|| अ‍ॅड. जयंत म्हाळगी

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी आली आणि माझ्या वडिलांचे आणि त्यांचे संबंध, कार्यकर्ता ते राष्ट्रीय पातळीवरचा नेता ते पंतप्रधान आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून त्यांचं असलेलं मोठेपण अशी अटलजींची अनेक रूपं, आठवणी डोळ्यांसमोर यायला लागल्या.

देशाच्या राजकीय वाटचालीत अनेक मोठे नेते होऊन गेले. परंतु त्या सर्वामध्ये आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक ठळक मूलभूत फरक होता. अटलजी अस्सल कविमनाचे कलाकार व्यक्ती होते. एक कलाकार जेव्हा राजकारणासारख्या तुलनेने वेगळ्या आणि कोरडय़ा क्षेत्रात येतो तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. एखादा खाऱ्या पाण्यातला मासा गोडय़ा पाण्यात आणून सोडला तर त्यात तग धरताना त्याच्या जीवाची जी काही तगमग होईल, अगदी तशीच तगमग राजकारणात कलाकाराची होते असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अटलजींसारख्या नितळ मनाच्या तरल कलाकार माणसाकडे एका राजकारण्याकडे असतात तसे डावपेच, सतत दुसऱ्याला कमी लेखत त्याच्यापेक्षा वरचढ ठरण्याची स्पर्धा अशा गोष्टी असणं शक्यच नव्हतं. पण एकदा पत्करलंय म्हटल्यावर तडीस न्यायचं, हे ठरवल्यावर मागे वळून बघायचं नसतं! मुत्सद्दी राजकारणी, त्यासाठी आवश्यक असलेला ‘अ‍ॅटिटय़ूड’, डावपेच अंगीकारण्यासाठी अटलजींनी प्रचंड मेहनत घेतली. आणि त्या मेहनतीला आलेलं यश वेळोवेळी आपण बघितलं! संघ, जनसंघ आणि त्यानंतर भाजप या संघटनांची विचारधारा, त्यांची पाश्र्वभूमी, त्यांचं राजकारण हे सगळंच खरं तर अटलजींच्या मूळ कलाकार म्हणून असलेल्या व्यक्तिमत्त्वाशी काहीसं विसंगतच. पण अटलजींनी हे आव्हान समर्थपणे पेललं!

माझे वडील रामभाऊ  म्हाळगी आणि अटलजी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. देशाचं हित हेच कर्तव्य आणि तेच सगळ्यात आधी- हा दोघांच्याही विचारातला समान धागा असल्यामुळे त्यांच्यात हा जिव्हाळा होता. १९७१ मध्ये माझे वडील रामभाऊ  हे जनसंघातर्फे लोकसभेची निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या विरोधात होते मोहन धारिया. अटलजी वडिलांच्या प्रचाराला येणार होते. सकाळी दहा वाजता अलका चित्रपटगृहाच्या चौकात अटलजींची सभा होणार असं ठरलं होतं. ती सभा आटोपून हडपसरला साडेबारा वाजता माझे वडील सभा घेणार होते. काही कारणाने अटलजींना यायला उशीर होत होता. त्या काळात लँडलाइन फोन होता. दोघांचा संपर्क झाला तेव्हा अटलजींनी ‘तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य!’ असा निरोप रामभाऊंना दिला. तेव्हा रामभाऊंनी अलका चित्रपटगृहाच्या चौकातील सभेत भाषण करून पुढे हडपसरच्या सभेसाठी निघायचं ठरवलं. अटलजींनी हा निर्णय मानला आणि रामभाऊंच्या निर्णयाचं कौतुकही केलं! ‘तुम्ही उमेदवार आहात, तुमच्या प्रचारासाठी मी येत असताना तुम्ही पुढे निघून जाणार का?’ वगैरे कुठलेही आढेवेढे त्यांनी घेतले नाहीत. कारण मानापमान, लहान-मोठेपण या गोष्टींचा खरंच या दोघा व्यक्तिमत्त्वांना स्पर्शही नव्हता.

अटलजींचं व्यक्तिमत्त्व कमालीचं प्रभावी होतं. जनसंघाची स्थापना झाल्यावर पक्षविस्तारासाठी नेते गावागावांमध्ये जात. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या घरी राहायची पद्धत होती. श्यामाप्रसाद मुखर्जीनी अटलजींना आमच्या घरी पाठवलं. ते शनिवार पेठेतल्या आमच्या घरी आले. अटलजी मीतभाषी होते. भरभरून बोलायचा त्यांचा स्वभाव नव्हता. पण कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये बोलायला उभे राहिले की ते मराठीतून सुरुवात आणि मराठीतून शेवट करत. हिंदी भाषणातसुद्धा मधेच एखादा खुसखुशीत मराठी शब्दप्रयोग ही अटलजींची खास शैली होती. ही त्यांची शैली, ओघवती वाणी आणि अमोघ वक्तृत्व यांच्या बळावर अनेक कार्यकर्ते अटलजींनी लीलया जोडले. संघटना म्हणून बांधणी करताना अटलजींसारख्या अखिल भारतीय स्तरावरच्या नेत्याचा विशाल दृष्टिकोन हा अनेक अर्थानी स्थानिक कार्यकर्त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावणारा ठरला.

१९७७ मध्ये अटलजींकडे जनता पक्षाच्या सरकारमध्ये परराष्ट्र खात्याचा कार्यभार होता. आपण परराष्ट्रमंत्री आहोत हा आविर्भाव त्यांच्याकडे अजिबात नव्हता. त्यामुळेच पक्षाच्या संघटनात्मक बाबींची चर्चा करण्याची वेळ येई तेव्हाही वेळात वेळ काढून ते दिल्लीला आमच्या घरी येत. पुढे जनता पक्षात जेव्हा दुहेरी निष्ठेचा मुद्दा आला आणि पक्ष दुभंगण्याचा प्रसंग उभा राहिला तेव्हा अटलजी आणि माझ्या वडिलांनी ‘राजीनामे देऊ, पण मातृभूमी आणि मातृसंस्था यांच्याशी प्रतारणा करणार नाही..’ अशी भूमिका घेतली. जनता पक्ष फुटला. मुंबईतल्या वांद्रे रेक्लमेशनमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. तेव्हा देशातील लोकप्रतिनिधींच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी अटलजींनी रामभाऊंकडे सोपवली. कार्यकर्ता, त्याचं घर आणि कुटुंब जोडायचं- या दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या कार्यपद्धतीचा पक्षाला मोठा फायदा झाला.

१९८५ मध्ये अटलजी पुण्यात आले तेव्हा माझे मोठे भाऊ  रमेश म्हाळगी यांच्याकडे त्यांची एकसष्ठी आम्ही साजरी केली. अटलजींचा स्वभाव बघता जाहीर कार्यक्रम न करता छोटाच साधा कौटुंबिक कार्यक्रम करायचा असं ठरलं. त्यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या मोजक्याच जवळच्या कार्यकर्त्यांना बोलावून कार्यक्रमही तसाच साधा आणि नेटका झाला.

माझे वडील आणि अटलजी यांचं नातं कायम अतूट राहिलं. २००३ मध्ये अटलजी पंतप्रधान असताना भाईंदरमधील उत्तन येथे ‘रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनी’चं लोकार्पण करण्यात आलं. लोकार्पणानंतर पंतप्रधान अटलजी आणि त्यांचे परममित्र उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी प्रबोधिनीत मुक्काम केला. सामान्यत: पंतप्रधान आणि उपपंतप्रधान सुरक्षेच्या कारणासाठी एकत्र प्रवास करत नाहीत, एकत्र राहत नाहीत. असं असतानाही हे दोघे म्हाळगी प्रबोधिनीत शेजारी शेजारी राहिले, हा एक दुर्मीळ योग होता. त्यावेळी त्यांच्या हस्ते एक आंब्याचं झाड प्रबोधिनीच्या आवारात लावलं गेलं. काही वर्षांनी त्या झाडाचे आंबे अटलजींना पाठवण्यात आले. आणि त्यांनीही ते मिळाले, आवडले हे आवर्जून कळवलं! अटलजींसारख्या मोठय़ा माणसाची ही छोटीशी कृती आम्हा सगळ्यांना त्यांचं मोठेपण अधोरेखित करून दाखवणारी ठरली.

अटलजी आता आपल्यात नाहीत, पण त्यांच्या अनेक आठवणी आहेत. माझ्या मावसबहिणीच्या लग्नात आपल्याच घरचं कार्य आहे, निमंत्रण कशाला हवं, म्हणून अगत्याने आलेले अटलजी आठवतात. कार्यकर्त्यांच्या घरातलं सुखदु:ख हे आपलं सुखदु:ख समजून प्रसंगाला धावून जाणारे अटलजी.. कर्तव्यकठोर, मीतभाषी, कवी, कलाकार, वक्ते, पत्रकार अशी त्यांची अनेक रूपं आठवतात. ते आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार आहेत. यापुढे त्याच विचारांचं बोट धरून पुढची वाट चालायची आहे..

शब्दांकन : भक्ती बिसुरे