गिरीश कुबेर

बॉब वुडवर्ड या पत्रकाराचं ‘फीअर : ट्रम्प इन द व्हाइट हाऊस’ आणि फ्रेडरिक फोर्सिथचं ‘द फॉक्स’ ही पुस्तकं नुकतीच अमेरिकेत प्रकाशित झाली. पैकी वुडवर्ड यांचं पुस्तक अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीचे रोखठोक वाभाडे काढणारं आहे. तर फोर्सिथ यांची कादंबरी ही सद्य: जागतिक पार्श्वभूमीवरील कल्पित थेट वास्तवाशी नेऊन भिडवणारी आहे. पण ही पुस्तकं वा त्यांचे लेखक हा मुद्दा नाही. तर..

Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा

गेले आठ-दहा दिवस फारच आनंदात गेले. दोन पुस्तकांची प्रतीक्षा होती. अमेरिकेत ती प्रकाशित झाली आणि दोन दिवसांतच इथे ती हातात पडली. दिवसाच्या पूर्वार्धात एक आणि उत्तरार्धात दुसरं अशी अधाशासारखी ती वाचली. आनंद होता तो याचा.

पण आताशा फारच त्रास होतो या अशा आनंदाचा.

यातलं एक पुस्तक आहे एका करकरीत बातमीदारानं लिहिलेलं. पण कादंबरीपेक्षाही अद्भुत. आणि दुसरं आहे एका गोष्टीवेल्हाळ लेखकानं लिहिलेली कादंबरी. पण सत्याच्या इतकी जवळ जाणारी, की खरीच वाटावी. बॉब वुडवर्ड या पत्रकाराचं ‘फीअर : ट्रम्प इन द व्हाइट हाऊस’ आणि फ्रेडरिक फोर्सथि या लेखकाचं ‘द फॉक्स’ ही ती दोन पुस्तकं.

ज्या वयात राजकीय मतं फुटायला लागतात त्या वयात आमच्या पिढीसमोर अमेरिकेचं व्हिएतनाम युद्ध संपत आलं होतं. आपल्याकडे इंदिरा गांधी यांची राजवट होती. सर्वसाधारण मध्यमवर्गीय आसमंतात त्यांच्याविषयी जी नाराजी होती ती कानावर येत होती. दिसत होतं सगळं; पण अर्थ लागत नव्हता. वातावरणात एक खदखद होती. निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला आणि पहिल्यांदा त्या खदखदीला तोंड फुटलं. तेव्हापासून निक्सन यांच्या बरोबरीनं दोन नावं डोक्यात बसली ती बसलीच. एक म्हणजे ‘वॉटरगेट’ आणि दुसरं.. बॉब वुडवर्ड. नंतर महाविद्यालयाच्या चळवळ्या काळात अमेरिकन सेंटरमध्ये जाऊन ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ पाहिला आणि बॉब वुडवर्ड हा मनातल्या मनात नायक बनून गेला. त्यावेळी खरेदी करू लागलेल्या पहिल्या काही पुस्तकांत त्याचं आणि कार्ल बर्नस्टीन याचं ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ हे होतं. तेव्हापासून त्याची सगळी पुस्तकं संग्रही बाळगायची सवय लागली ती लागलीच. ‘फीअर’ हे त्याचं अलीकडचं पुस्तक.

वुडवर्ड अकल्पित वास्तव समोर आणणारा; तर कल्पिताचं जग वास्तवाच्या किती जवळ असतं, हे सांगणारा फ्रेडरिक फोर्सथि. ‘द डे ऑफ द जॅकल’ या सिनेमातनं तो पहिल्यांदा भेटला. नंतर विसरूनही गेलो होतो त्याला. पण लंडनमध्ये शिकताना त्याचं ‘द फीस्ट ऑफ गॉड’ वाचलं आणि त्याची साथ आपण सोडली याचं दु:ख झालं. त्या पापाला एकच प्रायश्चित्त होतं. समग्र फोर्सथिचं पारायण करणं आणि त्याची सर्व पुस्तकं जवळ बाळगणं. तेव्हापासून फोर्सथिचा धरलेला हात अजून सुटलेला नाही. दोनेक वर्षांपूर्वी त्याचं आत्मचरित्र आलं.. ‘द आऊटसायडर.’ त्यावेळी जरा वाईट वाटलं होतं. कारण फोर्सथि आता नवी कादंबरी लिहिणार नाही असं त्यातून ध्वनित होत होतं. ती भीती खोटी ठरली. त्याची ‘द फॉक्स’ आली. ‘जॅकल’पासनं सुरू झालेला त्याचा लेखनप्रवास आता या ‘फॉक्स’च्या टप्प्यावर आलाय.

वुडवर्ड आणि फोर्सथि. एक अमेरिकेतला आणि दुसरा इंग्लंडमधला. पण या दोघांच्याही शैलीत एक साम्य आहे. ते सरळ लिहितात. लालित्याचा वगैरे आव आणण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत. दोघेही पत्रकारितेशी संबंधित.. त्यामुळेही असेल असं. हा लेख हे काही त्यांच्या पुस्तकांचं परीक्षण नाही.

वुडवर्ड यांचं पुस्तक हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकी अध्यक्षीय कारकीर्दीवर आहे. ते बातमीदार आहेत. स्तंभलेखक आहेत. आणि मुख्य म्हणजे जगातल्या एकमेव महासत्तेचं केंद्र असलेलं व्हाइट हाऊस हा त्यांचा हातखंडा विषय आहे. आणि तसा तो आहे म्हणून ‘कळते/ समजते’, ‘यांचंही बरोबर; पण त्यांचंही चूक नाही’ वगैरे गुळमुळीत लिखाणाचं हळदीकुंकू ते कधी घालत बसले नाहीत. जसं घडलं तसं ते सांगतात. हे सांगण्यातला त्यांचा दबदबा किती? तर- बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत त्यांचे वुडवर्ड यांच्याशी काही अर्थसंकल्पीय तरतुदींबाबत मतभेद झाले. तेसुद्धा जाहीर! तर आसपासच्यांनी अध्यक्षांना बजावलं.. ‘वुडवर्ड यांच्याशी दोन हात करताहात. तेव्हा जरा सांभाळून.’ तिकडे एक बरं असतं. मतभेद असले तरी माणसं एकमेकांशी बोलतात. एकमेकांच्या कपाळावर ‘तो अमुक पक्षाचा, हा तमुकचा’ असे शिक्के मारण्याची सवय अजून लागली नाहीये त्या मंडळींना. आणि दुसरं म्हणजे तिकडे वाचकही पत्रकारांना ‘तुम्ही अमुक सत्ताधीशांविरोधात का लिहिता?’ असं विचारत नाहीत. (खरं तर हा प्रश्न म्हणजे गोलंदाजाला तुम्ही फलंदाजाकडेच चेंडू का टाकता, असं विचारण्याइतका बावळटपणाचा आहे. जो समोर आहे त्यालाच गोलंदाजी केली जाणार! नॉन स्ट्राइकिंग एंडला असणाऱ्याला गोलंदाजी कशी करणार? इतकंही न कळणारे वाचक असतील तर लोकशाहीचं कठीणच म्हणावं लागेल. या शिशुवर्गातनं ते कधी बाहेर पडणार, हा प्रश्नच आहे. असो.) जो कोणी सत्तेवर असेल त्याला धारेवर धरणं हे पत्रकारांचं कर्तव्यच आहे, हे वाचक आणि राजकारणी दोघेही तिकडे जाणतात. त्यामुळे ओबामा आणि वुडवर्ड यांच्यातले मतभेद मिटलेही. तर नंतर अनौपचारिकपणे वार्ताहरांशी बोलताना ओबामा लटक्या आवेशात म्हणाले, ‘मला कमी समजू नका. वुडवर्ड यांच्याशी दोन हात करूनही सहीसलामत राहिलोय मी.’ म्हणजे वुडवर्ड यांचा इतका दबदबा! प्रत्येक अध्यक्षावर त्यांची पुस्तकं आहेत. आणि अमेरिकी राजकारण, समाजजीवन प्रत्येक अध्यक्षाच्या काळात कसं कसं बदलत गेलं हे समजून घ्यायचं असेल तर ही पुस्तकं सलग वाचली तरी ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतं.

ताज्या ‘फीअर’नंही तेच केलंय. एक तर ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत तीनेक आठवडे अमेरिकेत मी िहडलो होतो. या निवडणूक निकालाबाबतची हुरहुर आणि ही निवडणूक एरवीच्या निवडणुकीसारखी नाही, ही जाणीव अनुभवली होती. आणि मुख्य म्हणजे ट्रम्प यांच्या धक्कादायक निकालाचा धक्काही अनुभवला होता. त्यामुळे वुडवर्ड यांचं हे पुस्तक पुन:प्रत्ययाचा आनंद तर देतंच; पण त्यावेळची गृहितकं तपासून पाहायची संधीही देतं. हे झालं वैयक्तिक. पण त्याच्याही पलीकडे दूपर्यंत जाऊन वुडवर्ड ट्रम्प निवडून आल्यानं नक्की काय बदललंय ते सांगतात. आणि मुख्य म्हणजे ते तसंच्या तसं मांडतात. उगाच ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याचं पद्मपुरस्कारीय चातुर्य ते अजिबात दाखवत नाहीत. अर्थात म्हणूनच ते मोठे. हे पुस्तक अंगावर येतं.

ट्रम्प यांच्या आसपासचे राजकारणी, त्यांचे मंत्री, नोकरशाही, कर्मचारी, सेवक अशा अनेकांच्या मुलाखती वुडवर्ड यांनी या पुस्तकासाठी घेतल्या. हे रेकॉìडगच काही शे तासांचं आहे. या सर्वाची गुंफण वुडवर्ड यांनी इतकी उत्तम केलीये, की एखादी कादंबरीच वाचत असल्याचं वाटावं. परत माहिती नुसती जंत्री या स्वरूपाची नाही. म्हणजे अमुक तारखेला तमुक झालं.. असं नाही. तर जे काही झालं ते कसं झालं याचं रसाळ वर्णन त्यात आहे. उदाहरणार्थ..

ट्रम्प हे अशा नेत्यांचं प्रतिनिधित्व करतात- की ज्यांना जगाचा नाही, तरी आपल्या देशाचा इतिहास आपल्यापासूनच सुरू होतो असं ठामपणे वाटतं. अशा नेत्यांना नवनवीन काही ना काही करायचं असतं. आणि आपण जे काही नवनवीन करतोय त्यामुळे आपला देश कसा महान होणार आहे याची खात्रीच त्यांना असते. ही अशी अज्ञानी खात्री हे अशा नेत्यांच्या आत्मविश्वासाचं अधिष्ठान. तर आपल्या देशाचा खर्च वाचवायचा आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती द्यायची, हे ट्रम्प यांचं ध्येय. आपल्याआधीचे सगळे अध्यक्ष मूर्ख तरी होते किंवा अप्रामाणिक तरी.. हा समज. त्यामुळे ट्रम्प निर्णय घेतात दक्षिण कोरियातला अमेरिकेचा लष्करी तळ बंद करायचा. ‘कोरस’ या नावानं ओळखला जाणारा ‘कोरिया युनायटेड स्टेट्स फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट’च ते रद्द करू पाहतात. हा करार १९५० पासून अस्तित्वात आहे. या करारामुळे उत्तर कोरियाच्या साम्यवादी स्वप्नांना आळा बसलाय. या करारामुळे दक्षिण कोरियात अमेरिकेचे २८ हजार सैनिक आणि अमेरिकेची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तिथं तनात आहे. उत्तर कोरियानं अणुबॉम्ब बनवलाय. तो क्षेपणास्त्रावर ठेवून अमेरिकेच्या शहरांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं, हे त्यांच्या गावीही नाही. या सगळ्यावर अमेरिका वर्षांला ३५० कोटी डॉलर्स खर्च करते. पण त्यामागे ही महत्त्वाची कारणं आहेत, हे ट्रम्प यांच्या गावीही नाही. त्यामुळे ते जेव्हा हा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या आसपासचे सुन्न होतात. त्यात असतात त्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार गोल्डमन सॅकचे गॅरी कोहन. दक्षिण कोरियातली ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा अमेरिकेसाठी इतकी महत्त्वाची आहे की समजा, उत्तर कोरियानं अमेरिकी शहरावर क्षेपणास्त्र डागलंच, तर अवघ्या सात सेकंदांत दक्षिण कोरियातल्या या केंद्राला त्याचा सुगावा लागेल अशी व्यवस्था आहे. आणि तसं झालंच तर तिथून एक स्वतंत्र क्षेपणास्त्र आपोआप आकाशात झेपावेल आणि उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राचा नि:पात करेल. तेव्हा दक्षिण कोरियातली ही यंत्रणा बंद केली तर हा सुगावा लागायला अमेरिकी यंत्रणांना १५ मिनिटं लागतील आणि तोपर्यंत उत्तर कोरियाचं क्षेपणास्त्र अलास्कापर्यंत आलेलं असेल. तरीही पैसे वाचवण्यासाठी दक्षिण कोरियातला तळ बंद करा.. हा ट्रम्प यांचा धोशा!

तेव्हा आसपासचे अधिकारी, मंत्री कसा सामना करतात या चक्रम अध्यक्षाचा हे मुळातनं वाचणं चित्तथरारक आहे. ट्रम्प यांचे एक मंत्री म्हणतात, आमच्या अध्यक्षाची समज पाचव्या-सहाव्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त नाही. दुसरे त्यांचं वर्णन ‘इडियट’ असं करतात. तर त्यांचा कायदामंत्री म्हणतो, ट्रम्प इज अ ० लायर. एका मंत्र्याच्या मते, हा अध्यक्ष शुद्ध वेडपट आहे.

हे सगळं या पुस्तकात असंच्या असं आहे. त्या- त्या मंत्र्याच्या, अधिकाऱ्यांच्या नावासकट. या पुस्तकासाठी वुडवर्ड यांनी ट्रम्प यांनाही मुलाखत मागितली होती. त्यांची बाजूही यावी यासाठी. ते ‘नाही’ म्हणाले. पण पुस्तकात काय असण्याची शक्यता आहे याचा सुगावा जसा त्यांना लागला तेव्हा त्यांची धडपड सुरू झाली. वुडवर्ड किती धडाडीचे, सचोटीचे आहेत याचं जाहीर कौतुक वगैरे त्यांनी केलं. पण एव्हाना पुस्तक छापायला गेलं होतं. वुडवर्ड यांनी सांगितलं.. ‘अध्यक्ष महाशय, आता उशीर झालाय.’ मग ट्रम्प यांचा सूर बदलला. हे पुस्तक किती फालतू आहे असं ते आता सांगत असतात.

या तुलनेत फोर्सथि यांची ‘द फॉक्स’ ही केवळ कादंबरी आहे. पण योगायोग असा की, ती वुडवर्ड यांच्या पुस्तकाला समांतर जाते. फोर्सथि यांची जगड्व्याळ अशी एक शैली आहे. म्हणजे आफ्रिकेच्या कोणत्या तरी गावात पहिलं प्रकरण घडतं. दुसरं मग न्यूयॉर्कमध्ये. तिसरं युरोपीय संघटनेच्या कार्यालयात.. ब्रुसेल्सला. असं. नवीन वाचकाला त्यामुळे गांगरल्यासारखं होतं. आणि मराठी कादंबरीवर पोसलेल्यांना तर फोर्सिथ वाचताना शंभर मजली इमारतीच्या गच्चीवरनं पाहिल्यासारखं वाटतं. कादंबरी जसजशी पुढे जाते तसतसे हे ठिपके जोडले जायला लागतात आणि शेवटच्या प्रकरणात एका भव्य कटकारस्थानाचं चित्र समोर येतं.

‘द फॉक्स’ही तशीच आहे. सुरुवात आहे लंडनमध्ये. भर वस्तीतल्या एका घरावर कमांडो मध्यरात्री छापा घालतात आणि चौघांच्या पापभीरू कुटुंबाला पकडून नेतात. तिकडे अमेरिकेत सरकारचा मध्यवर्ती महासंगणक हॅक होतो आणि त्यामुळे अध्यक्ष पिसाळतात. पश्चिम आशियात इराणच्या अणुचाचणी केंद्रातली नियंत्रण व्यवस्था निकामी होते. अयातोल्ला खामेनींना संशय येतो इस्रायलचा. पण इस्रायलच्या हेरगिरी यंत्रणेतला एक खुद्द इराणलाच फितुर असतो. इस्रायल त्याला तसंच राहू देतं. त्याच्या माहितीच्या आधारे इराणी कमांडो इस्रायलच्या सुंदर एलात परिसरावर हल्ला करतात आणि मारले जातात. आशियात उत्तर कोरियाचा किम इराणला गुप्तपणे अणुतंत्रज्ञान देण्याच्या प्रयत्नात असतो. त्याचा बभ्रा होतो. रशियाचे पुतिन जगातली सर्वात सामर्थ्यवान नौका तयार करतात. पण पहिल्याच फेरीत अणुऊर्जेवर चालणाऱ्या या नौकेच्या नियंत्रण कक्षात संगणकीय घुसखोरी होते. कोण असतं या सगळ्यामागे?

ते उघड करणं हा या लेखाचा उद्देश नाही. वुडवर्ड यांच्या पुस्तकाची परिणती कशात होते याचीही चर्चा इथे अभिप्रेत नाही. अमेरिकेचे अभ्यासक/ निरीक्षक/ चाहते/ टीकाकार हे सगळेच वुडवर्ड वाचणार हे उघड आहे. तसंच जगभरातले फोर्सथिप्रेमीदेखील ‘द फॉक्स’ अवघ्या काही दिवसांतच संपवणार हेही

स्वच्छ आहे. (जाता जाता.. नंतर एकदा फोर्सथि यांना इंग्लंडमध्ये भेटलो होतो तेव्हा त्यांची आगामी कादंबरी ‘द अफगाण’च्या १६ लाख प्रतींची आगाऊ नोंदणी झाली होती. असो.) तेव्हा ही पुस्तकं वा त्यांचे लेखक हा मुद्दा नाही.

त्यांना लिहू देणारी व्यवस्था हा या लेखाचा केंद्रिबदू आहे. विद्यमान, सर्वशक्तिमान अध्यक्षावर, त्याचा पूर्ण पाणउतारा करणारं लेखन या देशात होऊ शकतं. बातमीदारावर त्याच्या वर्तमानपत्राचा कसलाही दबाव नाही. वर्तमानपत्रांना त्यांच्या वाचकांच्या वा संबंधित नेत्याच्या भक्तांच्या धमक्या नाहीत.. आणि वर त्यांनी लिहिलेलं छापण्याचं धर्य प्रकाशक दाखवतात. प्रकाशकानं छापलं तरी वितरक अमुक राजकीय पक्षाच्या नेत्याचा अपमान होतो म्हणून त्याच्या विक्रीवर बहिष्कार वगैरे घालत नाहीत की त्या लेखकाच्या घरावर मोच्रे नेले जात नाहीत. अन्य वर्तमानपत्रं, खासगी टीव्ही वाहिन्या त्या पुस्तकांवर चर्चा करतात.. त्या लेखकांवर अमुक विचारसरणीची तळी उचलल्याचा कोणी आरोप करत नाही की त्यांच्या हेतूंवर प्रश्न निर्माण केले जात नाहीत. वृत्तलेखन असो वा कादंबरी.. विद्यमान सत्ताधीशांची, त्यांच्या निर्णयांची, धोरणांची त्यांच्याच डोळ्यासमोर इतकी चिरफाड कधी झाली नसेल.

फोर्सथि यांची तर कादंबरी आहे. तिचं ठीक. पण बॉब वुडवर्ड यांच्या पुस्तकाचं नाव ‘फीअर’ असं का?

खुद्द ट्रम्प हे वुडवर्ड यांना एकदा म्हणाले होते.. ‘‘भीती निर्माण करण्यात खरी सत्ता असते.’’

या वास्तवाची ओळख करून देणारे वुडवर्ड आणि कल्पनेला वास्तवाशी भिडवणारे फोर्सथि यांची ही पुस्तकं म्हणून महत्त्वाची ठरतात. त्या देशात ती निर्वेधपणे प्रकाशित होतात याचा आनंद वाटतो.

पण आताशा त्रास होतो तो याच आनंदाचा.

महान लोकशाही आणि सर्वात मोठी लोकशाही यांतला फरक लक्षात घेतला की हा त्रास कमी होईल बहुधा!!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber