‘काळजी घे..’ ‘मी इजिप्तला जातेय..’ असं ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी हे दोन शब्द आवर्जून उच्चारले. आतापर्यंत पुस्तकं वाचताना मनात आकाराला आलेला इजिप्त वेगळा होता. वाळूमधले पिरॅमिड्स, सिंहाच्या आकाराचा स्फिन्क्स, सुएझ कालवा, वाळवंटातून वाहणारी नाईल इत्यादी म्हणजे इजिप्त. जगातील फारच थोडय़ा देशांना अशी ठळक वैशिष्टय़ं लाभली आहेत. त्यामुळे अस्थिर राजकीय परिस्थिती आणि दहशतवादी हल्ल्यांमुळे हा देश सतत चच्रेत असला तरी इजिप्तची ही प्रतिमा पुसली जाण्याची शक्यता नव्हती. इजिप्तच्या पर्यटन विभागाने पत्रकारांसाठी जी टूर आयोजित केली होती त्यात मात्र इजिप्तची एक वेगळीच ओळख झाली.
पहाटे साडेपाच वाजता कैरो विमानतळावर उतरताना आजूबाजूचा परिसर नीट दिसला नव्हता. विमानतळाबाहेर पडताना मात्र फटफटीत उजाडलं होतं तरी सर्वत्र काहीसं धूसर वातावरण होतं. पण मग लक्षात आलं, की धूसर वगरे काही नाही.. सगळ्या शहराचा रंगच राखाडी होता. जमीनही वाळूची आणि इमारतीही वाळूच्याच रंगाच्या. अगदी पुलावरून नाईल नदी ओलांडली तेव्हा तिचा रंगही निळ्यापेक्षा राखाडीकडेच झुकलेला दिसला. पुढच्या सात दिवसांत इजिप्तची अनेक रूपं पाहिली. मुंबईची आठवण करून देणारे, फेसाळणाऱ्या निळ्याशार भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील अलेक्झांड्रिया शहर आणि आधुनिक जगाचं विलासी रूप मिरवणारे, तांबडय़ा समुद्रकिनाऱ्यावरचे शर्म अल् शेख हे शहर हेदेखील इजिप्तचेच भाग. मात्र, तरीही आता इजिप्त म्हटला की सर्वात आधी डोळ्यांसमोर येते ती प्रवासात पाहिलेली मलोन् मल पसरलेली वाळू आणि त्यावर रेघोटीसारखा उमटलेला रस्ता. विमानाच्या वेगवान प्रवासातही तासन् तास या चित्रात बदल झालेला नव्हता. आणि ते साहजिकच आहे.

संरक्षण आणि सुरक्षाव्यवस्था
लागोपाठ झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे इजिप्तमधील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसाय महत्त्वाचा असल्याने गेल्या काही महिन्यांपासून संरक्षण आणि पर्यटन क्षेत्रावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे इजिप्त-भेटीवर गेलेल्या भारतातील माध्यम प्रतिनिधींसाठी यंत्रणा सुसज्ज होती. कोणत्याही ठिकाणी जाताना किमान एक सुरक्षा अधिकारी सोबत असेच. संवेदनशील ठिकाणी अधिक सुरक्षारक्षक असत. बाजारात फिरतानाही सुरक्षारक्षक आजूबाजूला असत. पूर्व इजिप्तमधील सायनाई प्रदेशात जाताना लष्करी जीप सोबत होती. आपल्यावर सतत कोणीतरी लक्ष ठेवून आहे ही भावना त्रासदायक असल्याने काहींनी या सुरक्षा यंत्रणेबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही राष्ट्रीय पाहुणे असल्याने ही सुरक्षाव्यवस्था आहे,’ या अधिकृत उत्तरापेक्षाही त्यामागे कोणतं कारण आहे, हे उघड गुपित होतं. अर्थात इजिप्तच्या वास्तव्यात कुठेही त्रासदायक घटना घडली नाही, हेदेखील खरं. शर्म अल् शेखच्या उपराज्यपालांशी पत्रकारांची भेट झाली तेव्हा पर्यटनावर बरीच चर्चा झाली. ‘इजिप्तचा पुरातन वारसा आणि शर्म अल् शेखचे पंचतारांकित विलासी राहणीमानाची माहिती सर्वाना आहे. पण शर्म अल् शेखमध्ये किती सुरक्षित वातावरण आहे, ते तुम्ही अनुभवलंच आहे. त्यामुळे तुम्ही येथील सुरक्षेविषयी लिहा,’ असं ते म्हणाले. यावर आम्ही मनोमन कपाळावर हात मारून घेतला.
इजिप्तचे क्षेत्रफळ दहा लाख चौरस किलोमीटरचे. (भारताचे क्षेत्रफळ याच्या साधारण चौपट आहे.) त्यात नाईलच्या आजूबाजूचा प्रदेश, भूमध्य व तांबडय़ा समुद्रकिनाऱ्यावर वसवलेली शहरे आणि ओअ‍ॅसिस असा सगळा मिळून केवळ १५ टक्के जमिनीवरच काय तो माणसांचा वावर आहे. म्हणजेच उरलेल्या तब्बल साडेआठ लाख चौरस किलोमीटरवर वाळूचे साम्राज्य आहे. जगातील पहिले नागरीकरण अस्तित्वात आलेल्या या देशाचे अस्तित्व केवळ नाईलच्या पट्टय़ातच आहे. अर्थात नाईलच्या किनाऱ्यावरील शहरांमध्ये फिरतानाही मातीऐवजी वाळूचीच सोबत होती.
आपल्याकडील जरा जास्तच रंगीत जगाची सवय असल्याने या राखाडी रंगाशी जुळवून घेणं तसं अवघडच होतं. त्या प्रयत्नांत असतानाच दुसऱ्या दिवशी पिरॅमिड पाहायला निघालो आणि रस्त्याने जाताना अचानकच उजव्या बाजूला पिरॅमिड दिसलं. हे पिरॅमिड इथे- कैरोच्या एवढय़ा जवळ, रस्त्याला लागूनच असतील अशी कल्पना नव्हती. हजारो र्वष मानवाला अचंबित करणारं हे आश्चर्य.. जे पाहण्यासाठी एवढय़ा दुरून आलो होतो- ते हे असे इतक्या सहजी पाहायला मिळतील असं वाटलंच नव्हतं. रस्त्याच्या बाजूला केवळ एक दगडी िभत आणि पलीकडे शतकानुशतके उभे असलेले, ‘अवाढव्य’ हा शब्दही खुजा ठरवणारे पिरॅमिड्स! प्रत्यक्ष पिरॅमिडच्या जवळ जाण्याआधीच त्याचं हे दर्शन अधिकच लक्षात राहणारं. पिरॅमिडला स्पर्श करणं हा स्वत: घ्यावा असाच अनुभव. कोणतेही शब्द, चित्र, दृक्श्राव्य माध्यम या हजारो वर्षांपूर्वीच्या अभियांत्रिकी कौशल्याची मांडणी करू शकत नाही, यावर विश्वास ठेवा.

अमिताभ-करिनाची क्रेझ
अमिताभची जगभरातील लोकप्रियता काही नवीन नाही. मात्र, इजिप्तमध्ये भेटणारा प्रत्येक जण- मग तो सरकारी अधिकारी असो की विक्रेता- अमिताभची आठवण काढत होता. ‘इंडियन?’ या प्रश्नावर मान होकारार्थी डोलण्याआधीच अमिताभ बच्चन, करिना कपूरचं नाव निघत असे. पुढे तर याची एवढी सवय झाली की ‘इंडियन?’ असा शब्द ऐकल्यावर आम्हीच ‘अमिताभ बच्चन, करिना कपूर’ म्हणायला लागलो. यात शाहरूखही होता, पण तिसऱ्या क्रमांकावर. काही तरुण मुलींना दीपिका पडुकोणही माहिती होती. पण पहिला क्रमांक होता तो करिनाचाच!

पुढच्या तीन दिवसांत कैरोतील पुरातन वास्तू पिंजून काढल्या. खरं तर कैरोमधील कोणताही दगड उचलला तरी त्याला पुरातन वारसा असेल अशी स्थिती! हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती इथे उभी आहे. पिरॅमिड, स्फिन्क्स, लाखाहून अधिक वस्तू असलेलं संग्रहालय, सिटाडेल, अ‍ॅलबस्टर मशिद, हँगिंग चर्च अशा हजारो वर्षांपूर्वीच्या जगात घेऊन जाणाऱ्या या वास्तूंच्या आजूबाजूलाच नवीन शहर वसतं आहे. अधिकाधिक उंच टॉवर आणि रस्त्यांवरील वाहनांची गर्दी यातून नवं कैरो उभं राहत आहे. एकीकडे पुरातन वारसा आणि दुसरीकडे पाश्चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव हा अंतर्विरोध संपूर्ण इजिप्तमध्ये वारंवार जाणवत राहिला.
एकीकडे इजिप्तचा हा वैभवशाली गतवारसा, तर दुसरीकडे शर्म अल् शेख. इजिप्त हा आफ्रिका आणि त्याचवेळी आशिया खंडाचाही भाग असलेला एकमेव देश. या देशाचा आशिया खंडात असलेला सिनाई भाग लष्करीदृष्टय़ा अतिसंवेदनशील. गेल्या दशकभरात सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे या भागातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. आजही प्रार्थना केले जाणारे जगातील सर्वात जुनं सेंट कॅथरिन चर्च याच भागात येतं. या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. मात्र, त्यापेक्षाही हा भाग आता ओळखला जातो तो ‘शर्म अल् शेख’ या शहरामुळे. या महानगरात रिसॉर्ट्स आणि पंचतारांकित हॉटेलांमधून तब्बल साठ हजारांहून अधिक खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. स्वत:चे खासगी किनारे असलेल्या या हॉटेलांमध्ये आधुनिक विलासाच्या सर्व संकल्पना प्रत्यक्षात उतरलेल्या आहेत. इथल्या सर्वसामान्यांच्या जीवनात असलेली पाण्याची कमतरता या हॉटेलांमधील प्रचंड जलतरण तलावांनी भरून काढली आहे. बाजूच्या सौदी अरेबियातून उन्हाळ्याच्या सुटीसाठी आलेले अरब उघडय़ाबंब शरीरांनी आणि त्यांच्या बायका डोक्यापासून पायापर्यंत वस्त्रांकित देहाने या जलतरण तलावात डुंबताना दिसल्या तेव्हा फारसं आश्चर्य वाटलं नाही.
शर्म अल् शेखहून कैरोला परतताना विमानप्रवासातही पुन्हा एकदा वाळूच सोबत होती. सिनाईच्या टेकडय़ा वगळता सर्वत्र वाळूचा समुद्रच. तांबडय़ा समुद्राची एक रेघ ओलांडल्यावर पुन्हा वाळूच वाळू. हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती, इतिहास आणि नव्याने उभारलेल्या शहरातील राहणीमान, हजार र्वष जुना असलेला खान-ए-खलेली बाजार आणि रात्री आठ ते सकाळी सहा या वेळेत भरणारा शर्म अल् शेखचा बाजार, अ‍ॅलेक्झान्ड्रियामध्ये फिरणाऱ्या ट्राम, काळ्या-पिवळ्या टॅक्सी, कैरोमधील रिक्षा.. इजिप्तमधील वास्तव्यात बरंच काही दिसलं, जाणवलं. पण कैरोवरून परतताना मात्र पुन्हा एकदा वाळूचा समुद्र ओलांडावा लागला आणि तोच लक्षात राहिला.
 प्राजक्ता कासले prajakta.kasale@expressindia.com