डॉ. दमयंती पांढरीपांडे

‘ज्ञानपीठ लेखिका’ हे मंगला गोखले यांनी लिहिलेले व मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक पुस्तक आहे. प्रास्ताविकापासूनच पुस्तकातील गुणवत्तेची प्रचीती येते. १९६५ पासून दरवर्षी भारतीय भाषांतील एका साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारासंबंधीची वर्तमानपत्रात बातमी आली की त्याच्या कात्रणांचा संग्रह करण्याचा अनोखा छंद लेखिकेला लागला आणि या छंदाचं रूपांतर पुढे त्या लेखकांच्या साहित्याच्या वाचनात झालं. भाषा अवगत नसली तरी अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध होते, ते मंगला गोखले यांनी वाचून काढले. त्या म्हणतात, ‘पुस्तकाच्या खिडकीत डोकावून हे विविधभाषिक जनजीवन समजून घेता आले.’ आपल्या भाषााभगिनींची ओळख वाढायला लागली. मनाची श्रीमंती वाढली. या मनाच्या श्रीमंतीने ज्ञानपीठ पुरस्काराचे अनेक पैलू उलगडत गेले. चिकित्सक वृत्ती वाढली. आजवर चार मराठी लेखकांना हा पुरस्कार मिळाला आहे.. वि. स. खांडेकर (१९७४), वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज (१९८७), विंदा करंदीकर (२००३) आणि भालचंद्र नेमाडे (२०१४). पण इतक्या वर्षांत एकाही मराठी लेखिकेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, ही खरोखरच खंत करण्याची गोष्ट आहे.अन्य भाषांतील सात लेखिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. गेल्या ५१ वर्षांत फक्त सात लेखिकांना हा बुहमान प्राप्त झाला आहे, हे वास्तवही अतिशय बोलकं आहे. यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार कृष्णा सोबती यांना मिळाला. म्हणजे सातमध्ये एकीची भर पडली आहे. हा पुरस्कार मिळण्याचा पहिला बहुमान आशापूर्णादेवी (बंगाली) या लेखिकेला १९७६ साली प्राप्त झाला होता. (१९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जगभर गाजले. त्यानंतरचा हा पुरस्कार आहे. हा केवळ योगायोग की स्त्री-कर्तृत्वाची दखल घेण्याची अपरिहार्यता, कुणास ठाऊक!)  नंतर अमृता प्रीतम (पंजाबी) १९८१, महादेवी वर्मा (हिंदी) १९८२, कुर्रतुल ऐन हैदर (उर्दू) १९८९, महाश्वेतादेवी (बंगाली)१९९६, डॉ. इंदिरा गोस्वामी (आसामी) २०००, डॉ. प्रतिभा राय (उडिया) २०११ अशा सात लेखिकांना हा पुरस्कार मिळाला. या सात भारतीय लेखिकांच्या साहित्याचा (भाषेची अडचण जाणवली तेव्हा मिळतील त्या अनुवादांचे वाचन करून) मंगलाताईंनी धांडोळा घेतला. त्यातून त्यांना जे जाणवले ते त्यांनी या पुस्तकात नोंदवले आहे. आणि ते खूप महत्त्वाचे आहे. त्या म्हणतात की, कितीही समाजकार्य असो वा साहित्यनिर्मिती केलेली असो, तरीसुद्धा सार्वभाषिक समाज स्त्रियांना दुय्यमच लेखत असतो. रूढी-परंपरांचा जाच त्यांनाही सहन करावा लागतो. त्या- त्या लेखिकेच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांनी लेखिकांना सहन कराव्या लागलेल्या घट्ट अशा सामाजिक पुरुषप्रधान व्यवस्था/विचारांच्या जाचाचे वर्णन केले आहे. साहित्य आणि समाज यांचा जवळचा संबंध असतो. लेखिकेचे व्यक्तिमत्त्व, तिची विचारधारा, तिची मानसिकता तिच्या साहित्यात प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे तत्कालीन समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था आणि स्त्रीचे स्थान, तिची अगतिकता तसेच तिची बंडखोरी यांचेही त्यात वास्तव चित्र उमटते. त्यामुळे आजच्या वाचकाला तो- तो काळ आणि  त्या काळातले एकंदर समाजजीवन त्यांच्या साहित्यातून कळते. उदा. स्वातंत्र्यपूर्व काळातील वसाहतिक आणि तरीही पुरोगामित्वाचे कवडसे उगवू लागलेली कुटुंबव्यवस्था, स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मनोवस्थेतील स्थित्यंतरे यांचे दर्शन या लेखिकांच्या कथा-कादंबऱ्यांमधून घडते. स्त्रीचे पाऊल उंबरठय़ाबाहेर पडू लागल्याने तिच्या विचारांत आणि आचारांत फरक पडू लागला. आत्मभान, समाजभान आणि त्यातून उमललेली स्त्रीची कार्यप्रवृत्ती- मग ती कधी विधायक रूप घेऊन व्यक्त होई, तर कधी बंडखोरीतून प्रकट होई. त्यामुळे कुटुंबातील नात्यांना धक्के बसत. आजच्या एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात ‘मी टूऽऽ’ असं जाहीरपणे सांगण्याचं धाडस करू शकणाऱ्या स्त्रीची शक्ती या सात लेखिकांनी रंगवलेल्या स्त्रियांमध्ये बीजरूपाने होती. किंबहुना, ती अंकुरित व्हायला सुरुवात झाली होती, हे वाचकांच्या लक्षात येते. तसेच आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती ही की आशापूर्णा देवी यांचे औपचारिक शिक्षण बेताचे होते; पण बाकीच्या सगळ्या जणी उच्चविद्याविभूषित होत्या. त्या स्वतंत्र विचारांच्या होत्या. मार्क्‍सवादी वा समाजवादी होत्या. (महाश्वेतादेवी आणि अमृता प्रीतम मार्क्‍सवादी होत्या.) पण त्यांचा ‘वाद’ हा मानवतेच्या आराधनेसाठी होता. त्यांच्यापैकी कुणीही स्वत:ला ‘स्त्रीवादी’ म्हणवून घेत नाही. त्या म्हणतातदेखील- की ‘मी स्त्रीवादी नाही, तर मानवतावादी आहे.’ त्यांच्या विचारांत, सामाजिक कामांमध्ये आणि लिखाणातून ‘गांधीविचार’ प्रस्फुटित होतो असे वाटते. काहींना तर घरातूनच गांधीविचारांचे बाळकडू मिळालेले होते. स्त्रीचा मूळ पिंड किंवा तिची नेमकी शक्ती कोणती, हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. समाज पुढे नेण्यात स्त्रीचा केवळ जैविक वाटा आहे का? समाजाने तिला आजवर काय दिलं? तिच्या वाटय़ाला शोषण आणि अवहेलनाच आली असेल तर त्याला जबाबदार कोण? समाजातले भीष्माचार्य, आंधळा कायदा आणि पारंपरिक वहिवाट हे सर्व घटक जर ‘तो मी नव्हेच’ या थाटात मिरवत असतील तर आजच्या स्त्रीला आपला आत्मसन्मान हा चिंतन, विचार आणि आचार या त्रिसूत्रीच्या आधारेच परत मिळवावा लागेल. तो कसा मिळवायचा, हे जिचं तिलाच ठरवावं लागेल. मात्र, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या या लेखिकांच्या लेखनप्रपंचातून आत्मभान आणि आत्मसन्मान प्राप्तीच्या मार्गाची दिशा हाती लागते, हे निश्चित. ही या पुस्तकाची मुख्य जमेची बाजू आहे. बाकी भाषासौष्ठव आणि भाषामार्दव यांचा संगम जसा या लेखिकांच्या साहित्यामध्ये आहे तसाच तो मंगला गोखले यांच्या अभ्यासपूर्ण आणि संयमित लिखाणातही आढळून येतो.

‘ज्ञानपीठ पुरस्कार’ या प्रकरणात लेखिकेने या पुरस्काराची स्थापना जैन कुटुंबीयांनी कशी केली याची विस्तृत माहिती दिली आहे. ती अत्यंत रोचक आहे. प्रसिद्ध दालमिया कुटुंबातील कन्या रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन हे सामाजिक कार्याची आवड असलेले दाम्पत्य. महात्मा गांधीजींच्या आश्रमात जमनालाल बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली रमा दालमिया यांचे व्यक्तिमत्त्व घडले होते. त्यांना अनुरूप अशा पतीची आणि कुटुंबाची साथ मिळाली. पतीच्या ५१ व्या वाढदिवशी भारतीय भाषांतील प्रतिभाशाली लेखकाला पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करावा असे रमाबेन यांच्या मनात आले आणि ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’च्या रूपाने त्याला मूर्त स्वरूप लाभले. या पुरस्काराला मूर्त रूप देण्यात काकासाहेब कालेलकर यांच्यासारख्या अनेक विचारवंतांचा सहभाग कसा होता, इथपासून तर त्याचे स्वरूप कसे असेल, निवड समितीत कोण राहील, इत्यादी सविस्तर माहिती या पुस्तकातून कळते. या पुस्तकाची खरीखुरी मौलिकता आणि पारदर्शकताही लक्षात येते. त्यानंतर ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’चे मानपत्र / प्रशस्तिपत्र, या लेखिकांनी पुरस्कार स्वीकारताना केलेले भाषण जसेच्या तसे दिले गेले आहे. त्यानंतर त्या, त्या लेखिकेचे लेखन आणि त्यांचे लौकिक चारित्र्य, विचारांची जडणघडण, त्यांनी केलेले ‘सामाजिक + राजकीय + सांस्कृतिक कार्य यांचा परिचय मंगला गोखले यांनी करून दिला आहे. हा मार्मिक परिचय चोखंदळपणे आणि आस्वादक वृत्तीने करून दिला असल्यामुळे पुस्तकाच्या लेखिकेचा स्त्रीविषयक विचारही त्यातून मुखरित होतो. ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या लेखिकांचा मानवतावादी आणि सहजीवनवादी स्त्रीविचार मंगला गोखले यांनाही पटलेला आहे, याचे संयत सूचन त्यांच्या मांडणीत दिसून येते.

आज स्त्रीमुक्तीचा विविध अंगांनी विचार होतो आहे. रूढीवादी विचाराला मागे टाकून स्त्रीविचाराला प्रत्यक्ष विद्रोह, आंदोलने, कायद्यांमधील बदलांसाठीचा पाठपुरावा आणि निरनिराळी क्षेत्रे पादाक्रांत करण्याचा स्त्रीचा निर्धार यांतून एक निश्चित वळण मिळू लागल्याचे दिसते आहे. पुरुषांच्या अनुकरणातून स्वत:चे स्वत्व गवसणार नाही हे तिच्या लक्षात येऊ लागले आहे. तसेच केवळ स्वत:चा विचार न करता समाजाच्या, किंबहुना- अखिल मानवजातीच्या कल्याणाचे मूल्यात्मक चिंतनही तिच्या कार्यबोलीतून व्यक्त होऊ लागले आहे. एक समूहमन जागृत झाल्याचे हे सुचिन्ह आहे.  या पुस्तकाविषयी लिहिताना हे अवलोकन आणि आकलन नोंदवावेसे वाटले ते यासाठी, की ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त सातही लेखिकांच्या लेखनातून हेच मानवतावादी चिंतन व्यक्त झाले आहे. मंगला गोखले यांनी त्याचे सूचन आपल्या विश्लेषणातून केले आहे. उदाहरणार्थ, आशापूर्णा देवींच्या त्रिधारेतील कादंबऱ्यांमधून सत्यवती, सुवर्णलता आणि बकुळ या प्रमुख व्यक्तिरेखांच्या द्वारे स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीच्या आणि नंतरच्या काळातील शिक्षण, बालविवाह, बहुपत्निकत्व, विवाहसंस्था, स्त्रीचं घरातील आणि समाजातील स्थान अशा अनेक महत्त्वाच्या बाबींकडे निर्दश करून लेखिकेने त्या काळातील ज्वलंत प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधलं आहे. ‘स्त्रीवर अन्याय करणाऱ्या पुरुषप्रधान समाजामुळे देशोद्धाराचे स्वप्न फुकट जाते,’ असे  सुवर्णलता एका प्रसंगात म्हणते. ती म्हणते, ‘समाजाचं अर्धाग जे स्त्री, ती दुर्दैवाच्या गर्तेत रुतली आहे’.. ‘बाईमाणसाला समाजात जोवर माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळत नाही तोवर सारे प्रयत्न म्हणजे भस्मामध्ये तुपाची आहुती देण्यासारखे आहे..’ आशापूर्णा देवी ते प्रतिभा राय या सर्वच लेखिकांच्या लिखाणात स्त्रीच्या माणूसपणाच्या हक्काचा पुरस्कार आहे. सातही लेखिकांचा कौटुंबिक वारसा, शिक्षण, जीवनातील अनुभव हे भिन्न आहेत. परंतु स्त्रीच्या शक्तीविषयीची धारणा आणि त्याबद्दलचे सर्वाचे चिंतन सारखेच आहे आणि ते मानवतावादी आहे. या पुस्तकाचे वाचन सर्वानीच करायला हवे. स्त्रियांनी तर हे पुस्तक आवर्जूनच वाचायला हवे. त्यातून आपले आणि आपल्या भोवतालच्या स्त्रियांच्या अनुभवांचे प्रतिबिंब ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या लेखिकांच्या कथा-कादंबऱ्यांमधील पात्रांमध्ये उमटल्याचे त्यांना जाणवेल. मंगला गोखले यांनी प्रत्येक लेखिकेच्या लिखाणातील काही पात्रे आणि घटना यांचा स्वत:च्या टिप्पणीसहित आढावा घेतला आहे. कथा-कादंबऱ्या म्हणजे केवळ मनोरंजनाचा मनोरा नव्हे, तर कालौघातील जीवन समजून घेऊन ते अधिक सकस आणि समृद्ध करण्याचा त्या पथदर्शी दीपही असू शकतात, हे वाचकाला यातून जाणवते आणि तो अंतर्मुख होऊन विचारप्रवृत्त होतो. या सर्व लेखिकांच्या कथा, कादंबऱ्या तसेच वैचारिक लेखन मुळातून वाचण्याची ओढ निर्माण होते. या पुस्तकाच्या यशाची ही पावती म्हणावी लागेल.

ज्ञानपीठ लेखिका’- मंगला गोखले, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

  • पृष्ठे- २९६, किंमत- ३६० रुपये.