धीरेन्द्र सिंह जफ़ा या भारतीय लढाऊ वैमानिकानं लिहिलेल्या ‘डेथ वॉज नॉट पेनफुल’ या विलक्षण मूळ इंग्रजी पुस्तकाचा वर्षां गजेंद्रगडकर यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. ‘युद्धस्य कथा’ कितीही रम्य असल्या तरी युद्धामध्ये इतर अनेक ठिकाणी घडत असलेल्या कथाही तेवढय़ाच रोमांचकारक आणि हृदयस्पर्शी असू शकतात, हे या पुस्तकानं सिद्ध केलं आहे.

या पुस्तकातल्या कहाण्या १९६५ सालचे भारत-चीन युद्ध, आणि मुख्यत: १९७१ सालचे भारत-पाक युद्ध यासंबंधीच्या आहेत. म्हणजे या गोष्टी घडल्या त्याला आता साडेचार दशकांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात जगभरात युद्धतंत्र, युद्धसामग्री आणि युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांत कमालीचा फरक पडलेला आहे. युद्धकैदी, जखमी व्यक्ती यांना जी वागणूक देण्यात येते, त्यासंबंधी संयुक्त राष्ट्रांनी अनेक कायदे-नियम जगभरात लागू केले आहेत. अर्थात, ते पाळले जातातच असं काही आपण भारतीय तरी म्हणू शकत नाही. याचे कारण आपल्याला नुकतेच आलेले शेजारी राष्ट्राच्या वर्तणुकीचे भीषण अनुभव.

हे पुस्तक विलक्षण ठरण्याचं कारण हेच की, इतकी वर्षे उलटली असली तरीही या कहाण्या मात्र अजूनही तेवढय़ाच वाचनीय आणि उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. या सर्व कहाण्यांमध्ये एक मानवीय अंश सातत्यानं आढळतो आणि तेच या कथांना एकमेकींशी जोडणारं सूत्र आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लेखक धीरेन्द्र सिंह जफ़ा यांची कमालीची सौम्य, माणुसकीची, सहिष्णु आणि विशेष म्हणजे विचार करण्याची वृत्ती.

जफ़ा यांना आलेल्या पाकिस्तानी तुरुंगातल्या अनुभवांवरून वाचकाला त्यांच्या या वृत्तीचं विशेष दर्शन होतं. सर्वसामान्य पाकिस्तानी माणूस जखमी व्यक्तीला- मग तो शत्रू सैनिक असला तरी किती माणुसकीनं वागवतो आणि तोच युद्धकैदी तुरुंगात पोचल्यानंतर त्याला कशी वागणूक दिली जाते, याचं अतिशय हृद्य वर्णन पुस्तकात आलं आहे. एका रेषेनं अलग झालेल्या या दोन देशांच्या आचार, विचार, संस्कृतीत बरेचसे साम्य आहे; मग हे शत्रुत्व आलं तरी कुठून आणि का? असा प्रश्न जफ़ा यांना पडतो. परंतु या प्रश्नाचे उत्तर मिळायला त्यांना फारसा वेळ लागत नाही. पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांच्या मनातला गोंधळ आणि त्यांच्या मनात घुसळत असलेला राग, चीड, सूड या भावना जफ़ा यांच्यासमोर स्पष्ट होत जातात. पद्धतशीरपणे नागरिकांच्या मनात शेजारी राष्ट्राबद्दल सूडाची भावना चेतवत ठेवण्याचा राजकारण्यांचा डावही जफ़ा अगदी सहजगत्या वाचकांसमोर मांडतात.

शत्रूच्या कैदेमध्ये असताना जफ़ा यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आलेले अनेक अनुभव, पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं कधी मैत्रीपूर्ण तर कधी कमालीच्या संतापाचं वर्तन, जफ़ा यांच्या काही सहकाऱ्यांनी कैदेतून पळ काढण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न आणि मग युद्ध संपलेलं असूनही राजकारण्यांच्या डाव-प्रतिडावांमुळे अनेक महिने तुरुंगातच राहावे लागणे, पुढे दीर्घ प्रतिक्षेनंतर झालेली सुटका.. हे सगळं तपशीलवार लिहीत असताना भारतीय राजकारण्यांवर असलेला राग स्पष्टपणे व्यक्त करायलाही जफ़ा कचरलेले नाहीत.

प्रत्यक्ष युद्धभूमीवर कधी पाऊलही न ठेवलेले अधिकारी आपल्या कचेरीत सुखनैव बसून प्रत्यक्ष युद्धभूमीवरील निधडय़ा छातीच्या आणि जिवावर उदार होऊन कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांविषयी अनुदार उद्गार काढतात तेव्हाचा राग आणि या अधिकाऱ्यांविषयी वाटणारी काहीशी तुच्छतेची भावनाही जफ़ा यांनी स्पष्टपणे मांडली आहे.

ही सारी कहाणी अतिशय रोचक तर आहेच, परंतु तिचा अनुवादही अतिशय उत्तम झाला आहे. मूळ लेखनाशी समरस होऊन केलेला   हा अनुवाद ओघवता झाला आहे. मात्र  ‘फायटर पायलट’ या शब्दासाठी ‘लढाऊ वैमानिक’ हा शब्द रूढ आहे, तो अनुवादात योजायला हवा होता असे वाटते. वास्तविक अशा रूढ मराठी प्रतिशब्दांची एक यादीच करायला हवी. किंबहुना असे मराठी प्रतिशब्द वापरण्याचा आग्रह अनुवादकांनीही धरायला हवा, असे वाटते.

डेथ वॉज नॉट पेनफुल

  • मूळ लेखक – धीरेन्द्र सिंह जफ़ा,
  • अनुवाद – वर्षां गजेंद्रगडकर,
  • अभिजित प्रकाशन,
  • पृष्ठे- २८८, मूल्य- ३०० रुपये.