|| शरद यादव

अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपाने देशाच्या राजकीय क्षितिजावर गेली साठ-सत्तर वर्षे स्वयंतेजाने तळपणारा एक महातारा अस्तंगत झाला आहे. त्यांची घरची, दारची तसेच सार्वजनिक क्षेत्रातली वैविध्यपूर्ण रूपे चितारणारे लेख..

santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका
Hemil Mangukiya died in russia
अडीच लाख रुपये पगारासाठी रशियन सैन्यात गेला; युक्रेन युद्धात गुजराती तरुणाचा दुर्दैवी अंत
Drunk lady police Wardha
वर्धा : मद्यधुंद महिला पोलीस शिपायाने चारचाकीने घातला हैदोस, दोघांना जखमी करीत पसार

अटलजी मला पहिल्यांदा भेटले त्याला चव्वेचाळीस वर्षे होऊन गेली.. गुरुवारी अटलजींना मी अखेरचा भेटलो. चार दशकांचा त्यांचा सहवास संपला. असा कविमनाचा, विशाल हृदयाचा नेता आता होणे नाही..

मध्य प्रदेशातील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून १९७४ साली मी पहिल्यांदा निवडून आलो. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांची काँग्रेसविरोधातील चळवळ तीव्र झालेली होती. मला विश्वास होता, की मी जबलपूरमधून जिंकणारच. अटलजी जबलपूरला आले होते. खांद्यावर हात टाकून अटलजींनी मला विचारले, ‘जिंकशील ना?’ मी आत्मविश्वासाने म्हणालो, ‘नक्की!’ त्यावर अटलजी त्यांच्या नेहमीच्या लकबीत मला म्हणाले, ‘जिंकणे सोपे नाही..’ त्यावर मी जोर लावून म्हणालो, ‘मी जिंकू शकतो.’ अटलजी हसायला लागले. ‘हरकत नाही. तू जिंकलास तर माझ्याकडून तुला मेजवानी.’ अटलजींनी तिथेच मला सांगून टाकले. ती निवडणूक मी जिंकलो. अटलजी मला पहिल्यांदा भेटले ते असे..

अटलजी कोणालाही आपलेसे करून घ्यायचे. समोरचा माणूस त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडत असे. मीही त्याला अपवाद नव्हतो. जबलपूरची निवडणूक जिंकून दिल्लीत आल्यावर मी त्यांना भेटलो. त्यांच्या घरी मेजवानीचा आस्वादही घेतला. तेव्हापासून सतत त्यांच्याकडे माझे येणे-जाणे होत राहिले. गेल्या काही वर्षांत आजारपणामुळे अटलजींचा सार्वजनिक जीवनातील वावर कमी कमी होत गेला. मी अधूनमधून त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत असे.

अनेकांनी अटलजींचे भाषेवरील प्रभुत्व आणि वक्तृत्वाची ओघवती शैली जाहीर सभेत अनुभवलेली आहे. पण त्यांची संसदेतील भाषणे ऐकणे हे एक प्रकारे राजकीय शिक्षणच असे. सुरुवातीच्या काळात खासदार म्हणून आणि नंतर पंतप्रधान या नात्याने अटलजींनी सभागृहांत विविध विषयांवर, मुद्दय़ांवर अत्यंत तडफेने केलेली मांडणी अनेकदा पाहायला, ऐकायला मिळाली. ते बोलायला लागले की सभागृह शांत होत असे. ते काय बोलतात आणि कसे बोलतात याची उत्सुकता संसद सदस्यांना असे. सभागृहात अटलजींच्या भाषणाच्या वेळी फारच कमी वेळा हस्तक्षेप केला गेला. तरुण खासदारांसाठी अटलजींची भाषणे ऐकणे हा एक वस्तुपाठ मानता येईल.

अटलजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी विभिन्न राजकीय विचारसरणींच्या २३ घटक पक्षांना घेऊन देशाची सत्ता चालवण्याचे अत्यंत अवघड काम अटलजींनी करून दाखवले. त्यापैकी प्रत्येक प्रादेशिक पक्षाची राजकीय बैठक वेगळी होती. पण अटलजींनी सर्व पक्षांना एकत्रित बांधून ठेवले होते. त्यात त्यांना अडवाणींनी मोठी साथ दिली. अटलजी मवाळ आणि अडवाणी जहाल अशी प्रतिमा बनवली गेली होती. पण दोघेही नेते खुल्या मनाचे. त्यांनी आघाडीतील घटक पक्षांना मन मोठे करून स्वीकारले होते. घटक पक्षांचे म्हणणे दोघेही ऐकून घेत आणि मग त्यावर चर्चा, विचारविनिमय होत असे. अर्थात मतभेदही होत असत. पण त्याचे स्वरूप कधी टोकाच्या राजकीय निर्णयात रूपांतरित झाले नाही. घटक पक्षांना वगळून पंतप्रधान अटलजींनी कधीही निर्णय घेतले नाहीत. महिन्यातून किमान एकदा तरी आघाडीतील पक्षांची बैठक बोलावली जात असे. समन्वय हेच अटलजींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या यशाचे गमक होते. अटलजींनी एक अजेंडा घेऊन आघाडी सरकार चालवले. आताही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार आहे; पण ना त्यामध्ये समन्वय आहे, ना अजेंडा. आघाडीचे सरकार कसे चालवावे, हे अटलजींकडून शिकले पाहिजे.

त्यांच्या कार्यकालातच गुजरातमध्ये दंगल भडकली होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. देशभर तणाव निर्माण झाला होता. जे काही घडत होते ते अत्यंत भयानक, निंदनीय होते. मी अटलजींची भेट घेतली. माझे सगळे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. मला म्हणाले, ‘जरा धीर धरा. तुम्हाला देशात तोंड दाखवायला जागा राहिली नाही असे तुम्ही म्हणता; पण मला अख्ख्या जगात तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही..’ अटलजींनी दुसऱ्याच दिवशी मोदींना नि:संदिग्धपणे सांगितले, ‘राजधर्माचे पालन करा!’ कोणाचीही तमा न बाळगता थेट जाब विचारणारा असा नेता आता राहिला नाही.

बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली तेव्हा अटलजींनी आपली नाराजी लपवून ठेवली नाही. त्यांनी या कृत्याचा निषेध केला होता. धर्माधता, कडवे राजकारण अटलजींना कधीही आवडले नाही. त्यांच्या नसानसांत उदारता होती. अटलजींनी कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. मतभेद झाले म्हणून कोणाविरोधात आकस ठेवला नाही. त्यांनी प्रत्येकाला त्यांच्या परिवारात सामावून घेतले. अटलजी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याकडे अनेक साधू-बुवा काही ना काही मागायला येत असत. पण त्यांनी कधीही अशा लोकांना जवळ केले नाही. राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच सत्ता राबवली जाईल, या विचारावर अटलजी शेवटपर्यंत ठाम राहिले. एका बाजूला ते दिलदार होते, लोकांना आपल्या सोबत घेऊन जाण्याची कला त्यांच्याकडे होती; पण दुसऱ्या बाजूला राज्य चालवताना कोणतीही राजकीय तडजोड करणे त्यांना पसंत नव्हते. म्हणूनच त्या काळातील राजकीय ताण्याबाण्यांत अटलजी पंतप्रधान झाले.

अटलजींचा देशवासीयांनी तर आदर केलाच; पण जगानेही केला. अगदी त्यांचे संयुक्त राष्ट्रांमधील हिंदीतून केलेले ऐतिहासिक भाषण असो वा विविध देशांशी त्यांनी जोडलेले सौहार्दाचे संबंध असोत; अटलजींच्या नेतृत्वगुणांचे जगभरातील तमाम नेत्यांनी कौतुकच केले. अटलजींच्या काळातच भारत-पाक संबंध पुढच्या टप्प्यावर पोहोचले. काश्मीरमध्ये मुफ्तींचे सरकार टिकले, कारण अटलजी त्यांच्यामागे ठामपणे उभे होते. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पुढचे पाऊल टाकले गेले ते अटलजींच्याच धोरणीपणामुळेच. त्यांच्याच राजवटीत कारगील युद्धही झाले हे खरे; पण ते त्यांच्या धोरणातील अपयश मानणे उचित ठरणार नाही.

अटलजींच्या बाबतीत अनेकदा म्हटले जात असे की, चुकीच्या पक्षात असलेला चांगला माणूस.. राईट पर्सन इन राँग पार्टी. अटलजींनाही अनेकांनी तसे स्पष्टपणे म्हटले होते. त्यांची विचारसरणी ही काँग्रेस विचारांच्या जवळ जाणारी होती. देशभरातील विविध विचारांच्या लोकांनी, राजकीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी अटलजींना आपलेसे केले, त्यामागे त्यांची ही समन्वयवादी भूमिकाच महत्त्वाची ठरली. पण अटलजी म्हणत असत, ‘तुम्ही म्हणता- मी चुकीच्या पक्षात आहे. पण तुम्हीच सांगा- मी कोणत्या पक्षात जावे? काँग्रेस, कम्युनिस्ट मला घेतील?.. नाही ना? मग मी इथे भाजपमध्येच आहे तो बरा आहे!’

शब्दांकन : महेश सरलष्कर