01 March 2021

News Flash

पर्यटकांचा मार्गदर्शक-मित्र

युरोप-पर्यटनकेंद्री नवे पुस्तकही ‘मॅजेस्टिक’नेच प्रसिद्ध केले आहे.

युरोप खंड.. मूळच्या युरेशिया महाखंडातील आशियापासून उरल व कॉकस पर्वतरांगा आणि कॅस्पियन समुद्रामुळे विभाजित झालेला प्रदेश. तरी खंड म्हणून युरोपच्या ओळखीला जितके भौगोलिक आधार आहेत, त्याहून अधिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आधार आहेत. रोमन साम्राज्यापासून आधुनिक काळातील शहरीकरणापर्यंत अनेक बदल होत आताची बहुजिनसी युरोपीय संस्कृती आकाराला आली आहे. तिथल्या कला परंपरा, साहित्य, खाद्यपदार्थ, क्रीडा प्रकार, मुख्य म्हणजे युरोपीय जीवनशैलीविषयी एक गूढ आकर्षण जगभरात आहे. त्यामुळेच युरोपला भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातले पर्यटकही त्याला अपवाद नाहीत. गेल्या काही वर्षांत तर यात बरीच वाढ झाली आहे. त्यात महत्त्वाची भूमिका वठवली ती- वीणा वल्र्डने! त्याच ‘वीणा वर्ल्ड’च्या वीणा पाटील यांचे ‘युरोप’ हे नवे पुस्तक अशा मराठी पर्यटकांना युरोपच्या इतिहासाबरोबरच वर्तमानाचीही सैर घडवून आणणारे आहे. दशकभरापूर्वी मराठीतील पहिली ‘डेस्टिनेशन गाइड’ ग्रंथमालिका वीणा पाटील यांनी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रसिद्ध केली होती. त्यानंतरच्या बदलांचा, नवी आव्हाने व शक्यतांचाही विचार करणारे हे युरोप-पर्यटनकेंद्री नवे पुस्तकही ‘मॅजेस्टिक’नेच प्रसिद्ध केले आहे.

लेखिका वीणा पाटील यांचा पर्यटन व्यवसायातील दीर्घ अनुभव आणि महाराष्ट्रातून युरोपला जाणाऱ्या पर्यटकांतील गेल्या काही वर्षांतील बदलांच्या अनुभवाधारित अभ्यासाचा या पुस्तकातील मांडणीला आधार आहे. पुस्तकात एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, ‘युरोप हे एखाद्या कॅलिडोस्कोपसारखं आहे. कॅलिडोस्कोपमध्ये कसं तुम्ही कोन बदलला की नक्षी बदलते, त्याप्रमाणे इथे देश बदलले की अनुभव बदलला आणि अनुभव बदलला की सहलीची रंगत बदलली.’ त्यामुळे युरोपला पहिल्यांदा जाणाऱ्यांप्रमाणेच तिथे पुन:पुन्हा भेटी देणाऱ्या पर्यटकांसाठीही युरोपच्या बहुजिनसी संस्कृतीची, तिथल्या इतिहासाची, भौगोलिक वैविध्याची तसेच बहुरंगी लोकजीवनाची ओळख असणे आवश्यक ठरते. ती असेल तर पर्यटन सुखावह होतेच, शिवाय समृद्ध अनुभवही गाठीशी येतो. वीणा पाटील यांचे हे पुस्तक मराठी पर्यटकांना युरोपची तशी ओळख करून देणारे आहे. युरोप कोणत्या काळात पाहावा? काय आणि कसे पाहावे? काय काळजी घ्यावी? असे प्रश्न युरोपभेटीसाठी उत्सुक असणाऱ्यांना नेहमीच पडतात. या पुस्तकातून अशा प्रश्नांची उत्तरे पर्यटकांना आपसूकच मिळतील.

पुस्तकातील पहिलेच प्रकरण युरोपची सर्वसाधारण ओळख करून देणारे आहे. त्यात ‘युरोप’ या शब्दाच्या उत्पत्तीपासून युरोप खंडाची भौगोलिक रचना, इतिहास, भाषा, अर्थव्यवस्था, कला-साहित्य-खाद्यसंस्कृती यांची थोडक्यात पण नेमकी माहिती दिली आहे. याच प्रकरणाच्या शेवटी ‘युरोपीय महासंघा’बद्दलही संक्षिप्त टिपण दिले आहे. युरोपीय महासंघातून ब्रिटनच्या बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांत युरोपीय महासंघाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. त्या पाश्र्वभूमीवर पर्यटकांना ही माहिती उपयुक्त ठरू शकते. पुस्तकाच्या पुढील भागात युरोपातील तब्बल २९ देशांच्या इतिहास, भूगोल, निसर्ग, हवामान, तिथली महत्त्वाची ठिकाणे यांच्याविषयी स्वतंत्र प्रकरणांत माहिती दिली आहे. त्यात कलेची सघन परंपरा असलेले इटली, निसर्गसौंदर्य व उच्च राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले स्वित्र्झलड, आल्प्स पर्वताच्या सान्निध्यातील ऑस्ट्रिया, पश्चिम युरोपातील नेदरलँड, फेसाळती बीअर आणि चविष्ट चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेले बेल्जियम, युरोपला मध्यवर्ती असणारा जर्मनी, व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य जगाला देणारा फ्रान्स, एके काळी जगावर राज्य गाजवणारे इंग्लंड, ऐतिहासिक ग्रीस, दक्षिण युरोपातील स्पेन, स्कँडिनेव्हियन भूशिरावरील स्वीडन, संघर्षमय इतिहास असलेले पोलंड, दर्यावर्दी मोहिमांचा आरंभ करणारे पोर्तुगाल.. अशा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महत्त्वाच्या देशांची थोडक्यात पण पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त माहिती पुस्तकात मिळते.

यानंतर येणारी ‘युरोपची तयारी’ आणि ‘मनासारखा युरोप’ ही दोन प्रकरणे युरोपभेटीचा बेत आखणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. या प्रकरणांत पर्यटकांसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत, त्या उपयुक्त आहेत. तसेच पुस्तकाच्या शेवटी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या भाषांतील महत्त्वाची व प्राथमिक संभाषणासाठी आवश्यक अशी मोजकी वाक्ये परिशिष्टवजा रकान्यात दिली आहेत. शिवाय युरोप खंडाचा एक रंगीत नकाशाही पुस्तकात जोडला आहे. एकूणच हे पुस्तक म्हणजे पर्यटकांसाठी ‘मार्गदर्शक मित्र’ ठरावे!

  • ‘युरोप’ – वीणा पाटील,
  • मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे – ४२३, मूल्य – ४०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 12:41 am

Web Title: europe book by veena patil
Next Stories
1 वर्तमानाचा स्वशोध
2 ‘काश्मीर प्रश्न’ ‘शब्द’कडून मागे!
3 ‘सेक्शुअल’ कथांचा काव्यात्मक आविष्कार
Just Now!
X