|| अतुल देऊळगावकर

atul.deulgaonkar@gmail.com

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार

आधुनिक भारताचे आधारस्तंभ ठरवताना अनेक विद्वानांना काही क्षेत्रांचा विसर पडतो. त्यापकी अभियांत्रिकी हे एक आहे. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आवाका आणि व्याप्ती पाहून हे सारे एक व्यक्ती करू शकते, हे वास्तव दंतकथेसारखे अशक्यप्राय वाटू लागते. शेकडो अभियंते आणि अनेक संस्था करू शकणार नाहीत अशी ती उत्तुंग कामगिरी होती. कन्फ्युशियसने केलेली ‘तुम्हाला व्यक्तीचं नावसुद्धा माहीत नसेल, तरीही त्याच्या ज्ञानाचा लाभ जगभर पोहोचू शकतो आणि जगात बदल घडून येतो, तोच खरा युगप्रवर्तक ज्ञानी!’ अशी व्याख्या त्यांच्याबाबतीत चपखलपणे लागू पडते. विसाव्या शतकाच्या आरंभी कलेच्या क्षेत्रात ‘अल्प हेच अधिक आहे (लेस इज मोअर)’ हा किमानतावाद (मिनिमलीझम.. कुठल्याही बाबीचा कमीत कमी वापर) दिसू लागला होता. १९६० नंतर चित्रकला, संगीत या क्षेत्रांतही किमानतावादी तयार झाले. आपल्याकडे त्याआधी ७५ वर्षे – म्हणजे १८८५ सालीच ‘विश्वेश्वरय्या किमानतावाद’ वास्तवात उतरवला गेला होता. द्रष्टे अभियंता, अभिकल्पक, अर्थनीतिज्ञ, नियोजक, शिक्षणतज्ज्ञ आणि आयुष्यभर गरीबांसाठी झटणाऱ्या या अलौकिक विभूतीला आपण केवळ ‘अभियंता दिन’ साजरा करण्यापुरते मर्यादित ठेवले आहे. विश्वेश्वरय्या (१८६१- १९६२) यांनी पिण्याचे पाणी, सांडपाणी, सिंचन आणि धरण यांची व्यवस्था करताना भांडवल व ऊर्जा यांचा अतिशय किमान वापर व्हावा असा कटाक्ष ठेवला होता. या योजनांची शताब्दी उलटून गेल्यानंतरही त्या उत्तम चालू आहेत. विश्वेश्वरय्यांच्या जन्मशताब्दीप्रसंगी पं. नेहरू म्हणाले होते : ‘विश्वेश्वरय्या हे भारताला पडलेले सुंदर स्वप्न आहे. केवळ विश्वेश्वरय्या यांच्या कर्तृत्वामुळेच देशाची अनेक स्वप्ने साकार झाली आहेत.’

आपल्याकडे कंत्राटदारशाही रुजू झाल्यापासून (केव्हापासून, या तपशिलात मतभेद असू शकतात.) विश्वेश्वरय्या हे फक्त ‘१५ सप्टेंबर’पुरते उरले आहेत. ‘अभिकल्प ते अंमलबजावणी- सब कुछ ठेकेदार’ असा प्रायोजित कार्यक्रम असल्यामुळे अशा दीर्घायू योजनांच्या निर्मात्याला दु:स्वप्न ठरवून त्यांच्या विचारांची उपेक्षा सध्या चालू आहे. आपल्या अधोगतीचा हा नीचांक आहे की अजून काही बाकी आहे, हे पुढे दिसून येईलच.

विज्ञान, तंत्रज्ञान, विशेषत: दुष्काळ आणि पाणी या विषयांवर सातत्याने व आस्थेने लिहिणाऱ्या मुकुंद धाराशिवकर यांचे ‘द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरय्या’ या पुस्तकामुळे विश्वेश्वरय्या यांचे बहुविध अपूर्व कर्तृत्व वाचकांना उपलब्ध झाले आहे. त्यांनी बंगळुरू, म्हैसूर येथे जाऊन विश्वेश्वरय्या यांच्या नातेवाईकांना भेटून, तसेच अनेक संस्थांमधील प्रचंड दस्तावेज धुंडाळले आहेत. त्यांनी पाच वर्षे केवळ विश्वेश्वरय्या यांचाच ध्यास घेतला होता. मनोविकास प्रकाशनाने धाराशिवकर यांच्या निधनानंतरही हा प्रकल्प त्याच निष्ठेने चालू ठेवला. यामुळेच विश्वेश्वरय्या यांचे अलक्षित पलू आणि कार्य आपल्यासमोर आज पुस्तकरूपात आले आहे.

बंगळुरूजवळील मुद्देनहळ्ळी गावचे पुजारी श्रीनिवास शास्त्री यांचे अकाली निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी व्यंकटलक्ष्मी या पाच मुले व दोन मुलींना घेऊन भावाकडे वास्तव्यास आल्या. बंगळुरू येथे आल्यावर आपल्या शिक्षणाचा भार मामावर पडू द्यायचा नाही, ही भावना या सर्वच मुलांमध्ये होती. क्रमांक दोनचे चिरंजीव विश्वेश्वरय्या हे शिकवण्या घेत शिकू लागले. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यावर म्हैसूर राज्याची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी पुण्याच्या ‘कॉलेज ऑफ सायन्सेस’मध्ये (कालांतराने ते ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग’ झाले. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वेश्वरय्या हेच होते.) प्रवेश घेतला. त्यावेळी पुणे हे राष्ट्रीय घडामोडींचे केंद्र होते. न्या. रानडे, टिळक, आगरकर, कर्वे यांच्या व्याख्यानांना ते आवर्जून जात असत. पुढे या सर्व प्रभृतींची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चाही केली. या काळात त्यांनी मराठी शिकून घेतले. पुढे अभियंता झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्यावर खानदेशचा कार्यभार सोपवला. (महाराष्ट्रात त्यांचे २८ वर्षे वास्तव्य होते.)

विश्वेश्वरय्या यांच्यासमोर धुळे येथे १६ किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा करण्याचे पहिले आव्हान आले. त्यांनी जलवाहिन्या आखून वानलिका (सायफन) तत्त्वाने पाणी आणण्याचे ठरवले. त्या काळातही बांधकाम यंत्रणेत साचेबद्ध चाकोरी करणारे कर्मचारी व ठेकेदार होतेच. नियमानुसार जाणारे व अहंगंडाने उन्मत्त झालेले ब्रिटिश अधिकारीही होते. अशा मानवी व इतर तांत्रिक अडचणींवर मात करून त्यांनी ही योजना वेळेआधीच पूर्ण केली. हे पाहून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आलेल्या गोऱ्या अधिकाऱ्यानेसुद्धा त्यांची प्रशंसा करून त्यांना बढती दिली. त्यानंतर त्यांनी सक्कर (सिंध), सूरत, पुणे व कोल्हापूर येथील पाणी योजनांची आखणी व अंमलबजावणी केली. नदीच्या पात्रात काठाजवळच छतासह (स्लॅब) विहीर बांधायची. २० फूट खोलीवर विहिरीला बारीक छिद्रे (वीप होल्स) पाडल्यामुळे नदीचे पाणी गाळून थेंबाच्या रूपाने विहिरीत येते. या विहिरीतील पाणी पंपाने टेकडीवरील पाण्याच्या टाकीत पोहोचवायचे आणि तिथून शहराला पाणी पुरवायचे. विश्वेश्वरय्यांनी अशी योजना सक्कर येथील सिंधू नदीवर प्रथम केली. तेव्हापासून भरण विहीर (जॅक वेल) ही पद्धत रूढ झाली.

१८९५ साली विश्वेश्वरय्या पुण्यामध्ये आले तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात पाणीवाटपाबाबतीतला असंतोष शिगेला पोहोचला होता. हे ओळखून त्यांनी फग्र्युसन महाविद्यालयात सभाच ठेवली. शेतकऱ्यांचा संताप ऐकून त्यांनी पाणीपुरवठय़ासंबंधीची आकडेवारी सादर करत सगळा प्रश्न वाटपात असल्याचे स्पष्ट केले. ‘‘खानदेशात पाणीवाटपासाठी फड पद्धत असून शेतकरीच पाटकरी नेमतात. चाकार पद्धतीने पिके घेतली जातात. दुष्काळी भाग असूनही प्रत्येकाच्या वाटय़ाला ऊस, कापूस, डाळी, भाजीपाला व कडधान्ये आल्यामुळे सगळे शेतकरी संपन्न झाले. दररोज सरकार व अधिकाऱ्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा पाणीवाटपाची जबाबदारी उचला,’’ असे खडे बोल त्यांनी सुनावले. तसेच १९०१ साली भारताच्या पहिल्या सिंचन आयोगासमोर पाणीवाटपासाठी ‘सर्वाना समान न्याय देणारी ब्लॉक पद्धत’ लागू करून सुबत्ता समाजाच्या सर्व स्तरांत पोहोचविण्याचा आग्रह धरला. इतकेच नाही, तर त्यांनी नीरा नदीवर ही पाणीवाटप पद्धत यशस्वीही करून दाखवली. १९०८ च्या मुंबई गॅझेटियरमधील नोंदींत ‘नीरा कालव्यावरील ब्लॉक पद्धत राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न व सरकारचा महसूल वाढला. याचे श्रेय बुद्धिमान, कार्यक्षम आणि दक्ष अधिकारी विश्वेश्वरय्या यांना जाते,’ अशी माहिती नमूद केली आहे. त्यांनी कुकडी, मुठा, प्रवरा व गोदावरी येथे ब्लॉक पद्धत करण्याच्या योजना केल्या. पूर येताच पाण्याच्या दाबाने दरवाजे आपोआप उघडतील आणि पूर ओसरताच पुन्हा पूर्ववत होतील असा कल्पक अभिकल्प विश्वेश्वरय्या यांनीच जगाला दिला. त्यांनी पुण्यासाठी खडकवासला धरण बांधून त्यावर सरकणारे स्वयंचलित दरवाजे (ऑटोमॅटिक गेट्स) बसवले आणि मित्रांच्या आग्रहामुळे त्याचे पेटंट प्राप्त केले.

विश्वेश्वरय्या यांची ही ख्याती ऐकून कोल्हापूरच्या महाराजांनी मातीचे धरण फुटण्याचा धोका टाळण्याकरता त्यांना पाचारण केले. त्यांनी धरण भरताच पाणी निघून जाण्याची व्यवस्था सुचवली. तीन वर्षांनंतर राधानगरी धरण बांधून दिले. काही कालावधीत त्यांनी धारवाड, विजापूर या शहरांसाठी पाणीपुरवठा योजना केल्या. मुंबई नगरविकासासाठी आराखडा तयार करून त्यानुसार अडथळे काढून टाकले. १९०८ साली ब्रिटिशांच्या नोकरीतून निवृत्ती घेऊन विश्वेश्वरय्या युरोप, अमेरिका, कॅनडा व रशिया या देशांचा दौरा करून आले. निझाम सरकारने त्यांना मुख्य अभियंता हे पद बहाल केले. हैदराबादला महाविध्वंसक पूर येऊन गेला होता. पूरनियंत्रण, मलनि:सारण व सांडपाणी व्यवस्थापन ही आव्हाने त्यांनी लीलया पेलून दाखवली. हैदराबाद, इंदूर, बंगळुरू, म्हैसूर, बेळगाव व मुंबई (नवी अंधेरी) या शहरांची रचना व विस्तार यासाठी त्यांनी आराखडा तयार करून दिला.

१९०९ साली म्हैसूरच्या महाराजांनी विश्वेश्वरय्या यांना मुख्य अभियंता होण्याची विनंती केली. त्यावर विश्वेश्वरय्या यांनी लिहिले होते : ‘देशाच्या विकासाकरिता पायाभूत सेवा, तंत्रशिक्षण व उद्योग चालू करणे आवश्यक आहे, हे मला माझ्या विदेश दौऱ्यातून लक्षात आले आहे. आपल्याला अशी इच्छा आहे काय? माझे नकाशे, योजना व अंदाजपत्रके युरोपीय अधिकाऱ्याला दाखवू नयेत. काम चालू असताना समिती नेमून अडथळा आणू नये. मी राज्याच्या भल्यासाठीच काम करीन यावर पूर्ण विश्वास ठेवावा. शंका असल्यास थेट मला विचारावे.’ विश्वेश्वरय्या यांनी घातलेल्या या अटी मंजूर झाल्यावर ते तिथे रुजू झाले. १९१९ साली निवृत्त होताना ते म्हैसूरचे दिवाण (प्रशासक) होते. या काळात ३०० किलोमीटर रेल्वेमार्ग तयार झाले.  ‘पायाभूत सेवा द्या, विकास आपोआप होईल’ हे त्यांचे ब्रीद होते. त्यानुसार त्यांनी म्हैसूर राज्याला तयार केले. भटकळ बंदर विकसित करण्याच्या त्यांच्या संकल्पनेला इतर अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. परंतु भारत सरकारच्या कमिशनने ‘कोलार व भद्रावती येथील उद्योगांना नवी चालना मिळेल’ असा निर्वाळा दिल्यानंतर मार्ग सुकर झाला. १९११ ते १९३१ या २० वर्षांत त्यांनी कृष्णराजसागर धरण प्रकल्प पूर्णत्वास नेला. कावेरी नदीवरील ८६०० फूट लांब, १४० फूट उंचीचे, २.४३ कोटी रुपये खर्च आलेले हे धरण त्या काळातले भारतातील सर्वात मोठे व पूर्णत: भारतीय अभियंत्यांनी अभिकल्पित केलेले धरण होते. धरणासाठी लागलेल्या १६१ दरवाजांपकी १३१ भद्रावतीला तयार करण्यात आले, तर केवळ ३० आयात केले होते. आणि हे सर्व काही विश्वेश्वरय्या यांच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेमुळेच प्रत्यक्षात आले होते!

कर्मयोग आचरणातून व्यक्त करणारे विश्वेश्वरय्या हे शब्दांतून कधीही व्यक्त होत नसत. शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर, मितभाषी, स्तुती व निंदा दोन्ही मनावर न घेणारे कमालीचे संयमी, कितीही कटू प्रसंगात शांत व नम्रपणे आपली मते स्पष्टपणे मांडणारे असे अतिशय विरळा व्यक्तिमत्त्व होते त्यांचे. विश्वेश्वरय्या यांच्या घरातील वातावरण अतिशय धार्मिक असूनही ते निरीश्वरवादी होते. ते कधीही देवळात गेले नाहीत, धार्मिक उत्सवांत सहभागी झाले नाहीत किंवा कुठल्याही कार्यारंभी त्यांनी देवाला नमस्कार केला नाही. समस्त भारतीयांशी तुच्छतेने वागणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही त्यांचा धाक वाटत असे. तर ब्रिटिश अभियंत्यांना त्यांच्या कर्तृत्वाविषयी विलक्षण आदर होता. त्यामुळेच १९१३ साली ब्रिटनच्या राणीने ‘सर’(नाइटहूड) हा बहुमान त्यांना बहाल केला.

म्हैसूरचे दिवाण झाल्यावर विश्वेश्वरय्या यांनी तोवर इंग्रजीतून सादर होणारे अंदाजपत्रक स्थानिक कन्नड भाषेत चालू केले. स्थानिक स्वराज्य संस्था बळकट केल्या. प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी आचारसंहिता लिहून ती सर्वाना वाटली. अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व अधिकार यांची स्पष्ट कल्पना दिली. दर तीन महिन्यांनी ‘कार्यक्षमता तपासणी अहवाल’ तयार करवून घेतला. त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. सर्वाना सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. तसेच मुलींच्या शिक्षणाला विशेष उत्तेजन दिले. शाळा व वाचनालये काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्याच पुढाकारामुळे १९१६ साली म्हैसूर विद्यापीठाची स्थापना झाली. तर १९१९ साली ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस’च्या स्थापनेसाठी ४०० एकर जागा त्यांनी दिली. बंद पडू लागलेल्या ‘भद्रावती आयर्न अ‍ॅण्ड स्टील इंडस्ट्री’ला पुनरुज्जीवित केले. ग्रामीण भागात छोटे व मोठे उद्योग चालू व्हावेत यासाठी त्यांनी दुग्ध व्यवसाय, मधमाशीपालन, कोंबडीपालन, रेशीम उत्पादन, लाकडी खेळणी, चंदनापासून तेल व साबणाचे (म्हैसूर सँडल सोप) उत्पादन या व्यवसायांना चालना दिली. हे उद्योग आजही त्यांची छाप (ब्रँड) टिकवून आहेत. तरुणांचे कौशल्य व नपुण्य विकसित करण्यासाठी शेतकी तसेच तंत्रशिक्षण शाळाही त्यांनी चालू केली. उद्योगांना अर्थसाहाय्य करण्याकरिता ‘बँक ऑफ म्हैसूर’ सुरू केली.

गंगा नदीचे संपूर्ण खोरे हा गाळाचा प्रदेश आहे. शेकडो फूट खोल गेले तरीही पक्का खडक लागत नाही. त्यामुळे वाराणसीपासून कोलकात्यापर्यंत गंगेवर पूलच नव्हता. देश स्वतंत्र झाल्यावर बिहार व बंगाल राज्यातून पुलाची मागणी जोर धरू लागली. तेव्हा १९५२ साली, ९२ वर्षांच्या विश्वेश्वरय्यांनी कार, हेलिकॉप्टर, विमान यांतून प्रदीर्घ पाहणी केली. ‘केवळ एकच पूल बांधणे पुरेसे नाही. मात्र, शासनाला एकच बांधायचा असेल तर मोकामेह ही जागा सगळ्यात योग्य आहे. बंगालच्या फराक्का येथे रेल्वे व रस्ता यांसाठी संयुक्त पूल बांधावा. पाटणा येथे पूल महागडा ठरणार आहे. गंगेच्या पात्राखालून बोगदा करून वाहतुकीला पर्याय द्यावा,’ असा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार पूल निर्माण केले गेले. एरवी स्वदेशीचा आग्रह धरणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना भारतीय पोलाद व सिमेंट यांच्या गुणवत्तेविषयी कल्पना असल्यामुळे ‘जगातील उत्तम विदेशी कंपनीकडून पूल बांधावेत’ हे त्यांनी स्पष्ट केले होते.

असा कामाचा प्रचंड व्याप असतानाही विश्वेश्वरय्या यांनी तब्बल २८ पुस्तके लिहिली. ‘रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया’, ‘नेशन बिल्डिंग’, ‘प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया’ या शीर्षकांवरूनच त्यांच्या पुस्तकांची सघनता लक्षात येते. त्यांचे ‘बिल्डिंग ऑफ मॉडर्न इंडिया ’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा त्यांचे वय होते ९६ वर्षे!

विश्वेश्वरय्या हे गांधीजींपेक्षा आठ वर्षांनी मोठे होते. त्या दोघांची प्रत्यक्ष भेट एकदाच झाली असली तरी दोघांमध्ये प्रदीर्घ पत्रव्यवहार झाला होता. दोघांत मतभेद असूनही एकमेकांविषयी अपार आदर होता. मोठय़ा उद्योगांना गांधीजींचा विरोध जाहीरच होता. तर विश्वेश्वरय्या यांना देशाला स्वावलंबी करण्याकरिता ते अटळ वाटत होते. गांधीजींनी विश्वेश्वरय्या यांना उत्तरादाखल पत्रात लिहिले, ‘आपण अवजड उद्योगाविषयी आपली मते स्पष्टपणे लिहिली आहेत. ती मान्य करायला मला कोणतीच अडचण दिसत नाही. मोठी यंत्रे जेव्हा मानवी काम हिसकावून घेतात आणि त्यांना पर्यायी काम उपलब्ध करून देत नाहीत, तेव्हा माझा विरोध चालू होतो.’ १९३७ साली ओरिसात महापूर आल्यावर गांधीजींनी त्यांना पत्र पाठवले, ‘पुराच्या थमानाविषयी आपण वाचले असेलच. मी ओरिसाचे मुख्यमंत्री विश्वनाथ दास यांना आपल्याशी संपर्क साधून आपले मार्गदर्शन घेण्यास सांगितले आहे. आपल्याला जे जे करता येणे शक्य आहे ते ते आपण करालच याची खात्री आहे.’ या पत्रानंतर विश्वेश्वरय्या यांनी तिथे जाऊन तपशीलवार पाहणी केली आणि हिराकुडला धरण बांधण्याची सूचना केली.

१९५५ मध्ये ‘भारतरत्न’ स्वीकारण्याविषयीचे पत्र त्यांना मिळाले. उत्तर देताना ९५ वर्षांचे विश्वेश्वरय्या पंतप्रधान नेहरूंना लिहितात : ‘तुम्ही मला ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च किताब देऊ करत आहात. मात्र मी एक गोष्ट स्पष्टपणे नोंदवून ठेवतो, अशी पदवी दिल्यावर आपल्या सरकारने केलेल्या कामाची मी स्तुतीच करीन अशी तुमची अपेक्षा असेल तर मी तसे करणार नाही. अयोग्य कामावर मी टीका करणारच. हे तुम्हाला मान्य असेल तर आणि तरच मला पदवी द्या.’ नेहरूंनाही हे परखड मत फारच आवडले.

आपण खरोखरीच ज्ञानयुगात असतो तर विश्वेश्वरय्या यांच्या कर्तबगारीचा वेध घेण्यासाठी सर्व भाषांतून असंख्य पुस्तके व वृत्तचित्रे समोर आली असती. धरण, पाणी योजना, पूल, मलनि:सारण यंत्रणा या त्यांच्या अभिकल्पांचा व नियोजनाचा आज कसा उपयोग होऊ शकतो? प्रचलित प्रकल्पांमध्ये उणिवा कोणत्या आहेत? त्यांना दीर्घायू व आपत्तीरोधक कसे करता येईल? आजच्या धोरणकर्त्यांनी या प्रश्नांवर खुल्या चर्चा घडवल्या असत्या; परंतु हे दिवास्वप्न आहे. आज विश्वेश्वरय्या असते तर, ‘ते महान आहेत, परंतु त्यांचे अभिकल्प हे खर्चीक, वेळखाऊ आहेत. शिवाय ते मराठी नाहीत’ अशा ठोस कारणांनी त्यांना कालबाह्य़ ठरवले गेले असते. (महाराष्ट्र राज्याने लॉरी बेकर यांना अशीच वागणूक दिली होती.)

धाराशिवकर यांनी अकरा प्रकरणांतून समग्र विश्वेश्वरय्या सादर केले आहेत. देशाविषयी कळकळ वाटणाऱ्या सर्वानी, विशेषत: अभियंत्यांनी हे पुस्तक वाचणे अनिवार्य आहे. आपण कुठे आहोत आणि जाऊ शकतो याचा अभिकल्प त्यातून मिळू शकतो. नवा आराखडा व कृती त्यातून शक्य होईल, असे वाटते.

  • ‘द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरय्या’- मुकुंद धाराशिवकर,
  • मनोविकास प्रकाशन,
  • पृष्ठे- ४०४, किंमत- ४५० रुपये.