दया डोंगरे

‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मला मिळाली. माझ्या आठवणीप्रमाणे गिरगावातील साहित्य संघ मंदिरात आमच्या या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते. धि गोवा हिंदूू असोसिएशनचे ‘बिऱ्हाड बाजले’ हे नाटक मी केले होते. रत्नाकर मतकरीलिखित या नाटकाचे दिग्दर्शन दामू केंकरे यांचे होते. त्याअगोदर मी, सई परांजपे,अरुण जोगळेकर, विश्वास मेहेंदळे आम्ही नवी दिल्ली येथे ‘नांदा सौख्यभरे’ या नाटकाचे काही प्रयोग केले होते. साहित्य संघ मंदिरातही या नाटकाचे दोन प्रयोग झाले होते. या प्रयोगाला दामू केंकरे, विजय तेंडुलकर आदी मंडळी आली होती. या नाटकात मला एक गाणेही होते. दरम्यान, ‘लेकुरे’ पुन्हा नव्याने रंगभूमीवर आणावे अशी कल्पना  धि गोवा हिंदूू असोसिएशनचे रामकृष्ण नायक यांच्या डोक्यात घोळत होती. ‘बिऱ्हाड बाजले’, ‘नांदा सौख्यभरे’मुळे माझे नाव एव्हाना परिचित झाले होते. दामू केंकरे यांनी माझे काम पाहिले होते.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

त्यांनी ‘लेकुरे’तील ‘मधुराणी’च्या भूमिकेसाठी

मला विचारणा केली. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या या नाटकात मला काम करण्याची संधी मिळत होती. त्यात ‘धि  गोवा हिंदू असोसिएशन’सारखी मातब्बर संस्था! त्यामुळे मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मी होकार दिला. या नाटकात ‘मधुराणी’ला काही गाणी आहेत. यातील सर्वच गाण्यांच्या ‘ट्रॅक’चे ध्वनिमुद्रण अगोदर झालेले होते. मूळ नाटकात ती गाणी लावली जात होती. पण यातील शेवटच्या ‘किती गोड गोड बाळ जसे कमल उमलले’ या गाण्याची पट्टी खूप वरची होती. त्या पट्टीत मी गाऊ शकले नसते. म्हणून या गाण्याचा ट्रॅक जरा खालच्या पट्टीत पुन्हा ध्वनिमुद्रित करण्याची मी विनंती केली आणि तसे करण्यात आले. श्रीकांत मोघे आणि कल्पना देशपांडे यांचे मूळ नाटक मी दिल्लीला पाहिले होते. मध्यांतरात मी श्रीकांतला भेटायला गेले. आणखी काही वर्षांनतर आपल्याला या नाटकात मुख्य भूमिकेत काम करायला मिळेल असे तेव्हा माझ्या ध्यानीमनीही नव्हते. पण पुढे तो योग जुळून आला.

‘लेकुरे’च्या मूळ प्रयोगाचे दिग्दर्शन मो. ग. रांगणेकर यांनी केले होते. नव्याने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणायचे ठरले तेव्हा नाटकात मी वगळता अन्य कलाकार मूळ नाटकातलेच होते. मीच तेवढी नवी होते. त्यामुळे माझ्याकडून नाटक बसवून घेणे आणि मला ते समजावून देण्याचे काम भिकूपै-आंगले यांनी केले. नाटकातील ध्वनिमुद्रित गाण्यांवर माझा सराव करून घेण्यात आला. सर्व कलाकारांसह गोवा हिंदू असोसिएशनच्या कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत आमच्या तालमी चालायच्या. दोन महिने तालमी झाल्यानंतर नाटकाचे प्रयोग सुरू झाले. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही नाटकाचे प्रयोग केले. पुसद या गावी तर एका मोठय़ा गोठय़ात सेट लावून आम्ही प्रयोग केल्याचेही आठवते. शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –

‘मी बोलले तर होते वाईट,

पण आहे का यांना त्याचे काही,

तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई

यांना माणसांची पारखच नाही..’

असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या  प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी  त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला.  नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता. येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता.

पण आता चित्र बदलले आहे.‘लेकुर’ने मला काय नाही दिले? मला सर्व काही दिले! या नाटकामुळे मला यश, प्रसिद्धी मिळाली. माझे नाव होऊन व्यावसायिक रंगभूमीवर मी प्रस्थापित झाले. या नाटकामुळेच मला व्यावसायिक रंगभूमीवर अन्य नाटके मिळाली. त्यामुळे ‘लेकुरे’ हा माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड असून माझ्या नाटय़प्रवासात या नाटकाला महत्त्वाचे स्थान आहे.

((   श्रीकांत मोघे आणि दया डोंगरे  ))