आनंद विंगकर

‘बलुतं’ने चाळीस वर्षांपूर्वी मांडलेल्या प्रश्नांना आता जगड्व्याळ रूप आले आहे. पण म्हणून काही माणसे संघर्ष करण्याचे अन् स्वप्नं पाहण्याचे थांबवत नाहीत. आणि मुख्य म्हणजे ते गप्प बसलेले नाहीत. अभिव्यक्त होताहेत. परंतु दया पवार यांचा संघर्ष अन् त्यांनी नमूद केलेले प्रश्न आज तरी मिटले आहेत का? त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी ऐरणीवर आणलेले दलितांचे प्रश्न आज संपले आहेत का?

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
best time to shower morning or night what time of day should you shower heres what doctors recommend read
सकाळ की रात्र; अंघोळीची योग्य वेळ कोणती? डॉक्टर काय सांगतात? वाचा….
Carrer Modeling area Brand building Digital Marketing
चौकट मोडताना: दुरावलेली नाती

सत्तरच्या दशकात प्रसिद्ध झालेल्या दया पवार यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनाचा एकूण मराठी साहित्यावरच नव्हे, तर भारतीय साहित्यावर दूरगामी परिणाम झालेला दिसतो. बहुतांश भारतीयांना किमान अवगत असलेल्या िहदी भाषेत राधाकृष्ण प्रकाशन संस्थेनं ‘बलुतं’चा अनुवाद ‘अछुत’ नावाने १९८१ साली प्रसिद्ध केला आणि त्याच प्रकाशकाने १९९७ साली ओम प्रकाश वाल्मीकींचे ‘जुठन’ हे आत्मकथन प्रसिद्ध केले आहे. डॉ. तुलसीराम यांचे ‘मुर्दहिया’ हे आत्मकथन २०१० सालातले. त्यानंतर मोहनदास नेमिशरायचे आत्मकथन. ‘बलुतं’च्या प्रभावाची यादी अशी एखाद्या पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांला आणखी सहज वाढवता येईल.

मराठीत ‘बलुतं’नंतर दलित आत्मकथनांची लाटच सुरू झाली आहे. प्र. ई. सोनकांबळे, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, उत्तम बंडू तुपे, किशोर शांताबाई काळे, राम नगरकर, दीपा महानवार यासारखी अनेक ज्ञात-अज्ञात शिक्षित माणसे आपल्या आयुष्याचे कथन करत आहेत. उपेक्षित अन् कष्टकऱ्यांच्या आत्मकथनांचे हे सत्र थांबवायचे म्हटले तरी अजून पन्नास वर्षे ते थांबणार नाही.

मागे मी म्हटले होते, कादंबरी लिहिण्यासाठी भालचंद्र नेमाडे यांनी मला अवकाश प्राप्त करून दिला. ‘आपणही लिहू शकतो कादंबरी’ असा आत्मविश्वास दिला तो त्यांच्या ‘कोसला’ने. कादंबरी लिहिण्याआधी मी कविता लिहीत होतो. मराठीत कवी म्हणून थोडाफार ओळखला जाऊ लागलो होतो. साहित्याची किमान जाण मला होती. परंतु ‘बलुतं’ने अक्षरांच्या दुनियेत आलेल्या प्रत्येक साक्षराला ‘माझेही जगणे मी शब्दांत मांडू शकतो’ असा आत्मसन्मानाचा पस बहाल केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बोलीभाषेतील ‘मऱ्हाटी’ अक्षरांमधून सर्वदूर उजागर होत गेली. वेगवेगळ्या समाजांतून आलेल्या या असंख्य आत्मकथनांनी मराठी भाषा अधिकच समृद्ध झाली.

‘बलुतं’नंतर मराठीत उपेक्षित जनसमूहांतील शिक्षितांनी लिहिलेली बरीच आत्मकथने प्रसिद्ध झाली. ग्रामीण भारतातील प्रत्येकाचे जगणे खडतर आणि कष्टप्रद होते. खालच्या जातींमधील बहुसंख्यांना ‘माणूस’ म्हणूनची संज्ञाही प्राप्त झाली नव्हती. मात्र, सार्वत्रिक शिक्षणाने ज्ञानाची दारे किलकिली केली. अन्यथा एखाद्या अलिखित दंडकासारखे मनावर िबबवलेले होतेच- ‘बामणाघरी लिहिणं’! त्यामुळे सुरुवातीच्या काळात बहुजनांतील सज्ञान, साक्षर माणसेही तशी दबलेलीच राहिली होती.

जातीय आणि वर्गीय गुलामगिरीची ही बलुतेदारी व्यवस्था म्हणजे हजारो वर्षांच्या अमानुष परंपरेने बहाल केलेला अपमानजनक ‘सेवाभावी रोजगार’च! आणि हेच गावकुसाबाहेरील लोकांचे भागधेय ठरलेले होते. हे अदृश्य साखळदंड कुणालाही तोडता येत नव्हते. हात हेच त्यांचे भांडवल. त्यांना श्रमांशिवाय जगण्याला कोणताही दुसरा पर्याय नव्हता. सांगावा, दवंडी व सरकारी दप्तर वाहण्यासाठी आणि सफाई कामगारासारखे गावाने ज्यास राखून ठेवले होते तो महार हा जातव्यवस्थेतील सर्वात खालची कमजोर कडी होता. त्या बलुतेदारीवरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्वाणीचा हातोडा हाणला अन् गावाच्या जोखडातून अमेरिकी निग्रोंप्रमाणे हा गुलाम समाज मुक्त व्हायला लागला.

आम्ही जे जीवन जगतोय ते सांगण्याची निकड मराठीला ‘बलुतं’ने दाखवून दिली. स्वत:विषयीचे कथन- जे भोगायला लागले अन् व्यवस्थेने लादलेल्या परिस्थितीने साधे एकवेळचे अन्नही मिळू दिले नाही- यासंदर्भातील पहिले बयान, गहिवर व संताप म्हणजे हे आत्मकथन! व्यक्तिपर उरस्फोडीतून सुरू झालेलं हे खंडन-विखंडन, कधी समजुतीचा संवाद, तर कधी समूहाच्या आकांक्षांचा संक्षिप्त एकालाप असते आत्मकथन. आयुष्यभराचा हा सगळा जळफळाट म्हणजे असते आत्मकथन. कादंबरी आणि आत्मकथन यांतील सीमारेषा फारच धूसर. अलीकडेच यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त झालेली ‘फेसाटी’ ही नवनाथ गोरेंची कादंबरीही एक निखळ आत्मकथनच तर आहे!

‘बलुतं’ या अर्थाने मलाच्या दगडाचा बहुमान प्राप्त झालेली ‘कादंबरी’ आहे. तसेही शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या ‘क्षिप्रा’, ‘सरहद्द’ आणि ‘जन हे वोळतु जेथे’ या कादंबऱ्या म्हणजे आत्मकथाच होत्या. नवनाथ गोरेंची ‘फेसाटी’, अशोक जाधवांची ‘भंगार’, अशोक पवार यांचे ‘बिराड’, धनंजय धुरगुडेंचे ‘माझा धनगरवाडा’ यांसारख्या साहित्यकृतींतून अजूनही ‘बलुतं’ची मुळे दिसतात आणि त्यात वावगे काहीच नाही. समूहाने जगणाऱ्या मानवाचे आयुष्य आहे एक जनअरण्य. कोणी कितीही स्वायत्त, तटस्थ अन् स्वयंभूपणाच्या वार्ता केल्या तरी पदराने पदर आपण एकमेकांचे नातेवाईकच असतो. खरे तर कालांतराने कुणालाही रस नसतो माणसाच्या व्यक्तिगत जगण्यात. महत्त्वाचा ठरतो तो काळ!

परंतु दया पवार यांचा संघर्ष अन् त्यांनी नमूद केलेले प्रश्न आज तरी मिटले आहेत का? त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी ऐरणीवर आणलेले दलितांचे प्रश्न आज संपले आहेत का? सांडपाणी अन् उकिरडय़ासारखे मानवाला राहायला सर्वथा लायक नसलेले ते परिसर.. शिवडी, वडाळा, पार तिकडे टिळकनगर, चेंबूपर्यंत लोकलच्या दुतर्फा माणसांची वाढत जाणारी वस्ती. पुन्हा धारावी हे आशियातील सर्वात मोठे माणसांचे सरोवर आहेच. झोपडय़ांचा हा विस्तार थांबलेला आहे का? कशा पद्धतीचे आहे इथले सार्वजनिक आरोग्य? बंद पडू लागल्यात महानगरपालिकेच्या मोफत शाळा. काम करून शिकण्याच्या रात्रशाळा आणि महाविद्यालये तर आता इतिहासजमाच झालीत. अजूनही फोरास रोडचा देहविक्रीचा बाजार भरतोच आहे राजरोस. कोण असतात त्या आयाबाया? कोर्टाशेजारचे एम्प्लॉयमेंट ऑफिस खरेच बंद पडलेय का? अजूनही सकाळी सकाळी गटारे साफ करणारी माणसे कोण आहेत? खरेच हे शहर नजीकच्या भविष्यात सर्वाना पनाह देणार आहे का? असे किती सारे शहराचे प्रश्न ‘बलुतं’ने उद्घोषित केलेत- ते आज मिटले आहेत का?

गतकाळाचे केवळ दस्तावेजीकरण करणे म्हणजे श्रेष्ठ कलाकृती होते असे नाही. जुनी मुंबई समजून घ्यायची असेल तर किरण नगरकरांच्या कादंबऱ्या आहेतच की! परंतु ‘अधांतर’मधील डिलाईल रोड- लालबाग-परळ या गिरणगावातल्या कामगारांचा पराजित संघर्ष अजूनही धग असलेल्या निखाऱ्यांसारखा जिवंत आहे. प्रयोगात्मक कसरतींना बळी पडून आपल्या बेकारीच्या प्रश्नाचे हसे करून घेणे गर अन् सरासर बेजबाबदारीचे आहे.

‘बलुतं’ने जुन्या मुंबईचे विहंगम दृश्य उभे केलेले नाही. ‘जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा..’ अथवा ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर..’ अशी कलात्मक कलाकुसर करायला दया पवार, बाबूराव बागूल आणि अण्णाभाऊंकडे वेळ नव्हता. ‘पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची’ असे जन्मल्यापासून त्यांच्या जगण्याचे प्रश्न त्यांना दिवसरात्र भेडसावत होते. सुरक्षित खिडकीत उभे राहून आषाढ-श्रावणाचे कौतुक करायला त्यांच्याकडे कुठे वेळ होता?

हे झाले शहराचे. परंतु ‘बलुतं’मध्ये चित्रित केलेले गाव?

कबूलच- की कितीही गरीब असले तरी मेलेल्या जनावरांचे मांस कोणी खात नाही. रूढार्थाची शिवताशिवत नाही. एक अघोषित करार झाला आहे- ‘तुम्हा तो शंकर सुखकर होवो’ आणि ‘भीमराव के बेटे हम तो जयभीमवाले है.’ कबूल- की कारणाशिवायची कोणती कलागत नसते. एका हॉटेलात चहा पितात मांडीला मांडी लावून सर्वजण. जेवतात एकमेकांच्या घरी. भेटतातही सुखदु:खांत.

आता आमच्यातही शिक्षणाची ‘अर्ज’ नाही. जीवनाभिमुखशिक्षण पसेवाल्यांसाठी. गरीबांची पोरं करतात कला-वाणिज्य. प्राथमिक शाळा ओस पडल्यात. वसतिगृहं आणि आश्रमशाळांची पोरं उपाशी राहतात कैक रात्री. भुकेसाठी धाब्यावर वेटरचं काम करतात. सामाजिक अत्याचार चालूच आहेत. अन्यायाविरोधात संसदीय मार्गाने मोर्चा काढला तर देशद्रोही ठरवले जाते. स्त्रियांना शेर-रोजगार मिळत नाही. दुष्काळी उन्हाळ्यात रोजगार इमानाने घरी बसलेले असतात.

हे केवळ दलितांचे प्रश्न नाहीत. जगणे असह्य़ झालेल्या आत्महत्यांना कौटुंबिक कलहाचे कारण दिले जाते. आता कोणी तमाशाचा फड उभा करीत नाहीत, पण बेरोजगार पोरं स्थानिक पुढाऱ्यांच्या गळाला लागतात. हकनाक गुन्हेगारी अन् धर्माधतेला बळी पडतात.

‘बलुतं’ने चाळीस वर्षांपूर्वी मांडलेल्या प्रश्नांना आता जगड्व्याळ रूप आले आहे. पण म्हणून काही माणसे संघर्ष करण्याचे अन् स्वप्नं पाहण्याचे थांबवत नाहीत. आणि मुख्य म्हणजे ते गप्प बसलेले नाहीत. अभिव्यक्त होताहेत.

अजूनही खूप दूरवर पसरलेत आपले लोक.. सह्य़ाद्रीच्या कडेकपाऱ्यांत, सातपुडय़ाच्या दऱ्यादऱ्यांत. वाट जिथे पोहोचली नाही अशा क्षितिजावर टेकलेल्या माळावर. जातीनिहाय नावे घ्यायला हवीतच का त्यांची? तथाकथित कसल्याही आधुनिकतेच्या सुविधा अजून तिथे पोहोचलेल्या नाहीत. बदल्यात मोबाइल लाँच केलेत आणि पेट्रोलच्या दुचाकी देताहेत हप्त्यांवर. बाकी जगण्याचे शिक्षण ते रस्त्यावरच्या दुकानांच्या पाटय़ा आणि पोस्टरवरून शिकत आहेत. त्यांचे दु:ख, श्रम आणि गुलामीला अजूनही शब्द फुटलेलेच नाहीत. परंतु फार काळ ते अक्षरांच्या दुनियेपासून दूर राहणार नाहीत. या उत्पीडित समूहांतूनच असंख्य नवीन ‘बलुतं’ आकाराला येतील. कारण दु:ख वेशीवर टांगण्याशिवाय अजून तरी रास्त कुठला पर्याय नाही.

anandwingkar533@gmail.com