समाजहितैषी बैठक, सर्व विचारधारांना समजून घेणारा उदार दृष्टिकोन ही ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांनी घालून दिलेली परंपरा त्यांच्यानंतर अधिक विस्तारत नेणारे ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर हे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे सुहृद व सहकारी डॉ. सदानंद बोरसे यांनी साधलेला पत्रसंवाद..

प्रिय दिलीपराव,

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

तुमची-माझी पहिली भेट कधी आणि कशी झाली, ते आता नक्की आठवत नाही. आणि तुमच्या मत्रीच्या निरंतर प्रवाहासवे जाताना त्याचे नेमके मूळ हुडकण्याचे प्रयोजनही नाही.

१९७७-७८ चा सुमार. मी नुकताच ‘माणूस’मध्ये चित्रपट परीक्षण लिहायला लागलेलो. बर्गमन अन् सत्यजित रे यांच्यानंतर चित्रपटातले काही कुणाला कळत असेल, तर ते फक्त मलाच अशा अभिनिवेशाने मी हिंदी-मराठी-इंग्रजी-जपानी अशा नानाविध चित्रपटांवर लेखणी चालवत होतो. ही परीक्षणे ज्यांच्या खिजगणतीतही नव्हती, अशा भल्याभल्यांना कधी सल्ले, तर कधी रट्टे देत होतो. त्या काळात तुमच्या-माझ्या गाठीभेटी व्हायच्या; पण त्या ‘काय, कसं काय?’ या पलीकडे फारशा सरकल्या नाहीत.

माझ्या आठवणीत तुमच्याबरोबरच्या या उडत्या भेटींच्या हळूहळू मफिली बनू लागल्या त्या १९८५ च्या आसपास. ‘रोश व्हस्रेस अ‍ॅडॅम्स’ हे एक अफलातून पुस्तक डॉ. विश्वास राणेंमार्फत तुमच्या टप्प्यात आलेले. त्याच्या अनुवादासंबंधी तुम्ही मला सुचवलेत आणि तिथपासून मी ‘दिलीप माजगावकर’ या उमद्या, चिरतरुण अन् दिलखुलास मित्रासोबत अशा एका साहित्य सफरीवर निघालो, की जिथे ‘राह बनी खुद मंझिल’!

आजच्या तारखेच्या ताळमेळाने १९८५ च्या आसपास तुम्ही चाळिशीकडे झुकलेले होता, तर मी पंचविशी पार करत होतो. पण ही आकडय़ांची जाणीव आज तुमच्या अमृतमहोत्सवाचा विचार करताना होते आहे. त्यावेळी तुम्ही आपल्यातले पंधरा वर्षांचे अतंर अगदी सहजगत्या पुसून टाकलेत. (माझ्या बाजूने मात्र हे अंतर अजूनही असते. अगदी आजही पुस्तकाचा ब्लर्ब, जाहिरातीचा मजकूर, एखाद्या नाकारलेल्या पुस्तकाबद्दलचे ‘सविस्तर’ पत्र पाहण्यासाठी तुमच्या हाती देताना पहिल्यांदाच परीक्षकाला सामोरे जात असल्याचा ताण मला जाणवतो.)

आणि नंतरही अगदी आजतागायत ‘राजहंस’ परिवारात सामील झालेल्या कितीतरी तरुण लेखक-लेखिकांसाठी तुम्ही वयाचे अंतर अगदी सहज पार करता.

आयुष्यात सुभाषिते कधी कधी खरी होतानाही दिसतात. तसे ‘साहसे श्री: प्रतिवसति।’ हे तुमच्याही बाबतीत खरे झाले. १९८८ मध्ये ‘नेहरू डायरी’ हा आगामी नेहरू जन्मशताब्दीनिमित्त आखलेला मोठा प्रकल्प आपल्या हाती नसलेल्या राजकीय वाऱ्यांनी उधळून लावला होता. पण नंतरच्या अत्यंत ओढगस्तीच्या अन् धकाधकीच्या परिस्थितीतही तुम्ही ‘पानिपत’ प्रकाशित केली आणि ‘पानिपत होणे’ या वाक्प्रचाराचा निदान ग्रंथव्यवहारापुरता तरी अर्थ बदलण्याएवढे भरघोस यश या कादंबरीला लाभले. त्यात विश्वास पाटील यांच्या लेखणीचा जसा मोठा वाटा होता, तसाच ज्या आक्रमक जाहिराततंत्राने आणि कल्पक वितरणाने ही कादंबरी तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली, त्या तुमच्या धाडसी अन् कुशल व्यवस्थापनाचाही मोठा वाटा होता.

तुमच्याबरोबर गप्पा मारताना ‘पुस्तके आणि राजहंस’ हा विषय अटळ असला, तरी एकमेव नसतो. कधी कधी तर फक्त आरंभबिंदू एवढेच निमित्त साधण्याचे काम करून तो गायबही होतो. पण बाकीच्यांना ऐसपस वाटणाऱ्या गप्पांमधूनही तुमच्यातला सदासतर्क प्रकाशक ताजेतवाने पुस्तक शोधत असतो. ती शक्यता मावळली तर पुढच्या एक-दोन मिनिटांतच ‘‘बरंय मग, भेटू पुन्हा.’’ असे सौजन्यपूर्ण पण निरोपाचे वाक्य समोर बसलेल्याला ऐकू येते.

एका बाजूला असा वेगळेपणा हुडकत असतानाच नापसंत संहितेला स्पष्ट आणि ठाम नकार देणेही तुम्ही लीलया साधता.

तुमच्या व्यक्तिमत्त्वातला ‘राजहंसी दिगमा’ हा रंग सर्वात उठावदार रंग म्हणून दिसत असला, तरी त्याच्या जोडीला आणखी कितीतरी रंग- काही गहिरे, काही शीतल, काही उबदार, काही गडद, काही फिके असे अनेक रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा गोफ विणत असलेले मी पाहिले आहेत. आणि यातला कुठलाच रंग नजरेला खुपत नाही. कारण तुमच्या सहजस्वाभाविक ऋजुतेमुळे दाट रंगही भडक बनत नाही.

अत्यंत नामांकित अन् वलयांकित व्यक्तींपासून अत्यंत सामान्य गरजवंतांपर्यंत कितीतरी जणांना तुम्ही साहाय्य केलेले आहे; अगदी प्रसंगी स्वत: अडचण सोसूनसुद्धा! त्यामुळे अनेकांसाठी अनेक अडचणींमध्ये मदत मागण्याचे हक्काचे ठिकाण बनलेले आहात तुम्ही.

नाते जोडण्याच्या अन् जपण्याच्या सच्चेपणामुळे कितीतरी व्यक्तींनी आपल्या मर्मबंधातल्या ठेवी तुमच्याकडे जपणुकीसाठी दिल्या आहेत. अशा काही भावोत्कट क्षणांचा मी साक्षी होतो. एखादा माणूस दुखावला गेल्याची, दुरावला गेल्याची पुसटशी शंकासुद्धा तुम्हाला अस्वस्थ करते, हळवे बनवून टाकते. तुम्ही त्याची समजूत काढता तेव्हा ती वरवरची दिखाऊ मलमपट्टी नसते, तर ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोचवण्याची शिकस्त असते.

आपला छापखाना ‘साप्ताहिक मुद्रण’ बंद करण्याचा निर्णय घेताना तुम्ही सद्गदित होता ते छापखान्याची यंत्रधडधड बंद होणार म्हणून नव्हे, तर इतकी वर्षे बरोबरीने काम केलेल्या माणसांच्या दूर जाण्याने तुम्हाला भरून येते. मात्र त्याच वेळी तुमच्यातल्या कुशल व्यवस्थापकाने या साऱ्या मंडळींची नंतरची उपजीविकेची सोयही लावण्याची काटेकोर काळजी घेतलेली असते.

आपले, आपल्या संस्थेचे सर्व इंटरेस्ट सुरक्षित ठेवण्याची सावध व्यवहारकुशलता तुमच्यात मुरलेली; पण ही लक्ष्मणरेषा ओलांडून दुसऱ्याच्या नुकसानीतूनसुद्धा आपला मतलबी हेतू ओरबाडण्याची लबाड धंदेवाईक चलाखी तुम्ही कधीच केली नाही.

माणूस आणि माणसाची मते यांच्यातील अंतराचे भान सतत जागे ठेवून तुम्ही साऱ्यांचे ‘माणूसपण’ सांभाळलेत आणि त्यामुळेच अगदी परस्परविरोधी टोकाची मते असलेली माणसेही ‘राजहंस प्रकाशन’ परिवारात सहजी सामावून घेतलीत.

श्री. ग. माजगावकर स्वत:ला ‘उदारमतवादी हिंदू’ म्हणवून घेत. त्यांच्याच पद्धतीने तुमच्याही लवचीक उदारमतवादाने अनेकांना सामावून घेतले.

१९८३ मध्ये ‘राजहंस प्रकाशना’ची संपूर्ण धुरा श्रीगमांकडून तुमच्याकडे आली. तुम्ही ‘राजहंस’मध्ये दाखल झाला होतात १९६६ मध्ये. प्रकाशनक्षेत्रातील सुरुवातीचे धडे तुम्ही श्रीगमांच्या मार्गदर्शनाखालीच गिरवले होते. ‘माणूस’च्या वाटचालीतही श्रीगमांना तुमची भक्कम साथ लाभली होती. १९८३ नंतरच्या वाटचालीत तुम्ही ‘श्रीगमा = माणूस’ या समीकरणासारखे ‘राजहंस म्हणजे दिगमा अन् दिगमा म्हणजे राजहंस’ हे समीकरण घडवले.

वैचारिक मोकळेपणा, समाजहितषी बैठक, सर्व विचारधारांना समजून घेणारा उदार दृष्टिकोन आणि या साऱ्यांचा परिपाक म्हणून परस्परविरोधी मते असलेल्या व्यक्तींनाही ‘राजहंस प्रकाशन’ परिवाराबद्दल वाटणारा जिव्हाळा ही वैशिष्टय़े श्रीगमांप्रमाणेच तुम्हीही कसोशीने अन् असोशीने जपली. त्यामुळेच ही वैशिष्टय़े राजहंस प्रकाशनाच्या कार्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली.

‘माणूस’मधून उगवलेले सामाजिक विषयांसाठीचे गंभीर व्यासपीठ ही राजहंस प्रकाशनाची प्रतिमा अधिक बहुआयामी बनून उमलून आली ती तुम्हाला जीवनाबद्दल, जीवन समृद्ध करणाऱ्या साहित्य-कला-संगीत-नाटय़-चित्रपट-क्रीडा-विज्ञान अशा अनेक गोष्टींबद्दल वाटणाऱ्या ओढाळ कुतूहलातून. या रसिल्या कुतूहलापोटीच या साऱ्या क्षेत्रांमधील तज्ज्ञांकडून राजहंससाठीची पुस्तकनिर्मिती झाली.

माणसांबद्दलचे, जीवनाबद्दलचे, चतन्याबद्दलचे, नित्यनूतन विश्वाबद्दलचे हे कुतूहल हाच जणू तुमच्या चिरतरुण व्यक्तिमत्त्वाचा कंद आहे. ग्रंथनिर्मितीच्या कार्याचा कोंभ फुटल्याने हा कुतूहलाचा कंद कायमच विकसनशील राहिला.

‘माणूस’मधील अनेक गाजलेल्या लेखमालांना अथवा विस्तृत लेखनाला राजहंस प्रकाशनाने पुस्तकरूप दिले होते. मात्र जवळजवळ सगळ्या पुस्तकांचे विषय चरित्रे, आत्मचरित्रे, सामाजिक-राजकीय-ऐतिहासिक बाबी यांभोवती फिरणारे होते. तुम्ही या विषयांचा परीघ खूप विस्तारला. वाचकाला नेमक्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, याची नेमकी नस जणू तुम्हाला सापडली. राजहंसच्या व्यासपीठावर आता विज्ञान, पर्यावरण वावरू लागले. ललित लेखनाचा मोहोर फुलू लागला. चरित्र-आत्मचरित्रांचे दालनसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या व्यक्तिमत्त्वांनी गजबजून गेले. त्यात वैज्ञानिक, कलावंत, उद्योजक अशा व्यक्तीही उठून दिसू लागल्या. समाजकारण-राजकारणातील इतिहास-वर्तमानावर भाष्य करणारी वैचारिक ग्रंथसंपदा तर भरीवपणे आकार घेतच होती. जोडीला संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, नाटय़, चित्रपट अशा विविध क्षेत्रांमधील कलाविचार मांडणारी, निर्मितीच्या मागे घडणारी विचारप्रक्रिया शोधणारी पुस्तके वाचकाला आकर्षित करून घेऊ लागली. असे वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी साक्षेपी संपादकांचा संच तुम्ही बांधला.

वेगवेगळे विषय हाताळताना तुम्ही प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीमूल्यांकडे आवर्जून लक्ष पुरवायला सुरुवात केली. आशयसमृद्धीबरोबरच पुस्तकाचे रूपडेही आकर्षक ठरावे, बांधणी सशक्त असावी, वाचन केवळ मेंदू जागवणारे नाही तर नेत्रसुखदही बनावे आणि एकूणच पुस्तकवाचनाचा अनुभव जास्तीत जास्त आनंददायी आणि वाचकस्नेही ठरावा, या उद्देशाने पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे काळजीपूर्वक बघण्यास तुम्ही सुरुवात केली. उच्च निर्मितीमूल्ये राखण्याच्या या ‘राजहंसी’ प्रयत्नांना कुसुमाग्रज-पु. ल. देशपांडेंपासून श्री. पु. भागवत, मंगेश पाडगावकर, विक्रम सेठ, डॉ. जयंत नारळीकर अशा दिग्गजांनी आवर्जून दाद दिली आहे.

आशय आणि निर्मिती या दोन्ही आघाडय़ांवर राजहंस प्रकाशनाने आपला वैशिष्टय़पूर्ण ‘राजहंसी’ ठसा उमटवला आहे. राष्ट्रपती पदक, साहित्य अकादमी अन् राज्य शासनाच्या असंख्य पुरस्कारांपासून अखिल भारतीय प्रकाशक संघटनेच्या देशपातळीवरील निर्मितीविषयक पुरस्कारांपर्यंत विविध शासकीय अन् संस्थात्मक पुरस्कारांनी तुम्ही स्वत: आणि राजहंसची अनेक पुस्तके सन्मानित झाली आहेत. निरनिराळ्या विषयांमधील अधिकारी तज्ज्ञ आणि रसिक वाचकवृंद या दोन्ही वर्गानी राजहंसच्या पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

वितरणक्षेत्रातील अनेक अभिनव उपक्रम राजहंसच्या महाराष्ट्रभर उघडलेल्या शाखा अन् प्रत्येक ठिकाणी घट्ट  पाय रोवून काम करणारे राजहंसचे स्थायी प्रतिनिधी ही तुम्ही केलेली कल्पक उभारणी. ‘अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:।’ या उक्तीतील ‘दुर्लभ योजक’ तुमच्या रूपात राजहंसला लाभल्यामुळे ‘प्रकाशनक्षेत्रातील राजहंस’ ही सार्थ उपाधी राजहंसला मिळाली.

बदलत्या काळाबरोबर वाचकही बदलत असतो याचे भान तुम्हाला सतत असते. आजच्या वाचकांना- विशेषत: तरुणाईला कसे आपलेसे करावे, सकस अन् आशयसमृद्ध साहित्य त्यांना रुचेल-पचेल अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवावे, ई-बुकपासून समाजमाध्यमांपर्यंत विविध गोष्टींचा वापर करून या नव्या वाचकवर्गाशी जवळीक कशी साधावी, यासाठी तुम्ही सतत नवनवे प्रयोग राबवत असता, नवनव्या कल्पनांशी खेळत असता.

ही प्रदीर्घ वाटचाल करत असताना अगदी १९६६ पासून आजतागायत असा एकही लहान-मोठा प्रसंग नसेल, अशी एकही आनंदाची वा कसोटीची घडी नसेल, ज्यावेळी तुम्हाला आपल्या ‘श्रीभाऊ’ची आठवण झाली नाही! व्यक्तिगत संभाषण असो वा एखादा जाहीर कार्यक्रम, ‘श्रीभाऊ’ची आठवण  झाली की एरवी संयत असणारे तुम्ही काहीसे हेलावता, कातर मन स्वरातही डोकावू लागते. मग एखादे हलके, मिस्कील विधान करून तुम्ही सफाईने स्थिरावतातही. पण ‘श्रीभाऊ’ कायमचे तुमच्या मनाचा हळवा कोपरा व्यापून बसले आहेत.

म्हणूनच आपल्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त तुम्ही आपल्या ‘श्रीभाऊं’बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक वेगळी कल्पना राबवली. श्रीगमांनी आयुष्यभर आपल्या चिंतनातून, विचारांतून अन् लेखनातून सतत राष्ट्रवाद, ग्रामविकास, राष्ट्रउभारणी अशा विषयांचा वेध घेतला. त्या जोडीलाच एका हातात शास्त्रकाटय़ाची कसोटी, तर दुसऱ्या हाती कलाकमलाची रमणीयताही महत्त्वाची मानली. त्यांना सर्वार्थाने रस असलेल्या क्षेत्रांशी संबंधित संस्थांची निवड करून श्रीगमांच्या नावे असलेला हा स्मृतिनिधी या संस्थांना आदराने आणि स्नेहपूर्वक सुपूर्द करावा आणि त्याद्वारे श्रीगमांप्रति मनातील कृतज्ञभाव प्रतीकरूपाने व्यक्त करावा, असे तुम्ही ठरवले.

श्रीगमांना ध्यास होता राष्ट्रउभारणीचा अन् ग्रामविकासाचा. या क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान करणाऱ्या संस्था – ‘वनस्थळी’, ‘वंचित विकास’, ‘गुरुकुल’, ‘डांग मित्र मंडळ’; जनतेत ज्ञानाची भूक जागवावी आणि ती भूक पुरवण्यासाठी प्रयत्न व्हावेत हे ‘माणूस’च्या स्थापनेच्या वेळी श्रीगमांनी व्यक्त केलेले उद्दिष्ट. या दिशेने वाटचाल करणाऱ्या संस्था – ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ‘डॉ. रा. चिं. ढेरे प्रतिष्ठान’; शास्त्रीय संगीताची वाट केवळ ‘कानसेन’ म्हणून न चालता तरुण वयात मफील करण्याएवढा मुक्काम त्या वाटेवर गाठणाऱ्या श्रीगमांच्या संगीतप्रेमाबद्दल बाकी काही सांगण्याची गरजच नाही. त्यासाठीच शास्त्रीय संगीतात पायाभूत काम करणारी संस्था – ‘भारत गायन समाज’.. राजहंस प्रकाशनातर्फे ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर स्मृतिनिधी या सात वेगवेगळ्या संस्थांच्या हाती सोपवण्यात येत आहे. त्याला निमित्त डकवायचेच ठरवले तर ते आहे तुमच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीचे.

खरे सांगायचे तर मला आजही डोक्यावरचा रुपेरी मुकुट वगळता तुमच्या ‘दिसण्या’मध्ये पंच्याहत्तर हा आकडा दिसतच नाही. तुमच्या वर्धिष्णू व्यक्तिमत्त्वातूनच गतिमान होणारा तुमच्याभोवतीचा सृजनाचा सोहळा असाच साजरा होवो आणि कधी सहभागी, तर कधी साक्षीदार अशा कोणत्याही भूमिकेतून त्यात सामील होण्याचे भाग्य आम्हा साऱ्यांना लाभो, हीच इच्छा!

आपला,

सदानंद