दुपारचे भगभगीत ऊन.. जणू सारा आसमंतच पेटला आहे असं जाणवणारी धग.. कापडी मंडपात सर्वागाला चटके देणाऱ्या वस्त्रगाळ उन्हाच्या झळा. अंगातून झिरपणारे घामाचे लोटच्या लोट.. आणि मंडपाच्या बाजूलाच सुरू असलेला वाद्यांचा प्रचंड कोलाहल. या धांगडिधग्यात  ‘घटिका समीप’ येत असल्याचे सांगणाऱ्या दुर्बल आवाजाकडे कोणाचेच लक्ष जात नाही. ‘बजाव..’ म्हणत बेभान होऊन नाचणाऱ्यांची गर्दी.. हे चित्र आता सरसकट लग्नांमध्ये दिसतेच दिसते. मग ते लग्न कापडी मंडपात असो वा एखाद्या मंगल कार्यालयात.

यंदा परिस्थिती जरा वेगळी आहे. सलग तीन वर्षांपासून मराठवाडा नापिकीचे संकट आणि दुष्काळाच्या झळा अनुभवतोय. त्याचा परिणाम ग्रामीण भागातल्या लग्नसोहळ्यांवरही झाला आहे. हुंडय़ाचा तडका गेल्या काही वर्षांत वाढला होता. पिकपाणी चांगले नाही म्हणून मुलीचे लग्न करण्याची ऐपत नसणारे वधुपिते हतबल झाले. काही ठिकाणी लग्ने पुढे ढकलली गेली. ‘यंदा नाही, आता पुढच्या वर्षी..’ असे म्हणत परिस्थितीचा रेटा निमूटपणे सहन करावा लागला. भरमसाठ हुंडय़ासाठी अडून बसणाऱ्यांना या वर्षी दुष्काळाने मात्र जरा भानावर आणले. मुलीचा बाप जरी ‘आता ऐपत नाही, पुढच्या वर्षी बघू’ असे म्हणाला तरीही मुलाचा बाप मात्र ‘आम्ही सांभाळून नेतो’ असे म्हणताना दिसत आहे. ‘हुंडय़ातले अध्रे पसे यंदा द्या, अध्रे पुढच्या वर्षी द्या’ असे म्हणत वरपक्ष तडजोडीसाठी तयार होताना दिसतो आहे. हे चित्र अपूर्व असेच आहे. ‘पदरात घ्या’ हा खरे तर मुलीच्या बापासाठीच जन्माला आलेला शब्द; पण या वर्षी मुलांचे बापही ‘पदरात घ्या’ असे म्हणताना दिसत आहेत.

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

कधीकाळी आपल्याच दारात मुलीचे लग्न लावले जायचे. ‘दुसरीकडे काय म्हणून लावायचे? दारातच मांडव घालू!’ असे म्हणण्यातही एक प्रकारची प्रतिष्ठाच बोलणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत असे. अशी दारासमोर होणारी लग्ने आता आढळत नाहीत. लहानसहान मंगल कार्यालय शोधले जाते. ‘असामी’ जर मोठी असेल तर मग विचारायलाच नको. गावोगावी उदयाला आलेल्या पुढाऱ्यांकडची जी लग्ने होतात त्यांचे अनुकरण गावातली इतर माणसेही करतात. पुढाऱ्यांच्या लग्नातला झगमगाट हा सामान्य माणसाचे डोळे दिपवणारा असतो. अशी लग्ने शक्यतो भर दुपारी होत नाहीत, ती होतात सायंकाळी. भव्य आतषबाजी, आसमंतात उडणारे भुईनळे, विद्युत् दिव्यांची रोषणाई, तोफांचे आवाज, फटाक्यांच्या लडी हे सारे काही हौसेने करायचे तर त्यासाठी अंधार पडायला हवा. जोडीला एखादा ऑर्केस्ट्रा असतो, तर कुठे भावगीतांच्या गाण्याची मफल असते. ही गाणी चालू असतानाच मंडपात दाखल होणाऱ्या ‘दखलपात्र’ पाहुण्यांचे नाव घेऊन स्वागत होते.

या स्वरूपाचे ध्वनिक्षेपक संचालन करणारी काही विशिष्ट माणसे आता तालुका पातळीपर्यंत आहेत. त्यांना येणाऱ्या खास पाहुण्यांची ओळख करून द्यावी लागत नाही. मंडपाच्या प्रवेशद्वारावर अशा पाहुण्याचा चेहरा झळकल्याबरोबर ध्वनिक्षेपकावरून नाव पुकारले जाते. पूर्वी मराठवाडय़ात लग्न-समारंभात फेटे बांधून स्वागत-सत्कार करण्याची पद्धत नव्हती. पश्चिम महाराष्ट्रातली ही पद्धत बीड जिल्हामाग्रे हळूहळू सगळ्या मराठवाडय़ात आता पसरली आहे. लग्नाआधी हमखास ठरावीक पाहुण्यांचा फेटे बांधून सत्कार केला जातो.

लग्नावरून यजमानाची प्रतिष्ठा जोखण्याचा मापदंड जो तयार झाला तो अजूनही लोकांच्या मानसिकतेतून जात नाहीए. लग्नाला जमणारी गर्दी, पुढाऱ्यांची उपस्थिती, भपकेबाजपणा यावरून लग्न कसे झाले, ते ठरवले जाते. त्यात बडय़ा मंडळींची लग्ने म्हणजे अनेक गोष्टी नव्याने दिसणार. पूर्वी ग्रामीण भागात म्हणच होती- ‘मोठय़ाचं लग्न पाहायला अन् गरीबाचं लग्न खायला.’ आपुलकी आणि खाऊ घालण्याबाबतचे अगत्य हे गरीबाच्याच लग्नात आढळते, असा अनुषंग या म्हणीला आहे. जिथे सत्ता आहे तिथे सत्तेचा झोक लग्नातही प्रतििबबित होताना दिसतो. त्याने सामान्यांचे डोळे दिपतात. ‘लग्न असावे तर असे!’ हा अचंबा अनेकांच्या मुखातून उमटतो. ऐपत नसणारी माणसेही मग आपल्या घरचे लग्न याच पद्धतीने व्हावे असा विचार करू लागतात. भरमसाठ हुंडा घेणाऱ्यांचीही अपेक्षा लग्न जोरात झाले पाहिजे, अशी मुलीच्या बापाकडे जोरकसपणे असते. एका मुलीचे लग्न केले की तो बिचारा बाप तीन-चार वष्रे तरी केवळ कर्ज फेडण्याचेच काम करतो. मुलीच्या लग्नासाठी कर्ज ही बाब आता नित्याची झाली आहे. मराठवाडय़ात शेती पिकत नाही. उत्पन्नाचा कोणताच मार्ग नाही. अशावेळी कर्ज काढूनच लग्न करावे लागते. शेती तारण ठेवून बँकांमार्फत किंवा खासगी सावकारांमार्फत कर्ज काढले जाते. निसर्गाशी खेळला जाणारा जुगार, सततची नापिकी यामुळे हे कर्ज मग फेडता येत नाही. कर्जाचे मीटर वाढतच जाते. जुनी माणसे म्हणतात, ‘वाहत्या पाण्याला झोप असते, पण व्याजाला नाही.’ ज्या घरी मुलीचे लग्न झालेले असते त्या घरावर कर्जाचे ओझे ही बाब ठरलेलीच.

मराठवाडय़ात गेल्या दोन महिन्यांत सामूहिक विवाह सोहळे मोठय़ा प्रमाणावर झाले. एकटय़ा जालना जिल्ह्यत दोन सामूहिक विवाह सोहळ्यांत एक हजार जोडपी विवाहबद्ध झाली. परभणी, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यंच्या ठिकाणी तसेच तालुक्यांच्याही ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे झाले. लग्नाचा मांडव दारातच पाहिजे- या पारंपरिक मानसिकतेला सामूहिक विवाह सोहळे आधी दुय्यम वाटायचे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावणे म्हणजे कमीपणा- असा विचित्र पीळही ग्रामीण भागात जाणवायचा. या वर्षी परिस्थितीने घडवून आणलेला चांगला बदल म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्यात शेकडोंच्या संख्येने लागलेली लग्ने होय. त्यामुळे अनेकजण कर्जबाजारी व्हायचे वाचले. अर्थात मुलीच्या बापाला हुंडा चुकत नाही. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे बाकीचा खर्च वाचतो, इतकेच. राजकीय पुढारी आपली प्रतिमा उजळून घेण्यासाठी अशा सोहळ्यांचा वापर करतात. पण आपली वेळ साजरी झाली याचे समाधान गरजूंना असते.

मधल्या काळात मराठवाडय़ात आणखी एक लग्नाचा प्रकार रूढ झाला होता. मोजकी माणसे न्यायची आणि लग्न लावायचे. मुलीच्या बापाचा जेवणावळी, मंडप आदींवरचा खर्च कमी करायचा. हे लग्न ‘गेटकेन’ म्हणून ओळखले जायचे. पण यातही असे लग्न लावून मुलीच्या बापाकडून पुन्हा हुंडय़ाशिवाय वेगळी रक्कम उकळली जायची. ‘‘गेटकेन’ लग्न लावू, पण हुंडा वाढवून द्या,’ अशी मागणी मान्यही होत असे. मुलीच्या बापाचा मात्र तेवढाच पसा जायचा. आता अशा ‘गेटकेन’ लग्नाचे प्रमाण कमी झाले आहे. जी लग्ने होतात ती झोकातच.

अनेक गावांमध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे. पूर्वी लग्नप्रसंगी बलगाडीद्वारे पाणी आणले जायचे. पुढे ही जागा टँकरने घेतली. आता लग्नाच्या ठिकाणी विकतच्या पाण्याचे जार आढळतात. ज्या गावी लग्न आहे तिथे वऱ्हाड धडकल्यानंतर तरुणाईचा पहिला शोध असतो तो घसा ओला करण्याचे दुकान कुठे आहे, हा. ज्या गावात प्यायला टँकरचे पाणी येते त्या गावात सर्व प्रकारची शीतपेये आता उपलब्ध असतात. पाणी जारचे, पत्रावळी कागदाच्या, द्रोण थर्मोकोलचे, ग्लास प्लास्टिकचे असे चित्र आता मराठवाडय़ाच्या ग्रामीण भागातल्या कोणत्याही लग्नात पाहायला मिळते. लग्नावरचा खर्च दिवसेंदिवस वाढतोच आहे. पण खर्च वाढतोय असे म्हणण्यापेक्षा कर्ज वाढतेय असेच म्हणणे जास्त सयुक्तिक. कारण वाढणाऱ्या खर्चाला जोड आहे ती कर्जाची. कर्जाशिवाय खर्च नाही. अर्थात याबाबतचे भान मात्र कुठेच दिसत नाही. ‘वऱ्हाड  जोमात.. गाव कोमात.. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय..’ आवाज तर एकदम टिपेलाच पोहोचलाय. या गोंगाटात कोणाचेच कोणाला ऐकू येत नाही.

आसाराम  लोमटे- aasaramlomte@gmail.com