दीपा भंडारे

मानवी जीवनाचं सर्वार्थाने उन्नयन करून समाजाची नैतिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक जडणघडण करणारे ‘कीर्तन’ हे समाजप्रबोधनाचं चिरंतन माध्यम आहे. संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या सात शतकांत ‘वारकरी’, ‘नारदीय’ आणि ‘रामदासी’ अशा तीन परंपरांचं कीर्तन सर्वार्थाने फळलं आणि फुललंसुद्धा! कीर्तन ही केवळ कला नसून नवविधा भक्तीप्रकारातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. महाराष्ट्रात संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी यांनी याच हरिकीर्तनाच्या माध्यमातून समाजाला खऱ्या अर्थाने जागवलं आणि घडवलंसुद्धा!

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
shivraj patil chakurkar , shivajirao patil nilangekar
काँग्रेसच्या प्रचारातून चाकुरकर, निलंगेकराचे छायाचित्र गायब
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर मराठय़ांनी १६७६ मध्ये केलेल्या दक्षिण भारतातील दिग्विजयानंतर शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे तमिळनाडूतील तंजावर प्रांताचे राजे झाले. १६७७ साली दक्षिण भारताच्या यात्रेवर असताना व्यंकोजीराजांच्या निमंत्रणावरून समर्थ रामदासस्वामी तंजावरला आले. दक्षिणेत शैव संप्रदाय लोकमानसात रुजलेला असतानाही हरिहर ऐक्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने समर्थानी रामभक्तीच्या प्रसाराकरिता तंजावर, मन्यारगुडी आणि कोनूरमरीमन्नकोवील या तीन ठिकाणी रामदासी मठांची स्थापना करून तिथे आपले  पट्टशिष्य भीमस्वामी, अनंतमौनी आणि भिकाजीबुवा यांना मठाधिपती केलं. तसेच महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘नारदीय’, ‘रामदासी’ कीर्तन परंपरा सर्वप्रथम तंजावरला नेली. रामदासी मठ आणि शिष्यांच्या माध्यमातून समर्थाच्या या कार्याला तंजावरच्या भोसलेवंशीय राजांचं मोठं पाठबळ मिळालं आणि अल्पावधीतच संगीत, नृत्य, नाटय़, निरुपण यांचा उत्तम समन्वय असणारा रामदासी मराठी कीर्तनकार तमिळनाडूत लोकप्रिय झाला. तमिळनाडूतील ‘हरिकथाकालक्षेयम’ या नव्या कीर्तन परंपरेचा जन्मही या रामदासी मराठी कीर्तनातून झाला. तंजावरमध्ये गेली ३५० वर्षे हे मराठी कीर्तन रामदासी मठ, शिष्य आणि तेथील निष्ठावान सर्वसामान्य भक्तांनी जिवंत ठेवलं आणि आजही ही परंपरा दिमाखात चालू आहे.

तमिळनाडूत रुजलेल्या आणि विकसित झालेल्या या मराठी कीर्तन परंपरेकडे आतापर्यंत महाराष्ट्रातील अभ्यासकांचं दुर्लक्षच झालं होतं. मात्र, ‘तंजावरची मराठी कीर्तन परंपरा’ या पुस्तकात डॉ. धनंजय होनमाने यांनी या दुर्लक्षित विषयाचा अत्यंत सखोल, मूलगामी आणि विस्तृत आढावा घेतला आहे. मराठी संस्कृतीत जन्मलेला कीर्तनासारखा भक्तियुक्त कलाप्रकार भिन्नभाषिक दक्षिणी संस्कृतीत कसा रुजतो आणि कसं नवं रूप धारण करतो याचा रोमांचकारी प्रवास.. इतिहास डॉ. होनमाने यांनी या पुस्तकात मांडला आहे. पाच प्रकरणांतून त्यांनी तंजावरमधील मराठी कीर्तन परंपरेचा विस्तृत आढावा घेतला असून, तिथल्या समृद्ध मराठी संस्कृती आणि कीर्तन साहित्य परंपरेचं दर्शन सक्षमपणे घडवलेलं आहे.

‘कीर्तन परंपरा : उद्गम आणि विकास’ या प्रकरणात भारतीय अध्यात्मशास्त्रातील कीर्तन- भक्तीचं स्वरूप, त्याचा पुराणकालातील उगम, तसंच भारतीय कीर्तन परंपरेचा इतिहास यांची सखोल चर्चा करण्यात आली आहे. देवर्षि नारद हे आद्य कीर्तनकार मानले जातात. तर पंजाब प्रांतापर्यंत भागवत धर्माचा प्रचार करणारे आणि वारकरी कीर्तनाची मुहूर्तमेढ रोवणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचं कार्य अलौकिक असून ते महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होत. नारदांपासून सुरू झालेली ही कीर्तन परंपरा उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, आंध्र, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात आजतागायत सुरू आहे. या सर्व प्रांतांतील कीर्तनाच्या विविधांगी स्वरूपांबद्दलची अमूल्य माहिती डॉ. होनमाने यांनी उत्तमपणे दिली आहे.

इ. स. १६७७ ते १८५५ या काळात तंजावरमध्ये मराठी राजांची सत्ता होती. त्यामध्ये व्यंकोजीराजे आणि प्रतापसिंह हे रामदासी संप्रदायाचे अनुग्रहित असल्याने त्यांच्या काळात मंदिरांत आणि दरबारात रामदासी कीर्तन परंपरेला प्रोत्साहन मिळालंच; त्याचबरोबर पुढे शहाजी राजे, तुळाजी राजे, सरफोजी राजे हे मराठी राजे स्वत: व्युत्पन्न पंडित, संगीत-तज्ज्ञ आणि प्रतिभासंपन्न कवी होते. त्यांनी स्वत: तसेच दरबारातील प्रतिभावान पंडित कवींकडून वैविध्यपूर्ण काव्य- आणि विशेषत: वैविध्यपूर्ण राग-तालांनी युक्त पद्यमय मराठी कीर्तनाख्यानांची प्रचंड निर्मिती करवून घेतली.

मराठी वाङ्मयाचं दालन समृद्ध करणाऱ्या या उच्च दर्जाच्या संगीतानुकूल मराठी पंडिती काव्य आणि साहित्याचं थक्क करणारं दर्शन ‘मराठी कीर्तनाख्यानांचं स्वरूप’ या दुसऱ्या प्रकरणात घडतं. यामध्ये रामायण, महाभारत, भागवत, तमिळी शैव-वैष्णव संत, देवतांचे जन्मोत्सव, स्वयंवराचे प्रसंग अशा पंडित कवी आणि रामदासी शिष्यांनी तयार केलेल्या विविधांगी कीर्तनाख्यानांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला आहे. आर्या, साकी, दिंडी, चूर्णिका, ओव्या, श्लोक, पदे, सराई, छंद, कटाव, फटका, लावणी, दोहा, गोपी गीत अशा मराठी भाषेला श्रीमंत करणाऱ्या अनेक वृत्तांनी युक्त असणारी ही कीर्तनाख्याने आजही सर्वाना आकर्षित करणारी आहेत. सध्याच्या काळातील नारदीय कीर्तनकारांनाही ती अभ्यासासाठी प्रेरणा देणारी आहेत. ती प्रत्यक्षपणे सादर करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. कीर्तन साहित्याचा हा अमूल्य ठेवा गेली ३५० र्वष जतन करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य तंजावरमधील ‘सरस्वती ग्रंथालय’ आणि शंकर श्रीकृष्ण देव यांनी धुळे येथे स्थापन केलेल्या ‘समर्थ वाग्देवता मंदिर’ने केले आहे. त्याबद्दल या दोन्ही संस्थांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत.

‘तंजावरच्या मराठी कीर्तनाची प्रयोगात्मकता’ या प्रकरणात महाराष्ट्र आणि तंजावरमधील मराठी कीर्तन सादरीकरणातील भेदही उत्तमरीत्या मांडले आहेत. या मराठी कीर्तनावर स्थानिक तेलगु, तमिळ संस्कृती, भाषा आणि कर्नाटकी संगीताचा झालेला परिणाम, त्यानुसार त्यांच्या आकृतिबंधात झालेला बदल, कीर्तनातील मंगलाचरण, पूर्वरंग, आख्यान आणि समारोपातील फरक, काव्य-अभंग गायनातील फरक असे सादरीकरणाचे अनेक पैलू सक्षमपणे दाखवून दिले आहेत. दक्षिणेत विठ्ठलभक्तीची मोठी परंपरा असूनही तंजावरमध्ये वारकरी कीर्तन का रुजू शकलं नाही, याची कारणमीमांसाही या पुस्तकात आहे.

पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात कीर्तनाख्यानातील वाङ्मयीन विशेषाची विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. त्यात कीर्तनकारांनी लोकप्रिय केलेली आर्या, साकी, दिंडी, पदे, आदी वृत्तांचं सौंदर्यपूर्ण विश्लेषण उदाहरणांसहित मांडण्यात आलं आहे.

तथापि पुस्तकातील सर्वच प्रकरणांत अनेक वेळा माहितीची पुनरावृत्ती झालेली आहे. कीर्तन परंपरेच्या इतिहासासंदर्भात काही वादग्रस्त आणि टोकदार जातीय विधानेही खटकतात. पुस्तकात चित्रं-छायाचित्रांचा वापर अजिबात केलेला नाही. त्यामुळे त्यास दृश्यात्मकता प्राप्त होऊ शकलेली नाही. तंजावरची चित्रशैलीही प्रसिद्ध असून, पुस्तकात दरबारातील कीर्तन वातावरण, कीर्तनकार यासंदर्भात काल्पनिक चित्रं अथवा छायाचित्रांचा वापर केला असता तर पुस्तक अधिक आकर्षक झालं असतं. तरीही तंजावरची मराठी कीर्तन परंपरा आणि त्यातील समृद्ध वाङ्मयीन ठेव्याचं दर्शन घडवणारं हे पुस्तक कीर्तनकार, अभ्यासक आणि कीर्तनप्रेमींसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

तंजावरची मराठी कीर्तन परंपरा

  • डॉ. धनंजय होनमाने, स्नेहवर्धन प्रकाशन,
  • पृष्ठे- २६०, मूल्य- २६० रुपये.