डॉ. राम पंडित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी वाङ्मयात गजल दाखल होऊन अर्धशतक लोटले असले तरी अजून समीक्षकांना ही विधा दखलपात्र वाटत नाही. गजल वाङ्मयात अंतर्भूत का केली जात नाही? यास कारणीभूत कोण? गजलेला तंत्रानुगामी ‘कृतकविधा’ संबोधणाऱ्या छंदोविहीन, अनाकलनीय, अमूर्त रचनाकर्ते कवी व समीक्षकांचे अज्ञान की त्यांचा आकस?

मराठी वाङ्मयात गजलविधा दाखल होऊन अर्धशतक लोटलं. गजलेचे बाह्य़ांग तर माधव जूलियन यांनी त्याहीपूर्वी मराठीत ‘गज्जलांजली’ व ‘छंदोरचने’द्वारे परिचित करून दिले होते. पण अद्यापही काव्यसमीक्षकांना ही विधा दखलपात्र वाटत नाही. गजल पद्यवाङ्मयात अंतर्भूत का केली जात नाही? शासकीय पुरस्कारांत गजल-संग्रहाला स्थान का नाही? याला कारणीभूत कोण? गजलेला तंत्रानुगामी ‘कृतकविधा’ संबोधणाऱ्या छंदोविहीन, अनाकलनीय, अमूर्त रचनाकार कवीवर्ग आणि समीक्षकांचे अज्ञान की आकस?

सुरेश भटांच्या मांदियाळीतील ज्या व्यक्तींचे त्यांच्या हयातीत गजलसंग्रह निघाले, तसेच ज्यांनी थेट गजल-सर्जनानेच प्रारंभ केल्याचे आढळते आणि त्यानंतर अद्याप त्यांचा गजल वा काव्यसंग्रह आलेला नाही अशांच्या त्या रचनांवर भटांनी अत्याधिक परिष्करण केले होते. भटांनंतरच्या पहिल्या फळीतील (अपवाद : इलाही जमादार) समग्र रचनाकारांवर भटांच्या शैली व भाषेचा प्रभाव अनुकरण सीमेपर्यंत होता. (इतका, की त्यातील काहींच्या गाजलेल्या गजला सुरेश भटांच्याच वाटाव्यात!)

कोणत्याही भाषेतील गजलकार मानोत- न मानोत; मुक्त अथवा गद्यकवितेप्रमाणे गजलेचे समग्र शेर उत्स्फूर्तपणे ९९ टक्के साकारणे शक्यच नाही. रदीफ-काफियांचं बंधन सर्जनकाराला क्राफ्ट्समनशिप करण्यास विवश करतंच. पण ही विवशता साऱ्याच छंदोबद्ध काव्यासाही लागू पडते. मग प्रश्न पडतो- अनिल, मर्ढेकर, बोरकर, कुसुमाग्रज इत्यादी छंदोबद्ध काव्यंही रचणाऱ्या कवींच्या काव्याची दखल घेणारे मराठी समीक्षक गजलकाव्याची उपेक्षा का करतात? याबाबत माझी अशी धारणा आहे (काहींच्या मते, ती चुकीची असू शकते!) की, ही मंडळी विचार करत असतील-

१) गजलच्या शेरात प्रासादिकता व संप्रेषणीयता अभिप्रेत असते. वाचकाच्या आकलनकक्षेत येणाऱ्या काव्यावर जटिल भाषेत आपण काय विद्वत्ज्जड भाष्य करणार? अमूर्त कवितेवर अत्याधिक जटिल व अमूर्त शैलीत लिहिणे सरावाचे असते.

२) गजल हा तंत्रानुगामी प्रकार आहे. गजलेवर लिहायचे म्हणजे बहर, रदीफ, काफिया, अलामत, मतला, इत्यादीचा (छंद, समांतिका, स्वराधार, स्वरांतिका, आरंभिका) अभ्यास करणे आले. आता हे कोण करत बसणार? अन् अनवधानाने आपण चुकलोच, तर हा गजलकार वर्ग लगेच आपलं अज्ञान उघडं पाडेल. त्यापेक्षा आपली अमूर्त समीक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची! मग कोणी विचारलं तर सांगायचं, ‘ते जॉनर वेगळं आहे.’ (म्हणजे ती काव्यविधा नाही? ‘जॉनर’चा अर्थ शोधत बसा ‘वेब्स्टर’मध्ये!)

३) बोरकर, ना. घ. देशपांडे, विंदा करंदीकर, शांता शेळके आदी अनेकांनी गजल-सर्जन करून पाहिले. (कदाचित सुरेश भटांना लाभलेली अमाप लोकप्रियता यास कारणीभूत असेल.) मात्र, आपल्याला ही काव्यविधा अनुकूल नाही हे जाणवल्यानेही त्यांनी गजलकडे पाठ फिरवली असावी. मंगेश पाडगांवकरांनी मात्र अनेक लक्षणीय गजला लिहिल्या. शांता शेळकेंनी गजलविधा पूर्णपणे न जाणून घेता टीकात्मक सूर लावत आपल्या अनभिज्ञतेचा परिचय दिला.

उर्दूतही डॉ. कलीमुद्दीन यांच्यापासून अनेकांनी गजलवर आक्षेप नोंदवले. पण अमीर खुसरो ते आजवर हजारो गजलकारांनी लाखो गजला लिहिल्या आहेत. तरल व प्रेयस भाववृत्तीचे कवीच नव्हे, तर अ-कवींनादेखील हा आकृतिबंध आकर्षित का करतो, याची मीमांसा व्हायला हवी.

कोणत्याही वाङ्मयीन विधेचं एक तंत्र असतंच. कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, चरित्र, आत्मचरित्र परस्परांपासून पृथक ठरतात ते त्यातील संपृक्तता, विस्तार, कथनशैली आदी तंत्रांमुळेच. नाटकात तंत्राचं संहितेएवढंच महत्त्व वाढलंय. तेव्हा ‘नाटक ही साहित्यिक विधा नाही’ असं म्हणायचं काय?

गजलेतील शेर विविध विषयांवर असल्याने एकाच विषयावरील काव्याचा आस्वाद घेण्याची सवय असलेल्या रसिकवर्गाला हे विषयाचे मार्गातरण ग्राह्य़ होत नाही. त्याने रसोत्पत्तीत व्यत्यय जाणवतो. हा आक्षेप सामान्य गजलेच्या बाबतीत योग्यच आहे, पण उच्चस्तरीय गजलेला तो लागू पडत नाही. दर्जेदार गजलेतील शेरांत विषयांची पृथकता असूनही एक आंतरिक सुसूत्रता विद्यमान असते. कारण कवीने एकाच काफियामध्ये ते विविध शेर रचलेले असतात. उर्दू काव्यरसिकांत अशा गजलेची आस्वादक वृत्ती रुजलेली आहे. क्रमबद्ध गजल एकाच विषयावरील शेरांची माळ असते. परंतु तिच्यातील प्रत्येक शेर परिपूर्ण कविता लेवून येतो. तसं नसेल तर ती रचना गजल आकृतिबंधातील गीत वा कविताच ठरते. मग तिच्यात रदीफ, काफिया, छंद, अलामत, इत्यादी तंत्र आढळले तरी! इक्बाल या तत्त्वज्ञ कवीच्या अनेक कविता गजल फॉर्ममध्ये आहेत.

गजलेतील रदीफ, काफियामुळे या विधेवर मर्यादा पडतात असे काहींना वाटते. खरे तर काफियातील लयात्मक पुनरावृत्ती शेरातील छंदासह माधुर्य आणते अन् रदीफची आवर्तने काफियाच्या गेयतेत वृद्धी करतात. सुरेश भटांनी काफियाला ‘यमक’ म्हटले आहे. खरे तर ही व्याख्या अपूर्ण आहे. काफिया म्हणजे उर्दूत ‘सौती हमआहंगी’! याचा अर्थ स्वरसाम्यता.. आवाजाची एकरूपता होय. अर्थात यात यमकाचा अंतर्भाव होतोच; परंतु त्याव्यतिरिक्तही ध्वनीसाम्य असलेल्या शब्दांचा समावेश होतो. उदा. ‘पाहू, राहू, साहू’ ही यमके आहेत. काफियात ‘आशा, पावा, गाथा, भाषा’ हे शब्द (वर्णयोजना गुरु-गुरु असल्याने उच्चारात ध्वनीसाम्य आहे.) येऊ  शकतात. भटांना निश्चितच हे ज्ञात होते. पण नवोदित गजलकार यात अनवधानाने चुका करतील म्हणून कदाचित त्यांनी यमकावर भर दिला असावा.

मात्र, यमकांच्या मर्यादित संख्येमुळे गजलेच्या कॅनव्हासवरही मर्यादा पडल्या. गजलेत ‘हासरा, साजरा, लाजरा..’ अशी यमके आल्यावर शेरांसाठी ‘घागरा, खाकरा..’ अशी यमके कवी नाइलाजाने आणून पाच शेर पूर्ण करू लागले. अन् त्या काफियांना अनुरूप आशय शेरात पेरू लागले. इथेच कृतक गजल-सर्जनाचा प्रारंभ झाला.

काफियाचं क्षेत्र ‘शब्दांची स्वरसाम्यता’ या मूळ व्याख्येनं अत्यंत विस्तृत होतं. अन् मग यमकासवे काफियाबंदी ही टीकादेखील संपुष्टात येते. गजल विधेचा आवाका छंदोबद्धच नव्हे, तर मुक्तछंदीय काव्याच्या समकक्ष होतो हे काव्य-समीक्षकांच्या ध्यानात येईल. आज हा ‘स्वरांचा ऊर्फ सौती काफिया’ (उर्दूत असे वेगळे नाव नाही.) मराठीतील समकालीन गजलकार समर्थपणे वापरीत आहेत.

गजलची उपेक्षा होण्यास गजल क्षेत्रात वावरणारे कृतक गजलकार सर्वाधिक जबाबदार आहेत. सुरेश भटांनंतर तंत्र अवगत झालेल्यांनी गजल रचण्याचे ‘कार्यशाळा’ नावाचे कोचिंग क्लासेस काढले. ‘झटपट गजलकार’ घडविण्याचा हा व्यवसाय फोफावला. भटांना ‘शिष्य’ ही प्राचीन उर्दू गजल क्षेत्रातली संकल्पना ग्राह्य़च नव्हती. पण काही दूरदृष्टीची मंडळी स्वयंघोषित ‘भट-शिष्य’ झाली. त्यांची स्वत:ची गजल तंत्रदृष्टय़ा निर्दोष असली तरी वाङ्मयीनदृष्टय़ा सुमार होती. मग त्यांनी कोचिंग क्लासेसकडे मोर्चा वळवला. त्यांनी ‘उस्ताद’ ही उपाधी माळून घेतली. त्यांच्याकडे तंत्र शिकणाऱ्यांचा उल्लेख ते ‘गंडाबंद शागीर्द’ असा करू लागले. या बुवाबाजीचा संसर्ग कविता क्षेत्रात अद्याप झालेला नाही हे गजलेतर कवींचे नशीबच! मराठी काव्यज्ञांनी हा हास्यास्पद सिनेरिओ पाहून गजलची उपेक्षा करणेच योग्य मानले, असे तर नाही ना?

सुरेश भटांनी गजलकार हा मूलत: उत्तम कवी असावा, हा निकष लावला होता. खुद्द त्यांच्या मांदियाळीतील किती जण मूलत: कवी होते? बरेच जण थेट गजल लिहू लागले होते. भटांच्या हयातीतच त्यांचे सर्जन थंडावले. भटांच्या निधनानंतरच्या पंधरा वर्षांत या कारागिरांचे गजल-काव्यसंग्रहही आले नाहीत. आज गजल- सर्जनात जी संख्यात्मक वाढ झाली आहे त्याला हे कोचिंग क्लासेस बहुतांशी जबाबदार आहेत. पण काही कवीही यातून गजलकार म्हणून घडले, हेही सत्य आहे. गुणात्मक वाढ झाली आहे, तिचा टक्काही हळूहळू वाढतोय. पण संख्यात्मक वाढीच्या गर्दीत ती दृष्टीस पडत नसावी.

‘मराठी गजल सुरेश भटांच्या पुढे गेली नाही’ असे दहा वर्षांपूर्वी वाटायचे. पण आज तसे म्हणता येणार नाही. निवडक जुने, नवे, समकालीन गजलकार (विशेषत: गेल्या १५-१६ वर्षांत) आशय, शैलीदृष्टय़ा भटांच्या शैलीहून पृथक गजल लिहीत आहेत. या गजलेत सामाजिक भान, वैचारिक प्रगल्भता, तर्कशुद्धता आजच्या उर्दू गजलप्रमाणे कवितेच्या अंगाने साकारतेय. मात्र, आज समग्र भाषांमधील गजलेत तरलता, शब्दलालित्य इत्यादी गजलच्या खासियत गणल्या जाणाऱ्या गोष्टींची (गजलची कविता व गीतापासून विलगता दर्शविणारी शैली) कमतरता जाणवते.

सवंग प्रसिद्धीसाठी काही व्यक्ती टाळ्याखाऊ, छद्मी आणि उपहासपर रचनाही करतात. परंतु त्या गजला नसतात, तर ‘हजला’ असतात. विद्यमान गजल ‘वाह’ची आहे. ‘आह’ची गजल क्वचितच सापडते. परंतु समकालीन मराठी कवितेच्या तुलनेने तांत्रिक भाग सोडून वाङ्मयीनदृष्टय़ा गजल कितपत स्टॅण्ड होते, याचे तरी काव्य-समीक्षकांनी परखड मूल्यांकन करण्यास हरकत नाही. काही गजल तंत्रविशारद दुसऱ्याच्या गजलेतील काव्यसौंदर्याऐवजी फक्त तांत्रिक चुका अधोरेखित करण्यालाच समीक्षा मानू लागले आहेत. यामुळे छंदांवर हुकूमत असलेला उत्तम कवीवर्गही गजल-सर्जनास कृतक ठरवू पाहतोय.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ram pundit article on marathi ghazals
First published on: 09-09-2018 at 01:25 IST