पूर्व विदर्भ उत्तम प्रतीच्या तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

देशात आणि देशाबाहेर ज्या तांदळाला सर्वाधिक मागणी आहे, त्यात हिराआणि चिन्नूरचा समावेश आहे. तांदळाचे हे वाण या भागातील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी  शोधून काढले आहे. उत्तम दर्जा आणि भरपूर उत्पन्न देणारी तांदळाची तब्बल नऊ वाणे शोधून काढणाऱ्या या संशोधकाच्या कामाची दखल ना कृषी विद्यापीठाने घेतली, ना सरकार नामक व्यवस्थेने! उपेक्षेच्या अंधाराशी झगडत हा संशोधक अखेर काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्यासारखे अनेक संशोधक आजही पिकांच्या नवनव्या जाती शोधून काढत आहेत. मात्र, त्यांची दखल घ्यावी असे कोणालाच वाटत नाही, हे या देशाचे दुर्दैव.

पूर्व विदर्भ चांगल्या प्रतीच्या तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ‘धानपट्टा’ अशी ओळख असलेल्या या भागातील तांदूळ जगभरात निर्यात होतो. येथील तांदळाच्या बाजारपेठा सदैव गजबजलेल्या असतात. देशात आणि देशाच्या बाहेर ज्या तांदळाला सर्वाधिक मागणी आहे, त्यात ‘हिरा’ आणि ‘चिन्नूर’चा समावेश आहे. तांदळाचे हे वाण दादाजी रामाजी खोब्रागडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शोधून काढलेले आहे यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. या तांदळाचे पीक घेऊन आजवर लाखो शेतकरी समृद्ध झाले. या तांदळाची विक्री करून व्यापारी गब्बर झाले. हाच तांदूळ परदेशात पाठवून निर्यातदारांनी प्रचंड पैसा कमावला. पण ज्याने हे वाण शोधले तो संशोधक मात्र शेवटपर्यंत फाटकाच राहिला. गेल्या रविवारी दादाजी गेले. तत्पूर्वी पंधरा दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मृत्यूशी लढण्यासाठीसुद्धा त्यांच्याजवळ पैसे नव्हते. अख्खे आयुष्य तांदळाची नवनवी वाणे विकसित करण्यात घालवलेल्या या संशोधकाजवळ वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसणे, त्यासाठी प्रसार माध्यमांना बातम्या द्याव्या लागणे, त्यांच्या मदतीसाठी सामान्य शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करणे, हे सारेच कमालीचे वेदनादायी तर आहेच; शिवाय व्यवस्थेचे अपयश ढळढळीतपणे अधोरेखित करणारेही आहे. खरे तर सध्या सर्वाधिक संकटांचा सामना कृषिक्षेत्राला करावा लागतो आहे. या क्षेत्रात आमूलाग्र बदलाची भाषा राज्यकर्त्यांपासून सारेच जण करतात. मात्र, त्या बदलासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या दादाजींच्या नशिबी मात्र उपेक्षाच येते. गेल्या तीन दशकांत तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित करणारे आणि ही सर्व वाणे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाल्याचे पाहण्याचे भाग्य लाभलेल्या या अवलिया संशोधकाला जवळ करावे, त्याला सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात, आर्थिक मदत करावी असे एकाही कृषी विद्यापीठाला वाटू नये, याकामी आपण पुढाकार घ्यावा अशी बुद्धी सरकारलाही सुचू नये, हे केवळ लाजिरवाणेच नाही तर भयंकर अस्वस्थ करणारे आहे. दादाजी ज्या नांदेड गावात राहायचे, तेथून काही किलोमीटरवर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे. तिथे काम करणाऱ्या सुटाबुटातल्या संशोधकांनासुद्धा दादाजींची दखल घ्यावी असे स्वत:हून कधी वाटले नाही. दादाजींचे ‘एचएमटी’ वाण बाजारात कमालीचे लोकप्रिय झाले. शेतकरी या तांदळाचे बियाणे मिळावे म्हणून धडपडू लागले. या वाणाची कीर्ती सर्वदूर पसरली. मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या न्युक्लियर अ‍ॅग्रिकल्चर विभागातून संशोधक म्हणून निवृत्त झालेले आणि तांदळावर काम करण्यासाठी विदर्भात स्थायिक झालेले डॉ. शरद पवार यांच्यापर्यंत दादाजींचे नाव पोहोचले. ते स्वत: दादाजींना घेऊन पंजाबराव कृषी विद्यापीठात गेले. परंतु तेथील संशोधकांनी या वाणाला शास्त्रीय आधार नाही, असे सांगत त्यांच्या या संशोधनावरच पाणी फिरवले. दादाजी हिरमुसले. परंतु डॉ. पवार हार मानायला तयार नव्हते. त्यांनी बराच पत्रव्यवहार केल्यावर विद्यापीठाने या वाणाची शुद्धता तपासण्याचा निर्णय घेतला. त्यात हे वाण अस्सल निघाले. नंतर विद्यापीठाने हेच वाण ‘पीकेव्ही एचएमटी’ या नावाने बाजारात आणून दादाजींचे नाव वगळले. त्यामुळे निराश झालेल्या दादाजींनी नंतर स्वत:च्या संशोधनावर सरकारची मोहोर उमटविण्याचा नादच सोडून दिला. या कटू अनुभवानंतर त्यांनी तब्बल आठ वाणे विकसित केली. तर त्यांच्याच भागात असलेल्या विद्यापीठाच्या संशोधन केंद्राला २००७ मधील ‘भुजंग’ वगळता इतर कोणतेही वाण तयार करता आले नाही. हे ‘भुजंग’सुद्धा दोन वर्षांत बाजारातून हद्दपार झाले. मात्र, दादाजींची वाणे आजही बाजारात दबदबा कायम ठेवून आहेत. ज्यांना संशोधनासाठी गलेलठ्ठ पगार मिळतो, ते अपयशी आणि ज्याच्याजवळ घर चालवायलासुद्धा पैसे नाहीत त्याचे संशोधन यशस्वी- असा प्रकार सतत घडत राहिला. मात्र, सरकार नावाच्या यंत्रणेने यात कधी लक्ष घातले नाही. दादाजींचे नाव फोर्ब्सच्या यादीत झळकल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गावात जाऊन दादाजींचा सत्कार केला. त्यांना पाच एकर शेती दिली. पण विद्यापीठाची दारे तुमच्यासाठी मोकळी आहे, असे त्यांनी म्हटले नाही किंवा दादाजींच्या संशोधनाला व्यासपीठ का देत नाही, असे कृषी खात्याला कधी सुनावले नाही. एकूणच संशोधकाकडे बघण्याची सरकारची दृष्टी किती अधू आहे याचा अनुभव दादाजींच्या प्रकरणात वारंवार येत राहिला. अशा संशोधकांसाठी केवळ सन्मान कामाचे नसतात, त्यांना संशोधनासाठी आर्थिक बळ देणे गरजेचे असते. सरकारने ते कधीच केले नाही. दादाजींनी विकसित केलेली वाणे केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या ‘प्रोटेक्शन ऑफ प्लँट व्हरायटीज अ‍ॅन्ड फार्मर्स राईट’ या संस्थेकडे नोंदणीकृत करावीत यासाठी अनेकांनी आग्रह धरला. कुणी संशोधनाचे पेटंट घ्या, असे सुचवले. पण व्यवस्थेचा कटु अनुभव सतत घेतलेल्या दादाजींनी त्या मार्गाने कधी जायचेच नाही असे ठरवून टाकले होते. सरकारी अनुभवामुळे आलेले कडवटपण त्यांनी आयुष्यभर उरी बाळगले, पण त्याची जाहीर वाच्यता करण्याचा असमंजसपणा त्यांनी कधीच दाखवला नाही. दादाजींनी वाण तयार करायचे, शेतकऱ्यांनी ते बीज एकमेकांकडे फिरवत वापरायचे, भरपूर पीक घ्यायचे हा सिलसिला शेवटपर्यंत सुरू राहिला. लाखो शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलवून टाकणाऱ्या दादाजींची आर्थिक विपन्नता खरे तर सरकारने स्वत:हून पुढाकार घेत दूर करायला हवी होती. पण तसे घडले नाही. त्यामुळे लोकाश्रय लाभलेल्या दादाजींना राजाश्रय कधीच मिळू शकला नाही. दादाजींच्या पावलावर पाऊल ठेवत पूर्व विदर्भात अलीकडच्या काळात तांदळाच्या क्षेत्रात अनेक नवे प्रयोग सुरू झाले. तांदूळ निर्यातीत आघाडीवर असलेल्या तळोधी बाळापूर या गावातील सुधाकर पोशेट्टीवार यांनी काही नवी वाणे शोधून काढली. भंडाऱ्याच्या अविल बोरकर यांनी विस्मरणात गेलेली जुनी वाणे शोधून ती पुन्हा बीज बँकेत जमा करण्याचा मोठा प्रयोग सुरू केला. साठ वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या ‘पिवळी लुचई’, ‘दुबराज’, ‘हिरानक्की’ या वाणांचा प्रचार सुरू केला. त्यांचा हा बीज बँकेचा प्रयोग पूर्व विदर्भातील सहा तालुक्यांत कमालीचा यशस्वी ठरला आहे. दरवर्षी हजारो शेतकरी त्यांच्याकडून बियाणे घेऊन जातात. यात अट एकच असते : दहा किलो बियाणे नेले तर उत्पादनानंतर २० किलो परत आणून द्यायचे. शेतकरी आनंदाने ही अट पाळतात. या उपक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी १८ जुनी वाणे पुन्हा नव्याने विकसित करून वापरली. त्यावर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव झालेला नाही. बोरकर यांनी मधुमेहावर रामबाण उपाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या तांदळाची लागवड केली. तीसुद्धा यशस्वी ठरली. या तांदळाला परदेशात प्रचंड मागणी आहे. केवळ लागवडीवर हे प्रयोग थांबले नाही तर बियाण्यांची शुद्धता कशी करायची, याचेही प्रशिक्षण शेकडो शेतकऱ्यांना देण्यात आले. या सर्व घडामोडींपासून कृषी खाते आणि कृषी विद्यापीठ गेली अनेक वर्षे दूर होते. जुन्या वाणांच्या पुनरुज्जीवनाचा हा प्रयोग कृषी अधिकारी बघायचे, अनेकदा शेतातून ओंबी चोरून न्यायचे; पण मदत करायचे नाहीत. दोन वर्षांपासून मात्र सरकारी यंत्रणेची दृष्टी थोडी बदलली आहे असे बोरकर सांगतात. तरीही अशा प्रयोगांना उचलून धरणे, मदत करणे, ते सर्वदूर पोहोचवणे यांत सरकारी यंत्रणा अजूनही मागेच आहे. अविनाश जाधव या अभियंता असलेल्या तरुणाने शेतकऱ्यांच्या पिकांचा प्राण्यांपासून बचाव व्हावा म्हणून अवघ्या पाच हजारांत सौरकुंपण तयार केले. बाजारात हेच कुंपण वीस हजाराच्या पुढे आहे. कृषी खाते शेतकऱ्यांना कुंपणासाठी अनुदान देते. या खात्याने या कमी खर्चातील कुंपणाचा प्रसार करावा यासाठी अविनाश जाधव यांनी जंग जंग पछाडले; पण सरकारी बाबूंनी त्यांना बिलकूल दाद दिली नाही. जाधव यांचा हा प्रयोग उत्तराखंड राज्याने उचलून धरला. परंतु तरीही महाराष्ट्रातील यंत्रणेची झोप काही उडाली नाही. दादाजी, बोरकर वा जाधव एवढय़ावरची ही यादी थांबत नाही. नवे प्रयोग, नवे संशोधन करणारे अनेक जण आहेत, पण त्यांच्याकडे कायम उपेक्षेने बघण्याचा सरकारी दृष्टिकोन आजही कायम आहे. या नवनिर्मितीला नाकारणारी यंत्रणा स्वत: तरी काही नवे संशोधन करते का, याचे उत्तरही ‘नाही’ असेच आहे. राज्यात बियाणे महामंडळ आहे. त्यांच्याकडे बीज उत्पादनाचा कसला ठोस कार्यक्रमच नाही. तांदळाचे क्षेत्र घेतले तर अलीकडच्या दहा वर्षांत कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या एकही वाणाचे नाव कुणी सांगू शकणार नाही अशी स्थिती आहे. या देशात संशोधनाला काडीचीही किंमत नाही हे कटू सत्य दादाजींच्या निधनाने पुन्हा एकदा समोर आले आहे. अशा संशोधकाला निदान मरण तरी सन्मानाने यावे यासाठी प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी शेवटच्या क्षणी दादाजींसाठी केलेली धावपळ बरेच काही सांगून जाणारी आहे.

devendra.gawande@expressindia.com