14 August 2020

News Flash

मराठी कवितेतील बीजकवी

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता हा मर्ढेकरोत्तर काळातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

कवितेतून आत्मभान आणि विश्वभान व्यक्त करणाऱ्या कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या समग्र कवितांचा ‘एकूण कविता’ हा संकलनग्रंथ पॉप्युलर प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. त्यास या ग्रंथाचे संपादक आणि समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश..

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता हा मर्ढेकरोत्तर काळातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. चित्रे यांच्या एकूण कवितांची संख्या जवळपास हजाराहून अधिक आहे. त्यांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजी, हिंदी या भाषांबरोबरच इतरही भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. इंग्रजीत त्यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. असे द्वैभाषिक कवित्व त्यांच्याकडे होते. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून ते कविता लिहीत होते. महाविद्यालयात असताना ‘रुईयाईट’ या वार्षिक अंकात त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. १९५३ साली ‘लोकसत्ता’मध्ये त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. तर १९५४ च्या ‘सत्यकथा’च्या दिवाळी अंकात त्यांची ‘चित्र’ या शीर्षकाची कविता प्रसिद्ध झाली. मराठीतील पहिले अनियतकालिक ‘शब्द’ (१९५४) च्या संपादनात अरुण कोलटकर, बंडू वझे, रमेश समर्थ यांच्याबरोबर चित्रे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. १९६० साली त्यांचा ‘कविता’ हा संग्रह मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. या संग्रहातील बहुतेक कविता या त्यांच्या महाविद्यालयीन काळातील आहेत. त्यानंतर वाचा प्रकाशनाने त्यांचे ‘कवितेनंतरच्या कविता’ (१९७८) व प्रास प्रकाशनाने ‘दहा बाय दहा’ (१९८३) हे संग्रह प्रकाशित केले. तसेच चित्रे यांच्या ‘एकूण कवितां’चे तीन खंड पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केले. ‘एकूण कविता- १’ (१९९२), ‘एकूण कविता- २’ (१९९५) व ‘एकूण कविता- ३’ (१९९९) अशा क्रमाने ते प्रसिद्ध झाले. यांतील ‘एकूण कविता- ३’मध्ये आधीचे तीन संग्रह छापले आहेत आणि शेवटी असंग्रहित अशा कविता छापल्या आहेत. याशिवाय असंग्रहित कवितांचा संग्रह ‘एकूण कविता- ४’ अलीकडेच पॉप्युलर प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध झाला आहे. चित्रे यांनी इंग्रजीतही काव्यलेखन केलेले आहे. भारतीय पातळीवर त्यांच्या कवितेला मोठी मान्यताही मिळाली. चित्रे यांच्या कलावंत म्हणून असणाऱ्या संवेदनस्वभावाला सर्जनशीलतेची बहुपरिमाणे आहेत. एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांनी लक्षणीय अशा प्रकारची कामगिरी केली आहे. त्यांच्या बहुमुखी ऊर्जेचा आविष्कार अनेक माध्यमांतून झाला आहे. अन्य वाङ्मयप्रकारांतून आणि कलामाध्यमांतही त्यांनी लक्षणीय लेखन केले आहे. वेगवेगळय़ा कलांमधून त्यांनी स्वतला व्यक्त केले. चित्रकला, चित्रपट या कलाविष्कारांशी त्यांचा संबंध आला. त्यांच्या कवितेला या कलाप्रकारांमुळे मोठी संदर्भबहुलता प्राप्त झाली आहे.

चित्रे यांना बालपणापासून विविध गोष्टींमध्ये, कलांमध्ये रस होता. चित्रकला, संगीत आणि वाङ्मयाची आवड त्यांनी बालपणापासून जोपासलेली होती. वडील पुरुषोत्तम चित्रे ‘अभिरुची’ नावाचे वाङ्मयीन नियतकालिक चालवत. ग्रंथप्रेमी व नियतकालिकाचे कल्पक संपादक अशी त्यांची ओळख होती. वडिलांचा ग्रंथसंग्रह मोठा होता. घरात साहित्यिकांचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांचा वावरही असायचा. त्यामुळे वाङ्मयाचा व वैचारिक घडणीचा संस्कार बालपणीच त्यांना घरातील वातावरणातून मिळाला. भाषा वाङ्मय व कला यांविषयीचे कुतूहल त्यांच्या मनात कायम वसलेले होते. वडिलांचा ग्रंथसंग्रह, हरतऱ्हेची नियतकालिके, इंग्रजी, गुजराती, मराठी, हिंदी, संस्कृत पाठय़पुस्तके, ‘बडोदा ओरिएंटल सीरिज’मधील पौर्वात्य विषयांवरील ग्रंथ वयाच्या सातव्या वर्षांपासून ते वाचत आले. मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी व फाळणीपूर्वीची हिंदुस्थानी या भाषा त्यांनी लहानपणीच आत्मसात केल्या होत्या. संगीत नाटके, सिनेमे, कीर्तने, प्रवचने, व्याख्याने, भजने, संगीताचे कार्यक्रम ऐकण्याची त्यांना आवड होती.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत बडोदा आणि मुंबई या नगरांचा मोठा वाटा आहे. या नगरांमधील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाने चित्रे यांचे भरणपोषण केलेले आहे. या दोन शहरांतील उदारमतवादी, सहिष्णुतावादी खुल्या वातावरणाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम चित्रे यांच्यावर झाला. बडोदा आणि मुंबईच्या खुणा केवळ भाषा आणि चारित्र्यावरच नाही, तर आपल्या वाङ्मयाच्या वळणावरही आहेत असे त्यांनी म्हटले आहे. एका बाजूला स्वतमधील विविध तऱ्हेच्या आंतरिक सर्जनाला, आविष्काराला प्राधान्य देत ते व्यक्त होत आले. समृद्ध आणि सकस अशा वाङ्मयाची व इतरही कलांची निर्मिती करत आले. त्याचबरोबर समांतरपणे अनुवाद व संस्कृतिसमीक्षा करत मराठी भाषा व संस्कृती यांचे माहात्म्य ते मोठय़ा पटलावर मांडत आले.

चित्रे यांनी कोणत्या काळात लेखन केले, त्या काळाचा काहीएक संवेदनस्वभाव ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. चित्रे यांनी १९५० नंतर लिहायला सुरुवात केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. नेहरूयुगाचा तो आरंभीचा काळ होता. १९५६ साली डॉ. आंबेडकरांनी धम्मचक्रप्रवर्तन केले. भारतीय दलित अस्मितेचा एक महत्त्वाचा आविष्कार म्हणून याकडे पाहता येते. याच काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होऊन पुढे १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांचे कृषी-औद्योगिक राज्याचे धोरण अस्तित्वात आले. ग्रामीण परिसरासाठी मोठय़ा योजना आल्या. सहकाराचे बीजारोपण झाले. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले. या टप्प्यावर चित्रे यांचा ‘कविता’ हा संग्रह मौज प्रकाशनाने प्रकाशित केला.

१९७० नंतर भारतीय राजकारणाने वेगळे वळण धारण केले. विशेषत: १९७५ साली आणीबाणीसारखी राजकीय घटना घडली. तिचे दूरगामी परिणाम भारतीय समाजावर झाले. कवी-कलावंतांवरही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची बंधने लादण्यात आली. काहींना तुरुंगवासही भोगावा लागला. चित्रे यांनाही या राजकीय घटनेची प्रत्यक्ष झळ पोहचली. ‘कवितेनंतरच्या कविता’मधील उत्तरार्धातील कवितेत या कालबदलाचे प्रतीकात्म असे आविष्करण आहे.

ऐंशी-नव्वदच्या दशकांत पुन्हा नव्याने काही सामाजिक बदल भारतीयांच्या जीवनात घडले. नवे आर्थिक उदारीकरणाचे धोरण अस्तित्वात आले. धार्मिक भावनांच्या अस्मितांचे प्रश्न राजकीय पक्षांना महत्त्वाचे वाटू लागले. भांडवली समाजरचनेकडे व्यवस्था झुकली. चित्रे ज्या काळात लिहीत होते, त्या काळाची पाश्र्वभूमी या प्रकारची होती. वाङ्मयीन पर्यावरणातही नवे काही घडत होते. सत्तरीचे दशक हे लघुनियतकालिकांच्या चळवळीचे मानले जाते. ऐंशीच्या दशकात वाङ्मयीन प्रवाहांचे समाजशास्त्र आकाराला आले. वाङ्मयीन केंद्राचा परीघ विस्तारला. या दीर्घकाळात महाराष्ट्रातला मध्यमवर्ग या व्यवहाराच्या केंद्रस्थानी होता. या टप्प्यावर चित्रे कविता लिहीत होते.

त्यामुळे त्यांच्या एकूण कवितेत विविध वळणे पाहायला मिळतात. त्यात काही जाणीवरूपे प्रभावी ठरली आहेत. एकूण कवितेचा गाभा कायम ठेवत त्यातील समांतर सूत्रे व्यक्त होत आली आहेत. तसेच या कविता-संवेदनविश्वाचा आणि बदलत्या काळाचा, वाङ्मयीन वातावरणाचा जवळचा संबंध आहे. त्यांच्या ‘कविता’ व ‘कवितेनंतरच्या कविता’ या दोन संग्रहांतील कवितांवर आधुनिकतावादी जाणिवांचा मोठा प्रभाव आहे. शैलीवर आधुनिक व समकालातील काही रूपविशेषांचा प्रभाव आहे. मर्ढेकरी काव्यपरंपरेच्या काव्यशैलीच्या प्रभावखुणा त्यांवर होत्या. ‘एकूण कविता-१’पासून त्यांच्या कवितेतील जाणीवरूपांत व शैलीत बदल घडला. सांस्कृतिक वातावरणाच्या प्रतिसादातून काही नवी जाणीवरूपे प्रकटली. तिचे आविष्करणरूप बदलले. तत्त्वज्ञान आणि भारतीय परंपरेतील काही अनुभवसूत्रांचे तीमध्ये जोरकस आविष्करण झाले. मात्र ते पारंपरिक दृष्टीने नव्हे; त्यामध्ये आधुनिकतावादी दृष्टी आहे, परंपरेची चिकित्सा आहे, विश्वभानाला जोडून घेणारी दृष्टी आहे. या कवितेतून भाषेचा अधिक खुला आविष्कार झाला. ती दीर्घकवितेकडे झुकली. सातत्य आणि बदल या अक्षावर चित्रे यांच्या एकूण कवितेचा प्रवास आपल्याला न्याहाळता येतो.

चित्रे यांच्या समीक्षात्मक लेखनातून त्यांची काव्यविषयक भूमिका व्यक्त झालेली आहे. त्यांच्या काव्यविषयक भूमिकेवर प्राचीन कवींपासून ते आधुनिक युरोपीय साहित्यातील विचारांचा प्रभाव आहे. अभिनवगुप्त, ज्ञानेश्वर, तुकाराम ते युरोपीय आधुनिकतावादी साहित्य-विचारांचा प्रभाव त्यावर आहे. ‘स्वतच्या लेखनासंबंधीचा विचार’ व ‘कवी काय काम करतो?’ या दोन लेखांमधून त्यांनी स्वतची साहित्यविषयक भूमिका विस्ताराने मांडली आहे. अस्तित्वानुभवाच्या प्रकटीकरणाला त्यामध्ये केंद्रवर्ती स्थान आहे. लेखन ही चिंतनशील कृती असल्यामुळे लेखनात आत्मभान आणि वस्तुभान हे दोन घटक असतातच. लिहिणारे आत्मभान व त्याचे वस्तुभान यांच्यातील संघर्ष आणि संवाद हा नेहमीच अस्तित्वसापेक्ष असतो. प्रत्येक अनुभवाची विशिष्ट उत्कटता आपल्याला अनुभवावीशी वाटते. स्वतचे काव्यरूपचरित्र आणि चारित्र्य निखळपणे वाचकांपुढे ठेवणे, हे त्यांना कोणत्याही वाङ्मयीन मूल्यांपेक्षा महत्त्वाचे वाटते. कविता या प्रकाराकडे ते आत्मचरित्राचा फॉर्म म्हणून पाहतात. कवी असलेला मनुष्य जे काही बघतो-अनुभवतो, तसेच त्याच्या विचारांपासून भावनांपर्यंत, इंद्रियानुभवापासून ते जगण्याच्या धक्काबुक्कीपर्यंत सर्व प्रकारचे अनुभव सातत्याने कवितेतून व्यक्त केले जातात. कविता या दृष्टीने अत्युच्च कार्यक्षम ठरते, असे त्यांना वाटते. त्यांनी तुकारामाच्या सबंध कवितेचा अस्तित्ववादी दृष्टिकोनातून विचार केला आहे.

या अनुभवपद्धतीवर अस्तित्वानुभवाची प्रेरणा ही प्रमुख प्रेरणा आहे. अस्तित्वानुभवाची जाणीव कवितेतून ते निरंतरपणे व्यक्त करीत आले आहेत. अस्तित्वभानाचा आविष्कार म्हणून त्यांच्या कवितेकडे पाहत असताना तीमधील विविध जाणिवांचा विचार करावा लागतो. ही सारी जाणीवरूपे तीव्र अशा अस्तित्वभानाने एकत्र बांधून ठेवली आहेत. त्या दृष्टीने चित्रे यांची प्रेमकविता ही आरंभापासून वेगळ्या प्रकारची आहे. स्त्री-पुरुषमीलन जाणीव ही त्यांच्या कवितेत केंद्रीय जाणीव आहे. आपल्या अस्तित्वानुभवाची वाट या संवेदनेतून उलगडली आहे, अशी त्यांची जाणीव आहे. त्यामुळे ‘कविता’ या संग्रहापासून ते शेवटच्या संग्रहातील कवितेपर्यंत या जाणिवेची उपस्थिती ही त्यांच्या कवितेत केंद्रवर्ती आहे. या प्रेमविषयक जाणिवेत कमालीची विविधता आहे. ‘कविता’ या संग्रहातील ही जाणीव फार उत्कट, तरल, आवेगी आहे. तर शेवटच्या संग्रहात ही जाणीव मानवी जीवनातील अंतिम विसाव्याच्या भावरूपाचे प्रकटीकरण करते.

चित्रे यांच्या कवितेचे प्रमुख केंद्र स्त्री-पुरुष संवेदनेचे आहे. अस्तित्वाचा एक प्रमुख आविष्कार म्हणून या केंद्राला त्यांच्या कवितेत केंद्रीय स्थान आहे. त्यांच्या प्रेमकवितेत शारीरिकतेला महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना प्रेमाची ही जाणीव दैहिकतेच्या अंगाने उजळते. त्यामुळे मराठीतील प्रेमविषयक कविता व चित्रे यांची कविता दोहोंतील शारीरप्रकटीकरणाच्या अंतरामुळे एकमेकांसमोर उभ्या आहेत. शारीर संदर्भ नाकारून अन्य कवींनी कविता लिहिली आहे, तर चित्रे यांची कविता या शारीरधर्मावर उभी आहे. मराठी कवितेत क्वचितच भेटणारे मानवी शरीराचे थेट उच्चार चित्रे यांच्या कवितेत आहेत. स्त्री-पुरुषांतील मीलनक्षणांना चित्रे यांच्या कवितेत आधिभौतिक स्वरूप लाभते. या संवेदनांना ते आदिम, अलौकिक, मूलभूत अशा जाणिवेची मिती प्राप्त करून देतात. शारीर प्रीतभावनेला त्यामुळे आध्यात्मिक परिमाण प्राप्त होते. या संवेदनांच्या प्रकटीकरणासाठी चित्रे यांनी जी भाषा घडविली ती मराठीत अपूर्व आहे.

वेगळ्या स्वरूपाची चिंतनशीलता हे त्यांच्या एकूण कवितेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. स्त्री-पुरुषातील लैंगिक अनुभवातही तिचे दार्शनिक रूप अस्तित्वात असते. भारतीय परंपरेतील शैवमताचा तिच्यावर खोलवरचा ठसा आहे. विशेषत: काश्मिरी शैवमताचा तिच्यावर मोठा प्रभाव आहे. ‘कविता’ व ‘कवितेनंतरच्या कविता’ या संग्रहांतील काही कवितांमधून या जाणिवेचे सूचन झाले होते. पुढच्या टप्प्यावर मात्र त्यांच्या कवितेत शिवशक्तीच्या अद्वैताचे केंद्र महत्त्वाचे ठरले. काश्मिरी शैवमताची वाट ही त्यांच्यात ज्ञानेश्वरांमुळे उजळली आहे. चित्रे यांना काश्मिरी शैववाद आणि ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाबद्दल आकर्षण होते. त्यांनी ‘अनुष्टुभ’मधून ‘अनुभवामृताचे अंतध्र्वनी’ (२०००-०२) या नावाची लेखमाला लिहिली. यात त्यांनी ज्ञानेश्वरांच्या शिवशक्ती विचारांची व रूपकाची विस्ताराने चर्चा केली आहे. चित्रे यांचे कवी म्हणून हे एक वेगळेपण आहे. त्यांच्या या प्रकारच्या दार्शनिक ओढीचे वेगळेपण म्हणजे त्यांनी वर्तमानातल्या स्त्री-पुरुष मीलनाच्या उत्कट महतीचा सांधा प्राचीन देवोदेवींच्या अद्वैताशी जोडला आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये प्रभावी असणाऱ्या स्त्री-पुरुषांतील संवेदनजाणिवेला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे.

पुढे चित्रे यांची कविता शारीरधर्माकडून शक्तिकेंद्राकडे झुकताना दिसते- ‘ऐकू येतंय मला/ एक ओवी/ एक तंत्र आणि कोडं/ आता हे मळसूत्र/ पापपुण्यांचे पापुद्रे भेदून/ भिडतंय/ प्रेमाच्या भिडस्त गाभ्याला/ अशरीर’ या जाणीव-केंद्राकडून त्यांची कविता अशारीरतेकडे झुकते. पुढे ‘या तुझ्या अमानुष प्रेमाच्या थंडीत/ गळ्यात रुळणाऱ्या नररुंडमाळेतील एक तोंड/ तुझ्या स्तनाग्राला भिडलंय’ या परस्परसमावेशनाकडे प्रेमानुभवाचा लंबक झुकतो. चित्रे यांच्या ‘एकूण कविता- १’मध्ये शक्तीविषयक जाणिवेचे सूचन मोठय़ा प्रमाणात आहे. एक प्रकारची आदिम, आधिभौतिक सृष्टी त्यांनी रचली आहे. आदिम काळातील भावविश्वाचा हा पाठलाग असला तरी त्याची भूमी ही वर्तमानाची आहे. बऱ्याच वेळा या प्रकारचा प्राचीन, आधिभौतिक असा दर्शनबिंदू घेतल्यामुळे कवी त्याच्या अनाठायी प्रेमात पडण्याची शक्यता असते. मात्र चित्रे यांच्या कवितेत असे घडत नाही. या कवितेत वर्तमानाचा संदर्भ सतत केंद्रवर्ती असतो.

एकंदरीत चित्रे यांची कविता भारतीय कवितेचा मानबिंदू आहे. काव्यसंकल्पनेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्यात त्यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अस्तित्वानुभवाची नवी नीती भारतीय कवितेला प्राप्त करून दिली. इंद्रियनिष्ठ जाणिवांचा अधिक खुला व मोकळा आविष्कार केला. एकाच वेळी परंपरा आणि आधुनिकतेचे नवे भान दिले. आत्मभान आणि विश्वभान यांना जोडणारा दुवा म्हणून वारकरी परंपरा आणि खंडोबा प्रतीकांतून महाराष्ट्र संस्कृतीचा घेतलेला आत्म-समूहशोध वैशिष्टय़पूर्ण ठरतो. शिव-शक्ती व देवी आराधनेच्या तत्त्वरूपकांतून स्त्री-पुरुष अस्तित्वाचा घेतलेला आदिम वेध ‘आत्ता’च्या संदर्भात लक्षणीय ठरतो. वास्तववादी सपाट कवितेला शह देणारे काव्यविश्व तिने घडविले. भाषेचा अत्यंत नवनिर्माणशील, अत्युच्च वापर कवितेत घडवून आणला. भाषेला सतत सार्वभौमत्वाचे स्थान देणारा भारतीय पातळीवरील चित्रे यांच्यासारखा कवी अपवादभूत म्हणावा लागेल. गेल्या अर्धशतकातील मराठी कवितेचे वैभव वृद्धिंगत करणारे काव्यरूप चित्रे यांनी घडवले. आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात ‘बीजकवी’ म्हणून चित्रे यांच्या वाङ्मयीन कामगिरीला असाधारण असे महत्त्व आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2018 1:29 am

Web Title: dilip purushottam chitre book on poems
Next Stories
1 जंगलात दडलेली रहस्ये..
2 संवादी ‘कुटुंबकथा’
3 वाडा संस्कृतीतील वेदनांचे महाभारत!
Just Now!
X