आपलं नेहमीचं वर्तुळ आणि कम्फर्ट झोन सोडायचा म्हटलं की माणसाला नको वाटतं. तो साशंक होतो. ती ऊब सोडायला नको वाटते. मग ते वर्तुळ कुटुंब आणि गाव यांच्याएवढं छोटं असो, की समाज आणि देश इतकं मोठं! पण ते सोडून जावं तर लागतं. एवढंच नाही, तर तिथे टिकूनही राहावं लागतं. अलीकडे तर कधी नव्हे एवढं हे चलनवलन वाढलेलं आहे. ‘जागतिक खेडे’ (ग्लोबल व्हिलेज)चा बोलबाला झाल्यापासून कित्येकांची पावलं शिक्षणाच्या आणि नोकरीधंद्याच्या निमित्तानं परकीय भूमीवर स्थिरावू लागली आहेत. तिथल्या लोकांशी नुसताच संपर्क नव्हे, तर त्यांच्याबरोबर राहायचं असतं, त्यांच्यात मिसळून कामही करायचं असतं. अशावेळी फक्त तुमचं कामातलं कौशल्य आणि त्या देशाचं भौगोलिक ज्ञान एवढंच पुरं पडत नाही. प्रत्येक देशातली परिस्थिती वेगळी. तिथला माणूस, त्याची जडणघडण, त्याच्या सवयी, खाणंपिणं, चालीरीती, त्याचे समज, त्याचे अभिमानिबदू आणि रागाचे विषय हे सगळं समजून घेता आलं तरच तुमची वाटचाल सोपी होते. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष होऊन सांस्कृतिक घोडचुका झाल्या तर मात्र खैर नसते. अशी वेळ येऊ नये यासाठी वेगळे प्रयत्न आपल्याला उन्मेखून करावे लागतात.
नेमकी हीच गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणारी एक पुस्तकमालिका राजहंस प्रकाशनानं प्रसिद्ध केली आहे.. ‘कल्चर शॉक’ या नावानं. आणि त्याचं संयोजन-संपादन केलं आहे वैशाली करमरकर यांनी! या मालिकेच्या पहिल्या संचात जर्मनी, जपान आणि आखाती देश या तिन्हींतील संस्कृतीची ओळख करून देणारी साधारण १४० पानांची छोटेखानी तीन पुस्तकं आहेत.
विषयाच्या सादरीकरणापासून ते मांडणीपर्यंत संपादकीय कौशल्याला दाद द्यावी अशीच ही पुस्तकं आहेत. भारत आणि जर्मनी यांच्या संस्कृतीतले रंग समजावून सांगणाऱ्या ‘संस्कृतिरंग’ या पुस्तकामुळे वैशाली करमरकर हे नाव वाचकांना परिचित आहे. जर्मन भाषा आणि संस्कृती यांचा विशेष अभ्यास असल्यानं भारत-जर्मनी संयुक्त व्यवसाय प्रकल्पांमध्ये ‘सांस्कृतिक विशेषज्ञ’ ही भूमिका त्या बजावतात. त्यामुळे ही मालिका त्यांनी संपादित करणं याला विशेष महत्त्व आहे.
परकीय भूमीवर ‘हे काय बुवा भलतंच?’ असं म्हणून आपले डोळे विस्फारू नयेत, म्हणजेच सांस्कृतिक धक्का बसू नये म्हणून या पुस्तकांची योजना! तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही तर विलक्षण मानसिक ताण येतो. स्वत: वैशाली करमरकर यांनी ‘कल्चर शॉक- जर्मनी’ या पुस्तकात जर्मन संस्कृतीचे धागे अतिशय हळुवारपणे, समर्पक उदाहरणं देत उलगडून दाखवले आहेत. आवश्यक तिथे संशोधनाचे दाखले दिले आहेत. भारतातील सारखी कुणाला तरी विचारून काम पुढे नेण्याची पद्धत, पाहुणचाराच्या कल्पना, स्वच्छतेतील चालढकल अशा गोष्टींमुळे विचित्र प्रसंग ओढवू शकतात. जर्मन लोकांच्या थेट आणि काहीशा तुसडय़ा स्वभावाविषयी बोलताना ‘इथे जागोजाग असे ‘अंतु बर्वे’ भेटतात’ असं लेखिका खेळकरपणे सांगते. वैशाली करमरकर यांच्या सहज लेखनशैलीचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. नेमकं, सोपं आणि प्रसन्न मराठी त्या वापरतात. त्यांच्या भाषेला डौल आहे. आपल्याकडे हल्ली एक सरधोपट, रंगरूप बिघडलेली आणि मराठीची लय नसलेली कोरडी भाषा बऱ्याच वेळा वाचायला मिळते. विशेषत: माहितीपर पुस्तकांमध्ये. इथे मात्र भाषेमुळे पुस्तकातल्या आशयाची रंगत वाढली आहे.
युरोप आणि त्यातील जर्मनी यांचा इतिहासही हे पुस्तक सांगतं. जर्मनी म्हटलं की हिटलर आणि त्याचा उदयास्त एवढंच ढोबळपणे डोळ्यांसमोर येतं. पण तिथला विवेकवाद, जगाला आश्चर्यानं तोंडात बोट घालायला लावणारं मोठय़ा कष्टानं त्यांनी साध्य केलेलं ‘इकॉनॉमिक मिरॅकल’ यांचे धागेदोरे त्या हुडकून दाखवतात. विशेष म्हणजे त्याकडे बघायची मर्मदृष्टी देतात. संस्कृती ही काही एका रात्रीत किंवा ५०-१०० वर्षांत तयार होत नाही. शतकानुशतकांचा इतिहास त्याला असतो. त्यातून त्या देशांतल्या माणसांच्या धारणा, समज घडत जातात.
जपानवरचं पुस्तक लिहिलं आहे निसीम बेडेकर यांनी. त्यांना तर टोकिओला राहून जपानी भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठीच शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे त्यांची निरीक्षणे ही तिथे फक्त कामानिमित्तानं राहणाऱ्यांपेक्षा अधिक ठोस पायावर उभी आहेत, संस्कृतीचा मूल्यतळ दाखवणारी आहेत, हे वेगळं सांगायला नको. ‘सात वेळा पडलात तर आठ वेळा उठा’ या वचनातून जपानी माणसाची मनोवृत्ती नेमकी उभी राहते. भौगोलिक एकाकीपणा आणि सांस्कृतिक आत्मकेंद्रितता यामुळे परदेशी लोकांना फारसे समजून न घेणे, त्यांच्या मनाची किंवा सूचनांची फारशी पर्वा न करणे या गोष्टी जपानी लोकांमध्ये बऱ्याचदा दिसतात. जपानच्या भौगोलिक तुटलेपणामुळे जपानी लोकांमध्ये एकसंधपणाची भावना दृढ झाली. त्यांच्या आपापसात लढाया झाल्या असल्या तरी त्यांनी परकीयांशी हातमिळवणी करून स्वकीयांचा विश्वासघात केल्याचे उदाहरण इतिहासात शोधूनही सापडत नाही. अशा निरीक्षणांतून जपानी माणूस कळायला मदत होते.
जपानी माणसाचे भारत आणि भारतीय समाज यांच्याबद्दलचे काय समज आहेत, त्यांना कशाबाबत कुतूहल आहे, हे सांगताना लेखक म्हणतो की, ‘तुमची जात वरची की खालची?’ असा एखादा प्रश्न भारतीय व्यक्तीला अपमानास्पद वाटू शकतो; पण त्यांचा तसा हेतू अजिबात नसतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. त्याचबरोबर जपान हा ‘उभ्या नात्यां’चा म्हणजे- वय, ज्येष्ठता, पद यांना महत्त्व देणारा असल्यानं समोरच्या व्यक्तीचे वय आणि पद लक्षात घेऊन शिष्टाचार पाळणे हे तिथे महत्त्वाचे ठरते. शिष्टाचाराचा भंग किंवा दुर्लक्ष ही जपानी समाजात अक्षम्य गोष्ट समजली जाते. इथली शहरं स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित आहेत. इथे व्यक्तीपेक्षा गटाला असलेलं महत्त्व, सर्वत्र फक्त जपानी भाषेचाच वापर, कमालीचा काटेकोरपणा आणि जिव्हाळ्याचा अभाव, रोखठोक बोलण्यापेक्षा संदिग्ध आणि सूचक बोलण्यावर असलेला भर.. असे दाखवून दिलेले अनेक जपानी संस्कृतीविशेष वाचकाचं जपानमधलं वास्तव्य नक्कीच सुकर करतील. निसीम बेडेकरांनी अभ्यासपूर्ण रीतीनं जपानी संस्कृती वाचकांपुढे ठेवली आहे.
आखाती देशांवर लिहिलं आहे विशाखा पाटील यांनी. तेलामुळे तिथे आलेला पसा, तिथली कट्टर संस्कृती, महिलांसाठी अबया आणि हिजाब, तिथले कठोर कायदे याचं एक दडपण आपल्यावर असतं. मात्र, तिथल्या माणसाची जडणघडण कळली तर त्याला तोंड देणं सोपं होतं. अनेक रीतिरिवाज, प्रतीकांचे अर्थ, आखाती-अरबी बोली, संस्कृतीतले विरोधाभास अशा गोष्टींमधून तिथली ओळख वाचकाला होत राहते. आखाती देशांबद्दलचे आपले अनेक गरसमजही हे पुस्तक दूर करतं.
या मालिकेतल्या तिन्ही पुस्तकांचा ढाचा सारखा ठेवला आहे. पुस्तकांच्या शेवटी एक ‘कल्चर क्वीझ’ आहे. शिवाय ‘हे आवर्जून करावे’ आणि ‘हे आवर्जून टाळावे’ असे कानमंत्र देणारं एक कार्ड आहे. त्यामुळे या पुस्तकांचं उपयुक्तता मूल्य वाढतं. उदाहरणार्थ, ‘जपानमध्ये चीन किंवा कोरियाची अति प्रशंसा करू नका’, ‘भाताच्या वाडग्यात चॉपस्टिक्स कधीही उभ्या खोचू नका’ किंवा जर्मनीमध्ये ‘संभाषणात हिटलर किंवा दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख करू नका’, ‘घरात सर्व भारतीय मंडळींची पार्टी ठेवली असल्यास शेजाऱ्यांना त्याची किमान आठ दिवस आधी कल्पना द्या,’ इत्यादी.
आजचं जग असं आहे की, तरुणांना तुम्ही कुठलीही गोष्ट विचारा, ते लगेच गुगल सर्च मारून क्षणार्धात त्याबद्दलची माहिती काढतात. त्यामुळेच नुसती माहिती देणारी पुस्तकं आता कालबा झाली आहेत. माहितीपेक्षा मर्मदृष्टी मिळणं, माहितीचे धागेदोरे गुंफून त्यातून काहीएक सूत्र तयार करणं, त्याला अनुभवांची जोड असणं हे आज महत्त्वाचं ठरतं आहे. या कसोटीवर ही पुस्तकं बरीचशी उतरतात. मार्गदर्शन व मदत करणारी असली तरी ती ‘सेल्फ हेल्प’ जातीच्या पुस्तकांच्या पलीकडे जातात, हे त्यांचं यश आहे. ज्यांना या देशांत जायचं आहे त्यांना ती उपयोगी पडतीलच, पण ज्यांना तिथे जायचं नाही त्यांनाही एखादी संस्कृती का आणि कशी घडत जाते, याची वाचनीय झलक इथे मिळते. मुखपृष्ठाबाबत मात्र ही पुस्तकं थोडी निराशा करतात. डोळे विस्फारलेल्या मुलाचा थेट फोटो टाकण्याऐवजी दुसरं काही करता आलं असतं का, हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
‘कल्चर शॉक- जर्मनी’, ‘कल्चर शॉक- जपान’, ‘कल्चर शॉक- आखाती देश’, संयोजन-संपादन : वैशाली करमरकर, राजहंस प्रकाशन, किंमत- प्रत्येकी १५० रुपये.
संध्या टाकसाळे  sandhyataksake@gmail.com