वृत्तपत्रीय सदरलेखन हे अल्पजीवी आणि तसेच अल्पमोलीही असते, या सार्वत्रिक (गैर)समजाला छेद देणारे सदरबहाद्दर म्हणून ज्या मराठी पत्रकारांची नावे आवर्जून घ्यावीत, त्यात मानाचे स्थान अरुण टिकेकरांना द्यावे लागेल. ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या दहा वर्षांहूनही अधिक काळ गाजलेल्या त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत त्यांच्या स्वत:च्या सदरलेखनाव्यतिरिक्त इतरांची तब्बल २२२ सदरे त्यांनी प्रकाशित केली होती. त्यापूर्वी ‘महाराष्ट्र टाईम्स’ आणि त्यानंतर ‘लोकमत’ या वृत्तपत्रांमधूनही त्यांनी त्या, त्या वेळच्या गरजेनुसार सदरांचे लेखन केले होते.. कधी गोविंदराव तळवलकर यांच्या बरोबरीने ‘आनंदी आनंद’ या टोपणनावाने, तर कधी विजय कुवळेकरांनी त्यांना आग्रह केला म्हणून. तथापि या सर्व लेखनाचा कस एवढा चांगला होता, की त्या- त्या वृत्तपत्रीय स्तंभांपुरतेच ते मर्यादित राहिले नाही.. अल्पजीवी ठरले नाही. त्यांच्या बहुतेक सर्व सदरांना ग्रंथरूप लाभले. ‘तारतम्य’, ‘जन-मन’, ‘स्थल-काल’, ‘काल-मीमांसा’, ‘कालान्तर’, ‘लेले आणि मी : दोन निवृत्तांचा संवाद’, ‘सारांश’ अशी लांबलचक यादीच तयार झाली. त्या यादीत आणखी एका पुस्तकाची (ते गेल्यावर) भर पडली आहे. पुस्तकाचे नाव आहे- ‘कालचक्र’!

२००३ मध्ये टिकेकरांनी ‘कालचक्र’ हे दैनिक सदर लिहिले. त्या सुमारे २०० लेखांमधील ८२ लेखांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. मध्यंतरी १३-१४ वर्षांचा काळ उलटून गेला असला तरीही ताजे टवटवीत वाटतील असे हे लेख आहेत. माहितीयुगाच्या अफाट फाफटपसाऱ्यातही पाचोळ्यासारखे जे भिरभिरत उडून जाणार नाही असे काहीतरी वाचकांच्या हाती द्यायचे, आणि तेही केवळ सहाशे शब्दांच्या मर्यादेत राहून द्यायचे- ही काही सोपी गोष्ट नाही. त्यातही टिकेकर पडले प्रचंड व्यासंगी, ग्रंथप्रेमी, ज्ञानसाधक. त्यामुळे आणि विविधांगी अनुभवसमृद्धीमुळेही दैनंदिन सदर लिहिताना शब्दमर्यादा सांभाळणे त्यांना निश्चितच कठीण जात असणार. पण त्यांनी ती तारेवरची कसरत अगदी सहज आत्मसात केली आणि तुलनेने शब्दसंख्येची अधिक मोकळीक देणाऱ्या साप्ताहिक सदरांइतकेच- किंबहुना, कधी कधी त्याहूनही सरस असे हे दैनंदिन सदरलेखन त्यांनी यशस्वीपणे पार पाडले.. याची या लेखसंग्रहामध्ये अगदी पानोपानी साक्ष पटते.

टिकेकर ग्रंथप्रेमी होते. ग्रंथसंग्राहक होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तो एक अविभाज्य घटक होता असे म्हटले तरी चालेल. या पुस्तकात ठिकठिकाणी आलेले असंख्य पुस्तकांचे संदर्भ त्या, त्या लेखातील निमित्तमात्र ठरणाऱ्या मुद्दय़ाला उठाव तर आणतातच, परंतु वाचकांच्या पदरात एरवी सहजासहजी उपलब्ध न होणाऱ्या माहितीचा ऐवजही टाकतात. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपण मानधन अर्धेच घेणार असल्याची घोषणा केल्याचे वृत्त वाचल्यावर टिकेकरांना आठवण होते ती १८८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकाची. ‘इंडिया इन १९८३’ या शीर्षकाचं ते पुस्तक १९८२ सालच्या एका संध्याकाळी ग्रँट रोड स्टेशनच्या बाहेरच्या एका जुन्या दुकानात अवघ्या दहा रुपयांत आपल्याला कसे अवचित गवसले, याची गोष्ट तर ते रंगवून सांगतातच; परंतु ब्रिटिश सरकारने त्या पुस्तकावर बंदीही घातलेली होती. ‘१९८३ मध्ये ब्रिटिश हा देश सोडून मायदेशी परत जातील,’ असे भाकीत त्या पुस्तकात वर्तविण्यात आले होते. पुस्तकाच्या उत्तरार्धात ‘बाबू पार्लमेंट’मधील काल्पनिक भाषणे संकलित स्वरूपात देण्यात आली होती आणि आपले मानधन वाढवून घेणारे बाबू सैन्याचा पगार आणि आकार निम्म्याने कमी करायला निघाल्यामुळे सैन्य पार्लमेंटवर हल्ला करते, गोळीबारात लोकशाहीचा मृत्यू होतो, असे चित्रही त्या पुस्तकात रंगविण्यात आले होते.. हा सारा रोचक तपशीलही ते सांगतात. १९८२ साली त्यांना मिळाली ती या पुस्तकाची तिसरी आवृत्ती होती. १८८८ मधली ती होती. पण त्या पुस्तकाच्या शीर्षपृष्ठावर लेखकाचे नाव नव्हते. पुढे केव्हातरी ते कळले : टी. हार्ट डेव्हिस या नावाचे सिंधमध्ये वास्तव्य करणारे ज्युडिशियल कमिशनर. आपले मानधन एका ठरावाद्वारे वाढवून घेण्याचा एतद्देशीयांचा स्वभाव त्या ब्रिटिश लेखकाने चांगलाच ओळखला होता. या समर्पक शेऱ्यासह एवढा सारा गमतीशीर तपशील टिकेकर वाचकांसमोर ठेवतात. असे अनेक लेखांच्या बाबतीत घडते. ‘जॉर्ज ऑरवेलने सांगितलेले ‘वैश्विक सत्य’ या लेखात अगदी मोजक्या शब्दांत ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीबद्दल दिलेला विविधांगी तपशील.. ‘टू हेल विथ पिकासो अ‍ॅन्ड अदर एसेज’ हे पॉल जॉन्सन नामक जगद्विख्यात संपादक-लेखकाच्या सदरलेखनाचे संकलन वाचताना मिळालेला आनंद सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यातली कळकळ आणि नैतिकतेच्या अधिकाराशी त्यांनी घातलेली सांगड.. ही वानगीदाखल आणखी दोन उदाहरणे. वाचकांना ग्रंथप्रेमाची दीक्षा देणारे टिकेकर या पुस्तकामध्ये वारंवार भेटत राहतात, हे या पुस्तकाचे एक प्रमुख वैशिष्टय़ आहे.

टिकेकरांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाला जशी विद्वत्तेची झळाळी होती, तशीच त्यांना आस्वादक रसिकतेची संपन्नताही लाभली होती. आपल्या कोणत्याही चित्रावर रविवर्मा स्वाक्षरी करीत नसत- ही त्यांची खासियत, किंवा रविवर्माची चित्रे लोकप्रिय करणाऱ्या माधवराव जोश्यांचं अर्धवट राहिलेले मराठी चरित्र.. हे बारकावे टिपणारे आणि ‘किमया रविवर्माची’ या लेखात ते मोकळेपणानं मांडणारे टिकेकर.. बऱ्याच कालावधीनंतर ‘प्रौढ’ वहिदा रहमानचे छायाचित्र पाहिल्यानंतर ‘गाईड’ चित्रपटातली ‘आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है’ या गीतात मूर्तिमंत चैतन्याचा सळसळता तारुण्यानुभव देणारी वहिदा आठवून हळहळणारे टिकेकर.. ‘सीन्स फ्रॉम द लाइफ ऑफ अ बेस्ट-सेलिंग ऑथर’ या निबंधसंग्रहातील ‘अल्कोहोल अ‍ॅण्ड लिटरेचर’ हा लेख वाचून मदिराप्राशन व ग्रंथवाचन यांच्या परस्परसंबंधांवर भाष्य करू पाहणारे टिकेकर.. कीर्तन परंपरा क्षीण होत चालली आहे याबद्दल खंत व्यक्त करतानाच राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तनांमध्ये ४०-४५ वर्षांपूर्वी ऐकलेले विनोदी किस्से पुन्हा आठवून स्मरणरंजनात रमणारे टिकेकर.. ‘स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा’ या भावगीताची आपल्या तरुण वयात लाभलेली कायमची साथ आठवून त्या गीताचे जन्मदाते कवी म. पां. भावे यांना आवर्जून भेटणारे आणि त्यांच्या आत्मचरित्राची प्रत विकत घेऊन त्यातील त्या गीताच्या पानावर भावे यांची स्वाक्षरी घेणारे टिकेकर.. सदाबहार चित्रपट ‘द रोमन हॉलिडे’चा नायक असणाऱ्या ग्रेगरी पेकच्या इतर गाजलेल्या चित्रपटांची त्या- त्या भूमिकांसह वैशिष्टय़े सांगत सुटलेले टिकेकर.. जॉनी वॉकर हा हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका करणारा अभिनेता मूळचा इंदूरचा बद्रुद्दिन काझी होता, या अपरिचित माहितीसह त्याच्या कारकीर्दीबद्दलच्या अनेक नोंदी करणारे टिकेकर.. अशा कितीतरी लेखांमधून टिकेकरांच्या व्यक्तिमत्त्वाची लोभस बाजूही वाचकांसमोर येते, हे या संग्रहाचे आणखी एक वैशिष्टय़.

‘कालचक्र’ या लेखसंग्रहाचे आणखी एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे अशा दैनंदिन सदरलेखनातूनही प्रकट होणारी टिकेकरांची तत्त्वनिष्ठा आणि परखड मते. मग ती क्रिकेट खेळाडूंमधील अपप्रवृत्तींबाबतची असोत किंवा सत्तेची फळे चाखायला मिळाल्यानंतर भाजप-संघामधील अध्वर्यु भ्रष्टाचारी होऊ लागल्याबद्दलची असोत. एरवी अग्रलेखासारख्या गंभीर स्तंभामधून ज्यावर भाष्ये करणे शक्य आहे, अशा विषयांवर ५००-६००  शब्दांच्या मर्यादेत राहूनही बोचरी टीका कशी करावी, याचे काही अस्सल टिकेकरी नमुने ‘चारित्र्यवानांमधली पडझड’ यांसारख्या लेखांमधून पाहायला मिळतात. आपल्या बंगल्यासाठी सरकारकडे भूखंड मागणाऱ्या सचिनला प्रा. रमेश तेंडुलकरांनी वडिलकीच्या नात्याने काय सांगितले असते; आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकलेल्या जहीर राणाकडून भेट म्हणून मर्सिडीज गाडी स्वीकारणाऱ्या कपिलदेवने आपली सामाजिक जबाबदारी टाळणे का आणि कसे चुकीचे आहे; शासकीय व बिगरशासकीय असे दोन्ही प्रकारचे अनेक सन्मान मिळाल्यानंतरही बिस्मिल्लाखॉं आर्थिक हलाखीच्या स्थितीत असतील तर त्याला ते स्वत: आणि त्यांचे कुटुंबीयच कसे जबाबदार आहेत.. हे आणि असे विवेकी प्रश्न उपस्थित करणारे काही लेख या संग्रहात समाविष्ट आहेत. टिकेकरांनी ते वगळले नाहीत हे चांगलेच झाले. लता मंगेशकरांच्या राज्यसभेतील अनुपस्थितीबद्दल राज्यसभेच्या दुसऱ्या खासदार शबाना आझमी यांनी नाराजी व्यक्त केली म्हणून निर्माण झालेल्या दुर्दैवी वादाबद्दलचा या संग्रहातील लेखसुद्धा यादृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे.

आणि या पुस्तकामध्ये प्रस्तावना म्हणून समाविष्ट केलेला ‘सदर-लेखन आणि मी’ हा एकमेव दीर्घ लेखसुद्धा या संग्रहाचे मोल वाढवणारा आहे. मराठी वृत्तपत्रीय सदरलेखनाच्या इतिहासातील तो एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. टिकेकरांच्या ज्ञानसाधनेच्या वृक्षाला लगडलेली, रुचिवैविध्याने अधिकच हवीशी वाटणारी फळे ‘कालचक्र’ या संग्रहाच्या रूपाने आपल्याला मिळाली आहेत असे म्हटल्यास त्यात कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही.

‘कालचक्र’- अरुण टिकेकर,

रोहन प्रकाशन,

पृष्ठे- १९४, मूल्य- २०० रुपये.