शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाविषयीचा शासनाचा कळवळा बऱ्याच काळापासून व्यक्त होत आहे. या मुलांनी काय वाचावे, हे त्यांचे त्यांना ठरवू न देता प्राचीन भारतीय संस्कृतीचे पाईक असल्याच्या थाटात शिक्षण विभागाने कोटय़वधी रुपये खर्चून पुस्तकखरेदीचा यज्ञ मांडला आहे. ‘सर्व प्रकाशक समाधाना’ची दुर्मीळ गोष्ट प्रत्यक्षात आणणाऱ्या या पुस्तकनिवडीतील आपल्या ‘चोखंदळ’पणावर शिक्षण विभाग ठाम आहे. या साऱ्या प्रकारातून वाचनापासून दूर गेलेल्या आजच्या पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी आपण काय देणार आहोत, याचे हे निवडक ‘अवांतर’ मासले! मंगेश पाडगांवकरांच्या ‘उदासबोध’मधील दाखल्यांचा आधार घेऊन त्यावर टाकलेला दृष्टिक्षेप..

फारच वैचारिक भ्रष्टाचार बोकाळला आहे आपल्याकडे. शेपटीवाल्या प्राण्यांच्या सभेतून फक्त शेपूट गळल्यामुळे माणूस बाहेर पडलेला असतानाही माकडाला आपले पूर्वज म्हणवतो. युगानुयुगांपूर्वीच्या तांत्रिक, वैद्यकीय क्रांतीच्या दुराभिमानी अन् बडेजावी गप्पा हाणण्यात धन्यता मानतो.. इत्यादी इत्यादी. तर मुद्दा हा आहे की, आपले हे वैचारिक मागासलेपण दूर करण्यासाठी जालीम उपाय हवा. ‘लैंगिक शिक्षण’ या शब्दांनीही कंप सुटणाऱ्या या समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आधीच्या पिढय़ांचे झाले ते झाले, पण पुढील पिढीच्या विचारशुद्धीसाठी त्यांच्यावर संस्कारक्षम गोष्टींचा मारा करणे क्रमप्राप्त आहे. हा जटिल प्रश्न कसा सोडवावा? तर..

‘शिक्षणासारखा बेत नाही,

शिक्षणासारखा हेत नाही

शिक्षणासारखे शेत नाही,

जाणते थोडे।’

(संदर्भ : उदासबोध, समास : शिक्षणमहर्षी)

या श्लोकास अपवाद ठरून आणि शिक्षणाचे शेत जाणून शाळेपासूनच विचारशुद्धी हवी हे ओळखून आपल्याकडे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची वात पेटवण्यासाठी अवांतर पुस्तकांचा खटाटोप केला आहे. वात पेटवण्यासाठी ही पुस्तके म्हणजे ‘अल्लादिनचा दिवा’ असल्याच्या थाटात त्यात आपल्याला हव्या त्याच (!) ग्रंथांचा तेलरूपी रतीब ओतला. आता हा दिवा घासून कुणाचे भले होणार असेल तर ते वाचनप्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील पुस्तक निर्माणकर्त्यांचे! त्यांनी पुस्तके काढलीच नाही, तर कसला आलाय वाचक आणि कसले होतेय वाचन? तर या शिक्षणरूपी शेतात विचारशुद्धीसाठी त्यांनी केलेल्या मशागतीचे पीक डवरून आले. त्या पिकाची अवांतर वाचनासाठी अवाच्या सव्वा भावाने (की भावनेनेही?) खरेदीप्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे शिक्षणाच्या शेतात पुस्तकांचे पीक काढणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे पोट समाधानाने टच्च भरले. त्याला ‘सारे किती छान छान’ दिसू लागले. आता या विचाररूपी पिकाचे ‘अमृतकण’ बिचाऱ्या बाळगोपाळांच्या माथी लवकरात लवकर मारून एकदाचे या व्यवहारातून नामानिराळे होण्याची लगबग सुरू झाली आहे.

आवडो- न आवडो; वाचावीच लागतात आणि डोक्यात कोंबावीच लागतात अशा पाठय़पुस्तकांतून खरे तर ज्ञानवर्धन व्हायला हवे. पूर्वीच्या काळी असे काही नव्हते हो! ‘संदर्भासहित स्पष्टीकरण’ याच प्रकारावर सर्वाधिक भर असणाऱ्या काळातील परीक्षा दिलेल्या असल्यामुळे याचे उत्तर पुराणांतच मिळणार! म्हणजे पुढचे ऐका बरे..

‘पोथीचे व्यापक गर्भाशय

प्रसवी संस्कृतीचा आशय

पोथीभोवती तेजोवलय अध्यात्माचे

विज्ञाने केली शोधांची प्रगती?

पोथी म्हणे, ती आधीच होती

(बघा, तेच तर! डार्विनचे आपले काहातरीच हं!)

पोथीची ही अधिकारमहती

कोण नाकारी?

ज्ञान पोथीतच असते,

पोथीबाहेर काही नसते,

पोथीमधून भविष्य दिसते,

श्रद्धा मात्र पाहिजे’

(संदर्भ : उदासबोध, समास : पोथीवादमहत्ता)

हे सगळे जरी खरे असले तरीही एक तर आमच्या पाठय़पुस्तकांची पाने मर्यादित; त्यांत सगळेच कसे द्यावे? अशाच मजकुराने जागा व्यापली गेली तर आमच्या सुवर्णकाळातील चहुबाजूच्या कोनांची ओळख नव्या पिढीला कशी करून द्यावी? त्यात सामाजिक अडचण आहेच. पुराणांना इतिहास न मानता मिथके मानणाऱ्या मिथकखोरांचे काय करावे? अखेर यावर उपाय म्हणून तर शिक्षण विभागाने पोथ्याच पुरवण्याचे घाटले. पण माशी शिंकली हो! या वैचारिक भ्रष्टांनी पोथ्यांवरच शंका घ्यायला सुरुवात केली. त्यावर अनेक कुटील दमछाकी उपाय वापरून, सर्व प्रक्रिया करून अखेर  एकदाची सम गाठण्यात आली असून आता पोथ्या वर्गा-वर्गातील पेटय़ांमध्ये विराजमान होण्यास सिद्ध झाल्या आहेत असे कळते. खरे तर हा विचारशुद्धीचा प्रयत्न तब्बल दहा वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. पवित्र अशा सिंहस्थकाळात या पोथ्यांचे वाटप करण्यात आले होते. आता त्याचे रूपडे बदलून ते पुढील पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. (काय आहे की, आताची मुले रात्रंदिवस टॅब आणि भ्रमणध्वनीमध्ये तोंड खुपसून बसणारी. त्यांना सगळे कसे चकचकीत, रंगीत लागते. त्यामुळे बदल हवाच ना?) त्याचवेळी ज्ञानरचनावादही टिकवून ठेवला पाहिजे. (काहीएकांच्या व्याख्येनुसार, मुलांना काही थेट न सांगता त्यांना प्रश्न पडतील अशी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे.) तर मुलांना प्रश्न पडावेत यासाठी पुढील काही मजकूर मुलांना वाचनास देण्याची तरतूद करण्यात आली आहे. (पुस्तकांत चित्रेबित्रे असावीत हे ठीक; मात्र चित्रे दिल्यास मुलांचे चित्त विचलित होऊन ‘विचारसाधने’त व्यत्यय येण्याचा धोका लक्षात घेऊन चित्रे टाळण्यात आली आहेत.) अर्थातच हा मजकूर या पुस्तकांमधील विचारधनाचा एक किंचितसा भाग आहे. पण तो विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, बुद्धिसामर्थ्य आणि गरजा या साऱ्यांशी फारकत घेऊन करण्यात आलेले हे ‘वाचनवृद्धीचे स्वयंवर’ कुणाचे भले करणार आहे आणि कुणाला वाचनापासून लांब नेणार आहे, हे स्पष्ट करू शकेल.

मासला क्रमांक १ :

मान्य, की आज पहिली ते दहावीच्या काळातील विद्यार्थी भ्रमणध्वनी आणि टॅबवर एक कळ दाबून त्यांना हवे ते (म्हणजे इतरांच्या दृष्टीने ‘नको ते’!) ज्ञान मिळवतात. प्रस्तुत उताऱ्यामधील ‘कामवासनेचा प्रादुर्भाव’, ‘कौमार्यभंग’ आणि मानवी मीलनाचे वर्णन या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची विचारशुद्धी देऊ शकेल, हा प्रश्न पुस्तक निवड मंडळातील  पंडितांच्या लक्षात आला नाही, हे प्रचंड दुर्दैवाचे आहे. तूर्त या परिच्छेदाचा आस्वाद घेणे इष्ट..

‘थंड वारा वाहत होता. वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायी होते. पराशर ऋषी शांतपणे बसले होते. नित्याच्या सवयीप्रमाणे सत्यवती- मत्स्यगंधा या नावाने परिचित होती. कारण तिच्या शरीराला मासळीचा वास येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा म्हणायचे- ती नाव वल्हवत होती. तिचे सौंदर्य, नितळ कांती, शरीराच्या होणाऱ्या हालचाली पाहून पराशर ऋषींचे चित्त चंचल झाले. त्यांच्यात कामवासनेचा प्रादुर्भाव झाला. त्यांनी कामातूर होऊन तिचा हात धरला. त्यावर न संकोचता ती निषादकन्या पराशर ऋषींना म्हणाली, ‘हे महामुने, आपण श्रेष्ठ वंशातील असून तपस्वी आहात. आपल्याला हे चांचल्य शोभत नाही. माझ्यासारख्या मासळीच्या दरुगधाने युक्त अशा शरीराबाबत या प्रकारचा अनार्यभाव कसा बरे उत्पन्न झाला? ’ मत्स्यगंधेने केलेल्या या प्रश्नाने पराशर ऋषींना राग न येता कौतुकच वाटले. ते म्हणाले, ‘हे निषादकन्ये, तू म्हणतेस ते बरोबरच आहे. याआधी कधीही मी याप्रकारे चंचल चित्त होऊन कामातूर झालो नाही. पण आज जे घडते आहे ते दैवी इच्छेनेच घडते आहे असा माझा विश्वास आहे. कारण कुठल्या तरी महान आणि ईश्वरी अंशाने परिपूर्ण असलेल्या, दैवी कार्य करणाऱ्या आत्म्याचा जन्म भूतलावर येण्यासाठीच ही काहीतरी ईश्वरी प्रेरणा आहे, यावर तू विश्वास ठेव.’ पराशर ऋषींच्या या बोलण्याने मत्स्यगंधा प्रभावित झाली. पण तिच्यासमोर मूलभूत प्रश्न आणि अडचणी होत्या. त्या म्हणजे, ‘माझा कौमार्यभंग झाल्यामुळे मला कोण स्वीकारेल?’ याबाबत पराशर ऋषींनी तिला अभिवचन दिले की, ‘तुझे कौमार्य अबाधित राहील. तसेच तुझे माता-पिता या संबंधात अज्ञानी राहतील आणि तुझ्या शरीराचा हा दरुगध नष्ट होऊन तू योजनगंधा होऊन राहशील. तुझा हा पुत्र माझ्याप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धिमान राहील.’ पराशर ऋषींनी दिलेल्या अभिवचनांना तिने मान्य केले. त्यांनी तप:सामर्थ्यांने निर्माण केलेल्या रात्रसदृश गहन व दाट धुक्यात त्यांचे मीलन झाले. एका द्वीपावर तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. द्वीपावर त्याचा जन्म झाला म्हणून त्यांना ‘द्वैपायन व्यास’ असे म्हणतात.’

(संदर्भ : ‘भगवान वेदव्यास’)

मासला क्रमांक २ :

या अवांतर गोष्टींवर परीक्षेत प्रश्न विचारण्यात येणार नसले म्हणून काय झाले? मेंदूला चालना मिळण्यासाठी मुलांना प्रश्न पडायलाच हवेत ना! पहिली ते पाचवीच्या मुलांना नाही कळणार यातील काही भाग. मात्र, ‘कुणी बरे ही पुस्तके निवडली? पुस्तके निवडण्याआधी ती वाचली होती का?’ असे काही प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण ही पुस्तके वाचून आणि त्यानंतर बालमनांमध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांतून या अवघड विषयांवर वर्गामध्ये मुक्त चर्चा घडू शकेल. राहिली गोष्ट वैचारिक भ्रष्टांना पडलेल्या स्वाभाविक प्रश्नांची. तर त्याचेही उत्तर मिळेल. कारभार तसा पारदर्शी आहे. फक्त याच गोष्टी नाहीत, तर इतरही अनेक बाबतींत मुलांचे ज्ञान वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. वानगीदाखल (वानगी पुराणातील असली म्हणून काय झाले?) पुढील उतारा पाहता येईल-

‘एका काळात अयोध्येत सागर नावाचा राजा राज्य करत होता. त्याला दोन पत्नी होत्या. विदर्भ राजकुमारी केशिनी ही त्याची ज्येष्ठ पत्नी होती. तर त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सुमती होते. तिच्या वडिलांचे नाव कश्यप होते. गरुड हा तिचा बंधू होता. सर्व प्रकारचे सुख असूनही सागर राजाच्या जीवनात एक उणीव होती, की त्याला पुत्रसंतान नव्हते. संतानप्राप्तीसाठी सागर राजाने तपश्चर्या करण्याचे ठरवले. आपल्या दोन्ही पत्न्यांसमवेत हिमालयाच्या भृगुप्रस्त्रवण नावाच्या शिखरावर जाऊन तो तपश्चर्या करू लागला. प्रदीर्घ काळ तपश्चर्या केल्यावर भृगुऋषींनी त्याला दर्शन दिले आणि वर दिला. भृगु त्याला म्हणाले, ‘हे राजा, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तुला बहुपुत्रांची प्राप्ती होईल आणि तू जगात श्रेष्ठ कीर्ती संपादन करशील.’

(संदर्भ : ‘भगीरथ’)

पुत्रप्राप्तीची ही विलक्षण कहाणी वाचल्यानंतर विद्यार्थी कसली ‘तपश्चर्या’ करतील? ‘पुत्रसंतानच का?’ असा प्रश्न मुलांना अन् मुलींना यातून पडला तर त्यांनी त्यांच्या घरी पालकांना विचारावे.

मासला क्रमांक ३ :

‘कन्या हे परक्याचे धन असते’ असेदेखील आणखी एका पुस्तकातील मजकुरात ठळकपणे बिंबवण्यात आले आहे. त्यामुळे पाठय़पुस्तकांतून ‘मुलगा-मुलगी समान असतात’ असे का बरे शिकवतात, असा प्रश्न पडून त्याचे उत्तर मुले शोधू पाहतील. ‘बेटी बचाओ’ हे उच्चरवात जाहिरातींतून का सांगितले जाते, हे मुलांना कळणार नाही. शिवाय या अवांतर ग्रंथमौक्तिकांतून अनेक मोठय़ा व्यक्तींची ओळख करून देताना त्यांच्या तत्त्वज्ञानाचे वेगवेगळे आयाम मुलांसमोर येतील याची काळजी घेण्यात आली आहे. इथे ‘शारदामाता’ या पुस्तकाचे उदाहरण घेणे अगत्याचे ठरेल. त्यातील हा उतारा पाहा-

‘विषयलोलुपतेपायी विवाह न करता इंद्रियसुख घेतल्याची उदाहरणे पुराणकाळात अनेक राजे, देव आणि मुनीजनांकडून घडली आहेत. विवाह करूनही विषयलोलुपता आणि इंद्रियसुख दूर ठेवता येते, हेच रामकृष्ण आणि शारदादेवी यांना इहयुगात सामान्यजनांपुढे उदाहरण ठेवायचे होते. या संकेतानुसार हा विवाह होत होता. सर्वसामान्य लोकांना याची जाण कशी असणार?’

आता या मजकुरातून मुलांना नेमके काय प्रश्न पडतील, या प्रश्नाचे उत्तर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांविषयी कळकळ बाळगणाऱ्या शिक्षकांना अद्यापि मिळालेले नाही. मुलांचे ज्ञान वृद्धिंगत झाल्यामुळे त्यांना पडणाऱ्या प्रश्नांना काय उत्तरे द्यावीत, याची तयारी करण्यासाठी पुराणातच कदाचित उत्तर मिळते का, हे शिक्षक आणि पालकांनी पाहणे उचित ठरू शकेल. विद्यार्थ्यांहूनही अधिक यात गुंतलेल्या यंत्रणेचे भले करण्यासाठी रचलेल्या या ‘अवांतर वाचन’ उद्योगावर कितीही व्यापक चर्चा केली तरी ती थोडीच ठरणार आहे. मात्र, सद्य:स्थितीत विचारसाधनेत बुडल्यामुळे मनी उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ‘उदासबोधा’तील पुढील पंक्तीत मिळू शकतील कदाचित..

‘कोणीही प्रश्न विचारू धजेना,

कोणीही स्वत:चे उत्तर शोधेना,

कोणीही गंज मुळी खरवडेना

आपुल्या मनाचा।

पोथीतली वाळवी राज्य करी

यांच्या थोर संस्कृतीवरी,

परंपरेच्या खांद्यावरी

मढे सत्याचे।’

रसिका मुळ्ये rasika.mulye@expressindia.com