सर्वसामान्य माणसाचे भावविश्व मुळापासून हादरविणारी कादंबरी आहे ही. क्षीण हृदयाच्या लोकांनी वाचू नये, सभ्य, सुसंकृत घरांमध्ये येऊ देऊ नये. वास्तवाचे हलाहल ज्यांना पचत नाही, दारुण दु:खाचे, शारीरिक क्लेशांचे बीभत्स चित्रण ज्यांना सहन होत नाही, त्यांनी या कादंबरीपासून दूरच राहावे. पण असे तरी कसे म्हणावे? घराच्या पल्याड, रस्त्यांच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर, झाडा-झाडांमागे, गटारा-मुताऱ्यांमध्ये दडून भुतांसारखे गुपचूप वावरणारे हे गलिच्छ वास्तव केव्हातरी अचानक दाणकन् समोर ठाकले तर..? सामोरे जाण्यासाठी धैर्य एकवटायलाच हवे. आणि होय, लेखक महाबळेश्वरच्या ओसाड स्मशानातील सैतानाच्या गढीतही घेऊन जातो. दचकू नका. सैतानाच्या कौन्सिलमध्ये कदाचित तुमचे-आमचेही चेहरे दिसतील. कारण अखेर आपल्यासारख्याच बाजारी प्रगतीच्या शिडय़ा चढण्यासाठी आसुसलेल्या मध्यमवर्गीयांना सैतान एजंट म्हणून निवडत असतो. तुम्हाला आठवत नसेल, कारण सैतानाकडून इन्स्ट्रक्शन्स घेऊन पृथ्वीवर पोहोचायच्या आधीच तो आपली ती मेमरी डीलिट करून टाकतो. वैफल्य देणारी गोष्ट. पण जग आहे ते असे आहे. सैतानाला जिंकू द्यायचे नसेल तर आपणही या लढाईत उतरू शकतो.
जेफचे वडील अमेरिकेतील सॅम्युअल ट्रस्टचे प्रमुख. मृत्यूशय्येवर असताना त्यांना अंदाज आलेला असतो- आपल्या फंडचे पुढे काय होणार ते. जेफला ते सांगतात, ‘‘सैतान पृथ्वीवरील विजयाच्या अंतिम टप्प्यात आलाय. आणि सैतानाचं इथलं सर्वात प्रभावी अन् सुरक्षित घर कुठलं असतं, माहिताय? आपलं! कारण तिथं सैतान आहे असा संशयही येत नाही कुणाला.’’ सॅम्युअल ट्रस्ट छॅइळ आणि वेश्या-व्यवसायात काम करणाऱ्या एनजीओंना तगडे फंडिंग करीत असतो. छॅइळ म्हणजे लेस्बियन, गे, बाय-सेक्स्युअल आणि ट्रान्स-सेक्स्युअल (म्हणजे लिंगभ्रम असलेले). सेक्स वर्कर म्हणजे अर्थातच वेश्या-गणिका. कादंबरीचे कथानक फिरते हे लोक आणि त्यांच्यात आरोग्यविषयक काम करणारे एनजीओंचे लठ्ठ पगार व पंचतारांकित भत्ते मिळविणारे ‘सेवाभावी’ कार्यकर्ते, डॉक्टर वगैरेंभोवती. हे एलजीबीटी लोक आपसात कशी भाषा वापरतात याचा विचार करूनका. घेरी येईल. लेखक डॉ. अरुण गद्रे यांनी संभाषणांमध्ये कधी त्यांची ‘जार्गन’ घेतली आहे, पण अत्यंत जबाबदारीने व गांभीर्याने. एरवी कादंबरी सेन्सॉरसारख्या संस्थेच्या तावडीत सापडती असती तर पुस्तकाच्या २४० पैकी २०० पानांवर फुल्याफुल्याच आल्या असत्या. म्हणून मन घट्ट करून वाचायचे. वाचणेही आवश्यकच; कारण सगळ्या मानवजातीच्या जीवनमरणाचा प्रश्न कादंबरीत मांडला आहे.
लेखक गायनॅकॉलॉजिस्ट, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ. त्याने तरुणपणीच समाजसेवेचा कीडा चावल्याने मुंबई-पुण्यासारख्या शहरांत खोऱ्याने पैसे ओढण्याचा मोह सोडून दूर ग्रामीण लासलगावात दवाखाना टाकला. औषधोपचाराच्या आधुनिक सोयी नसलेल्या गावात अनंत अडचणींना तोंड देत वीस वर्षे निष्ठेने प्रॅक्टिस केली. तेथील गैरसोयी, राजकारण, समाजकारण, संस्कृतिकारण यांच्या ताणतणावांशी सामना करताना अखेर हृदयाने इशारे दिले तेव्हा अँजियोप्लास्टी करून पुण्यास परतावे लागले. समाजसेवेची आस होतीच. म्हणून प्रॅक्टिस न करता एका एनजीओच्या हाकेला साद देऊन नोकरी धरली. काम होते छॅइळ लोकांमध्ये मिसळून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवायचे, त्यांना एचआयव्हीसारख्या लैंगिक रोगांपासून दूर ठेवायचे. आत्मकथन नव्हे, पण या सुन्न करणाऱ्या अनुभवांवर आधारित असलेली ही कादंबरी. या भूमिगत जगातील भीषण वास्तवाचे वाचकांच्या मनाला तिडीक आणणारे अस्सल चित्र डॉक्टर उभे करतात.
जागतिक बाजारपेठ फोफावली की बाजारपेठेचे तत्त्वज्ञानही मानवजातीवर सत्ता गाजवू लागते. ते आपण टीव्ही आणि सोशल मीडियाच्या गोंगाटातून, जाहिरातींच्या मशीनगनसारख्या माऱ्यामधून पाहतोच. त्यातून बळ मिळते ते निखळ व्यक्तिवादाला. ‘मला अमुक गोष्ट हवी आहे, आणि ती मी मिळवणारच!’ हा या वृत्तीचा गाभा. यातच खरा पुरुषार्थ! या चंगळवादाच्या जोडीने लोकप्रिय होत असलेली रिलेटिव्हिझम् व पोस्ट-मॉडर्निझम्ची भूमिका. ‘एकम सत्। विप्र: बहुधा वदन्ति।।’ या वेदातील महावाक्याला थोडे मुरडून पोस्ट-मॉडर्निस्ट लोक ‘अंतिम असं काही सत्य नसतं’ अशी भूमिका घेतात. त्यातील अंतर्विरोध असा, की ही भूमिका या विचारवंतांसाठी मात्र अंतिम असते. आणि हेच मान्य करावे असा त्यांचा आग्रह असतो. जे स्वीकारत नाहीत ते बुरसटलेले, प्रतिगामी! गद्रे त्यांच्या मनोगतात म्हणतात, ‘एकदा या पायावर इमारत उभी राहिली की मग कोणीही आपापलं सत्य आपापल्यापुरता ठरवायला मोकळा. मग कोणी ठरवलं की, सेक्स वर्क इतर कामासारखंच नॉर्मल काम, तर ते तसं. कोणी ठरवलं की, छॅइळ हे नैसर्गिकच, तर तेही बरोबर.’ अनेक जबाबदार जागतिक संस्थांच्या संशोधनाचे पुरावे देऊन डॉक्टर सांगतात की, छॅइळ प्रेरणा या जन्मत: निसर्गदत्त प्रेरणा नव्हेतच. त्या बाहेरून जबरदस्तीने लादलेल्या किंवा क्वचित् इतरांच्या दबावामुळे स्वीकारलेल्या. सत्य सापेक्ष ठरल्याने आपल्या कोणत्याही कृतीचं स्पष्टीकरण मागण्याचा दुसऱ्याला अधिकार उरत नाही. लेखक म्हणतो, ‘‘या उदार पायावर उभ्या मानवतावादाचा आश्रय कोणीही कशासाठीही घेऊ शकतो. ‘अंतिम असं सत्य नसतं’ ही भूमिका घेणारे विचारवंत व समाज कोणत्याही वाईटाला (इव्हिल) विरोध करण्याची तात्त्विक क्षमता घालवून बसतो. ज्याला वाटेल त्याने कशाचेही गौरवीकरण करावे.. सेक्स-वर्करचं, होमोसेक्श्युअ‍ॅलिटीचं..’’
मानवी कारुण्य व आधुनिक मानवतावाद म्हणून एलजीबीटी गटातील लोकांना इतर नॉर्मल लोकांप्रमाणे समानाधिकार देणे, त्यांना समाजात समानतेने वागवणे हे योग्यच. पण गेल्या काही दशकांत इंग्रजी मीडिया व सोशल मीडिया एलजीबीटीचे उदात्तीकरण करतो आहे; नव्हे, त्याला उत्तेजन देतो आहे. त्यामुळे व्यक्तिकेंद्री व चंगळवादाच्या आहारी गेलेली कैक निष्पाप तरुण मंडळी या मोहाला बळी पडून कळपात शिरतात. एकदा एलजीबीटीच्या व्यूहात शिरला की बाहेर पडणे कठीण. अशी कितीतरी पात्रे या कादंबरीत भेटतात. एनजीओचे नाव ‘अस्मिता’! चंगळवादाला शरण गेल्यामुळे ‘अस्मिता’च्या नाशिकच्या प्रोजेक्ट डायरेक्टर, को-ऑर्डिनेटरपासून तो प्रत्यक्ष कार्यकर्ते आणि खुद्द छॅइळ सदस्य यांच्यापैकी पुष्कळ जणांचे आत्मे सैतानाने अंकित करून घेतले आहेत. छॅइळ चा पृथ्वीवर प्रसार करणे हे सैतानाचे उद्दिष्ट आणि वरील सारे त्याच्या कटात सामील झालेले. सैतानाच्या एका मीटिंगमध्ये सैतानाच्या लेक्चरने उधळलेली काही मुक्ताफळे अशी :
‘‘माणसामध्ये कृतिस्वातंत्र्याची जाणीव सतत टिकटिकत असते. आपल्या (सैतानी) शक्तीनं तो प्रेरित असला तरी सैतानी नियमांनी तो वागतोच असे नव्हे. तो स्वत:च्या इच्छेनं वागतो. त्यासाठी त्याच्याकडे एक जन्मदत्त असं सदसद्विवेकाचं होकायंत्र असतं. पण ते खूप अशक्त असतं. आपली सैतानी शक्ती त्याला दाबून ठेवते.. तरीही गडबड होतेच. कोणीतरी कळपाबाहेर सटकतंच. ते टाळण्यासाठी आपला हा प्रोग्राम. असे अनेक प्रोग्राम्स्.. दारुडय़ांसाठी, बायकांसाठी, सेक्स-वर्कर्ससाठी, होमोसेक्श्युल्ससाठी. आपल्याकडून फंड मिळाले नाहीत तर ते थंड पडतात.. म्हणून सध्या प्रोग्रामची दोन उद्दिष्टे : आपल्या कळपातून सटकणारं मेंढरू ओळखून त्याला कळपात परत आणणं, आणि बाहेरच्या कोल्ह्य़ा-तरसांपासून या मेढरांना वाचवणं.. अशी परिस्थिती निर्माण करायची, की ज्यायोगे बाहेरच्यांना कळपात यायचा मोह पडावा.. त्यांचं जसं सदसद्विवेकबुद्धीचं होकायंत्र आहे ना, जे आपल्या पाशातून सटकायला कारणीभूत ठरते, त्याला काऊंटर करायला आपलंही एक यंत्र आहे. ते म्हणजे देहाची-डोळ्यांची हाव व स्वत:चा अभिमान, गर्व. हाच खरा मानवी अधिकार.. ते घुसवायचं माणसाच्या होकायंत्रात.. प्रत्येकाच्या सदसद्विवेकबुद्धीच्या होकायंत्रात जन्मत:च हे सॉफ्टवेअर आपण घुसवतो. त्याच्या विळख्यात माणूस कैद करून ठेवणं म्हणजे आपला प्रोग्राम राबवणं.. आपल्या कळपात जास्तीत जास्त लोकांना पकडण्यासाठी वेठीला धरा. धार्मिक नेते, विचारवंत, तत्त्वज्ञानी, राजकीय नेते, समाजकारणी, धनवंत यांना.. फक्त त्यांच्या मनावर बिंबवायचं, की जगात अंतिम सत्य असं नसतं. सर्व सापेक्ष. ज्याला जे योग्य वाटते त्याला ते योग्यच..! म्हणजे चंगळवादाचा जयजयकार..’’
अर्थातच लेखकाचा सैतान प्रतीकात्मक आहे. चंगळवादाचा राक्षस व साक्षेपी सत्याच्या विचाराला दिलेले विकृत वळण या रसायनातून सैतानाचे अधिष्ठान बसते. अंतर्विरोध असा, की येशूच्या कारुण्यप्रधान मानवतावादी विचारांनी भारलेले सॅम्युअलसारखे ट्रस्ट व त्यांना मदत करणारे निष्पाप दाते नागरिक यांच्या धनसंपदेतूनच मानवजातीला कीड लावणारे हे विष तयार होते. मानव प्रजातीच्या अंतिम विनाशाचे जे अनेक भीतिदायक सीनॅरियो सांगितले जातात, त्यातलाच हा एक.. सर्व जग ‘एलजीबीटी’मय करून टाकणे. प्रजननाची वाटच अशा रीतीने बंद करायची!
या कादंबरीत निदान सॅम्युअल ट्रस्ट सुधारतो. वडलांच्या मृत्यूनंतर जेफच्या हाती सूत्रे येतात. पायाखाली काय जळते आहे ते त्याला समजते. ‘अस्मिता’सारख्या आपल्या पंखाखालच्या एनजीओंना तो नीट वळण लावतो. सैतानाच्या पकडीतून त्यांची सुटका करतो. एलजीबीटीच्या कळपातून जास्तीत जास्त लोकांना मुक्त करणे, हे खरे मानवी कल्याणाचे कार्य. ही कादंबरी अशी बहुपरिमितीयुक्त असून कथासूत्रामध्ये मानवी भावभावनांच्या हिंदोळ्यांबरोबरच तत्त्वविचारांनाही तेवढेच प्राधान्य आहे.
‘कैद केलेले कळप’- डॉ. अरुण गद्रे, मनोविकास प्रकाशन, पृष्ठे- २४४, किंमत- २९० रुपये.

अरुण साधू

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)