News Flash

मिश्कीलीच्या मिषाने.. : हा देश सुधारायला कोर्टच उपयोगी पडणार!

पहाटे पहाटे फार छान स्वप्ने पडतात, असे परवा कुठे तरी वाचनात आल्याने मी हल्ली पहाटे लवकर उठतो.

प्रिय तातूस,
पहाटे पहाटे फार छान स्वप्ने पडतात, असे परवा कुठे तरी वाचनात आल्याने मी हल्ली पहाटे लवकर उठतो. स्वप्नाचे जाऊ देत, पण इतकं निवांत असतं की काय काय विचार डोक्यामध्ये येत राहतात. मला तर असं वाटतं, की अनेक कार्यालये पहाटे उघडली तर किती एकाग्रतेने सगळे काम करतील. आपले ऋ षीमुनी पहाटे लवकर उठायचे म्हणून त्यांनी एवढे ग्रंथ वगैरे लिहिले. त्या काळी खरे तर टाइपराइटर असते तर याहून अधिक मोठय़ा प्रमाणावर ग्रंथ लिहून झाले असते. मला तर सुरुवातीला पहिल्यांदा या सर्व गोष्टी कशा काय सुचल्या असतील याची गंमत वाटत राहते. अगदी पहिला बापट किंवा तावडे या जगाच्या पाठीवर कोण असेल आणि त्याला हेच आडनाव कसे घ्यावेसे वाटले असेल? अगदी नदीलादेखील पहिल्यांदा आपण कुठल्या दिशेला वहात जायचे हे कसे सुचले असेल? वळायचे कुठे, खाली कुठे उतरायचे असे माझे चिंतन चालू असते. मला नेहमी असे वाटत असते, की आपण तत्त्वज्ञान विषय घ्यायला हवा होता. परवा इथे एका तत्त्वज्ञाची छान मुलाखत झाली. प्रत्येक सोसायटीतून एकाला निमंत्रण होते. मी कुठलीही गोष्ट विचारपूर्वक आणि गांभीर्याने करत असल्याने सर्वानी माझे नाव सुचवले.
‘अरे तातू, वाजलेत किती?’ असे कोणी विचारले तरी मी एकदम उत्तर देत नाही. उतावीळपणे लगेच सांगितले तर त्याचे महत्त्व राहत नाही. ‘तुम्हाला कशासाठी वाजलेत किती हवेय?’ इथपासून मी त्यांना त्यांचे नाव वगैरे सर्व विचारपूस करून मगच उत्तर देतो. अगदी राँग नंबरचा फोन आला तरी मी त्यांची व्यवस्थित विचारपूस करतो. निव्वळ राँग नंबरशी बोलल्याने माझ्या असंख्य ओळखी झाल्यात. तर सांगायचा मुद्दा असा, की त्यांनी हल्ली अ‍ॅस्ट्रो फिजिक्समध्ये नवीन नवीन शोध लागतायत आणि त्याची परिणती म्हणजे ‘टाइम’ अस्तित्वातच नाही असा शोध लागतोय, असे सांगितल्याने मी घाबरूनच गेलो. जे समोर दिसते आहे ते नाहीए वगैरे म्हटल्याने तर माझा गोंधळच झाला. म्हणजे समोर बटाटे वडे दिसतायत आणि बटाटे वडे नाहीत असे म्हटल्याने आपण मेंटलच ठरणार. आता छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे बोरीबंदरला ‘टाइम’ अस्तित्वातच नाही म्हटले तर मग सगळ्या स्टेशनातल्या इंडिकेटरचे काय होणार आणि संध्याकाळी गर्दी केलेल्या हजारो कारकुनांनी आता कुठे जावे, अशी म्हणायची वेळ येणार. मागे एकदा एका बिल्डरची साठी होती आणि माझे आमच्या वॉर्डमध्ये थोडे नाव असल्याने मलाही भाषण करायला लावले. त्यात मी त्यांचा गौरव करताना ‘मा. अप्पासाहेबांनी घरे बांधली म्हणून, अन्यथा ऑफिस सुटल्यावर ही कारकून मंडळी कुठे गेली असती,’ असे म्हटल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. असो.
हल्ली सगळीकडे स्त्री-पुरुष समान हक्कांचे वातावरण आहे. पण काकूचे म्हणणे सगळ्या देवांची सध्या साडेसाती सुरू आहे. नाना परवा गावी गेला होता तिथे देव इतका कडक आहे की चोऱ्या होत नाहीत त्यामुळे कुठेही दरवाजेच नसतात. अगदी बँकेचे लॉकरदेखील उघडे असतात म्हणे! आपल्या देशात खरे तर पर्यटनासाठी अशा कितीतरी जागा आहेत. हल्ली सगळीकडे संगीताचे महोत्सव चालू आहेत. खरे तर पूर्वीसारखं मला हल्ली ऐकू येत नाही. त्यामुळे घरातले सगळेच माझ्यावर ओरडत असतात. माझं एक सोड, पण मी म्हणतो ऐकू धड येणाऱ्या लोकांनी तरी असे काय दिवे लावलेत? तर सांगायची गंमत म्हणजे- बुवा गात होते आणि तान घेता घेता बुवांना एकदम जांभई आली म्हणून त्यांनी मागच्या साथीदाराला हात केला, तर तो शिष्य इतका आज्ञाधारक की त्याला वाटले बुवांची जांभई आपण पुढे न्यायचीय म्हणून त्यानेही जांभई दिली. असो. मला संगीत आवडते. कारण साहित्यात कसं पुरोगामी साहित्य, प्रतिगामी साहित्य असतं तसा संगीतात भेदाभेद नसतो. आणखी शंभर-दोनशे वर्षांनीदेखील सारंग राग हा सारंगच राहणार आणि तो कुणीही ऐकावा. म्हणून तातू, संगीत बघ हजारो वर्षे टिकून आहे. पण संगीताला मेहनत करावी लागते. त्यामुळे मला ते जमणे कठीण वाटते. खरे तर इतके गोड वाटत असूनही आपण त्याला राग का म्हणतो काही कळत नाही.
मध्यंतरी काही वर्षे डान्स बार बंद असल्याने खरे तर अनेकांच्या पोटावर पाय आला होता. आता कोर्टानेच परवानगी दिल्याने बार पुन्हा सुरू झालेत. पूर्वी तिथे काय काय गोष्टी चालायच्या ते आपला दत्ता सांगायचा. पण मी काही त्यावेळी तिकडे फिरकलो नाही. पण आता कसं कडक नियम आणि आचारसंहिता घालून दिल्याने मी हिला घेऊन डान्सबारमध्ये गेले होतो. अर्थात तो शाकाहारी डान्सबार होता त्यामुळे आम्हाला आवडला. तातू तुला खरं सांगतो, आम्ही आत गेल्यावर त्या सगळ्या बारबालांनी आम्हा दोघांनाही अगदी वाकून नमस्कार केला. याला म्हणतात संस्कार! मला एकदा त्यांच्या पाठीवरून हात फिरवावासा वाटला. परंतु नियमाप्रमाणे अंतर ठेवावयाचे असल्याने मी सावध झालो. प्रथम आम्हाला अमृत कोकम घेणार की थंड पन्हे घेणार विचारल्यावर आम्ही कशाला, त्याला म्हणालो. पण ते फ्री आहे कळल्यावर उगाचंच नाही म्हणालो असे वाटले. आम्हाला खुर्चीत बसवल्यावर आमचे दोन्ही हात खटक्यासारखे लॉक झाले. त्यामुळे आम्ही कुठे कुणाला हात लावण्याचा प्रश्नच आला नाही. ‘थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा’ असे सुरुवातीलाच लावणीच्या अंगाने गाणे म्हटले ते आवडले, पण हात बांधलेले असल्याने टाळ्या वाजवता आल्या नाहीत. दोन तास इतके छान गेले सांगू! पुढच्या वेळी आम्ही वाडीतल्या मुलांनादेखील घेऊन जाऊ या असा विचार करतोय. हल्ली न्यायालय सगळ्या गोष्टीत इतके लक्ष घालते की मी हिला म्हटले, एखादे वेळी भाजीत मीठ जास्त पडले किंवा भाकरी करपली तर सरळ कोर्टात जाईन अशी ताकीद देतो. शेवटी हा देश सुधारायला कोर्टच उपयोगी पडणार असं वाटते. तू इकडे आल्यास आपण दोघेही डान्सबारमध्ये जाऊ. असो.
तुझा,
अनंत अपराधी
अशोक नायगावकर – ashoknaigaonkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2016 2:00 am

Web Title: court decision useful for improve country
Just Now!
X