|| अनिता पांडे

अटलबिहारी वाजपेयी इतरांसाठी पंतप्रधान असतील, भाजपा नेते असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असतील; परंतु माझ्यासाठी ते केवळ परंपरा जपण्याचा आग्रह धरणारे, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारे, कुटुंबवत्सल प्रेमळ मामा होते. मला ते प्रेमानं ‘गुड्डी’ म्हणायचे. मामा मूळचे उत्तर प्रदेशातील आग्य्राजवळच्या बटेश्वरचे! त्यांचं शिक्षण ग्वाल्हेरमध्ये झालं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मी नव्यानं सांगायला नको. ते एका शब्दानंही कुणाला दुखवायचे नाहीत. ते नेहमी संयमानं, विचार करून आणि अभ्यास करूनच बोलत. त्यांच्या चेहऱ्यावरील सात्त्विक भाव त्यांना त्यांच्या आई-वडलांकडून वारशानं मिळाले होते. त्यांचे आई-वडीलही त्यांच्यासारखेच साधे होते. साधी राहणी आणि उच्च विचार हे त्यांच्याकडे पाहून आणि त्यांना ऐकल्यावर मनोमन पटायचं. त्यांच्या बोलण्या-वागण्यात अहंकार कधीच नसे. त्यामुळे समोरचा माणूसही त्यांच्याशी अदबीनं आणि मनमोकळेपणानं बोलू शकायचा. मला आणि माझ्या मुलांनाही त्यांच्याशी अगदी सहजपणे संवाद साधता यायचा.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

नागपुरातील आमच्या सीताबर्डीच्या घरी आणि नंतर देवनगरातील बंगल्यावरही ते अनेकदा येत असत. त्यांच्या सहवासातून आम्ही परंपरांची जपणूक करायला शिकलो. कारण मामा कुटुंबात वडीलधाऱ्यांचा मान राखणं आणि परंपरा जपणं महत्त्वाचं मानायचे. ते सगळ्या भाच्या आणि त्यांच्या यजमानांचा खास मानपान करायचे. कुटुंबातील रीतिरिवाजानुसार सर्व भाच्यांच्या ते पाया पडायचे. अगदी माझ्या छोटय़ा मुलीच्याही! जेवणाच्या मेजावर बसल्यावर जोपर्यंत जावई जेवणाला हात लावत नसत तोवर ते जेवण सुरू करत नसत. आमच्याकडे आल्यावर किंवा इतरही भाऊ वा बहिणींकडे गेल्यावर जेवणाची सुरुवात जावई करतील, हा अलिखित नियम ते पाळत असत.

चार भाऊ आणि तीन बहिणी असं त्यांचं मोठं कुटुंब होतं. त्यांचे सर्वात मोठे भाऊ अवधबिहारी, नंतर सदाबिहारी, प्रेमबिहारी आणि सर्वात लहान माझे मामा अटलबिहारी वाजपेयी होते. तर बहिणींमध्ये माझी आई ऊर्मिला मिश्रा सगळ्यांत धाकटी. ती आणि मोठी मावशी विमला मिश्रा ग्वाल्हेरला दिलेल्या, तर आईपेक्षा मोठी असलेली मावशी कमला मिश्रा आग्रा येथे राहत असे. या सात भावंडांपैकी केवळ माझे मामा आता हयात होते. माझ्या आधीच्या आणि माझ्या नंतरच्या पिढीला बांधून ठेवणारा हा एकमेव स्वयंप्रकाशित तारा आज निखळल्याचं अतीव दु:ख आहे.

मामा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते हे सर्वानाच माहिती आहे. भारतीय जनता पक्षाशी जोडल्यानंतर आम्ही त्यांचे कुटुंबीयही आपसूकच पक्षाशी जोडले गेलो. नागपुरात त्यांचं अनेकदा येणं-जाणं असे. इथे आल्यावर ते आमच्या कुटुंबाबरोबर किंवा राज्यपाल रजनी रॉय यांच्याकडे थांबायचे. त्यांच्यापाशी फार वेळ नसायचा. पण कुटुंबीयांना भेटल्याशिवाय ते जात नसत. वेळ खूपच कमी असला की ते जिथे उतरायचे तिथे आम्हाला बोलवून घेत. त्यामुळे कधी कधी विमानतळावर त्यांची धावती भेट घ्यावी लागायची. अर्थात ते घरी यायचे तो दिवस आमच्यासाठी दिवाळी-दसऱ्यापेक्षा कमी नसे. त्यांच्या सहवासात आम्हाला कधीच ताणतणाव जाणवत नसे. उलट, ते त्यांच्या बोलण्यानं वातावरण हलकंफुलकं करायचे. जसं राजकारणात ते कुटुंबाला येऊ देत नसत, तसंच कुटुंबात असताना ते राजकारण उंबऱ्यापलीकडे सोडून येत. त्यांच्या सुरक्षारक्षकांना ते घरात येऊ देत नसत. म्हणायचे, ‘मला असे बंधनात जखडू नका. कुटुंबाबरोबर सुखाचे क्षण घालवू द्या!’ त्यांच्या मृदू बोलण्यामुळे वातावरण सैल व्हायचं. आणि मग मुलांबरोबर गमतीजमती, कुटुंबाची, घरातल्यांच्या नोकरीधंद्याबद्दलची विचारपूस करून ते घरातलं वातावरण मोकळं करून टाकायचे. ते पंतप्रधान असताना भोपाळमधील त्यांच्या बंगल्यावर एकदा आम्ही सहकुटुंब गेलो होतो. त्या ठिकाणी उमा भारती आल्या होत्या. त्या राजकारणासंबंधी काही बोलायला लागल्या. मात्र, मामांनी मधेच त्यांना थांबायचा इशारा केला. ‘कुटुंबासमोर राजकीय गप्पा नकोत,’ असं त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं.

घरी आल्यावर किंवा त्यांना भेटायला जायचे असले की त्यांच्या आवडीचे दोन पदार्थ आम्ही आवर्जून करायचो. कढी, भजी आणि मुगाच्या डाळीच्या वडय़ा. मुगाची डाळ भिजवून ती मिक्सरमधून बारीक करायची. नंतर एका कापडात चक्क्यासारखी बांधून ठेवायची. पाणी निथळल्यानंतर त्याच्या वडय़ा करायच्या आणि तेलातून परतून काढायच्या. या वडय़ा त्यांना फार आवडत. यासंबंधीची माझ्या आईची आठवण सांगायला हरकत नाही. माझी आई ऊर्मिला ही नेहमीच त्यांना राखी बांधत असे. त्यासाठी कधी आई मामांकडे जायची, तर कधी मामा आईकडे येत असत. भाऊ येणार म्हणून आईची सकाळपासूनच लगबग सुरू असायची. मामाला खानपानाचं पथ्य असल्यामुळं कमी तेल आणि सौम्य तडका दिलेली भाजी आई करायची. तर आमच्यासाठी कडक तडका दिलेली भाजी. दोन्ही भाज्या वेगवेगळ्या असायच्या. त्यामुळं आईला चिडवायची आयतीच संधी त्यांना मिळत असे. आई फार निगुतीनं त्यांच्यासाठी भाजी बनवायची. पण मामा मात्र आल्यावर आमच्यासाठी केलेली भाजीच खायचे. आणि आई त्यांच्याकडे काळजीयुक्त संमिश्र भावनेनं पाहत राहायची. काय करणार!

माझ्या सासऱ्यांना ते ‘श्रीमान पांडेजी’ म्हणायचे. पांडे कुटुंबीयांचा नागपुरात चष्म्यासाठी लागणाऱ्या काचेचा कारखाना आहे. महाल भागातील कारखान्याचे उद्घाटन मामांच्या हस्ते व्हावे अशी आमची आणि खासकरून माझ्या सासऱ्यांची मनोमन इच्छा होती. आदल्या दिवशी मामांचा रात्री फोन आला, की मी येऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या काही अडचणीही सांगितल्या. त्यांना त्या रात्री काय वाटले कुणास ठाऊक; पण सकाळीच त्यांचा फोन आला आणि सासऱ्यांना ते म्हणाले, ‘श्रीमान पांडेजी, तयारी करा, मी येतो आहे.’

लहानांसमवेत लहान आणि मोठय़ांबरोबर मोठे होऊन राहण्याची हातोटी त्यांना साधली होती. ते आल्यावर एक वेगळंच, प्रसन्न वातावरणात घरात निर्माण होत असे. त्यांची मला कधीही भीती वाटली नाही. परंतु काही गोष्टी मात्र आम्ही त्यांना विचारू शकत नव्हतो. जसे की- त्यांनी लग्न का केले नाही? त्यांना हे विचारण्याची माझी प्राज्ञा नव्हती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक असल्याने घराबाहेरच जास्त काळ असत. घरातल्या वडीलधाऱ्यांनी त्यांना अधिकारवाणीने लग्नाबद्दल विचारल्यावर त्यांनी लग्नास साफ नकार दिल्यामुळं नंतर हा विषय कोणी काढत नसे. सगळ्या भाऊ-बहिणींशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचे मोठे भाऊ अवधबिहारी वाजपेयी यांच्याशी मात्र त्यांचे फारसे बोलणे होत नसे. कारण ते काँग्रेसवासी झाले होते. माझ्या लग्नाला ते तीन दिवस जातीने हजर होते. त्यानंतर पाठवणीच्या कार्यक्रमासाठीही ते खास आले होते. तो क्षण मी विसरू शकत नाही.

२००३-०४ मध्ये त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रवासावर मर्यादा आली. या शस्त्रक्रियेमुळे देवनगरातील आमच्या घराचा जिना चढून ते येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना दिल्लीला जाऊन भेटण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हते. मामांनी त्यांच्या ग्वाल्हेरमधील एका भावाला सहकुटुंब दिल्लीत राहण्यास बोलावले होते. मात्र, त्यांच्या व्यवसायामुळे त्यांनी दिल्लीला जाण्यास नकार दिला. त्यांची मानलेली मुलगी गोनू आणि जावई रंजन भट्टाचार्य यांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली. आम्हाला जेव्हा आठवण येत असे तेव्हा आम्ही जायचोच; पण त्यांचा २५ डिसेंबरचा वाढदिवस आम्ही कधीच चुकवला नाही. गेली दहा वर्षे आम्ही नियमितपणे त्यांच्या भेटीसाठी जात असू. गेल्या तीन-चार वर्षांत त्यांची प्रकृती फारच नाजूक झाली होती. पण आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचे. ‘माझी गुड्डी आणि जावई न विसरता दरवर्षी भेटीला येतात,’ असे ते म्हणायचे तेव्हा आमचे डोळे भरून येत. त्यांची प्राणज्योत मालवली आणि आमच्या कुटुंबातील एक स्वयंप्रकाशित तारा निखळला. आमच्या पाठीवरचा एक आश्वासक हात आणि खंबीर आधारच जणू आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

शब्दांकन : ज्योती तिरपुडे