचे प्राक्तन असेल; परंतु किमान विचारी जनांनी तरी या सत्यापलापाकडे का दुर्लक्ष करावे? विद्यमान वातावरणात या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा बाळगणे दूरच; परंतु हा प्रश्न विचारणेदेखील धाष्टर्य़ाचे ठरते. तेव्हा या सर्व दाखल्यांवरून भाजप हा नवा काँग्रेस पक्ष ठरतो, हे मान्य व्हावे. तथापि जे काँग्रेसकडे नव्हते अािण डाव्यांकडे होते, ते सध्याच्या भाजपकडे आहे.

भाजपाच्या यशाचे मोठे श्रेय जाते ते निश्चलनीकरणाच्या निर्णयाला नरेंद्र मोदी यांनी यशस्वीपणे फासलेल्या गरीबकल्याणाच्या चुन्याला. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्याने काळा पैसा नष्ट होऊन जणू गरीबांचे कल्याणच होणार आहे, ही कथा मोदी यांनी इतक्या उत्तमपणे या देशातील भाबडय़ांच्या गळी उतरवली, की त्यांच्या विक्रीकौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मुदलात या देशातल्या बहुसंख्य जनतेचे आर्थिक ज्ञान बेतासबात. त्यात गरीब, पिछडे वगैरे भाषा केली की हा वर्ग हमखास भुलतो, हे ऐतिहासिक सत्य.

कार्यकर्त्यांचे बळ. काँग्रेस हा त्या अर्थाने कधीच कार्यकर्ताधारित.. म्हणजे काडरबेस्ड.. पक्ष नव्हता. एका कुटुंबाभोवती फिरणाऱ्या तगडय़ा नेत्यांच्या मध्यवर्ती नेतृत्व मंडळाने निवडणुका जिंकून द्याव्यात आणि त्यातून मिळालेल्या सत्तेतून खालच्या पायरीवरील अनेकांच्या शिध्याची व्यवस्था करावी- अशी या पक्षाची रचना. वरून खाली असे जोपर्यंत शिधावाटप होत होते तोपर्यंत ही उतरंड व्यवस्था उत्तम चालली. कालौघात ही व्यवस्था जसजशी अशक्त होत गेली, तसतसे तळाच्या पायऱ्यांतील लाभदायी काँग्रेसला सोडून जाऊ लागले. तसेही ते काही कोणत्या विचारधारेने त्या वळचणीखाली जमले होते असे नाही. त्यांच्या जमण्यामागे वरून मिळणारा शिधा हे एकमेव बांधून ठेवणारे कारण होते. शिधावाटप संपल्यावर या तळाच्या मंडळींना बांधून ठेवणारा घटकच नाहीसा झाला.

मग हा वर्ग भाजप आदी पक्षांकडे आकृष्ट होऊ लागला. भाजपने त्यांना सामावून घेतले. पण त्याचवेळी भाजपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून बांधल्या गेलेल्या कार्यकर्त्यांचा जथ्थाचा जथ्था तयार होता. हा संघीय जथ्था डाव्या पक्षांकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांइतकाच तगडा, बांधीव होता. त्यांच्या जोडीला भाजपत हा अन्यपक्षीय कार्यकर्त्यांचा घोळका जमा होऊ लागल्यावर या पक्षाच्या आणि मूळ पिठाच्या- म्हणजे संघाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दोघांची एक मोट बांधली. काँग्रेसच्या कथित निधर्मीवादाला भुलून दलित, मुसलमान, अल्पसंख्य आदी त्या पक्षाकडे वळले होते. भाजप आणि संघाने मग माळी, धनगर आदी अन्य मागासांना.. म्हणजे ओबीसींना.. आपल्याकडे वळवले. कल्याणसिंह, गोपीनाथ मुंडे, उमा भारती ते नरेंद्र मोदी ही ओबीसी नेत्यांची फळीच्या फळी त्या पक्षात तयार झाली, त्यामागचे हे कारण.

काँग्रेस आणि भाजप यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे हे या पक्षाने ठरवून केले. काँग्रेसला हे जमले होते ते सत्तास्थानामुळे. परंतु या अशा बांधून ठेवायच्या कार्यकर्त्यांचे महत्त्व काँग्रेसने कधीच लक्षात घेतले नाही. त्यामुळे संघटनात्मक बांधणी अशी त्या पक्षाची कधीच झाली नाही. या बांधणीचे महत्त्व ओहोटी लागली की कळते. ज्या वेळेस भरती असते त्यावेळी काहीही न करणाऱ्या निष्क्रियांची नावदेखील आपोआप उचलली जाते. प्रश्न ओहोटीच्या वेळचा असतो. तो आता काँग्रेसला भेडसावत आहे. हमखास निवडून देणारे नेतृत्व असले तर मतदान केंद्रनिहाय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे महत्त्व जाणवत नाही. ते जाणवते हमखास निवडून देण्याची क्षमता असणारे नेते काळाच्या पडद्याआड गेल्यावर! परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आणि एव्हाना जे काही जमलेले तळाचे कार्यकर्ते असतात, तेदेखील सोडून गेलेले असतात. डाव्यांकडे, काँग्रेसकडे आज काही ठिकाणी नेते आहेत, तर तळाचे कार्यकर्ते नाहीत. तर काही ठिकाणी तळाचे कार्यकर्ते आहेत, पण नेते नाहीत असे चित्र आहे. भाजप तूर्त हे दोन्हीही राखून आहे. त्याचमुळे सध्याचा भाजप हा काँग्रेसचे धर्मवादी स्वरूप आणि डाव्यांचे संघटनकौशल्य यांचे मिश्रण ठरतो.

तर असे हे सध्याचे आपले राजकीय वास्तव आहे. भारतीय जनतेचा उत्कलन बिंदू बराच वरचा आहे. त्यामुळे या जनतेचा भ्रमनिरास व्हायला बराच वेळ लागतो. गेल्या सत्तर वर्षांत यात काही फार फरक झालेला आहे असे नाही. या निवडणुकांनी हेच वास्तव दाखवून दिले आहे.

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on March 19, 2017 1:30 am

Web Title: congress left bjp and narendra modi